Saturday, 16 June 2018

वाकडी येथील दुसरी बाजू ...

वैधानिक इशारा वाकडी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे मांतग समाजातील दोन मुलांना नग्नावस्थेत झालेली मारहाण आणि अनुसूचित जमातीतील एकाला धमकावण्याचे अमानविय कृत्य करणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या दोघांसह त्यांचे इतर दोन बघे साथीदार (ते सुद्धा अनुसूचित जमातीचे आहेत) यांना प्रचलित कठोर कायद्यांमधील सूचविलेली कमाल शिक्षा झालीच पाहिजे, असे मत लेखानापूर्वीच व्यक्त करीत आहे.)

वाकडी येथे गेल्या १० जूनला शेतविहिरीत आंघोळीस आलेल्या दोन मुलांना नग्नावस्थेत मारहाण करण्याचा प्रकार घडला. तेथे अजून एक तिसरा मुलगा होता, पण त्याला केवळ धमकावण्यात आले. दोघांना एकाने मारहाण केली आणि दुसऱ्याने मोबाईलद्वारे त्याचा व्हीडीओ तयार केला. तेथे अजून इतर दोघे बघे ही होते. त्यानंतर तीन दिवस या घटनेविषयी कोणतीही तक्रार पीडितांनी केली नाही. मात्र, १० जूनला घटनेचे व्हीडीओ चित्रिकरण करणाऱ्याने १३ जूनला घटनेचा व्हीडीओ वाकडी ग्रामस्थांच्या व्हाट्स ऍप गृपमध्ये शेअर केला. नग्नावस्थेतील मुलांचे गावात हसे व्हावे, हा त्यामागील हेतू होता. मात्र, त्या दोघा मुलांना नग्नावस्थेत होणारी अमानुष मारहाण पाहून वातावरण तापण्यास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात घटनेतील पीडित मुले मातंग समाजातील असल्याचे स्पष्ट झाले होते. पीडितांची जात समोर आल्यानंतर आपसूक मारहाण करणाऱ्या आरोपींच्या जातीचा शोध घेतला गेला. त्यातील एकाचे आडनाव जोशी आणि दुसऱ्याचे लोहार होते. जोशी आडनाव असणाऱ्या शेतमालकाचीच विहिर आहे, हे सुद्धा समोर आले. मग त्यातून वेगवेगळ्या स्टोरी तयार व्हायला लागल्या.

जोशी आडनाव लक्षात घेऊन सवर्ण व्यक्तिच्या चिथावणीने मांतग समाजातील मुलांवर अत्याचार झाल्याची पहिली कथा झटपट रचली गेली. हा विषय व घटनेचा व्हीडीओ माध्यमांच्यासह विविध संघटना व राजकिय पक्षांना चर्चाचर्वण व टीका करण्याचे खाद्य म्हणून मिळाला. काहींनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. ती रास्त होती. मात्र, अशा घटनांच्यावेळी गावातील काही मंडळी विषय विकोपाला जाऊन त्याला वेगळे वळण मिळू नये म्हणून मध्यस्थाची भूमिका निभावत सामोपचाराने विषय मिटवायचा प्रयत्न करतात. तसा प्रयत्न वाकडीतही झाला. यातून दुसरी स्टोरी, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न म्हणून रंगविली गेली. अखेर १३ जूनला सायंकाळी एका पीडिताच्या आईची तक्रार पहूर पोलिसात नोंदवून मारहाण करणाऱ्या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. येथपर्यंत वाकडीची घटना आटोक्यात होती.

