Wednesday, 18 July 2018

ब्रह्मवृंदही निवडणुकीतून बाद !

जळगाव मनपाच्या निवडणुकीतून मराठा समाज कसा बाजुला ढकलला केला याचे सविस्तर विवेचन कालच्या ब्लॉगमध्ये केले. याविषयी अनेकांनी मोबाइलवर संपर्क करुन समाजाच्या पुढाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घातल्याचा उल्लेख केला. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक या संस्थेत दोन गटांचे टोकाचे मतभेद सुरु झाले आणि मराठा नेत्यांचे खच्चीकरण झाले, असेही एका मित्राने लक्षात आणून दिले. संघटन नेत्यांच्या हेव्या दाव्यात विभागले आणि सत्तेतील सामाजिक मक्तेदारी संपुष्टात येत गेली, याचेच हे उदाहरण.

मात्र, संघटन मजबूत असले तरी सत्तेत प्रवेश मिळतोच असे नाही, हा अनुभव बहुभाषिक ब्राह्मण संघाला आला आहे. जळगाव शहरात सर्व शाखांच्या ब्रह्मवृंदाची संख्या ३० हजारांच्या आसपास आहे. महाबळ परिसरातील प्रभागात जवळपास तीन हजार मतदान आहे. जुने जळगावातील काही प्रभागात आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातही मतदान आहे.

भारतीय जनता पक्षात कार्यक्रमांसाठी चादरी टाकण्यापासून तर कार्यक्रम संपून त्या उचलेपर्यंत राबणारे काही तरुण आहेत. त्यातील एक दोन तरुणांना महाबळ परिसरातून उमेदवारी अपेक्षित होती. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षात वजन आहे. त्यामुळे निवडणुकीचे मैदान जिंकणारा तिसरा ब्राह्मण नगरसेवक होण्याचे इचूछुकांचे स्वप्न होते. गेल्या ३०/४० वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर कमलाताई प्रभुदेसाई या पहिल्या आणि कृष्णेंदू तथा उदय भालेराव हे दुसरे असे दोघे जण पालिकेच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आले होते. तेव्हाच्या शहर विकास आघाडीच्या मातब्बरांना कमलाताई व भालेराव यांनी पराभूत केले होते.

मध्यंतरी काही जणांना स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळाली. यात आशिष जोगी, चंद्रशेखर ठुसे, दिनेश जोशी, बंटी जोशी यांचा समावेश राहिला. यात बंटी तथा अनंत जोशी यांनी लक्षवेधी कामगिरी केली. या नावांच्या पलिकडे मनपात ब्रह्मवृंदाचे फारसे अस्तित्व नाही. स्व. डॉ. अविनाश आचार्य हे रास्वसंचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. बहुतांश निवडणुकांमध्ये ते सत्ताधारी आघाडीला सकारात्मक पाठबळ देत. त्यांच्यानंतर ब्रह्मवृंदातील कोणताही चेहरा थेट पक्षाचे राजकारण करताना दिसत नाही. जे कोणी आज सामाजिक क्षेत्रात आहेत, ते व्यक्तीनिहाय संबंध जपणारे आहेत.

यावेळी भाजपत ब्रह्मवृंदाच्या उमेदवारीचा विषय गाजला. नाथाभाऊंच्या समर्थकाला बसविण्यासाठी मामाच्या समर्थकांनी फिल्डींग लावली आणि गिरीषभाऊंच्या निष्ठावंतांनी पत्ता काटला अशी चर्चा होती. पण या विषयी पक्षाच्या कोअर टीममधील सदस्याने स्पष्ट केले की, ब्रह्मवृंदातील मंडळींनीच घोळ घातल्याने उमेदवारी हिरावली गेली.  असे हे पडद्यमागील वास्तव आहे. नाही म्हणायला बंटी जोशी हे शिवसेनेतर्फे रिंगणात आहेत.

जळगाव मानपाच्या निवडणुकीत विघटीत झालेल्या मराठा समाजाला महत्त्व दिलेले नाही. दुसरीकडे संघटीत असल्याचे दिसणाऱ्या ब्रह्मवृंदाला कुरघोडीचा फटका बसला आहे. दोन्ही समाज यातून बोध घेतील असे तूर्त वाटते आहे.

No comments:

Post a Comment