Tuesday 24 July 2018

जळगाव होईल का मराठा आंदोलनाचे कुरुक्षेत्र ?

जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाने राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंढरपूर येथे आषाढीच्या शासकिय महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचे काय ? असा प्रश्न विचारुन महापूजेसाठी मज्जाव केला गेला. अखेर फडणवीस यांनी पंढरपुरात येण्याचे टाळले. पण तसा निर्णय का घेतला हे माध्यमांना सांगत असताना मराठा आंदोलनाच्या कथित कृत्यांची वाच्यता फडणवीस यांनी केली. या वक्तव्यांनी मराठे भडकणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असताना मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी कायगाव टोका (जि. औरंगाबाद) येथे काकासाहेब शिंदे या २८ वर्षाच्या मुलाने पुलावरुन गोदावरीत उडी मारुन देहाचे जलार्पण केले. आता त्याचे पडसाद म्हणून महाराष्ट्र बंदचे लोण उसळले आहे.


‌यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे मूक मोर्चा आंदोलन सुरु असताना, आंदोलनाचे अंतिम साध्य काय ? हा प्रश्न होता. आता उद्भवलेल्या संतापजनक स्थितीतही अंतिम साध्य काय ? हा प्रश्न आहे. मराठा मूक मोर्चाचे स्वरुप विस्तारत असताना समुह नेतृत्व ही संकल्पना विशिष्ट मर्यादेपर्यंत ठिक होती. पण सरकारी व्यवस्थेत तहाची बोलणी करताना जेवढे चेहरे आणि त्यातही फितूर कमी करता येतील ते समुहातून बाजुला सारायला हवेत, हा नियम विसरला गेला. याचा व्हायचा तो परिणाम होऊन सरकार धार्जिणे चेहरे हाताशी धरुन व त्यांच्याशी बोलणी करुन मूक मोर्चा आंदोलनाला सरकारमधील "संकटमोचकांनी" गुंडाळले. त्यानंतर मराठा आरक्षण संदर्भात अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा केली गेली. या समितीचे अध्यक्ष आहेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. सदस्य आहेत, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे. गेल्या ११ महिन्यांत या समितीने मराठा आरक्षण विषयी आपला कोणता अहवाल दिला याची माहिती नाही.

‌कोणतेही आंदोलन हे रस्त्यावर सुरु होते. अगोदर ते सामोपचाराने असते. निर्णय देणाऱ्या यंत्रणेने दुर्लक्ष केले की हे हळूहळू हिंसात्मक होत जाते. अगदी असेच मराठा आंदोलनाचे होते आहे. पण आंदोलनाच्या संघटनात्मक शक्तीला केवळ माणसांवर दगड फेकणे किंवा सरकारी वाहने जाळणे याच्यासाठी वापरायचे नसते तर त्या निमित्ताने एकजूट झालेल्या संख्याबळाला प्रस्थापित राजसत्ता आणि व्यवस्थेच्या विरोधात मतदानासाठी सुध्दा प्रवृत्त करायचे असते. दगडफेक किंवा जाळपोळ राजसत्तेला फक्त घाबरवू शकते मात्र संख्येतील गठ्ठा मतदान हे राजसत्तेला उलथवून टाकते, हे अंतिम साध्य मराठा समाजाने लक्षात घ्यायला हवे. मतदानासाठी मिळालेल्या संधीला विरोधातील जनक्षोभ म्हणून दर्शविण्याचेही नियोजन उत्तमपणे व्हायला हवे.

‌जळगाव शहरातील समस्त मराठा समाजाला जनक्षोभ मतदानातून दाखवून देण्याची उत्तम संधी जळगाव महानगर पालिका निवडणुकीने उपलब्ध करुन दिली आहे. जळगाव शहर हे मराठा आंदोलनाच्या लढाईचे कुरुक्षेत्र म्हणून इतिहासात नोंदले जावू शकेल असे नियोजन कुशलतेने व सावधपणे करता येणे शक्य आहे. मात्र, ते करताना पुन्हा जात व समाजाचा चेहरा असलेल्या राजकीय पक्षाच्या प्रेमात जळगावकर मराठ्यांनी पडायला नको. तसे होणे हा सुध्दा समाजाच्याप्रति धोकाच आहे. प्रस्थापित राजसत्तेचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या क्रमांकचा जो प्रबळ दावेदार आहे, त्याच्या पारड्यात मराठ्यांची गठ्ठा मते टाकणे हेच शहाणपण आता दाखवावे लागणार आहे. म्हणजेच, मराठा बहुलांचा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगावमधील मर्यादित व नगण्य स्थितीत आपल्या मतांची बेगमी टाकण्यापेक्षा ती भाजपला टक्कर देणाऱ्या शिवसेनेच्या पारड्यातच टाकायला हवी. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा कार्यकर्त्यांनी आपला पक्ष स्वाभिमान गुंडाळून राजसत्तेला पराभूत करु शकणाऱ्या शक्तीला पाठबळ देणे हाच विचार कृतीत आणायला हवा. शत्रूच्या शत्रूला मदत करणे कधी कधी लाभाचे असते, हे ध्यानात घ्यावे.