मात्र, नंतरच्या टप्प्यात वृत्तपत्र माध्यमांमधील लेखन आणि दूरचित्रवाहिन्यांवरील स्टुडिओत बसून प्रस्थापित चेहऱ्यांनी केलेली एकांगी चर्चा यातून वाकडीचा गावगाडा बिघडतगेला. घटना का घडली ? या कारणाचा वास्तववादी शोध घेण्यापेक्षा पीडित आणि आरोपींच्या जात, जमाती याविषयी आरोपप्रत्यारोप सुरू झाले. एक मात्र बरे झाले, पोलिसांनी गुन्हा नोंद झाल्यानंतर प्रसिद्धी पत्रक देवून पीडित आणि आरोपी कोणत्या जात, जमातीचे आहेत याचा सुस्पष्ट उल्लेख केला. तेव्हा असे लक्षात आले की, जोशी आडनाव असलेली ती व्यक्ती कुडमुडे जोशी या घटकातील म्हणजे, नंदीबैल घेऊन गावोगावी भटकणाऱ्या भटके विमुक्त जमातीतील आहे. शिवाय, त्याचा सोबती लोहार आडनाव असलेला हा सुद्धा भटके विमुक्त जमातीतील आहे. इतर दोघे बघे ही जमातीतीलच आहेत. या वास्तवाने जातीभेदाचा मुद्दा आपोआप गुंडाळला गेला. सवर्णाकडून मातंग मुलांवर अत्याचाराचा मुद्दा मागे पडला.

अर्थात, विहीरीत आंघोळ करुन ती बाटविली म्हणून मुलांना मारहाण, विहिरीत पोहले म्हणून २ मागासवर्गीय मुलांना विवस्त्र करुन मारहाण अशा वृत्तपत्रिय हेडलाईन्स दिशाभूल करणाऱ्या ठरल्या. कारण, मातंग जसे मागास आहेत तेवढेच भटके विमुक्त हेही मागासच आहेत. तेही आरक्षणाच्या वर्गातील आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करून माध्यमांमध्ये बातमी लेखन व चर्चा झड़ल्या. येथे "न्यूज १८ लोकमत" या वाहिनीवर समुह संपादक श्री. उदय निरगुडकर यांनी बेधडक या कार्यक्रमात घडवून आणलेली चर्चा बऱ्यापैकी घटनेच्या मागील कारणांचा शोध घेणारी ठरली. त्यामुळे इतर दूरचित्रवाहिन्यांमध्ये वेगळ्या वळणाने होऊ शकणारे चित्रण थांबले.

कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी घटनांच्यामागे प्रामुख्याने दोन सूत्र असतात. पहिले म्हणजे, पूर्वग्रह दुषित किंवा तात्कलिक कारण. दुसरे म्हणजे, जाती-पातीचा भेद किंवा एखाद्याची व्यक्तिगत असूया. याच कारणांवरून घटनेचा हेतू व त्या घडण्यामागील कारण लक्षात येते. वाकडीच्या घटनेमागील अशा कारणांचा शोध न घेता पारंपरिक पद्धतीने जातीभेदातून झालेली अमानुष घटना असेच चित्रण माध्यमे करीत राहिली आणि राजकिय लाभाच्या अपेक्षेने तेथे पोहचलेले पुढारी बोलत राहिले.

मुलांच्या आंघोळीने विहिर बाटली हा दावा करणाऱ्यांनी वाकडीचा गावगाडा समजून घेतला नाही. हा गावगाडा समजून घेतला असता तर वाकडीची घटना ही केवळ तात्कालिक कारणातून घडल्याचे आणि ती सहा सात जणांच्या आपापसातील वादातून कारणीभूत ठरल्याचे लक्षात येते. वाकडीत पोहचलेले राष्ट्रीय पक्षांचे पुढारी, आदिवासी किंवा दलितांचे नेते म्हणून भटकणारे संघटनेचे नेते यापैकी कोणीही वाकडीतील जातीय समिकरणे, तेथील सामाजिक सलोखा, गावातील प्रशासकिय व्यवस्था, परस्परावर अवलंबून असणे हे काहीही समजून घेतले नाही. किंवा त्यासंदर्भात चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. तेथील सरपंच, तेथील पोलीस पाटील, तेथील ग्रामसेवक अशांना गावातील नेहमीच्या वातावरणाविषयी काहीही विचारले नाही. त्यामुळे वाकडी गावातील दुसरी बाजू समोर आली नाही. मात्र, जातीय तणावाचा उल्लेख करणाऱ्या एका पुढाऱ्याला काही ग्रामस्थांनी खडसावले असेही समोर आले आहे.

