Tuesday 18 September 2018

बच्चा लोग ... ताली बजाव !

सन १९९२/९३ मधील जळगाव शहरातील राजकीय इतिहास डोळ्यांसमोर येतो. नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीची बहुमताची सत्ता तेव्हा होती. स्व. बबन बाहेती, स्व. नरेंद्र पाटील, छबीलदास खडके, उल्हास साबळे असे दोन चार जण विरोधक म्हणून असायचे. पालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी असली की सत्ताधारी गटाची पार्टी मिटींग सुरेशदादांच्या निवासस्थानी व्हायची. सभेत अजेंड्यावरील विषय कसे मंजूर करायचे याचा फार्स तेथे निश्चित व्हायचा. प्रत्यक्ष सभेत एका कोपऱ्यात गफार मलिक, दुसऱ्या कोपऱ्यात बंडू तथा पांडुरंग काळे तिसऱ्या कोपऱ्यात शिवचरण ढंढोरे व चौथ्या कोपऱ्यात करीम सालार बसायचे.


सभेला सुरुवात व्हायची. सभा सचिव पहिला विषय  श्रध्दांजलीचा वाचायचा. दोन मिनीटे मौन पाळले जायचे. त्यानंतर दुसरा विषय मागील सभेचे प्रोसेडींग वाचून मंजूर करणे असायचा. या विषयांचे रितसर वाचन व्हायचे आणि त्याला आवाजी मंजुरी दिली जायची. त्यानंतर पुढील तिसऱ्या विषयापासून वाचन सुरु झाले की, चारही बाजूने सालार, ढंढोरे, काळे व मलिक उभे राहचे आणि अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर ...मंजूर असे ओरडत सभा गुंडाळून टाकायचे. अध्यक्षस्थानी असलेले सुरेशदादा सर्व विषय मंजूर म्हणत पट्कन सभागृहाच्या बाहेर जायचे. सभेचा मूळ अजेंडा ७/८ विषयांचा असायचा आणि आयत्या वेळेच्या विषयांच्या अजेंड्यावर २०० पेक्षा जास्त विषय असायचे. अजेंड्यासोबत मुख्याधिकाऱ्याने दिलेली टीपणी वा कायदेशीर हरकती कोणीही वाचायचे नाही. विषय निहाय विरोधाची तयारी करुन आलेले बाहेती, पाटील, खडके व साबळे हे चौघे जागेवर बसून असाचे आणि सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक मंजूर ... मंजूर ओरडत सभागृहाच्या बाहेर निघून जायचे. अवघ्या १० मिनिटात २०० वरील विषय चुटकीसारखे मंजूर व्हायचे. त्यानंतर विरोधातील चौघेजण सभा सचिवाकडे जावून विषय निहाय आमचा विरोध नोंदवा असा आग्रह करायचे. सभेचे प्रोसेडींग लिहिताना सूचक व अनुमोदक म्हणून सत्ताधारी गटातील ठराविक ३/४  जणांची नावे लिहिली जात.

तेव्हा विरोधक फारशा पत्रकार परिषदा घेत नसत. सभा संपली की लाकडी जीन्याजवळ उभे राहूनच हे चौघे विरोधक आपली भूमिका पत्रकारांना सांगत. तेथे स्व. बबन बाहेती सुरेशदादांच्या कार्यशैलीचे नेहमी एक उदाहरण सांगायचे. बाहेती म्हणायचे, शहर विकास आघाडी म्हणजे, सुरेशदादांचा डोंबाऱ्याचा खेळ आहे. डोंबारी जसा चौकात खेळ लावतो तसा सुरेशदादा पालिकेत खेळ लावतात. डोंबारी जसा दोरीवर बायको,  मुलगा किंवा मुलीला चढवतो तसे सुरेशदादा दर सहा महिन्याला एकाला नगराध्यक्ष म्हणून पदावर चढवतात. हा खेळ पाहणाऱ्या जळगावकरांना वाटते आता सुरेशदादा काहीतरी जादू दाखवतील. पण हा डोंबारी जादू काही दाखवत नाही. तो फक्त ढोल वाजवतो आणि पाहणाऱ्यांना सांगतो, 'बच्चा लोग ... ताली बजाव'. अगदी तसेच पालिकेत चालते. सत्ताधारी गटाची अमर्याद सत्ता (बहुमतापेक्षा जास्त संख्या) असल्याने सर्व साधारण सभेत असा जंबुऱ्याचा खेळ चालतो. दोरीवरची महिला, मुलगा किंवा मुलगी कसरत करते आणि पाहणारे फक्त टाळ्या वाजवातात.