‌जळगाव हे मराठा आंदोलनाचे कुरुक्षेत्र का ठरु शकते ? याचे एकच कारण आहे. ते म्हणजे, मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्याचे अनिवासी पालकमंत्री आहेत. समितीचे सदस्य जलसंपदामंत्री हे जळगावहून प्रवासी मंत्री आहेत. प्रवासी याचा अर्थ म्हणजे ते जळगावात केवळ रल्वे, विमान व महामार्ग याची सुविधा वापरत इतरत्र प्रवास करीत असतात. जळगाव शहरातील मूठभर लोकांचा संबंध मंत्री पाटील व मंत्री महाजन यांच्याशी येतो. मंत्री उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य जर जळगावशी संबंधित असतील तर त्यांना त्यांच्याच गल्लीत पराभूत करण्याएवढा उत्तम गनिमीकावा कोणता ? म्हणूनच जळगाव शहरातील मराठा समाज घटकांनी महानगर पालिका निवडणुकीत प्रस्थापित राजसत्तेला पर्यायाने सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला आपला विरोध दर्शवायला त्यांच्याच घरातील भेदी शिवसेनेला मतदान करायला हवे. भाजपचा पराभव ठरवून होऊ शकतो हेच यातून दिसून येईल.

‌शिवसेनेलाच मतदान का करावे ? या प्रश्नावराही विचार करायला हवा. याचे पहिले कारण, शिवसेनेचे जळगावमधील नेते सुरेशदादा आहेत. त्यांची प्रतिमा व आजपर्यंतचे राजकारण सर्व समावेशक राहिले आहेत. आज इतर पक्षांमध्ये नेते असलेले बहुतांश जण हे सुरेशदादांच्या सोबतच होते. दुसरे कारण म्हणजे, भाजपच्या अहंकाराचा विजय रथ रोखायचा असेल तर विरोधात जिंकणाऱ्या पक्षाला मत द्यायला हवे. महापौरपदासाठी तडजोडीची किंवा किंगमेकरची भाषा आजच वापरणाऱ्या आपल्याच गोतावळ्याच्या पक्षावर विश्वास ठेवून सौदेबाजीला खतपाणी घालून उपयोग नाही. तिसरे कारण म्हणजे, शिवसेनेशी भविष्यातील व्यवहाराच्या स्थानिक बोलणी आज करता येतील. चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे, भाजपने मग्रुरी दाखवत शिवसेनेशी युती मोडली आहे. अशावेळी भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेलाच मतदान करणे म्हणजे "लोहा लोहे को कांटता है," हे दाखवून देणे होय. पाचवे आणि अंतिम कारण म्हणजे, मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचा प्रारंभ झाल्यानंतर जळगाव हे लक्षवेधी केंद्र होते. आताही भाजपच्या पराभवासाठी समाजाची एकजूट हा संदेश निवडणूक निकालातून दिला जाईल. मराठा समाज मतदानातून राजसत्ता उलथवू शकतो याचे उदाहरण जळगाव महानगर पालिकेच्या निकालातून ठळकपणे समोर येईल.

‌जळगाव शहरातील मराठा मंडळी वरील विवेचन वाचून गांभीर्याने पुढील रणनिती आखू शकतील अशी अपेक्षा करु या.

4 comments:

  1. खरच सर अस झाल तर जळगावात ईतिहास घडु शकतो. सर्वांना एकत्र आणण्यासाठी तुमचा हा लेख मार्गदर्शक ठरु शकतो.

    ReplyDelete
  2. खरच सर अस झाल तर जळगावात ईतिहास घडु शकतो. सर्वांना एकत्र आणण्यासाठी तुमचा हा लेख मार्गदर्शक ठरु शकतो.

    ReplyDelete
  3. यामधे एक अडचण अशी आहे की शिवसेनेने मराठ्यांच्या आई बहीणींचा केलेला अपमान विसरावा लागेल मराठ्यांना, सुरेशदादा सर्वसमावेशक आहेतच याबद्दल शंका नाही पन निवडणुकीनंतर जर त्यांनी भाजपला मदत केली तर

    ReplyDelete
  4. शिवसेना व भाजप एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना अशी परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगला अपक्ष उमेद्वार निवडून दिलेला चांगलं

    ReplyDelete