![]() |
२५ कोटींच्या कामांसाठी एकत्र आलेले प्रशासन व पुढारी |
गेल्या ५ वर्षांत मनपात पदाधिकारी म्हणून वावरणाऱ्या गट तटांची अवस्था ही नेहमी 'तळ्यात मळ्यात' अशीच राहिली. उडीदाच्या पोत्यात सारेच उडीद काळेच असतात. पण त्यातही एखाद दोन उडीद पांढरे भासतात. म्हणूनच त्याला 'उडीदामाजी काळे गोरे' म्हणतात. परंतु तसे पांढरे उडीद मनपाच्या कारभारात काही दिसले नाहीत. मनपातील सत्ताधारी खाविआ (३३ नगरसेवक) आणि इतर भाजप (१५), महाराष्ट्र नव निर्माण सेना (१२), राष्ट्रवादी काँग्रेस (११), जनक्रांती आघाडी (२), मनविआ १ यांच्यासह १ अपक्ष यांच्यात नेहमी स्वहितासाठी साटे लोटे राहिले.
गेल्या निवडणुकीत खाविआ ३३ जागा मिळवून मोठा गट होती. महापौरपदासह सत्तेसाठी एकूण ७५ पैकी ३८ चे बहुमत खाविआकडे नव्हते. उलटपक्षी भाजप, मनसे, राकाँ मिळून ३८ संख्याबळ होत होते. विरोधकांनी महापौरपद व स्थायी समिती सभापतीपदाचा कालावधी वाटून घेतला असता तर खाविआ सत्तेत आली नसती. खाविच्या विरोधात मागील निवडणुकीत लढलेले हे विरोध तेव्हा एकत्र आले नाहीत. परंतु आताच्या निवडणुकीत मागील बरेच विरोधी चेहरे भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आहेत. म्हणूनच ओरिजिनल खाविआतून आलेल्या नेत्यांची संख्या भाजपत वाढलेली नाही. गेल्यावेळी खाविआ विरोधात लढलेले सध्या भाजपत एकत्र दिसत आहेत. उडीद हा एका पोत्यातून दुसऱ्या पोत्यात टाकला तरी त्याचा रंग काळाच असतो. हेच सूत्र खाविआला सुध्दा लागू आहे.
मागील निवडणूक झाल्यानंतर महापौर निवडीच्यावेळी खाविआच्या उमेदवारासमोर विरोधासाठी विरोध दाखवायला भाजपने उमेदवार दिला नव्हता. मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहिले होते. नंतरच्या काळात मनसे सत्तेत सहभागी झाली. पण सत्तेत सहभागी होण्याचा खेळ मनसेच्या अंगलगट आला. कारण, महिला बालकल्याण सभापती निवडीवरुन मनसेचे काही नगरसेवक खाविआला तर काही नगरसेवक भाजपला जाऊन मिळाले. मनसे नंतर व्यक्तिनिहाय विभागली गेली. नंतरच्या काळात जनक्रांतीच्या दोघा नगरसेवकांनी मनसेचा पट्टा गळ्यात घातला होता.
राकाँची अवस्था नेहमी लटकून राहिलेला पक्ष अशी होती. महापौर निवडणुकीत राकाँने तटस्थ राहून खाविआला मदत केली. पण नंतर याच राकाँने खाविआचा पाठिंबा काढून घेणारी भूमिका घेतली. पण जेथे साटेलोटे असते तेथे सत्तेसोबत राहण्याचा मोह टाळला जात नाही. पाठिंबा काढणाऱ्या पत्राची बातमी माध्यमांमध्ये दिसली पण खाविआ व राकाँचा गळ्यात गळा कायम राहिला. अर्थात, यामागे विविध कामातील ठेकेदारीचे लाभ हे कारण होते. नंतरच्या काळात प्रभाग समिती निवडीवरुन राकाँतही फूट पडली. कोणीच कोणाला जुमानत नव्हते.
भाजपच्या १५ नगरसेवकांना आमदार सुरेश भोळे यांचे पाठबळ होते. मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहारासाठी २५ कोटीचा विशेष निधी दिला. सुरुवातीला खाविआ आणि आमदार भोळे यांच्यात निधी खर्चावरुन मतभेद झाले. त्यानंतर आमदार भोळे यांनी सूचविलेल्या कामांच्या यादीला भाजपच्याच काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. अगदी पालकमंत्र्यासमोर कामांच्या यादीवर सही करणाऱ्या आमदारांनी पलटी मारुन मला कामांची यादीच माहित नाही असे सुध्दा सांगितले.
एकदातर (दि. २४/९/२०१७) जिल्हाधिकारी, महापौर, आमदार यांनी एकत्र फोटो काढून जळगावकरांना सांगितले की, २५ कोटींच्या कामातील तिढा सुटला. हा फोटो पाहून जळगावकरांना वाटले होते, चला आता तृरी कामे होतील. पण नंतर त्या कामांची प्रगती झाल्याचे काही दिसले नाही.
गेल्या ५ वर्षांत खाविआतही सारे काही सुरळीत होते असे नाही. आघाडीचे नेते रमेश जैन आणि नितीन लढ्ढा यांच्याविषयी अनेकांच्या मनांत नाराजी होती. खाविआला राज्य सरकार सहकार्य करीत नाही म्हणून खाविआचे शिवसेनेत विलनिकरणाचा मुद्दा चर्चेत होता. सन २०१४ च्या लोकसभा निवडणूक काळात खाविआने राकाँला पाठिंबा दिला होता. मात्र विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघातील निवडणुकीत खाविआच्या नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते. खाविआची हीच भूमिका आता अडचणीची ठरते आहे. मध्यंतरी खाविआला नीटपणे काम करता येऊ नये म्हणून भाजपच्या नेत्यांनी निष्क्रिय आयुक्ताला काही काळ आणून बसवले होते. असे वातावरण असताना खाविआ सुध्दा जनतेच्या हिताचे काम करु शकली नाही. सुरेशदादा जैन सोबत नसताना शहर विकास होऊ शकत नाही, अशी छुपी भूमिका घेणाऱ्या खाविआला आपल्याच कृतीचा फटका बसला. आर्थिक अनियमिततेची अनेक प्रकरणे घोटाळे म्हणून डोक्यावर लटकत आहेत. सरकार विरोधात होते म्हणून कामे झाली नाहीत, हा युक्तिवाद निवडणूक प्रचारात बुमरैंग होवू शकतो. कारण आताही राज्य सरकार भाजप नेतृत्वातील आहे व राज्य स्तरावर युतीचे विळाभोपळ्याचे नाते आहे. अशा स्थितीत खाविआने बदलून घेतलेल्या शिवसेनेच्या चेहऱ्याला का मतदान करावे ? असा प्रश्न मतदारांना पडतोच.
गेल्या ५ वर्षांत मनपातील सत्ताकारण बघितले तर खाविआच्या सत्तेचा लाभ कमी अधिक प्रमाणात अनेकांनी घेतला आहे. पण जळगावकरांना रस्ते, गटारी, पाणी पुरवठा व पथदीप विषयक प्राथमिक सुविधा देण्यात खाविआसह सारेच अपयशी ठरले आहे. अशावेळी खाविआचे विरोधक भाजपचा चेहरा घेऊन व खाविआचे सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा घेऊन मत मागायला येत आहे.
या स्थितीवर अकबर मासूम याशायरची एक रचना आठवते ...
न अपना नाम न चेहरा बदल के आया हूँ
कि अब की बार मैं रस्ता बदल के आया हूँ
वो और होंगे जो कार-ए-हवस पे ज़िंदा हैं
मैं उस की धूप से साया बदल के आया हूँ
ज़रा भी फ़र्क़ न पड़ता मकाँ बदलने से
वो बाम-ओ-दर वो दरीचा बदल के आया हूँ
मुझे ख़बर है कि दुनिया बदल नहीं सकती
इसी लिए तो मैं चश्मा बदल के आया हूँ
वही सुलूक वही भीक चाहता हूँ मैं
वही फ़क़ीर हूँ कासा बदल के आया हूँ
(मी सारे काही बदलून आलो. आता मी फकीर आहे. पण मला तुमच्या मतांची भीक हवी आहे. कारण आता कपडे बदलून आलोय ...)
No comments:
Post a Comment