Monday 30 July 2018

प्रचाराला रिवाईंड करु या !

जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला. निवडणूक रिंगणात असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचा एकही स्टार प्रचारक शहरात आला नाही. हे या निवडणूक प्रचाराचे पहिले वैशिष्ट्य. प्रचारात स्थानिक नेत्यांनी गल्लीबोळात फिरुन पक्षाच्या उमेदवारांना वियजी करा असे आवाहन केले. यात भाजपतर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राधेशाम चौधरी यांनी सहभाग दिला. रिपब्लिकन पक्षाचे अनिल अडकमोल व राजु मोरे हे शिवसेनेसोबत आहेत. स्थानिक नेत्यांनी प्रचारासाठी घेतलेली मेहनत हे प्रचाराचे दुसरे वैशिष्ट्य ठरले.

प्रचाराचे मुद्दे आणि पक्षांचे जाहिरनामे बहुतांशपणे 'कॉपी पेस्ट' होते. चर्चेत मनपावरील कर्जाचा बोजा, व्यापारी गाळ्यांची थकीत भाडे वसुली, घरकुल योजना हे तीन विषय कळीचे होते. 'शत प्रतीशत भाजप' घोषणा देत रिंगणात उतरलेल्या भाजपला अगोदर उमेदवार आयात करावे लागले. मनपातील सत्ताधारी आघाडीच्या ३५ वर्षांच्या कार्यकाळातील ठराविक पद्धतीचा विकास व गैरव्यवहाराचे मुद्दे भाजपने आक्रमकपणे मांडले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासाकरीता दिलेले २५ कोटी रुपये गेल्या तीन वर्षांत मुलभूत गरजांवर खर्च होवू शकले नाहीत या मुद्यावर भाजपला बॅकफूटवर जावे लागले.

मनपातील सत्ताधारी खान्देश विकास आघाडी या निवडणुकीत शिवसेना म्हणून रिंगणात आहे. गेल्या ३५ वर्षांत शहरात राबविलेल्या विकास योजनांचा उल्लेख वारंवार शिवसेनेने केला. यात वाघुर धरणातून पाणी पुरवठा योजना, भव्य व्यापारी संकुले, सुशोभीत चौक, मनपाची १७ मजली इमारत, गरीबांसाठी घरकुल योजना याविषयी सकारात्मक बाजू मांडली गेली. शिवाय, लोकसहभागातून केलेले मेहरुण तलाव खोलीकरण, भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान विकास, मनपा रुग्णालयांसाठी व शाळांसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार या बाबी ठळकपणे मांडण्यात आल्या.

गेल्या १५ वर्षांत जळगाव शहरात मनपाच्या माध्यमातून फार काही नवे घडले नाही. उलट मुलभूत सुविधांच्या अपेक्षाही मनपा पूर्ण करू शकली नाही. मनपाने हुडको व जळगाव जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यात दरमहा कोट्यवधी रुपये द्यावे लागत आहेत. याचा उल्लेख दोन्ही बाजुंनी झाला. भाजपने याला कर्जाचा 'बोजा' म्हटले. शिवसेनेने मात्र याला 'विकासाची दिशा' संबोधून कर्ज घेवूनच मोठे विकास प्रकल्प पूर्ण होतात ही भूमिका मांडली.

शिवसेनेच्या प्रचाराची एक जमा बाजू ही होती की, त्यांनी मनपावरील सर्व आक्षेपांना सकारात्मक व आकडेवारीसह उत्तर देणारी पुस्तिका मतदारांच्या हातात पोहचवली. यात दोन बाबी महत्वाच्या होत्या. पहिली म्हणजे घरकुल योजनेच्या कर्जाची परतफेड सन २००१ ते २००३ मध्ये थांबविली गेली. म्हणून थकीत कर्जाचा बोजा वाढला. त्यानंतर सन २०१५ मध्ये आयुक्ताच्या आडमुठेपणामुळे डीआरटी कोर्टात मनपाची बाजू वेळेवर मांडली गेली नाही. कोर्टाने एकतर्फी निकाल दिला. हे नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात आले. शिवसेनेची ही पुस्तिका युवा वर्गाला पालिका व मनपाचा गेल्या ३५ वर्षांचा इतिहास समजून सांगायला मार्गदर्शक ठरली. भाजपकडून २५ कोटी रुपये खर्चाविषयी फारसे समाधानकारक उत्तर आले नाही. अर्थात, हा निधी खर्च न होण्यामागे स्थानिक आमदार व भाजपच्या १५ नगरसेवकांत वाद कारणीभूत असल्याचे लक्षात आले.

भाजपने संपूर्ण प्रचार प्रक्रियेपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ठरवून लांब ठेवले. भाजपच्या यशाचे श्रेय ठराविक मंडळींना स्वतःच्या नावे नोंदवायचे आहे. त्यामुळे खडसेंची जेथे-जेथे अप्रतिष्ठा होईल तेथे-तेथे ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रचार फलकावरुन खडसे, खासदार ए.टी. पाटील व रक्षा खडसे यांचे फोटो हटविण्यात आले. समांतर रस्ते व महामार्ग विकास हा विषय खडसे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असताना त्याचे श्रेय भाजप प्रचार यंत्रणेत दुसऱ्यांना दिले गेले.

