Wednesday 3 October 2018

नाना पाटेकरवर आमचा विश्वास आहे !

गेल्या काही दिवसांत दूरचित्रवाहिन्या आणि इंग्रजी, हिंदी अॉनलाईन तथा छापिल माध्यमातून दक्षिणेतील कधी काळी अभिनेत्री असलेली व सध्या अनिवासी भारतीय तनुश्री दत्ता हिने चित्रपट अभिनेता नाना पाटेकरवर गैरवर्तनाचा आरोप लावून नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य व चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही संशयाच्या पिंजऱ्या उभे केले आहे.


तनुश्रीने सन २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटात आयटम साँग करण्याचा करार दिग्दर्शक सारंग सोबत केला होता. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक आचार्य होते. चित्रपटाचा हिरो नाना होता. गाण्याचे दृश्य एका मोठ्या क्लबमध्ये १०० कलावंत आणि इतर ५०० प्रेक्षकांसोबत होते. या गाण्याचे चित्रिकरण करताना नानाने आपल्या शरीराला गैरहेतूने हात लावायचा प्रयत्न केला. त्याच्या कृत्याला आचार्य व सारंग यांची साथ होती. शरीराला हात लावू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर मला चित्रपटातून काढले गेले. या घटनेनंतर नानाने महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या करवी आपल्या गाडीवर हल्ला केला. तिची मोडतोड केली. यामुळे माझे आर्थिक, मानसिक नुकसान झाले होते. असा तनुश्रीचा आरोप आहे. हे प्रकरण १० वर्षांपूर्वीचे आहे. तेव्हा तनुश्रीने या प्रकरणाची तक्रार पोलिसात व चित्रपट कलावंतांची कार्यकारी समिती 'सिंटा'कडे केली होती. नंतर चर्चा होवून प्रकरण मिटले होते.

तनुश्रीला गाण्यातून वगळल्यानंतर तेच गाणे 'आयटम साँग क्विन' राखी सावंतला घेऊन चित्रीत झाले होते. तनुश्री 'हॉर्न ओके प्लीज' मधून बाहेर झाल्यानंतर जवळपास अज्ञातवासात गेली. सध्या ती अमेरिकेत राहत असून तिला तेथे रहिवासाचे ग्रीन कार्ड मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी ती भारतात सुट्या घालवण्यासाठी आली असून तिने १० वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरुन काढत नानाच्या बदनामीची मोहिम चालवली आहे. दुसरीकडे ती अमेरिकेतील कायदे व न्याय व्यवस्थेची भलावण करीत असून भारतीय न्याय व्यवस्थेलाही तुच्छ म्हणत आहे.

अमेरिकेतील चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील काही अभिनेत्रींनी त्यांच्या लैंगिक छळाच्या कहाण्या उघडपणे माध्यमांच्या समोर मांडल्या. त्यानंतर 'मीटू' हा सामायिक परवलीचा शब्द सोशल मीडियात घेऊन भारतातील काही अभिनेत्रींनी सुध्दा 'मीटू' अंतर्गत आपले अनुभव शेअर केले आहेत. हाच धागा पकडून तनुश्रीने १० वर्षांपूर्वीचा घटनाक्रम सांगून नानाची बदनामी करीत स्वतःला सहानुभूती मिळवली आहे.

तनुश्रीची बाजू उचलून धरत अभिनेत्री रेणुका शहाणेने नानावर आरोप करणारे जाहिर पत्र लिहिले आहे. यात ती नानाला तापट स्वभावाचा व महिलांचा अवमान करणारा म्हणते. पण रेणुकाने नाना सोबत कधीही काम केलेले नाही. तनुश्रीला प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर आदींनी पाठींबा दर्शविला आहे. दुसरीकडे राखी सावंतने तनुश्रीला तिच्याच भाषेत खोटारडी ठरवून अर्वाच्य भाषेत उत्तर दिले आहे. तनुश्रीने मध्येच गाणे सोडल्यामुळे सारंग यांचे कसे आर्थिक नुकसान झाले हे राखीने सांगितले आहे. अभिनेता आयाज खानने नानाची उघड बाजू घेत तनुश्रीच्या आरोपांवर शंका घेतली आहे.

