Thursday, 30 May 2019

बिनबुडाच्या २ टूम !!!

जळगाव शहराच्या व जिल्ह्याच्या राजकारणात २ टूम सध्या सोडल्या जात आहेत. कोणताही आगापिछा नसलेल्या या टुमांमुळे निव्वळ करमणूक होत आहे. पहिली टूम आहे ती भाजप-शिवसेना युती अंतर्गत जळगाव शहराच्या आमदारपदाची जागा शिवसेनेकडे जाणार. ही टूम निव्वळ गप्पा झोडणाऱ्यांनी सोडलेली आहे. जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे तथा राजूमामा हे भाजपचे आहेत. जळगाव मनपात भाजपचे संख्याबळ शिवसेनेच्या ४ पट (५७) आहे. महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे आहेत. लोकसभा निवडणुकीत जळगावकरांनी भाजपला जवळपास ७१ हजारांवर मताधिक्य दिले आहे. भाजपला पूरक असलेल्या सद्यस्थितीत जर जळगाव शहर आमदाराची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली तर भाजपच्या पुढाऱ्यांना मूर्खात काढले जाईल. अजून एक बाब स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे शहर आमदाराची जागा भाजपकडेच राहिल आणि उमेदवार सुध्दा बदलला जाणार नाही.

Tuesday, 28 May 2019

गठ्ठा मतदान सिध्दांत मोडीत !

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाचे विश्लेषण वेगवेगळे गृहितक मांडून त्यातून निघणाऱ्या निष्कर्षावर केले जाते आहे. यात एक निष्कर्ष असाही आहे की, जात-पात आणि समाजच्या गठ्ठा मतदानावर विजयी होण्याचा पूर्वीचा सिध्दांत मोडीत निघाला आहे. याच सिध्दांताच्या बळावर सत्तेत हिस्सेदारी मागणाऱ्या काही बहुचर्चित नेत्यांना मतदारांनी कसे पराभूत केले, या विषयावर काही उदाहरणांसह मी लिहिले आहे. परंतु लोकसभेच्या ५४३ जागांचा एकत्रित निकाल, झालेले मतदान, भाजपला ३०३ जागांसाठी मिळालेले मतदान याच्या टक्केवारीची पडताळणी करताना लक्षात येते की, संपूर्ण भारतातील मतदारांनी जात-पात व समाज याच्या गठ्ठा मतदानाचा संकुचित विचार बाजूला सारुन भाजपने मांडलेल्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला समर्थनषदेणारे मतदान केले आहे. अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या तळागाळातील मतदाराने व्यक्तिगत लाभ वा फायदा याच्याशी संबंधित आमिषे, लांगुलचालन, लोभ बाजूला सारुन आपले 'एक' मत भारतासाठी दिलेले आहे.

Saturday, 25 May 2019

हिस्सेदारीचा राजकीय डाव उध्वस्त

'मोदी है तो मुमकिन है', म्हणत नरेंद्र मोदी पुन्हा दिमाखात पंतप्रधान पदावर आरुढ होत आहेत. मोदींचा हा विजय महाप्रचंड आहे. सन २०१४ मध्ये भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. सन २०१९ मध्ये ३०३ जागा मिळाल्या आहेत. सन २०१४ मध्ये 'मोदी लाट' होती तर सन २०१९ मध्ये 'मोदी त्सुनामी' आली असे म्हटले जाते. या त्सुनामीत कोणाच्या हिस्सेदारीचे राजकीय डाव उध्वस्त झाले ? याचा डोळसपणे आणि वस्तुनिष्ठ विचार करायला हवा.  जात-पात व समाजाच्या संख्याबळावर राजकारण करीत सत्ता, शिक्षण व नोकरीत हिस्सेदारीची मागणी करणाऱ्यांना मतदारांनी उध्वस्त केले आहे. छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील मतदारांनी मोदीच्या बाजूने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा हाच खरा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे.

Saturday, 18 May 2019

बोलती बंद ... पेपरवाल्यांची ... !!!

पंतप्रधानपदी १८१७ दिवस आरुढ झालेल्या (माणसाचे घोड्यावर बसणे या अर्थाने) नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. १७ मे २०१९ ला पहिली आणि शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदींनी ५२ मिनिटे हजेरी लावली. पण पत्रकारांच्या प्रश्नाला भाजप अध्यक्ष अमितशहा यांनी उत्तरे दिली. पत्रकार परिषदेत मोदींचे मौन हे दुसऱ्यादिवशी माध्यमांमध्ये टीकेचा विषय ठरेल हे अपेक्षित होते. अर्थात, शुक्रवारपासून लाईव्ह मीडिया व सोशल मीडियात मोदींना लक्ष केले गेले. सोशल मीडियात मोदी भक्त बैकफूटवर गेले.

Thursday, 16 May 2019

गिरीशभाऊ, बदलाचे वारे ओळखा ...

