Saturday 28 July 2018

नाथाभाऊंनी केली अशीही पोलखोल !जळगाव मनपा निवडणूक प्रचाराचे अखेरचे दोन दिवस आहेत. प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांनी फारशी गाजलेली नाही. भाजपकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा होणार आहे. शिवसेनेकडून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्या सभा सुरु होत आहेत. इतरांच्या सभा फारशा लक्षात येणाऱ्या नाहीत.


निवडणुकीच्या या प्रचारात रंगत आणली आहे ती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी. नाथाभाऊंना प्रचाराच्या कुंपणावर बसवून ठेवण्याची वेळ पक्ष संघटन व संघटनाबाह्य मंडळींनी मोठ्या खुबीने आणली आहे. नाथाभाऊंना रिंगणात आणलेले नसल्याने ते आता कुंपणावर बसून  सामना पंच म्हणून भूमिका बजावत आहेत. प्रशासनाचा प्रदीर्घ  अनुभव, राजकारणातील पट्टीचे डावपेच आणि प्रचंड लोकप्रियता असलेल्या नाथाभाऊंनी तज्ञ समालोचक म्हणूनही भूमिका बजवायला सुरुवात केली आहे.

निवडणूक प्रचारासाठी भाजपने पुण्यातून डिझायनर्स आणल्याचे सांगण्यात येते. जळगावचे प्रश्न, त्यांचा आतापर्यंतचा पाठपुरावा, कोणाशी संबंधित विषय आहे आणि काय होणार आहे ? याचा काहीही अंदाज व अभ्यास नसल्यामुळे बाहेरच्या या डिझाईनरने केवळ होर्डिंगचे डिझाईन केले. घोषवाक्य टाका व फोटो टाका असे सांगितल्याने तसेच काम केले आहे. अशा बेसावधपणामुळे अनेक गमती घडल्या आहेत. या गमतींची पोलखोल स्वतः नाथाभाऊंनी दि. २८ ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

जळगाव शहरात महामार्गलगत संमांतर रस्त्यांचे काम करावे या विषयाचा पाठपुरावा नाथाभाऊ, खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे हे तिघेच गेल्या दीड दोन वर्षांपासून करीत आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत या तिघांच्या ४ बैठका झाल्या. हे स्वतः नाथाभाऊ पत्रकार परिषदेत २ वेळा म्हणाले. यावेळी आमदार सुरेश भोळे शेजारी बसले होते. पण नाथाभाऊंनी एकदाही त्यांचे नाव घेतले नाही. समांतर रस्त्यांचा १३९ कोटींचा डीपीआर सादर असून त्याबदल्यात १०० कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाल्याचे पत्रच नाथाभाऊंनी पत्रकारांना दिले.

याविषयाची गंमत अशी आहे की, भाजपने राष्ट्रीय महामार्गावर समांतर रस्ते प्रश्न आम्ही सोडवू असे आश्वासन देणारा भलामोठा फलक लावला आहे. हे आश्वासन देणारे नेत्यांचे फोटो आहेत, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व आमदार. आहे की नाही गंमत. समांतर रस्ते डीपीआर सादर आहे, निधी मिळतोय आणि हे नेते अजूनही आश्वासनच देत आहे. ते सुध्दा पाठपुराव्याशी काडीचा संबंध नसताना. नाथाभाऊंनी थेट शब्द वापरले नाही पण पोलखोल झालीच. समांतर रस्ते डीपीआर मंजूर करावा या मागणीसाठी सुरेशदादा जैन यांनीही गडकरींशी २/३ वेळा फोनवर संपर्क केला आहे.

नाथाभाऊंनी पत्रकार परिषदेत आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, सध्या अमृत योजनेचे श्रेय काही जण घेत आहेत. श्रेय घेण्याची सवय आहेत अनेकांना. पण जळगाव आणि भुसावळ या दोन योजनांचे प्रस्ताव जेव्हा सरकारकडे चर्चेला आला तेव्हा मी कैबिनेटमंत्री होतो. वास्तविक जळगाव मनपा व भुसावळ पालिकेत तेव्हा विरोधी आघाड्या होत्या. तरी ते प्रस्ताव आम्ही मंजूर करुन घेतले. कारण योजनेचा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतोय हाच विचार आम्ही केला. नाथाभाऊंनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर पुन्हा भाजपच्या प्रचाराचे होर्डिंग आठवले. अमृत योजनेचा ज्यांच्याशी काडीचा संबंध नाही, त्यांचे फोटो फलकावर आहे. अशी ही दुसरी गंमत आहे. शिवाय, भाजपकडून वृत्तपत्रात ज्या बेधडक व बेफिकीरपणे जाहिराती केल्या गेल्या त्यात तर तशील असाही आला आहे की, अमृत योजनेत रस्त्यांची कामे होणार. याविषयी नाथाभाऊ म्हणाले, 'अमृत योजनेत पाणी पुरवठा व भुयारी गटारीची कामे होतील. रस्त्याचे काम करण्याची माहिती बहुधा त्यांना असेल' नाथाभाऊंनी अशीही गंमत लक्षात आणून दिली.

अमृत योजनेचा प्रस्ताव जळगाव मनपाने सन २००९/१० मध्येच सादर केले होते. हे प्रस्ताव काँग्रेस आघाडीच्या योजनेत दिले होते. तेव्हा केंद्राचा ८०%, राज्याचा १०% व मनपाचा १०% निधी खर्च होणार होता. योजना रेंगाळली. नंतर सन २०१४ मध्ये आलेल्या भाजप नेतृत्वाने योजनेचे नाव अमृत केले. मनपा व राज्यावर योजनेचा बोजा प्रत्येकी २५% टाकला. हे सुध्दा या योजनेमागील वास्तव आहे.

जळगाव मनपाची सत्ता काहीही करुन मिळवायचीच असा चंग बांधून भाजपचे नेते कामाला लागले आहेत. यासाठी चुनावी जुमला आहे, 'भाजपला संधी द्या. एका वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलतो. २०० कोटी आणतो.' हा जुमला दिला आहे जलसंपदामंत्री आणि त्यांच्या पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्षांनी. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले केवळ २५ कोटी रुपये जी मंडळी ३ वर्षांत खर्च करु शकली नाही ती मंडळी २०० कोटी रुपये एका वर्षांत खर्च करणार म्हणे ? अर्थात, नाथाभाऊंनी या चुनावी जुमल्याचा सुध्दा प्रचारात समाचार घेतला. नाथाभाऊ म्हणतात, ' हे काहीही सांगोत की आम्ही एका वर्षांत सुधरवू. एका वर्षांत शहर सुधरते का कधी ? हे भाजपचच आमच म्हणने असते. निवडणुकीचा फंडा असतो. जुमला म्हणतात त्याला.' नाथाभाऊ असे म्हणतात तेव्हा उपस्थित श्रोते सुध्दा हसतात.

मनपा निवडणूक निमित्ताने नाथाभाऊ ठराविक प्रभागातच प्रचाराला जात आहेत. बहुतांश उमेदवार नाथाभाऊंपासून अंतर ठेवून आहेत. कारण अशी जवळकी दिसली तर पक्षांतर्गत इतरांशी संबंधावर आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक सहकार्यावर परिणाम होवू शकतो. हीच बाब लक्षात घेऊन नाथाभाऊ एका सभेत म्हणाले, 'काम करणारे व चांगल्या चारित्र्याचे उमेदवार निवडून द्या'. अशाच प्रकारे जलसंपदामंत्री शाहू नगरमधील सभेत म्हणाले, 'डॉन उमेदवारांना पराभूत करा' नाथाभाऊ व जलसंपदा मंत्र्यांचे हे आवाहन जळगावकरांना जागृत करणारे आहे.

मनपाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या ३०३ पैकी ३६ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलीस रेकॉर्ड वरुन लक्षात आले आहे. यात सर्वाधिक उमेदवार भाजपचे असून, काँग्रेसच्या एका उमेदवारावर तब्बल सात गुन्हे दाखल आहेत. महापालिकेच्या रिंगणात भाजपच्या १५ उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे आहेत. शिवसेनेच्या ९, काँग्रेस आघाडीच्या ४ सह ६ अपक्षांवर गुन्हे दाखल आहेत. एमआयएम व कम्युनिस्ट पार्टीच्या प्रत्येकी एका उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता भाजपचे १५ उमेदवार डेंजर झोनमध्ये आहेत.

अशा प्रकारे नाथाभाऊंनी गंभीरपणे चर्चा करीत, गौप्यस्फोटातून पोलखोल केली. ही बाब लक्षात घेता जळगावकर मतदारांनी गेल्या ३०/३५ वर्षांत शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवणाऱ्या पक्षाला विजयी करायला नको का ? शेवटी दोन्ही भाऊ म्हणताहेत, 'चांगले उमेदवार निवडा. डॉन मंडळींना पाडा.'

No comments:

Post a Comment