Sunday 29 July 2018

नाथाभाऊंच्या बनावट अॉडिओ क्लिपचे गौडबंगाल...

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आजचा (दि. ३०) एकच दिवस शिल्लक आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सोशल मीडियात अजब फंडा  वापरण्यात आला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजाची नक्कल करून, ‘भाजपला मतदान करा’ असे आवाहन करणारी बनावट ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या बनावट क्लिपविषयी माहिती मिळाल्याने स्वत: नाथाभाऊ व्यथित झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून या गंभीर प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. नाथाभाऊंच्या नावाने भाजपला मतदान हवे, पण नाथाभाऊ भाजपत नको, असा कुटील डाव सध्या खेळला जात असल्याचे यातून उघड झाले आहे. म्हणून अशी क्लिप कोणी तयार केली असावी यामागील गौडबंगाल वाढले आहे.



गेल्या २२ दिवसात श्री. खडसे यांना भाजपच्या प्रचारात सक्रिय व सहभागी करून घेण्यात आले नाही. मुक्ताईनगर पंचायत निवडणुकीत श्री. खडसे  व्यस्त होते. भाजपच्या काही नेत्यांनी ही वेळ साधून घेत  मनपा निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण केली. उमेदवारी मिळेल हाच उद्देश ठेवून अनेकांनी भाजपत प्रवेश केला. अशा उसनवार उमेदवारांच्या भाऊगर्दीत भाजप निष्ठावंत व श्री. खडसेंच्या अनेक समर्थकांना उमेदवारी नाकारण्यात आली. प्रचार, सभा, मेळाव्यांचे नियोजन करताना श्री. खडसे यांना विश्वासात घेतले नाही किंवा त्यांना सहभागी करुन घेतले नाही. श्री. खडसे यांना पक्षांतर्गत दूर ढकलण्याचे कारस्थान पुढे सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवले. 

श्री. खडसे हे गेली ३५ वर्षे भाजपचे काम निष्ठेने करीत आहेत. गावागावात व गल्लीबोळात जावून त्यांनी पक्ष वाढवला. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात त्यांचे नेतृत्व मान्य करणारा बहुजन वर्ग निर्माण झाला. राज्यात युती सरकारमध्ये दोनवेळा मंत्री म्हणून काम करताना त्यांनी सर्व सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. जळगाव जिल्ह्यात विकासाच्या अनेक योजना त्यांच्याच नेतृत्वात मार्गी लागल्या.

मात्र, दोन वर्षांपूर्वी श्री. खडसे यांच्याविरोधात कथित आरोपांची मालिका सुरु झाली. स्वपक्षीयांच्या छुप्या मदतीचे बळ श्री. खडसे विरोधाच्या मागे होते व आहे. श्री. खडसेंनी मंत्रीपद स्वतः सोडावे अशी स्थिती निर्माण केली गेली. विविध आरोपांनी घेरलेल्या अवस्थेत अखेर श्री. खडसेंनी स्वतः मंत्रीपद सोडले. पण प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. दुसरीकडे त्यांची पक्षांतर्गत कोंडी करणे सुरु झाले. हा प्रकार पाहून त्यांचे समर्थक नाराज होत गेले. श्री. खडसेंना मानणारा बहुजन वर्ग भाजपपासून दुरावू लागला. श्री. खडसेंची अशी आगतिक अवस्था पाहून जळगाव शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेला लेवा पाटील समाज हा भाजपविषयी नाराज झाला आहे. लेवा पाटील समाजातील ज्यांना श्री. खडसेंमुळे पद, प्रतिष्ठा मिळाली ते आज त्यांच्यावर उलटले आहेत. या नाराजीचा फटका मनपा निवडणुकीत भाजपला हमखास बसणार आहे. सर्वच्या सर्व ७५ प्रभागात श्री. खडसेंना मानणारा व समर्थकांचा मतदार वर्ग भाजप विरोधातील मतदान करण्याच्या मनःस्थितीत आहे. गेल्या २ ते ३ दिवसात श्री. खडसे यांना प्रचारापासून लांब ठेवण्याचे जे प्रकार घडले ते पाहून आता निष्ठावंत भाजप कार्यकर्ते शिवसेनेला छुपी मदत करीत असल्याचे उघडपणे दिसत आहे. 