काय आहे दुसरी बाजू ?

वाकडी येथील घटनेला जातीय वादविवादाचे उदाहरण ठरविणारा प्रत्येक घटक हा तेथील ग्रामस्थांनी जपलेला गावगाड्याचा सलोखा मोडून तोडून टाकत आहे. मातंग समाजाची मुले शेतविहिरीत आंघोळ करतात, विहिर बाटते अशी मांडणी करणारी माध्यमे व त्यावर बोलून स्वार्थाची पोळी शेकणारे पुढारी तोंडघशी पडतील असा वाकडीचा गावगाडा आहे.

वाकडी हे गाव सुमारे ७ हजार लोकसंख्येचे आहे. ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जमातीच्या नसिफा तडवी आहेत. ग्रामपंचायतीत ५ कर्मचारी असून त्यातील ३ मातंग समाजाचे व दोन बौद्ध समाजाचे आहेत. म्हणजेच, वाकडीचे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत व्यवस्थापन मागासवर्गातील घटकांकडेच आहे. जेव्हा की, गावात मातंग समाजाची केवळ १३ घरे आणि बौद्ध समाजाची ४० घरे आहेत. उर्वरित घरे ही प्रामुख्याने लाडवंजारी, राजपूत, मराठा, जैन यांच्यासह इतर जाती-जमातींची आहे. ग्रामपंचायत व्यवस्थापनात असलेल्या कारभारी घटकांविषयी यापूर्वी गावात कोणीही तक्रार केलेली नाही किंवा कोणाचे वादविवाद घडलेले नाही.

आता मुख्य मुद्दा समोर येतो तो म्हणजे, वाकडी गावात वॉटरमन म्हणून मांतग समाजाचे जगन चांदणे हे गेल्या २५ वर्षांपासून काम करीत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा मुलगा सुनील चांदणे हा सुद्धा वॉटरमन म्हणून काम करीत आहे. जगन चांदणे हे घटनेतील पीडितांचे आजोबा असून सुनील हा चुलत भाऊ आहे. वाकडी गावासाठी तोंडापूर धरणातून पाणी पुरवठा योजना आहे. गावात दोन मोठ्या व तीन लहान टाक्या आहेत. या टाक्यांवरून गावातील विविध भागात पाणी पुरवठा होतो. वॉल्व सुरू करणे व बंद करणे ही कामे जगन व सुनील चांदणे करतात. दर १० दिवसांनी पाण्याच्या टाक्यांमध्ये टीसीएल पावडर टाकली जाते. शिवाय, नियमितपणे पाण्याच्या टाक्याही तेच धुवून स्वच्छ करतात. म्हणजेच, चांदणे यांच्या स्पर्शाने प्रत्येक ग्रामस्थाला पिण्याचे व वापराचे पाणी मिळते. अशा प्रकारे मिळणारे पाणी वापरून वाकडीतील एकही ग्रामस्थ आपण बाटलो अशी भावना मनांत बाळगत नाही. पण, वॉटरमनचे नातेवाईक शेतविहिरीत आंघोळ करतात म्हणून विहिर बाटते असे, म्हणणे निश्चितपणे लाजिरवाणे व वाकडीच्या गावागाड्याच्या सलोख्यावर अन्याय करणारे आहे. हिच आहे वाकडीतील दुसरी बाजू आणि राजकिय पोळ्या शेकणाऱ्यांची दुखरी बाजू

नवीदिल्लीत बसून अखिल भारतीय पक्ष चालविणाऱ्या अध्यक्षाला, दूरचित्र वाहिन्यांवर बडबडणाऱ्या संघटनात्मक पुढाऱ्यांना, माध्यमांमधील अर्धवट पत्रकारांना, सोशल मीडियात उथळपणे फास्ट फॉर्वड करणाऱ्यांना वाकडीची ही दुसरी बाजू समाजणार कधी आणि कशी ?

