Wednesday 11 July 2018

दलबदलुंना दारातून परत पाठवा !

जळगाव महानगर पालिका निवडणुकीचा पोळा शेवटी फुटला. पोळा हा शब्द येथे उदाहरण म्हणून आहे, तुलनात्मक नाही याचे अगोदर स्पष्टीकरण देतो. बैल आणि माणसांची तर मुळीच तुलना होऊ शकत नाही. मनपा निवडणुकीत जे घडले व घडते आहे ते पाहून बैल पोळ्याची आठवण झाली. पोळ्याच्या दिवशी बैलांविषयी दोनच गोष्टी मालक किंवा गडीच्या हातून घडतात. पहिली म्हणजे, पळवून किंवा मिरवणुकीने ओळखी पाळखीच्या दारी बैलाला नेले जाते. तेथे पूजा करुन पुरणपोळी खाऊ घालतात. 'इच्छा असो वा नसो' बिच्चारा बैल पोळी खात असतो. दुसरी घडणारी गोष्ट म्हणजे, एखाद्या चौकात ग्रामदैवताच्या मंदिराजवळ १०१,२०१ रुपये बक्षीसाचे नारळ दोराला बांधलेले असते. बैलाच्या मागून धावत येणारे मालक वा गडी उडी मारुन ते नारळ तोडतात. जो बैल मालक किंवा गडी नारळ तोडतो, तो बक्षीसाचा मानकरी ठरतो.


पोळ्याशी संबंधित या दोन्ही घटना मनपा निवडणुकीच्या तोंडावर दलबदल करणाऱ्यांना चपखल लागू होतात. बैलाला पुरणपोळी खायची असेल तर दारोदार जावेच लागते. निवडणुकीत मत हवे असेल तर उमेदवाराला दारोदार जावेच लागते. येथे उदाहरण पुरणपोळी व मत याच्याशी संबंधित आहे. नारळ तोडण्याचा हेतू मालकाचा किंवा गडीचा असतो. तो साध्य करायला मालक वा गडी बैलाची शेपूट पिळून त्याला धावायला लावतो. मनपावर पक्षाचा झेंडा हवा असे नेत्यांना वाटते. विजयी होणारा उमेदवार शोधून पक्षांतराची शेपूट पिरगळली जाते. एकदा का नारळ तुटला की बक्षीस मालकाच्या अथवा गड्याच्या हातात पडते. बैलाच्या मानेवर गाडीच्या नेहमीच्या ओझ्याची दुसेर (जू) कायम असते. येथे उदाहरण शेपूट पिळणे व पक्षांतराशी संबंधित आहे.

जळगाव मनपा निवडणुकीत अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी दलबदल केला. ५ रुपयांचे दुपट्टे गळ्यात टाकले. राजकारणात एक चांगले असते. असा चिन्हांकित रंगाचा दुपट्टा टाकला की तो माणूस पक्षाच्या दृष्टीने पुरणपोळी खाण्यालायक पवित्र आणि शेपूट पिळणाऱ्या नेत्यांच्या दृष्टीने नारळ तोडायला धावण्यासाठी पात्र होतो. अशावेळी आपल्या गोठ्यातील इतर मंडळी दोर तोडून पळत असल्याचे भानही राहत नाही.

मनपाचा नगरसेवक होणे, ही क्रिया प्रत्येक मतदाराच्या मताशी प्रामाणिक राहून शहर विकास करण्याविषयीचे दिले जाणारे अभिवचन आहे. अशा अभिवचनापूर्वी स्वतःच्या स्वार्थासाठी दलबल करुन कोणत्या प्रामाणिक विचाराने आपण मतदारांच्या दारी जाणार आहोत ? याचा विचार करायला हवा. पोळा जवळ आला म्हणून पुरणपोळीच्या हेतूने मालक किंवा गडी बदलणारा बैल मी अजून पाहिलेला नाही. हे लेखन म्हणजे, पुरणपोळी व नगरसेवक पदासाठी उदाहरण आहे. बैल व माणसाची तुलना नाही.

वैचारिक अभद्रपणा सिध्द करणाऱ्या अशा दलबदलुंना घराच्या दारातून मतदारांनी परत पाठवायला हवे. मी तर पुणेकरांचा आदर्श घेत घराबाहेर पाटीच लावणार आहे, 'दलबदलुंनी येथे मत मागू नये.' किंवा 'आम्ही गडी बदलणाऱ्या बैलास पुरणपोळी खाऊ घालत नाही.'

हिंदी भाषेतील ज्येष्ठ हास्य कवी काका हाथरसी यांच्या दार्शनिक दलबदलु या कवितेतील खालील ओळी जळगाव मनपा निवडणुकीतील दलबदलुंना तंतौतंत लागू होतात.

सत्य और सिद्धांत में, क्या रक्खा है तात ?
उधर लुढ़क जाओ जिधर, देखो भरी परात
देखो भरी परात, अर्थ में रक्खो निष्ठा
कर्तव्यों से ऊँचे हैं, पद और प्रतिष्ठा
जो दल हुआ पुराना, उसको बदलो साथी
दल की दलदल में, फँसकर मर जाता हाथी

(वैधानिक इशारा - यातील बरेच लेखन बैलांना लागू आहे. कृपया माणसांशी तुलना करु नये)

1 comment:

  1. सत्ता-स्वार्थासाठी दलबदल हा पायंडा साहेबांनी पाडला असेल का ?

    ReplyDelete