श्री. खडसे यांनी पाठपुरावा केलेल्या विकास प्रकल्पांचे श्रेय त्यांना न देण्याचा प्रयत्न भाजपने प्रचारासाठी तयार केलेल्या जाहिरात फलकांवरील संदेशातून झाला आहे. समांतर रस्त्यांसाठी १३९ कोटी रुपयांचा निधी आणणे आणि अमृत योजनेसाठी ४०० कोटींचा निधी मिळविणे याचे श्रेय श्री. खडसे, खासदार श्रीमती रक्षा खडसे व श्री. ए. टी. पाटील या तिघांचे असताना त्यांची छायाचित्रे भाजपच्या समांतर रस्ते विषयक जाहिरात फलकावरून हटविण्यात आली आहेत.

श्री. खडसे यांना अशाप्रकारे मिळालेली ही अपमानास्पद वागणूक पाहून त्यांचे सर्व समर्थक चिडलेले आहेतच. त्यात श्री. खडसेंच्या आवाजाची नक्कल करुन तयार केलेल्या बनावट ऑडिओ क्लिपच्या प्रकारामुळे संतापाची भर पडली आहे. श्री. खडसेंच्या नावावर पक्षाला त्यांना मानणाऱ्या मतदारांचे मतदान हवे आहे पण श्री. खडसे हे काही नेत्यांना पक्षातच नको आहेत, हे उघडपणे दिसून येत आहे. या प्रकाराने श्री. खडसे यांना मानणारा व समर्थक वर्ग भाजप संबंधी रागातून शिवसेनेला मतदान करण्याची शक्यता बळावली आहे. स्वबळावर मनपा जिंकायला निघालेल्या भाजपच्या पायाखालची वाळू या प्रकारांमुळे  घसरु लागली आहे. याचा अंदाज असलेल्या मंडळींनी श्री. खडसे यांच्या आवाजाची नक्कल करणाऱ्याकडून भाजपला मतदान करा असे आवाहन करणारी बनावट अॉडीओ क्लिप तयार करुन घेतल्याचा संशय असून असे हा शातीर फंडा कोणाचा असावा हे समजून घेणेच गौडबंगाल आहे.

श्री. खडसे यांचे समर्थक व त्यांना मानणाऱ्या मतदारांची दिशाभूल करण्यासाठी तयार केलेली बनावट ऑडिओ क्लिप दि. २९ रोजी सायंकाळी सोशल मीडियात व्हायरल झाली. ही क्लिप ९१२०३८००५८७२ या नंबरवरून जळगावातील अनेकांच्या वॉटस्ॲप गृपमध्ये फॉरवर्ड झाली. या क्लिपमध्ये श्री. खडसे यांच्या नक्कल केलेल्या आवाजात संदेश आहे की, ‘‘नमस्कार, मी एकनाथराव खडसे गेल्या ३० वर्षांपासून या महानगरपालिकेची झालेली दुर्दशा, शहराची झालेली दुर्दशा व झालेले प्रचंड घोटाळे याची सर्व जाणिव आपल्याला आहे. यावेळेस या महापालिकेमध्ये परिवर्तन करायचे आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या कमळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.’’

ही क्लिप श्री. खडसे यांनी ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला. अशा कोणत्याही ऑडिओ क्लिपसाठी आपण संदेश दिलेला नाही हे त्यांच्या लक्षात आले. म्हणजेच ती क्लिप बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. क्लिप संदर्भात पोलीस अधिक्षकांकडे त्यांनी मोबाईलवरुन तक्रार करून चौकशी करण्याची सूचना केली. याबरोबर त्यांनी स्वत:ची भाजप विषयी भूमिका मांडणारी पोस्ट सोशल मीडियातून पाठविली.