भारताच्या संसदीय राजकारणात विचार आणि विखार यात प्रचंड परिवर्तन करणाऱ्या लोकसभा  निवडणूक २०१९ ची प्रक्रिया अंतिम चरणात आहे. देशाशी संबंधित राष्ट्रवाद, समाजवाद आणि समानता या ३ विषयांवर २ टोकांच्या विचारात मतदारांची विभागणी झाली आहे. पाश्चात्य मासिक टाईम्सने भारताची विभागणी करणारे नेता असे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. हिंदुत्त्व आणि भगवा रंग याच्या भोवती राष्ट्रवाद व समाजवादाची भूमिका मोदींनी घेतली आहे. दुसरीकडे समाजवाद-समानता आणि एकता या विषयांच्या भोवती विरोधकांनी केवळ आणि केवळ मोदी विरोधाचे कडबोळे तयार केले आहे. कडबोळे एवढ्याचसाठी म्हटले आहे की, प्रत्येक राज्यातील प्रादेशिक सुभेदाराने आपापला हिस्सा कायम ठेऊन मोदी विरोध सुरु ठेवला आहे. अशा वातावरणात लोकसभा निवडणुकीचे निकाल मोदींसाठी फारसे चांगले असणार नाहीत, असा दावा आता विरोधक करीत आहेत. भाजपच्या संभावित टेकूवाल्या सत्तेवर नेतृत्वाचा पर्याय म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या राजकारणात पितामह राजकारणी असलेले शरद पवार यांच्यासारखा विरोधकही नेतृत्व बदलात गडकरींच्या नावाचा उल्लेख करीत आहे. बदलाचे हे वारे सध्या तरी दिल्लीकडे वाहते आहे. मोदींच्या नावावर भाजपने खासदारांच्या साध्या बहुमताचा आकडा २८७ पार केला तर सारेच प्रश्न बाजूला पडतील. पण, मोदी टाळून काही विषय आला तर विरोधकांकडून गडकरी चर्चेत आहेतच. गरज पडेल तेव्हा संघ परिवार गडकरींना पसंती देतो याचा अनुभव २ वेळा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना आला आहे.

Sunday, 12 May 2019

'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगाव आवृत्ती

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हीडीओ' हा प्रचाराचा नवा डीजीटल पैटर्न जन्माला घातला. केंद्रात ५ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी सरकारच्या उलट्यापालट्या मत-मतांतरे, धोरणे आणि टीव्ही, चित्रपट माध्यमात गाजावाजा केलेल्या योजनांचा सरकारी प्रचार आणि वास्तव याची उलटतपासणी करणारे व्हीडीओ राज ठाकरेंनी सादर केले. जळगाव जिल्ह्यातही सरकारच्या अशाच गाजावाजा केलेल्या पंतप्रधान कौशल विकास योजने (PMKVY) च्या लाभार्थी म्हणून ज्याचा व्हीडीओ टीव्ही वरील जाहिरातीत वापरला त्याला ४ वर्षांत योजनेतील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रच दिलेले नाही. 'लाव रे तो व्हीडीओ' ची जळगावीची आवृत्ती समजून घेऊ...

Thursday, 9 May 2019

इंदिरा व राजीव यांनी ओढवून घेतलेले मृत्यू ...

१७ व्या लोकसभा निवडणूक प्रचारात सोनिया, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी गांधी घराण्यातील स्व. इंदिरा आणि स्व. राजीव हे देशासाठी शहीद झाल्याचा वारंवार उल्लेख केला आहे. इंदिरा या पंतप्रधानपदी असताना २ शिख अंगरक्षकांकडून दि. ३१ आक्टोबर १९८४ ला निवासस्थानी मारल्या गेल्या. राजीव हे माजी पंतप्रधान असताना तामीळ टायगर्स (एलटीटीइ) या श्रीलंकास्थित दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात दि. २१ मे १९९१ ला श्रीपेरंबदूर येथे मारले गेले. इंदिरा व राजीव यांच्या या घातपाती मृत्यूमागे त्यांनी घेतलेले निर्णय आणि कृती याचे गुंतागुंतीचे संदर्भ आहेत. देशहितापेक्षा त्यामागे व्यक्तिगत पद-प्रतिष्ठा, कळीचे राजकारण आणि विरोधकांवर मात करणे हिच प्रमुख कारणे आहेत.

Monday, 6 May 2019

'बुकमार्क' गनीभाई मेमन ...

जळगावच्या सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून मोठ्ठे प्रभावलय निर्माण करणारे मित्र गनीभाई मेमन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या सहवासात आलेल्या आंबट-गोड अनुभवांविषयी लिहिण्याची आज खरी संधी. गनीभाई, हे जळगावच्या सामाजिक क्षेत्रात 'बुकमार्क' सारखे आहेत असे मला वाटते. पुस्तकाची पाने अनेक असतात. वाचन करताना ती मागे पुढे उलटवली जातात. आपण कोणत्या पानापर्यंत पोहचलो हे लक्षात ठेवण्यासाठी बुकमार्क वापरावे लागते. बुकमार्क पानांना वेगळे करीत असले तरी ते दोन पानांमधील मध्यस्थाच्या भूमिकेत असते. बुकमार्क म्हणजे पुस्तक नसले तरीळ दोऱ्याने बांधलेले बुकमार्क पुस्तकातील कोणत्याही पानांपर्यंत पोहचू शकते.