तनुश्रीने नानाच्या विरोधात केलेल्या आरोपातून चित्र असे उभे राहते की, आयटम साँगमध्ये तनुश्री नाचते आहे. तेथे नाना सुध्दा आहे. नानाने तनुश्रीच्या शरीराला गैरहेतुने स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे. तनुश्रीला ते आवडले नाही. तिने काम थांबवून आचार्य व सारंगकडे हरकत नोंदवली. ती तेथून निघून जात असताना नानाने मनसेचे गुंड बोलावून तनुश्रीची गाडी फोडली. नंतर पोलीस केस झाली. अभिनेत्यांच्या समिती 'सिंटा'कडे तनुश्रीने तक्रार केली. अशा प्रकारे उभे राहणारे चित्र नानाला खलनायक ठरवते. नाना नाचताना तनुश्रीच्या अंगचटीला गेला असेच डोक्यात फिट्ट बसते. तनुश्रीच्या बाजूने घटनेच्या स्थळी त्या दिवशी उपस्थित महिला पत्रकार जैनिस सिकेरिया हिने ट्विट करुन म्हटले आहे की, तनुश्री जे जे सांगते आहे ते खरे आहे. ट्विटरवरची ही साक्ष वाचून नाना गुन्हेगार असल्याचेही निश्चित होवून जाते. त्यानंतर तनुश्रीला समर्थन देणाऱ्यांच्या प्रतिक्रिया  पाहून नाना घृणास्पद वाटायला लागतो. मात्र कोणाचेही मौखिक उच्चारण अथवा बोलघेवडेपणा हा घटना घडल्याचा पुरावा ठरत नाही. नानाच्या विरोधात असा एकही पुरावा नाही. कारण ते तसे घडलेच नाही, हे आता इतर अनुषंगिक उदाहरणांनी समोर येते आहे.

तनुश्रीने नानावर आरोपांची चिखलफेक सुरुच ठेवली आहे. ती म्हणते, नानाला हिरो होता आले नाही, म्हणून त्याने असे कृत्य केले. नानासारख्या बदमाश माणसासोबत आजही चित्रपट क्षेत्रातील लोक काम करीत आहेत. नानाच्या चिथावणीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडी मोडली. राज ठाकरे मुंबईत तोडफोड करीत असतो. त्याला बाळासाहेब ठाकरेची खूर्ची मिळाली नाही वगैरे. नाना वरील गैरवर्तनाच्या आरोपाभोवाती बदनामीच्या इतर चिंध्या अशा लपेटल्या जातात. खरे तर या घटनेशी संबधित स्वतः नाना, आचार्य व सारंग यांची बाजू माध्यमे जाणून घेत नाहीत.

नाना म्हणतो, बदनामी करणाऱ्यांच्या आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही. घटना घडली तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री ही मला मुली समान आहे हे म्हटले होते. ती आज १० वर्षांनी असे का म्हणते ? मला समजत नाही. मी कायदेशीर मार्गाचा विचार करेन. आचार्य म्हणतो, तनुश्री म्हणते असे काहीच झाले नाही. तिला नृत्याच्या काही टेप्स आवडल्या नाही. तिने तसे करायचे नाकारले. नंतर तीने चित्रपट सोडला. नाना व आचार्यच्या खुलासानंतरही तनुश्री आपलेच म्हणणे खरे असल्याचे सांगत आहे. मात्र 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नेमके काय घडले होते ? हे सारंग यांच्या सांगण्यातून उलगडत जाते.

सारंग म्हणतात, तनुश्रीला आम्ही आयटम साँगसाठी घेतले होते. आयटम साँग म्हणजे, भक्तिगीत नाही. आयटम साँग म्हणजे नर्तकीचे कमी कपड्यातले नृत्य. हे तनुश्रीला माहित होते. अशा नृत्यात नर्तकीसोबत हिरो नाचणार हे निश्चित असते, नाना हिरो होता. तो तनुश्री सोबत काही टेप्स करणार होता. आयटम साँग तीन दिवस चित्रीत होणार होते. पहिल्या दिवशी एकट्या तनुश्रीवर चित्रीकरण झाले. दुसऱ्या दिवशी काही स्टेप तनुश्री व नानाने एकत्र केल्या. तेव्हा काहीही आक्षेपार्ह नव्हते. पण तिसऱ्या दिवशी तनुश्री सेटवर घुश्श्यात आली. मला म्हणाली, नानाने आचार्यला सांगून काही स्टेपमध्ये माझ्या अंगाला स्पर्श करायचे दृश्य घुसडवायचे ठरविले आहे. मी तसे करणार नाही. असे म्हणून ती तिच्या मेकअप व्हैनमध्ये निघून गेली. हा प्रकार घडला तेव्हा नाना तेथे नव्हता. त्याला हा प्रकार माहित नव्हता.

सारंग पुढे सांगतात, तनुश्री शुटींग सोडून गाडीत बसल्याची चर्चा फिल्मिस्तान स्टुडीओत पसरली. तेथे पत्रकार होतेच. ते तनुश्रीच्या गाडीजवळ आले. तेथे इतरही लोक होते. सुमारे ४ तास तनुश्री मेकअप व्हैनमध्ये होती. नंतर तिची दुसरी गाडी आली. मेकअप व्हैनमधून दुसऱ्या गाडीत जावून ती बसली. तेथे तिचा बाईट घेणेसाठी पत्रकार व फोटोग्राफरचा गराडा पडला. यात एकाचा कैमेरा मोडला. तो तनुश्रीच्या गाडीच्या काचेवर कैमेरा आपटू लागला. गाडी सुरु करुन ती पुढे घेताना एकाच्या पायावरुन टायर केले. तो ओरडून गाडीमागे धावला. तनुश्रीची गाडी फिल्मिस्तानच्या गेटवर अडवली गेली. तेथे पुन्हा गर्दी गोळा झाली. ज्याचा कैमेरा मोडला होता तो काचेवर धडका मारत होता. एकजण गाडीच्या टपावर चढून कुदला. दुसऱ्याने हवा सोडली. अखेरीस पोलीस व्हैन आली. पोलिसांनी तनुश्रीला सुरक्षित बाहेर काढले.

अर्थात, सारंग जसे सांगतात तशा तीन व्हीडीओ क्लिप सध्या युट्यूबवर दिसतात. पहिल्या एका व्हीडीओत तनुश्री नृत्याच्या स्टेप करते आणि नंतर जाऊन मॉनिटरवर पाहते. तेथे बाजूला उभा आचार्य दिसतो. दुसऱ्या एका व्हीडीओत तनुश्री गाडीत बसलेली. एकजण गाडीच्या टपावर आणि एकजण गाडीच्या काचेवर कैमेरा आपटताना व नंतर टायरची हवा सोडताना दिसतो. याचाच अर्थ, सारंग म्हणतो त्यानुसार तनुश्रीच्या गाडी भोवती मनसेचे नव्हे तर माध्यमातील पत्रकार व कैमेरामनचा घोळका होता हे सिध्द होते. तिसरा व्हीडीओ तेव्हाचा टीव्हीचा कैमेरामन पवन भारद्वाज याचा आहे. तो संपूर्ण घटना सांगून आपला कैमेरा कसा मोडला होता ते सांगतो. याच घटनेला दुजोरा देणारी प्रतिक्रिया तेव्हाचा टीव्हीचा दुसरा रिपोर्टर वासिम अख्तर याने दिली आहे. तो म्हणतो, तनुश्रीच्या गाडीजवळ पवन भारद्वाज याचा कैमेरा मोडला होता. त्यामुळे तो गोंधळ घालत होता.

दरम्यान, आचार्य याची सहनृत्य दिग्दर्शिका डेझी शहा हिने सुध्दा चित्रीकरण तीन दिवस होते. पहिले दोन दिवस सर्व काही छान झाले. पण तिसऱ्या दिवशी तनुश्री गाडीत जाऊन बसली. काय झाले ? हे मला समजले नाही असा दावा केला आहे.

तनुश्री नृत्याचे काम सोडून गेली आणि तिने नानावर आरोप केला हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी सारंगने नानाला सांगितले. ते ऐकून नानाच्या डोळ्यांत पाणी आले. नानाने पत्रकार परिषद घेतली आणि तनुश्री मला मुली सारखी असून तीने माझ्यावर गैरवर्तनाचा आरोप का केला हे मला समजत नाही, असे सांगितले. हे सुध्दा जुन्या बातम्यांमधून समोर येते.

तनुश्रीने दावा केल्यानुसार अभिनेत्यांच्या कार्यकारी समिती 'सिंटा'कडे तिची तक्रार होती. त्यावर दोन्ही पक्ष एकत्र बसले. तनुश्रीने भरपाई ५ लाखांची मागितली. ती सारंगने दिली आणि विषय मिटला असेही तथ्य समोर येते. आज उपलब्ध माहितीनुसार 'सिंटा'च्या कार्यकारी समीतीकडे तनुश्रीने मार्च २००८ मध्ये तक्रार केली होती. त्यानंतर 'सिंटा' आणि आयएफटीपीसीची संयुक्त तक्रार निवारण समितीने या प्रकरणावर जुलै २००८ मध्ये निर्णय दिला. त्यात तनुश्री सोबत केलेल्या असभ्य वर्तणुकीचा उल्लेख नाही. हे सत्य आज समोर आले आहे. तनुश्री म्हणते तसा प्रकार होवून १० वर्षे झाली. आता 'सिंटा'कडून कारवाई होऊ शकत नाही कारण घटनेच्या किमान तीन वर्षांत तक्रार करावी अशी 'सिंटा'ची अट आहे.

म्हणजेच, संपूर्ण घटनेमागे निर्माण केलेली साशंकता हळूहळू स्पष्ट होत जाते. सारंगने सांगितलेला तीन दिवसांचा घटनाक्रम जुळतो. त्याला काही दृश्य पुरावे आहेत. नानाचा आणि तनुश्रीचा अंगचटीला आल्याचा कथित प्रकार घडलेला नाही हे सुध्दा स्पष्ट होते. नृत्त्य दिग्दर्शक आचार्यने सूचविलेल्या स्टेपला तनुश्रीची हरकत होती. पण आयटम साँगमध्ये असे दृश्य गृहित असतेच हा सारंगचा दावा खरा वाटतो. शिवाय, तसे दृश्य नानाने सांगितले असावे किंवा नानाला तसा रस होता हे मात्र थेट सिध्द होत नाही. पवन व अख्तर यांचे कथन हेच सिध्द करते की, तेथे मनसेचे गुंड नव्हते. तर तो वाद माध्यम प्रतिनिधींशी तनुश्रीने ओढवून घेतला होता.

आता प्रश्न हा पडतो की, तब्बल १० वर्षे शांत बसून अमेरिकेत राहणारी तनुश्री आज हा आरोप का करते आहे ? नानाला का टार्गेट करते आहे ? याचा शोध घेताना संशयाच्या तर्काची सूई खान मंडळींकडे जाते. नाना व तनुश्रीच्या वादात सलमानने थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. अमीरने मात्र नानाविषयी शंका घेता येईल असे वक्तव्य करुन चौकशी व्हायला हवी असे म्हटले आहे. शाहरुख काही बोललेला नाही. सलमान हा बीग बॉसचा प्रमुख आहे. तनुश्री भोवती वादाचे वलय उभे करुन तिला बीग बॉसमध्ये घुसवायचा त्याचा प्रयत्न असावा असा तर्क आहे. यापूर्वी अनिल थत्ते हा पत्रकार या बीग बॉसमध्ये होता. त्याने हा तर्क मांडून तनुश्री बीग बॉसमध्ये प्रवेशासाठी नानाला बदनाम करीत असल्याचे म्हटले आहे.

नाना आणि खान मंडळींचे फारसे सख्य नाही. नानाने सलमान, शाहरुख व अमीरचा उल्लेख यापूर्वी 'खानावळी' म्हणून केला आहे. सलमानने यापूर्वी पाकिस्तानी कलावंताचे स्वागत करणारी भूमिका घेतली होती. तेव्हा नानाने पाकिस्तानी कलावंतांवरील बंदी योग्य ठरवून सलमान सारख्या लोकांना देशासमोर 'खटमल' म्हटले होते. अमीर हा देशातील काही सामाजिक प्रश्नावर 'सत्यमेव जयते' सारख्या मालिका करुन आपला सामाजिक चेहरा साकारत असतो. दुसरीकडे नाना व मकरंद अनासपुरे यांनी पदरचे पैसे खर्च करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद सैनिकांच्या वारसांना मदत केली आहे. नाना व मकरंद यांचे नाव 'नाम फाऊंडेशन' मुळे चर्चेत आहे. अमीर 'पानी फाऊंडेशन' चा गवगवा करतोय. बहुधा या मागील सुया- असुया असू शकते.

तनुश्रीच्या आरोपासंदर्भात बीग बी अमिताभने अत्यंत संयत शब्दात प्रतिक्रिया देणे टाळले. अमिताभ म्हणाले, माझे नाव तनुश्री नाही व मी पाटेकरही नाही. मी का प्रतिक्रिया  देऊ ? अर्थात अमिताभच्या या प्रतिक्रियेवर तनुश्रीचा जळफळाट झालेला आहे. ती म्हणते, ज्येष्ठ लोक नानाचा निषेध का करीत नाही ? पण एखाद्या अभिनेत्रीने निराधार आरोप केल्याने आपली केवळ बदनामी होते याचा अनुभव स्वतः अमिताभने घेतला आहे. तनुश्री प्रमाणेच चित्रपट क्षेत्रातून बाहेरच्या देशात अभिनेत्री परवीन बाबी गेली होती. परवीन ही अमिताभची समकालिन होती. दोघांनी काही चित्रपटात सोबत काम केले. काही काळ ती सुध्दा भारतातून विदेशात गेली होती. कालांतराने ती भारतात परत आली. मात्र येथे आल्यावर तिने अमिताभवर थेट आरोप केला होता की, अमिताभने मला पळवून ठार मारायचा प्रयत्न केला. अर्थात, तेव्हा परवीन ही मानसिक विकाराने ग्रस्त होती म्हणून कोणीही तिच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवला नाही. पण अमिताभची काही काळ बदनामी झाली होती. आज तनुश्री नाना बाबत असेच काही तरी करते आहे.

वरील प्रमाणे विविध जुळणाऱ्या कड्या आणि खुलासे लक्षात घेतले तर नानाचा तनुश्रीच्या अंगचटीला जाण्याचा थेट प्रसंग कुठेही दिसत नाही. जी काही चर्चा आहे ती तनुश्री म्हणते म्हणून. उलटपक्षी घटनेचे जे जे विश्वासार्ह साक्षिदार आहेत, ते तनुश्रीच्या हेतू विषयी शंका दाखवतात. म्हणूनच आपला मराठी मर्द गडी नाना पाटेकर चुकीचे काही करणार नाही हा विश्वास सार्थ ठरतो. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील हा मराठी कलावंत वाकड्या वाटेला जाईल असे वाटत नाही. कारण नानाने पत्नी निलकांतीशी असलेला दुरावा कधी लपवला नाही. इतर अभिनेत्रीशी असलेली जवळकी सुध्दा कधी नाकारली नाही. नाना आहेच आपला रांगडा मराठी माणूस !!!

(नानाच्या बदनामीमागे त्याची मनसेशी असलेली सलगी कारणीभूत असावी असाही तर्क आहे)

(वैधानिक खुलास - महिलांच्या शील रक्षणाच्या वैयक्तिक अधिकाराचा आदर लेखक करतो. 'मीटू' अभियानातील अभिनेत्रींसोबत पुरुषी गैरप्रकाराच्या ज्या ज्या घटना खऱ्या आहेत, त्याचा तीव्र शब्दांत निषेध आहे.)

2 comments:

  1. सुंदर तर्कसंगत विश्लेषण! आपल्या प्रतिभेला कमी लेखत नाही,पण सुशीलजींच्या सहवासाचा परिणाम असावा बहुधा! अगदी खरंय,दहा वर्षे काय झोप लागली होती का तनुश्रीला?

    ReplyDelete
  2. परखड विश्लॆषण सर.नानाला पाठिंबा

    ReplyDelete