आज तब्बल २५/२६ वर्षानंतर स्व. बबन बाहेतींनी सांगितलेला हा डोंबाऱ्याचा खेळ आणि दोरीवर चढलेल्या महिला व मुलांची आठवण येते. सन २०१४ मध्ये भारतीय मतदारांनी 'अच्छे दिन' च्या अपेक्षेने सत्ता परिवर्तनाचा कौल केंद्रात व त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने राज्यात दिला. केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीमुळे मतदारांसाठी खरेच अच्छे दिन आले किंवा नाही हा तूर्त विषय नाही. पण २०१४ पासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षातील नेत्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अच्छे दिन नक्कीच आले. सत्तेत भागीदार होणाऱ्या नेत्यांनी डोंबाऱ्यागत ढोल बदडून निवडणुका जिंकल्या आणि दोरीवर चढवताना आपापल्या कुटुंबातील महिला, मुले, मुली यांना चढवले. पक्षाच्या पातळीवर असलेले कार्यकर्ते मात्र, 'बच्चा लोग ... ताली बजाव' करीत राहिले.

डोंबाऱ्याच्या खेळात एक जमुरा असतो. हा जमुरा म्हणजे सांगकाम्या. डोंबारी म्हणतो, 'बोल जमुरे ... गुलाटी लगायगा ?' त्यावर जमुरा कोलांटी मारतो. डोंबारी म्हणतो, 'बोल जमुरे ... नाचेगा ?' त्यावर जमुरा नाचून दाखवतो. मग डोंबारी म्हणतो, 'बोल जमुरे ... दोरीपर चढेगा ... ?' जमुरा हो म्हणतो. दोरीवर चढायचा प्रयत्न केल्याचे दाखवतो. पण तो चढत नाही. कारण त्याला चढता येत असले तरी तसे करायचा हक्क त्या सांगकाम्याला नसतो. त्या दोरीवर चढायचा हक्क डोंबाऱ्याच्या बायको, मुलगा किंवा मुलीलाच असतो. जमुरा तर खेळ लावायच्या आणि आवरायच्या कामाचा असतो. अर्थात, असा खेळ लावून जेव्हा दोरीवर डोंबाऱ्याच्या कुटुंबातील कोणीही चढते तेव्हा तेथे घराणेशाही राहत नाही. कारण, तेव्हा डोंबाऱ्याने वारंवार बघ्यांकडून टाळी वाजवून घेतलेली असते आणि आपली जादू साधून घेतली असते.

डोंबाऱ्याच्या अशा खेळाचे प्रयोग ज्यांना राजकारणात साध्य होतात अशी हुशार, चतुर मंडळी सत्तेच्या दोरीवर (पदांवर) आपापल्या कुटुंबातील घटकांना बरोबर चढवून घेतात. अशा खेळात कार्यकर्ते व मतदार मात्र 'बच्चा लोग ... ताली बजाव' या भूमिकेत असतात. विशेष म्हणजे अशा खेळातील मंडळींना मुक्ताईनगरची मुक्ताई, शेंदुर्णीचे त्रिविक्रम महाराज आणि जळगावची महालक्ष्मी प्रसन्न असते. स्व. बाहेतींनी सांगितलेला ताली बजावचा हा किस्सा ताज्या अनेक घटनांना लागू होतो. गारुडी बदलतो. त्याचे कुटुंब बदलते. पण दोरी तीच असते आणि टाळी वाजवणारेही तेच असतात.

(वैधानिक इशारा - वरील लेखन हे स्व. बबन बाहेती यांची आठवण म्हणून केले आहे. सद्यस्थितीतील राजकारणाशी या लेखनाचा काडी मात्र संबंध नाही.)

3 comments:

  1. जलगाव शहराच्या जनतेने विचार करणे सोडून दिल आहे.जो कुणी दिवा स्वप्न दाखवेल त्याच्या मागे मेंढरासारख जाण्यात शहरवासियांना धन्यता वाटते हे दुर्दैव आहे.बाप्पा जलगावकरांना सद्बुद्धी दे.

    ReplyDelete
  2. सरजी खूप छान विश्लेषण . आजच्या राजकारणालाही चपखल बसणारा हा गारुडीरूपी खेळ आहे. मदारी बदलले तरी खेळ तोच आहे . बजाव ताली ...

    ReplyDelete