भाजपमधील काही मंडळींना खडसेंचा सहभाग नको होता. मात्र, खडसे यांना मानणारा चाहता वर्ग, त्यांचे समर्थक व खडसे यांच्या एक गठ्ठा लेवा पाटील समाजाचे मतदान भाजपला हवे आहे. यासाठी खडसे यांच्या आवाजाची नक्कल करुन 'भाजपला मतदान करा' असे आवाहन करणारी बनावट ऑडीओ क्लिप व्हायरल झाली. या प्रकाराने संतापलेल्या खडसे व त्यांच्या समर्थकांनी वेगळीच भूमिका घेतली तर भाजपचे अनेक अंदाज चुकतील.

जळगावमधील मतदारांना भुलवायला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोन मुद्दे वारंवार मांडले. भाजपला एक हाती सत्ता द्या. एका वर्षात विकास करुन दाखवतो. हे आवाहन करताना महाजन २५ कोटी का खर्च झाले नाही ? यावर काहीही बोलले नाही. शिवाय, युती सरकाराचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची अॉडिओ क्लिप सुध्दा व्हायरल झाली. शिवसेने याला छान उत्तर दिले. युतीत आसणारा भाजप एकटा २०० कोटी आणतो तर शिवसेनेसह ४०० कोटी आणता येतील असे ठासून सांगण्यात आले.

भाजपचा प्रचाराचा रोख हा केंद्र व सरकारी योजनांच्या निधी मिवविण्यावर होता. शिवसेनेने स्वबळावर जळगावला स्मार्ट करु म्हटले आहे. भाजप पूर्वीच्या ज्या प्रकल्पांना कर्जाचा बोजा म्हणते आहे, त्याच प्रकल्पात निर्माण झालेल्या मालमत्तांचे मुल्यांकन काही हजार कोटी रुपयांचे आहे, हे शिवसेने प्रभावीपणे सांगितले.

जळगाव मनपा निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने मराठा, ब्राह्मण, मुस्लीम व लेवा पाटील समाज यांच्या वर्चस्वाची चर्चा सुद्धा झाली. भाजपने ब्राह्मण उमेदवारांना झुलवले हा मुद्दा सोशन मीडियात व्हायलर झाला. जळगावमधील मुस्लिम समाज पहिल्यांदा शिवसेनेचे पट्टे गळ्यात घालून प्रचार फेरीत सहभागी झाला. लेवा पाटील समाजातील अनेक भाजप निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली गेली. शिवाय खडसे यांच्या अवमानाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे भाजपचा पारंपारिक लेवा पाटीदार मतदार हा भाजप विषयी नाराजी दाखवायला शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालात जर ही बाब स्पष्ट झाली तर शिवसेनेत सध्या थांबलेले विष्णु भंगाळे यांचे पुढील भविष्य उज्ज्वल असून जळगावचे भावी आमदार तेच असू शकतात.

खडसे यांनी बनावट ऑडिओ क्लिप संदर्भात खुलासा करताना पक्षातील आपल्या कोंडीचा उल्लेख माध्यमांमध्ये केला. प्रचारासंदर्भात कोणीही आपल्याशी बोलले नाही हे त्यांनी ठळकपणे सांगितले. लेवा पाटील भोर पंचायतचे कुटूंब नायक रमेश पाटील हे जळगाव शहरात ठाण मांडून होते. खडसे व त्यांनी समाजाच्या भूमिकेविषयी रणनिती आखली आहे. ती काय होती? हे निकालावरुन समजते.

जळगाव मनपा निवडणूक निकालावर मोठा परिणाम मराठा आंदोलन, मुख्यमंत्र्यांची पंढरपूरची महापूजा टाळताना केलेले वक्तव्य, रेंगाळलेला आरक्षण प्रश्न आणि भाजप अंतर्गत मराठा नेतृत्वाची वाईट झालेली अवस्था या विषयांमुळे होणार आहे. भाजपने इतर पक्षांमधून उमेदवार आयात करताना कोळी व लेवापाटील समाजातील ठराविक नेत्यांना महत्व दिले. त्याचवेळी मराठा उमेदवारांना दुर्लक्षीत केले गेले. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून मराठा समाज भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्री यांची सभा रद्द झाली अशीही चर्चा आहे.

एकंदर जळगाव महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा शांततेत थंडावल्या. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे व पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या चोख नियोजनाला दाद द्यायला हवी. अंतिमतः जळगावकरांना आवाहन करावे लागते की, बुधवारी (दि.१ ऑगस्टला) मतदान जरुर करा. कुटूंबासह व मित्रांसह मतदानाला आवर्जून जा. निवडणूक प्रचाराला आपल्या मनात रिवाईंड करा आणि योग्य बाजू ठरवून मतदान करा !

No comments:

Post a Comment