या पोस्टमध्ये श्री. खडसे यांनी व्यक्त केलेला आशय असा.. ‘‘जय हिंद जय महाराष्ट्र, त्या ऑडीओ क्लिपमधे असलेला आवाज माझा नसून कुणीतरी मिमिक्री करणार्‍याकडून ही क्लिप तयार करुन घेण्यात आली आहे. कारण, मतदारांना आवाहन करणारी ऑडीओ क्लिप रेकॉर्ड करुन द्या असे कुठलेही आदेश मला भाजपच्या वतीने देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मी कुणालाही अशाप्रकारे ऑडीओ रेकॉर्ड करुन दिलेला नाही. पक्षाने आदेश दिला असता तर नक्कीच मी हे आवाहन केले असते. परंतु मला कुठलीही कल्पना न देता माझ्या नावाने अशी ऑडीओ क्लिप समाजात पाठविणे ही एक फसवणूकच आहे. काही महिन्यांपासून माझ्या नावाचे बनावट चेक तयार करण्याचे प्रकरण समोर आले आहे. सध्या त्याची चौकशी देखील सुरु आहे. त्यातून मला मानसिक छळ देखील सोसावा लागत आहे. आज ही ऑडीओ क्लिप ऐकून धक्का बसला. माझ्या डुप्लिकेट आवाजातून आज असे आवाहन केले जात असेल तर, भविष्यात अशाच ऑडीओ क्लिप बनवून मला फसविण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो. त्यामुळे सतर्कता बाळगून मी या ऑडीओ क्लिपबाबत पोलिसांकडे तक्रार करुन सदरील क्लिप फॉरेन्सिक लॅबमधे तपासण्यात यावी अशी मागणी करणार आहे.’’

श्री. खडसे पुढे म्हणतात, ‘‘मी भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने गेल्या ४ दशकांपासून पक्ष वाढीसाठी मेहनत घेत आलोय. अनेकवेळा मतदारांनी भाजपाला मतदान करावे असे आवाहन देखील करत आलेलो आहे. त्यामुळे आता देखील भाजप करिता मतदारांना आवाहन करा असे मला पक्षाकडून सांगण्यात आले असते तर नक्कीच मी ही रेकॉर्डिंग करुन दिली असती. मी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक प्रभागांमध्ये सभा घेतल्या. जवळपास २४ कॉर्नर मिटींग घेतलेल्या आहेत. मला कल्पना न देता असे रेकॉर्डिंग करणे ही माझी व मतदारांची देखील फसवणूक होईल. तसेच भविष्यात माझी फसवणूक होऊ नये म्हणून पत्रकाद्वारे खुलासा करत आहे. अप्रत्यक्षरित्या माझ्यावर अविश्वास दाखविण्यासारखी ही बाब आहे, म्हणून मतदार राजाने देखील ही बाब गंभीरतेने घेण्याची गरज आहे.’’

श्री. खडसे यांच्या बनावट ऑडिओ क्लिपची चर्चा सायंकाळी सोशल मीडियात सुरू झाली. या प्रकारामुळे त्यांचे समर्थक अधिकच बिथरले.  नाथाभाऊंच्या नावाने पक्षाला मतदान हवे आहे पण त्याचे श्रेय स्वतःला घ्यायचे आहे हा कुटील डाव लक्षात आला. मात्र, पक्षाच्या पातळीवर श्री. खडसेंचा सन्मान इतर नेते करीत नाहीत हे सुध्दा वारंवार अनुभवाला आले आहे. याच संतापातून श्री. खडसे यांचे समर्थक व त्यांना मानणारा वर्ग मनपाच्या निवडणुकीत मतदान करताना "उलटफेर" करण्याची शक्यता अनेक निष्ठावंत बोलून दाखवत आहेत. जळगाव मनपात भाजपला पराभव दिसावा असे बहुतांश निष्ठावंतांना वाटत आहे. अर्थात, हा रोष पक्षातील शेटजी, भटजी व व्यापारी प्रवृत्तीच्या पडद्यामागील शक्तींना आहे. भाजपला याच रोषाचा फटका बसणार हे नक्की. भाजपच्या रणनितीतून मराठा, मुस्लिम, ब्राह्मण समाजा सोबतच लेवा पाटील व इतर समाजाचे मतदार दुरावले आहे. आरक्षण आंदोलन, मराठ्यांच्या विषयीची वक्तव्ये याची यात भर पडली आहे. असा साराच क्षोभ ईव्हीएमच्या माध्यमातून भाजप विरोधात गेला तर भाजपच्या पराभवाचा अध्याय जळगावातून लिहिण्यास प्रारंभ होईल. सध्या हिच शक्यता दिसते आहे. मनपाचा निकाल धक्कादायक असेल असा अंदाज आहे.

3 comments: