Tuesday 17 July 2018

मराठा वर्चस्व संपवणारी निवडणूक

जळगाव महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांनी अगदी सोयीने आणि ठरवून आपापल्या उमेदवारांची निवड केली आहे. उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पक्षात स्वागतासाठी पायघड्या घातल्या गेल्या. यात मराठा म्हणून कोणीही दिसले नाही. मतदारांची गठ्ठा संख्या लक्षात घेऊन प्रभागातील उमेदवारांची निवड झाली आहे. पैनल प्रमुखांच्या भोवतीचे चेहरे नीटपणे बघितले की, प्रभागातील चौघा उमेदवारांच्या जात व समाज निहाय मतांच्या समिकरणाची माहिती होते. या समिकरणाचे अंतिम उत्तर काय असेल ? हे पडताळून पाहिले की, लक्षात येते या निवडणुकीतून मराठा समाजाच्या नेतृत्वाचा चेहरा हरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व  वगळले तर इतर पक्षांमध्ये मराठा नेतृत्व म्हणून चेहराच नाही. जळगाव शहरात मराठा मतदारांची संख्या जवळपास ७० हजार आहे. मराठा क्रांति मोर्चाला याच शहरात लाखावर गर्दी झाली होती.

ज्येष्ठ नेते नरेंद्र अण्णा पाटील हे मनपातील मराठा समाजाचे आणि सजग विरोधी नेते होते. प्रकृती साथ देत नसल्याने यावेळी ते रिंगणात नाहीत. माजी महापौर असलेले किशोर पाटील हे सुध्दा रिंगणात नाही. सौ. ज्योती शैलेंद्र इंगळे या सुध्दा रिंगणाच्या बाहेर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद देशमुख थेट नगरसेवक नसले तरी त्यांच्या सौभाग्यवती रिंगणात आहेत. श्री. देशमुख यांना तडीपारीची नोटीस पाठविण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी केले आहे. समस्त मराठा समाजाला ही सणसणीत चपराक आहे. शिवजयंती, मराठा मोर्चा अशा उपक्रमात सामाजिक चेहरा असलेले श्री. देशमुख रिकामटेकडे आहेत आणि दारु पिऊन धिंगाणा घालतात हे पोलिसांनी दिलेल्या नोटीसमधून समजले.

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत कोणाचे व्यवस्थापन या विषयावरुन अलिकडे मारहाणीचे प्रकार घडले. निवडणूक लढवून सत्तेत आलेल्या गटाला तेथून हुसकावून लावण्यात आले. एवढेच नव्हे तर जामिन मिळवत पळावे लागले. ज्यांनी हे घडविले त्यांची आज या मनपा निवडणुकीत अवस्था काय आहे ? उलटपक्षी इच्छा नसताना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी करावी लागली आहे. मराठा संस्थेतील शांत झालेल्या वादाला कोणी खतपाणी घातले, याची माहिती दोन्ही गटांना आहे. या संस्थेत एकत्र आलेले मराठा नेतेही आता विभागले आहेत.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर मूकमोर्चे निघाले. जळगावमधील मोर्चा आयोजनात समाज एकसंध झाला होता. प्रत्येक घरापर्यंत नेटवर्क पोहचले होते. तेव्हा ज्या मंडळींना समाजाचे कर्तेधर्ते मानले होते ते आज या निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठेही नाहीत आणि काही ठरवू शकतील अशी स्थितीही नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीत जे जे पदाधिकारी किंवा मंत्री आहेत त्यांनी ही कधी समाजाशी चर्चा केल्याचे चित्र नाही.

जळगाव शहरात राज्य सरकारच्या निधीतून अद्ययावत नाट्य संकूल उभारले गेले आहे, त्याला छत्रपती राजे संभाजी महाराजांचे नाव देणे निश्चित आहे. पण गेल्या ४ महिन्यांपासून निवडणुकांच्या आचार संहितेमुळे नाट्यगृहाचे लोकार्पण रखडले आहे. उद्घाटनापूर्वी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नाट्यगृहाचा देखभाल खर्च परवडणारा नसल्यामुळे भविष्यात राजे संभाजी महाराजांच्या नावे असलेले हे नाट्यगृह पडित वास्तू होण्याची शक्यता आहे.

प्रमुख पक्षांचे उमेदवार ठरवताना कोअर टीम म्हणून जे नेते होते, त्यांच्यातही मराठा चेहरे नव्हते. त्यामुळे ज्या वार्डात मराठा बहुल मतदार आहेत तेथे मराठ्यांमध्येच लढत लावलेली आहे. पण जेथे उमेदवारी निश्चित करणारे विशिष्ट समाज घटकांचे जे नेते होते त्यांनी आपापल्या उमेदवारांच्या समोर आपल्याच समाज किंवा जातीचा दुसरा उमेदवार येणार नाही ही काळजी घेतली आहे.

एकंदरीत जळगाव मनपाची ही निवडणूक मराठा समाजाचे वर्चस्व संपवणारी आहे, असे म्हणता येईल. कारण निवडून किती येतील ही शंका आहेच.

No comments:

Post a Comment