वाकडीचा हा समाजिक सलोखा केवळ एवढ्या पुरताच नाही. तेथील समाजिक एकत्रिकरणाचे सर्वोत्तम उदाहरण हे शेंगोळा यात्रेच्या (तुळसाबाईची यात्रा) निमित्त होणारे नगर भोजन हे सुद्धा आहे. या नगर भोजनाची जवळपास २७ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी साधारणतः दिवाळीच्यानंतर ही यात्रा भरते. तेव्हा तेथे भागवत सप्ताह असतो. संपूर्ण गाव यात सहभागी असतो. भागवत कथा एकायला रोज ३००-४०० भाविक असतात. त्यात गावातील १५०-२०० व इतर गावीताल २०० भाविक असतात. कथेनंतर प्रसाद असतो. त्यात वाकडीचील सर्व समाजाचे भाविक असतात.

सातव्या दिवशी नगर भोजनाचे आमंत्रण प्रत्येक ग्रामस्थाला असते. आजुबाजूच्या ६-७ खेड्यातून भाविक येतात. दहा हजार लोकांच्या जेवणासाठी पोळ्या, भाजी वगैरे तयार करावे लागते. यासाठी सर्वंच ग्रामस्थांच्या घरी कणिक दिले जाते. प्रत्येक घरातून पोळ्या तयार करुन येतात. भाजी, डाळ वगैरे करण्यासाठी गावातील मुस्लिमांसह इतर सर्वजण एकत्र असतात. बौद्ध आणि मांतग समाजाच्या घरुनही पोळ्या तयार करुन येतात. अशा प्रकारे तयार होणारा भागवत सप्ताहाचा प्रसाद सारा गाव मिळून नगर भोजन प्रसंगी ग्रहण करतो. शिवाय वाढप्यांची व पाणी देण्याची कामे सर्वजण करतात. नगर भोजन करताना कोणती पोळी कोणाच्या घरुन तयार करुन आलेली आहे, हे जेथे ओळखता येत नाही, किंवा पोळ्यांविषयी कोणताही किंतु परंतू कोणीही मनांत आणत नाही, तेथील सात मुलांच्या आपापसातील कृत्यांला जातीय वादविवादाची दुषित मोजपट्टी लावून वाकडीला संपूर्ण भारतात बदनाम केल्याने कोणाचे काय हेतू साध्य होत असतील ? याचा विचार सद्सद्विवेकबुद्धी असलेल्या प्रत्येकाने करायला हवा.

वाकडी विषयी तथाकथित पुढारी, कोठेही जावून तोंड मारणाऱ्या संघटनांचे पुढारी आणि पत्रकारितेचा वसा जपणारे नव्हे तर ठसा उमटविणारे माध्यम प्रतिनिधी यांच्या अर्धवट व एकांगी विश्लेषणावर वाकडीची केवळ एक बाजू समजून योग्य होणार नाही. यासाठी तेथील गावगाडा समजून घेणे आवश्यक आहे.

शेतविहिरीत पोहू नका, असे वारंवार सांगूनही मुले ऐकत नाही याच्या रागातून शेतमालक, त्याचा सोबती यांनी न ऐकणाऱ्या मुलांना अद्द्ल घडविण्यासाठी मारहाणचा अमानविय प्रकार केला आहे. मनाई करुनही विहिरीत पोहायला आलेली मुले स्वतः नग्नावस्थेत पोहत होती. विहिर मालक तेथे आल्यानंतर ती बाहेर येवून शेजारच्या मशीन रुमकडे पळाली आणि तेथे अमानविय पद्धतीने मारहाणीच्या दुर्दैवी प्रसंगाला सामोरी गेली. हे सत्य आहे. या घटनेतील अपराध हा चौघांशी फार तर तेथे उपस्थित सात जणांशी (तिसरा पीडित मुलगा व इतर दोन बघे) संबंधित आहे, हे शाश्वत व नाकारता न येणारे सत्य आहे. हे सत्य समोर आल्यानंतर प्रत्येक जण हेच म्हणेल की, अपराध करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण वाकडीच्या बदनामीची मोहीम थांबली पाहिजे.

1 comment:

  1. विस्तारपूर्वक आणि सखोल विचार

    ReplyDelete