Sunday 2 September 2018

नाथाभाऊंना माध्यमांचा चकवाच !

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस. त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षात खडसेंची राजकीय कोंडी करण्यात आली आहे. फारसा आगापिछा नसलेल्या कथित आरोपांच्या भोवऱ्यात खडसे पक्षांतर्गत एकाकी पडले आहेत. अशा स्थितीत आगतिक झालेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या संदर्भात केलेले वक्तव्य आठवले. खडसेंनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, 'सत्य माहित झाल्यानंतर माध्यमांनी मला न्याय मिळवून द्यायला हवा !' अर्थात, खडसेंवर झालेल्या अनेक आरोपांपैकी एकही आरोप न्यायालयाच्या कक्षात साधार पुराव्यांसह साबीत झालेला नाही. या सोबत दुसरी बाजू अशीही आहे की, खडसेंवरील सर्वच आरोप निराधार असल्याची क्लिनचीट भाजप नेतृत्वातील सरकारने दिलेली नाही. म्हणून खडसेंची सत्तास्थानावरील वापसी होण्याची तुर्तास शक्यता नाही. याची जाणिव खडसे यांनाही असून काही दिवसांपूर्वी ते स्वतःच म्हणाले आहेत, 'मला मंत्रीपद मिळण्याची 'ती योग्य वेळ' परत कधी येणार नाही.'राजकारणात व समाजकारणात अशा प्रकारे असहाय्य होण्याची वेळ खडसेंप्रमाणे अद्याप कोणत्याही राजकीय नेत्यावर आलेली नाही. आपल्याच पक्षाची सत्ता असताना सरकार व प्रशासन न्याय तडीस नेत नाही. समाजाचा आधारही डळमळीत होत आहे. तेव्हा खडसेंनी सहाजिकपणे माध्यमांकडून न्यायाची अपेक्षा करणे उचित ठरते. पण खडसेंच्या अर्धशतकाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर खडसेंना माध्यमांनी सतत चकवा दिल्याचेच दिसते. दोन वर्षांपूर्वी जेव्हा खडसेंच्या विरोधात आरोपांच्या फैरींची रचना ठरवून व एकापाठोपाठ सुरु होती तेव्हा खडसे म्हणाले होते, 'ही तर माझ्या विरोधात मीडिया ट्रायल आहे.' खडसेंनी अशा मीडिया ट्रायालचा अनुभव पूर्वापार घेतला आहे.

खडसेंचा राजकारणातील प्रवेश हा साधारणतः १९७८ पासूनचा. १९८२ मध्ये ते पंचायत समितीचे सदस्य झाले. १९८४ मध्ये ते कोथळीचे सरपंच झाले. कोथळी हे मुक्ताईनगर (जुना एदलाबाद) तालुक्यातील गाव आहे. तो काळ काँग्रेसच्या एकछत्री वर्चस्वाचा होता. गल्ली ते दिल्ली सत्ता काँग्रेसची होती. सहकार क्षेत्रातही काँग्रेसी नेते वरचढ होते. १९९० मध्ये खडसे एदलाबाद मतदार संघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा उत्तर महाराष्ट्रातून निवडून आलेले ते एकमेव आमदार होते. अशा वातावरणात काँग्रेसमधील मंडळींच्या ताब्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे खडसेंनी पुराव्यानिशी विधी मंडळात मांडली. यात जळगाव जिल्हा सहकारी बँकेची प्रकरणे सुध्दा होती. खडसेंनी विधानसभेतही मांडलेल्या प्रश्नांच्या बातम्या मुंबईच्या दैनिकात सिंगल कॉलम प्रकारात प्रसिध्द होत.  जळगाव येथून प्रसिध्द होणाऱ्या तीन जिल्हा दैनिकात फारशा प्रसिद्ध होत नसत. कारण, ती वृत्तपत्रे काँग्रेस धार्जिणी होती.

साधारणतः १९९२ ते १९९४ च्या सुमारास जळगाव शहरात विविध प्रकारच्या विवादास्पद घटना घडल्या. विधानसभेत निर्णय होऊन तेव्हाची जळगाव नगर पालिका बरखास्त करण्यात आली होती. या राजकीय घडामोडीत खडसेंना विधीमंडळात बोलायची संधी मिळाली. तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षपदावर असलेल्या स्व. मधुकरराव चौधरी यांनी खडसेंना बोलायची संधी दिली. खडसेंची तेव्हाची वक्तव्ये मुंबईच्या दैनिकात प्रकाशित झाली. मात्र, जळगावहून प्रकाशित होणाऱ्या दैनिकातून खडसेंना फारशी प्रसिध्दी मिळाली नव्हती. पालिका बरखास्तीमुळे चौधरी - अरुण गुजराथी - खृडसे विरोधात सुरेशदादा जैन असा अध्याय पहिल्यांदा लिहिला गेला.

१९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तेत आले. खडसेंना मंत्री होण्याची संधी मिळाली. १९९७ ते १९९९ पाटबंधारे खाते खडसेंकडे होते. खडसेंनी तापी पाटबंधारे महामंडळ स्थापन केले. या महामंडळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची वृत्तमालिका जैनांशी संबंधित दैनिकातून सुरु झाली. खडसे विरोधातील ती 'पहिली मीडिया ट्रायल' होती. जळगाव पालिका बरखास्ती आणि राजकारणातील इतर सत्तास्थानांसाठी स्पर्धेचे कारण या मीडिया ट्रायलमागे होते.

त्यानंतर सन २००९ मध्ये खडसे विधी मंडळात विरोधी पक्ष नेते झाले. खडसेंनी अत्यंत आक्रमकपणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची, मंत्र्यांची गैरकारभाराची शेकडो प्रकरणे समोर आणली. खडसेंनी स्वतःचे राजकीय वजन एवढे वाढविले की, सत्तेतील कोणतीही राजकीय डील हि विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन करावी लागत असे. अगदी राज्याचा अर्थ संकल्प मंजूर करण्यापूर्वी अजित पवार खडसेंशी बोलत. खडसेंचे हे वाढलेले प्रस्थ पाहून तेव्हा ज्येष्ठनेते शरद पवार यांनी खडसेंवर अत्यंत शेलका आरोप करीत म्हटले होते की, 'विरोधी पक्षनेते हे तोडीपानी करणारे आहेत.' पवारांचे हे वक्तव्य खडसेंची सार्वत्रिक बदनामीचा कळस होता. त्यानंतरही मुंबईतील काही दैनिकातून खडसे विरोधात 'दुसरी मीडिया ट्रायल' झाली.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत रावेर मतदार संघातून खडसेंच्या सुनबाई श्रीमती रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करायला खडसेंनी मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर पत्रकारांचे स्नेहभोजन आयोजित केले होते. या  साग्रसंगित मैफलीत गिन्याचुन्या संपादकांच्या समोर खडसेंनी माध्यमांवर केलेल्या खर्चाची तोंडी आकडेवारी सादर केली होती. माध्यमांचे संपादक तेव्हा निमुटपणे तिर्थपान करीत गप्प बसले होते. कोणाचे किती रुपयांचे 'पीएन' पैकेज होते याचा उल्लेखच खडसेंनी केला होता. अशा प्रकारे खडसेंनी त्या दिवशी संपादकांची मीडिया ट्रायल केली. मीडिया वरील खडसेंचा राग नंतर अनेक वेळा निघत राहिला.

राज्यात भाजप नेतृत्वातील युती सरकारचे बरे चालले आहे असे वाटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खडसेंमधील विवादाच्या बातम्या मुंबईतून पेरल्या गेल्या. मंत्ररिमंडळाच्या बैठकीत खडसे इतर मंत्र्यांच्या अधिकारावर अधिक्रमण करतात अशाही बातम्या प्रसिध्द झाल्या. शिवाय, 'मला मुख्यमंत्री व्हायची ईच्छा आहे' असे खडसे पंढरपुरात म्हणाले. दुसरीकडे खडसेंनी साम, दाम, दंड व भेद वापरत जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख सहकारी संस्था ताब्यात घेतल्या. पण तेथील नेतृत्व स्वतःच्या कुटुंबियांना दिले. हा विषय सुध्दा मीडिया ट्रायलसाठी पूरक ठरला. यामुळे खडसे काही जणांच्या टार्गेट रेंजवर आले.

