Saturday 21 July 2018

मुस्लिम मतदारांचा कौल सुरेशदादांकडे ?

जळगाव महानगर पालिका निवडणूक प्रचाराची रंगत वाढते आहे. राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना मराठा आणि ब्राह्मण समाजाला डावलल्याचे दिसते आहे. जळगाव शहरातील किमान सहा प्रभागात विजयाचे निर्णय फिरवू शकणाऱ्या मुस्लिम बहुल प्रभागात कौल कोणाच्या बाजुने जाईल ही उत्सुकता आहे. मुस्लिम समाज हा स्थानिक व प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास दर्शवतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे.

जामनेर नगर पालिकेच्या निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील भाजपने २५ पैकी २५ जागा जिंकल्या. यात भाजपकडून ७ मुस्लिम सदस्य निवडून आले. ६ सदस्य हे मुस्लिम बहुल भागातून व १ मुस्लिम सदस्य हा हिंदू बहुल भागातून विजयी झाला. हा निकाल हेच दाखवतो की, जामनेरच्या मुस्लिमांनी स्थानिक व प्रस्थापित नेते म्हणून महाजन यांना साथ दिली. मुक्ताईनगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी १३ जागा भाजपने जिंकल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात पक्षाला हे यश मिळाले. मुक्ताईनगरातही मुस्लिम व हिंदू बहुल भागातून भाजपचे सदस्य निवडून आले. मुक्ताईनगरातील मुस्लिमांनीही स्थानिक व प्रस्थापित नेते म्हणून खडसे यांच्यावर विश्वास दाखवला.

जळगाव शहरात जवळपाह २५ ते २८ हजार मुस्लिम मतदार आहेत. जवळपास ६ प्रभागात मुस्लिम मतदार विजयाचे पारडे फिरवू शकतात. शिवसेनेने ६ आणि भाजपने ६ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. जळगावातील स्थानिक व कायम रहिवासी व  शिवसेनेचे नेते सुरेशदादा आहे. मनपातील सत्ताधारी आघाडीचे प्रमुख म्हणून सुरेशदादा प्रस्थापित आहेत. सुरेशदादांच्या शब्दाला मान देणारा मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. जामनेर, मुक्ताईनगरच्या मुस्लिमांनी स्थानिक नेतृत्वावर विश्वास दाखवला तशीच स्थिती जळगावात सुरेशदादांविषयी आहे.

याचा प्रत्यय पिंप्राळा भागात शिवसेना प्रचारफेरीत सहभागी मुस्लिमांची संख्या पाहून आला. भगव्या रंगाचा शर्टच नव्हे तर रुमाल सुध्दा न बाळगणारी मुस्लिम युवा मंडळी शिवसेनेचे दुपट्टे गळ्यात घालून या फेरीत सहभागी झाले. सुमारे दोन हजारांपर्यंत गर्दी असावी. सुरेशदादा हे बाजारातील भिकन शा बाबा दर्ग्यात चादर चढवायला गेले. तेथे ठरवून पुष्पहार सोबत भगवी चादर चढविण्यात आली. मुस्लिम मनाचा कानोसा यातून दिसून येतो.

भाजपच्या प्रचाराचे नारळ मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी नियोजन करुन वाढविले. यासाठी तयार केलेल्या फेरीत सर्व हिंदू मंदिरे होती. अशा प्रकारच्या नियोजनातून भाजपच्या कर्मठपणाचा संदेश मुस्लिम समाजात गेला. याचा उल्लेख अनेक मुस्लिम नेत्यांच्या मुखातून बाहेर येतोय.

रिंगमास्तर कहाँसे लाओगे ठाकूर !

भारतीय जनता पक्षात आयारामांची तुडूंब गर्दी झाली आहे. अशा घाऊक भरतीत पक्षाचे उपरणे जो गळ्यात घालतो, तो पवित्र असतो. कोणाला इन्कम टैक्सच्या प्रकरणांची धास्ती तर कोणाला तडीपारीची टांगती तलवारची भीती असते. तालिममध्ये नव्याने येणाऱ्या पैलवानावर जुन्या पैलवानांचा फार काही विश्वास नसतो. तो आपला लंगोट कमरेलाच बांधून ठेवतो. तालिमचा उस्ताद कधी कोणाला लंगोट बांधायला सांगून कुस्तीचे डाव शिकवेल सांगता येत नाही. अशावेळी भाजपत झालेल्या नव्या 'भाऊगर्दीत' सर्वांना पकडून ठेवू शकेल असा रिंगमास्तर आहे कोण ?  भाजपसाठी पडद्यामागील परिवार असा रिंगमास्तर शोधतोय म्हणे !

No comments:

Post a Comment