त्यानंतर २०१५ च्या अखेरीस खडसेंच्या विरोधातील मीडिया ट्रायलचा अंतिम फार्स सुरु झाला. कृषि विभागाच्या नेट योजनेचा व्यक्तिगत लाभ, कथित पीए गजानन पाटलाचे ३० कोटींची लाच मागण्याचे प्रकरण, खोटे डीजिटल पुरावे पेरुन खडसेंचे कराचीस्थित दाऊशी फोनवर संपर्क, वाळू माफियाच्या त्रासातूनपोलीस निरीक्षक सादरे आत्महत्या, पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी, जामनेर येथे उद्योग प्रकल्पासाठी जागा खरेदी, जावायाची लिमोझीन कार नोंदणी, अपसंपदा गोळा करणे असे अनेक आरोप खडसेंच्या मानगुटावर बसले. या सर्व आरोपांच्या घेऱ्यातून सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न खडसेंनी केला. एक दोन प्रकरणात प्रशासनाकडून क्लिनचीट मिळाली. पण भोसरी भूखंड प्रकरणाच्या निमित्ताने कोंडी झाल्यानंतर खडसेंनी मंत्रीपद सोडले. पदावरुन पाय उतार होत असताना खडसेंचा मीडियावरील राग पुन्हा उफाळला. 'दैनिकात पाकिट संस्कृति असून ते दिले की हवे ते छापून येते' असेही खडसे जाहिरपणे बोलून गेले. अशा वातावरणात मीडियाने मग खडसेंवर सूडच उगवायला प्रारंभ केला.

कधी नव्हे चर्चेत आलेल्या मुंबईतील महिला समाजसेवकांनी खडसेंना जाणून बुजून लक्ष्य करायला प्रारभ केला. अर्थात, एका सामाजिक महिला कार्यकर्तीची ठाणे जिल्ह्यातील आदिवासी जमिन खरेदी नियमबाह्य ठरवून जमिन सरकार जमा केल्याच्या रागातून आपणावर आरोप होत असल्याची बाजू खडसेंनी वारंवार मांडली. पण खडसेंचा आवाज दिल्ली व मुंबईतील चैनल माध्यमात क्षीण होत गेला. एका हिंदी चैनलने खडसे - दाऊद संबंधावर नैन्शल न्यूज चालवली. एका चैनलने खडसेंच्या कथित गैरव्यवहारावर 'सो सॉरी' ही कार्टून क्लिप तयार केली.  अशा प्रकारे दिल्ली पासून तर गल्ली पर्यंतच्या माध्यमात खडसे संदर्भात 'मीडिया ट्रायल' सुरुच राहिली. बहुतेक वेळा डसेंनी माध्यमांना विषय पुरवले. संभाजी भीडेंचे पूत्र प्राप्ती करुन देणारे आंबे नंतर चर्चेत आले. त्यापूर्वी खडसेंनी स्वतःच्या शेतातील 'मोठे आंबे' चर्चेत आणले. अशा हल्ल्याने चिडलेल्या समाजसेविकेने, खडसेंच्या मर्दपणाला ललकारुन कोर्टात लढा असे चैलेंज दिले. दोघांच्या अशा फैरीत मीडिया ट्रायल कधी इकडे तर कधी तिकडे झुकली. मीडियाने नेहमी खडसेंना चकवा दिला.

खडसे कितीही अडचणीत असले आणि माध्यमांनी कितीही एकांगीपणे त्यांच्या विरोधात लेखन केले तरी त्यांच्यावर प्रेम करणारा समर्थक व कार्यकर्त्यांचा राज्यभरात गोतावळा आहे. त्यांना खडसेच प्रिय आहेत. 'आमचे भाऊ ... नाथाभाऊ' अशी घोषणाच तयार झाली आहे. नाथाभाऊंची पक्षात झालेली कोंडी पाहूनच त्यांचे समर्थक व कार्यकर्ते आज धडाक्यात लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करीत आहेत. अशा लोकप्रिय नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

8 comments:

 1. बरोबर आहे पण काहीही असो खडसे साहेब आमच्या लेवा समाजासाठी 1 आदर्श नेतृत्व आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे हे नक्कीच.....

  ReplyDelete
 2. अतिशय सुंदर मांडणी. नाथाभाऊंचं राजकारणातील योगदान आणि स्थान निर्विवाद आहे. त्यांच्याशिवाय राजकारणात काहीच होऊ शकत नाही. सध्या त्यांचा ग्रहणकाळ आहे असे वाटते.
  पण त्यातून ही ते तावून सूलाखून निघतील यात शंका नाही.
  भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  ReplyDelete
 3. I think media is always against Nathabhau..
  But nobody can compare to Nathabhau in Kerala community and all genl public in Khandesh region .
  Happy birthday to Nathabhau bhau.

  ReplyDelete
 4. जळगावचा एकच भाऊ नाथाभाऊ ,

  ReplyDelete
 5. लाख संकटे जरी उभी समोर ठाकली मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली ! या काव्यपंक्तीप्रमाणे आपली कारकिर्द गाजविणारे स्वतः सोबत अन्याय झाला म्हणुन निष्ठा ढळू न देणारे शेतकऱ्यांची जाणीव व जनसामान्यांच्या दुःखाची कळ समजणारे संवेदनशिल संघर्षरत लोकनेते मा.नाथाभाऊ यांना राष्ट्रसेवेसाठी परमेश्वर उत्तम आरोग्य व शक्ती देवो ! जय श्रीराम ॥

  ReplyDelete
 6. भाऊंची कारकीर्द कार्यकर्त्याला वाढवणारी होती नुसता साध्या माझ्या सारख्या कार्यर्कत्याने फोन केला कि माझा हा अधिकारी काम करत नाही तर भाऊ जागेवरच त्याच्याशी बोलुन फोनवर काम करून देत आजपन ती धमक आहे त्यांच्या मंत्रीपद जाण्याने संपूर्ण जिल्हांचे फार मोठे नुकसान झाले आहे अशा माझ्या नेत्याला परमेश्वर त्यांची प्रकृती साथ देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  ReplyDelete
 7. श्री. दिलीपजी आपण अतिशय योग्य शब्दात भाउंवरील सध्याच्या संकटाचे विवेचन मांडलेले आहे. काही वर्तमान पत्र जाणून बुजून चांगल्या बातम्या छोट्या रकान्यात आणि एखादे “मिडिया ट्रायल” मोठ्या हेडिंग ने छापलेले आम्ही वाचलेच आहे असा पक्षपातीपणा आमच्या सारख्या सामन्य जनतेने अनुभवला आहेच. पण भाउंविषयी एकच मनात येते येणाऱ्या-जाणाऱ्यांना सहजतेने उपलब्ध होवून सामन्याचे कामे मार्गी लावणारा समाजसेवकास ईश्वराने दीर्घायुरोग्य द्यावे मग संकट काय सर्व पेलून विरोधकांना उरून पुरतील एवढी कर्तबगारी आहेच. दिवस बदलत असतातच हा निसर्गाचा नियमच हळूहळू सरतील हे दिवस..योग्य वेळ येईलच. तो पर्यंत आणि शेवटपर्यंत आम्ही सर्व आपण भाऊंच्या सोबतच “एकच भाऊ नाथाभाऊ”

  ReplyDelete
 8. श्री. दिलीपजी आपण अतिशय योग्य शब्दात भाउंवरील सध्याच्या संकटाचे विवेचन मांडलेले आहे. काही वर्तमान पत्र जाणून बुजून चांगल्या बातम्या छोट्या रकान्यात आणि एखादे “मिडिया ट्रायल” मोठ्या हेडिंग ने छापलेले आम्ही वाचलेच आहे असा पक्षपातीपणा आमच्या सारख्या सामन्य जनतेने अनुभवला आहेच. पण भाउंविषयी एकच मनात येते येणाऱ्या-जाणाऱ्यांना सहजतेने उपलब्ध होवून सामन्याचे कामे मार्गी लावणारा समाजसेवकास ईश्वराने दीर्घायुरोग्य द्यावे मग संकट काय सर्व पेलून विरोधकांना उरून पुरतील एवढी कर्तबगारी आहेच. दिवस बदलत असतातच हा निसर्गाचा नियमच हळूहळू सरतील हे दिवस..योग्य वेळ येईलच. तो पर्यंत आणि शेवटपर्यंत आम्ही सर्व आपण भाऊंच्या सोबतच “एकच भाऊ नाथाभाऊ”

  ReplyDelete