Monday, 4 June 2018

असे जिंकले १९७१ चे युद्ध


पाकिस्तानी सैन्यदलाची शरणागती
सन १९४७ मध्ये भारताचे विभाजन होऊन दि. १४ ऑगस्ट १९४७ ला पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) हे अस्तित्वात आले. भौगोलिकदृष्ट्या दोन ठिकाणी विभाजीत अशा संयुक्त देशाचे अस्तित्व तेव्हाही अडचणीचे होते. पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी व पठाणी राजकिय नेत्यांचे पूर्व पाकिस्तानवर वर्चस्व होते. त्यांची भाषा उर्दू होती. पूर्व व पश्चिम पाकिस्तानची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक संस्कृती भिन्नच होती. पूर्व पाकिस्तान नैसर्गिक स्त्रोतांनी संपन्न होता. तेथे बंगाली नेते राजकिय वर्चस्व ठेवून होते. त्यांची भाषा बंगाली होती. राजकारणासह सरकारी नोकऱ्यांत पश्चिमी पाकिस्तानी मंडळींचे वर्चस्व होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तान विषयी प्रारंभापासून नाराजी होती.


सन १९६९ च्या दरम्यान पूर्व पाकिस्तानमध्ये स्वतंत्र देशाच्या निर्मितीचे वारे वाहू लागले. तेथे असलेल्या पाकिस्तानी सैन्याकडून बंडखोर  आणि सामान्य जनतेवर होणारा अत्याचार वाढला. शेकडो बंगाली महिलांना कैदी करुन कारागृहात डांबले तर पुरुषांचा सरेआम कत्ल होवू लागला. अशा अशांत व अस्थिर स्थितीत संयुक्त पाकिस्तानच्या विभाजनाची प्रक्रिया वेगात सुरू झाली. बांगलादेश मुक्तीची मागणी करीत मुक्ती संग्राम नावाने संघटना कार्यरत झाली.

पश्चिम पाकिस्तानातील जनरल याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानातील बंडखोरी मोडून काढायचे ठरविले. तेथील अशांत परिस्थिती हाताळता येत नाही असा आरोप ठेवून जनरल साहेबजादा याकूब यांना हटवून जनरल टिक्का खान यांना पाठविले. टिक्का खान यांनी सैन्याचा वापर जनतेवर अनन्वित अत्याचार करण्यासाठी केला. त्यामुळे बंडखोरी वाढतच गेली. सैन्याच्या छळाला कंटाळून पूर्व पाकिस्तानातील निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले. त्यांची संख्या लाखांत वाढली. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यांनी पूर्व पाकिस्तानलगतच्या सिमा या लोढ्यांसाठी खुल्या केल्या. त्यांच्यासाठी मदत केंद्र व आश्रयस्थाने निर्माण केली. अशा पद्धतीने भारतात आलेल्या शरणार्थींची संख्या एक कोटीवर गेली. या लोकांचे काय करायचे ? हा भारतासमोर प्रश्न होता. कारण सिमेलगतच्या शहरी भागात नागरी सुविधांवर या शरणार्थींच्या संख्येचा प्रतिकूल परिणाम होत होता. आश्रयस्थानात आलेल्या मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण भारतीय सैन्य दलाने देणे सुरू केले.

याच काळात पश्चिम पाकिस्तानात तेव्हाचे राष्ट्रपती अयुब खान यांच्या विरोधातही वातावरण तापले. राजकिय अस्थिरता हाताळता येत नसल्याचा त्यांच्यावर आरोप करुन त्यांना पदावरुन पाय उतार केले गेले. सेनादलाचे प्रमुख जनरल याह्या खान यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता हाती घेतली. याच काळात पूर्व पाकिस्तानात नेते शेख मुजीब उर रहेमान यांनी स्वतंत्र बांगलादेश निर्मितीची मागणी केली. त्यांनी अवामी लीग पक्षाची स्थापना केली. याह्या खान यांनी सन १९७० मध्ये विधासभेच्या निवडणुका जाहिर केल्या. पूर्व पाकिस्तानात अवामी लीगने विधीमंडळाच्या एकूण १६९ पैकी १६७ जागा जिंकल्या. याच जागांच्या बळावर संयुक्त पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत शेख मुजीब यांच्या पक्षाला एकूण ३१७ जागांपैकी बहूमत मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची संधी त्यांना चालून आली. पण राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांनी त्यांना बंडखोर ठरवून इस्लामाबादेतील कारागृहात डांबले. पूर्व पाकिस्तानात सैन्याचा वापर करीत बंगाली जनतेचा मोठा नरसंहार केला. तो दिवस होता दि. २५ मार्च १९७१. मात्र, दि. २६ मार्च १९७१ ला मेजर जिया उर रहेमान यांनी शेख मुजीब यांच्यावतिने बांगलादेश स्वतंत्र झाल्याची घोषणा ढाका आकाशवाणीवरुन केली. तेथील सैन्यदलातील अनेक बंगाली अधिकाऱ्यांनी तेव्हा भारतात शरण घेतली. दि. २७ मार्च १९७१ ला इंदिरा गांधींनी बांगलादेश मुक्ती संग्रामला भारताचा अधिकृत पाठींबा जाहिर केला. भारतातील आश्रयस्थानी शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेणारे मुक्ती संग्रामचे कार्यकर्ते पूर्व पाकिस्तानात परत जावून पश्चिम पाकिस्तानी सैन्यावर छुपे हल्ले करु लागले. त्यांना भारतातून शस्त्रे सुद्धा पुरवली जात. तेथे एकप्रकारे गृह युद्ध सुरु झाले.

गाझी पाणबुडीचा कराची बंदर ते विशाखापट्टण मार्ग
इंदिरा गांधी यांचे पूर्व पाकिस्तानातील घडामोडींवर पहिल्या पासून बारकाव्याने लक्ष होते. संयुक्त पाकिस्तान मोडकळीस येत असल्याचे त्यांना समाधान होते. हाच संदर्भ राझी चित्रपटाचा प्रारंभात येतो. मुक्ती संग्रामवाले पाकिस्तानी सैन्यावर सशस्त्र हल्ले करीत. पाकिस्तानी सैन्य मग सामान्यांचा छळ करीत असे. मुक्ती संग्रामला भारताची फूस असल्याचा पश्चिम पाकिस्तानचा राग होता. पूर्व व पश्चिम पाकिस्तानात संपर्काचे केवळ दोन पर्याय होते. पहिला म्हणजे हवाई मार्ग आणि दुसरा म्हणजे, समुद्री मार्ग. या दोन्ही मार्गावर त्यावेळच्या आयएनएस विक्रांत या अवाढव्य जहाजामुळे भारतीय नौदल व वायुदलाचे वर्चस्व होते. पश्चिम पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तानात जाण्यासाठी भूमार्ग नव्हताच. जेव्हा ढाकामधून स्वतंत्र बांगलादेश निर्मितीची घोषणा बंडखोरांनी केली तेव्हा पश्चिम पाकिस्तानातून सैन्याची कुमक सागरी मार्गे पाठविणे गरजेचे झाले. यासाठी अमेरिकेने पश्चिम पाकिस्तानला दोन जहाजे दिली. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांनी संयुक्त रशियाचा दौरा करुन आपापापसात २० वर्षे सहकार्य करार केला होता. संयुक्त रशियाने सुद्धा भारताला पाणबुड्या दिल्या. अशा प्रकारे भारतीय नौदल अधिक शक्तीशाली झाले. भारत व संयुक्त पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्धाची तयारी पडद्यामागे अमेरिका व तेव्हाचा संयुक्त रशिया हेही करीत होते.

पश्चिम पाकिस्तानातून सागरी मार्गाने सैन्याची रसद पूर्व पाकिस्तानात जाण्यासाठी भारताने अडथळा करु नये म्हणून अमेरिका भारतावर दबाव निर्माण करीत होता. मात्र, इंदिरा गांधी यांना पूर्व पाकिस्तान हा मुक्त व्हावा असेच वाटत होते. त्यांनी अमेरिकन दबाव झुगारुन सागरी मार्गावर भारताचेच वर्चस्व राहिल अशी व्यूह रचना केली. भारतातील शरणार्थींना
पुन्हा पूर्व पाकिस्तानात परत पाठविण्यापेक्षा पूर्व पाकिस्तानातून पश्चिम पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावणे आणि संभावित शरणार्थी तथा घुसखोरांना त्यांच्याच प्रांतात रोखणे हा व्यावहारिक निर्णय घेण्याचे इंदिरा गांधी यांनी मनोमनी ठरविले होते. अमेरिकेसमोर भारताच्या सुरक्षेचा मुद्दा त्यांनी पुढे रेटला. अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे सल्लागार हेनरी किसिंजर यांच्या नेतृत्त्वातील शिष्ट मंडळालाही इंदिरा गांधी यांनी ठणकावून सांगितले होते की, गरज पडली तर भारतीय सैन्य पूर्व पाकिस्तानात घुसून कारवाई करेल. ही चर्चा साधारणतः जुलै १९७१ मध्ये झाली होती. यासाठी त्यांनी तेव्हाचे भारतीय लष्कर प्रमूख मानेक शा यांच्याशी चर्चा करुन पाकिस्तानशी लढायला सज्ज राहा आणि भारताच्या सुरक्षेसाठी जे करता येईल ते करा अशी मुभा दिली होती. मात्र तेव्हाची उल्लेखनिय बाब अशी की, पश्चिम पाकिस्तानवर हल्ला करण्याची घाई करणाऱ्या इंदिराजींना माणनेक शा यांनी रोखले होते. वातावरण प्रतिकूल आहे त्यामुळे आपले लक्ष्य साध्य होणार नाही. काही काळ प्रतिक्षा करुन नंतर युद्ध करु असे मानेक शा यांनी सांगितले होते आणि इंदिराजींने ते मान्य केले होते.  

पूर्व पाकिस्तानातील बंडखोरांचा उपद्रव, त्यांना मिळणारी भारताची सशस्त्र मदत, सागरी मार्गाच्या वापरातील अडचणी अशा कोंडीत असलेले पश्चिम पाकिस्तानी सैन्यदल भारतीय युद्धनौका आयएनएस विक्रांतला उध्वस्त करण्याचे कारस्थान रचत संभावित युद्धाची तयारी करीत होते. यासाठी त्यांची अत्याधुनिक अमेरिकन बनावटीची पाणबुडी पीएनएस गाझीला समुद्रीमार्गे विशाखापट्ट्णपर्यंत घुसवून विक्रांतला उडवायचे आणि बंगालच्या उपसागरात पाण सुरूंग पेरायचे ही त्यांची योजना होती. एकदा हे शक्य झाले की भारतावर वायुसेनेचे हल्ले करुन युद्ध सुरु करायचे नियोजन होते.

अशा अस्थिर काळात विक्रांतची सुरक्षा ठेवण्यासह गाझीला कसे शिकार केले गेले याची वास्तवादी कहाणी तेव्हाचे नौदल उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल एन. कृष्णन यांच्या आत्मचरित्रातून उलगडत जाते. सागरी युद्धाच्या डावपेचात हुशार असलेल्या कृष्णन यांनी नौदलातील आठवणींचे 'ए सेलर्स स्टोरी' हे पुस्तक लिहिले आहे. सन १९७१ मध्ये श्री. कृष्णन हे विशाखापट्टण येथे नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. विक्रांतला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांनी तिला विशाखापट्टण बंदरापासून अनेक किलोमीटर दूर बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांजवळ उथळ समुद्रात नांगरून ठेवले. तेथे पाण्या खालून पाणबुडीचा हल्ला होवू नये हा हेतू होता. विक्रांतला विशाखापट्टण येथून दूर हलविले पण आभास असा निर्माण केला गेला की, विक्रांत विशाखापट्टण बंदरातच आहे. त्यामागील हेतू स्पष्ट होता की तिचा शोध घेत गाझी विशाखापट्टण बंदरात यावी. विक्रांतच्या रेडीओ फ्रिक्वेन्सीवर आयएनएस राजपूत या जुन्या पाणबुडीला ठेवण्यात आले. त्यासाठी बाजारातून साहित्य खरेदी सुद्धा विक्रांत नावाने सुरु झाली. भारतातून ही माहिती पाकिस्तानात पोहचावी म्हणून थोडा ढीसाळपणा केला गेला. 

अमेरिकन बनावटीची पाणबुडी गाझी

दुसरीकडे भारतानेही पूर्व पाकिस्तानकडे येणारे पाकिस्तानी नौदल व त्यांची सामग्री रोखण्यासह कराची बंदरावर हल्ल्याची तयारी सुरू केली होती. ही जबाबदारी म्हैसूरचे तेव्हाचे ऍडमिरल कुरुविल्ला यांच्याकडे सोपविली होती. दि. १४ नोव्हेंबर १९७१ ला गाझीने विशाखापट्टणकडे जाण्यासाठी कराची बंदर सोडले. भारतीय सागरात घुसून कारस्थानानुसार कामगिरी पार पाडायचीच असा चंग बांधून गाझीचे नेतृत्व कमांडर जाफर मुहम्मद खान यांना दिले होते. जाफर धाडसी होते आणि जे साध्य करायचे आहे त्यासाठी ते इतरांचे ऐकत नसत.  

पीएनएस गाझी भोवती खोट्या माहितीचा साफळा रचणे श्री. कृष्णन यांनी सुरू केले होते. कराची बंदरातून गाझी दि. १४ नोव्हेंबर १९७१ ला निघाली. श्री. कृष्णन यांनी दि. १३ नोव्हेंबरला विक्रांतला विशाखापट्ट्ण येथून अंदमान निकोबारकडे रवाना केले होते. आता त्याच्या फ्रिक्वेन्सीवर होती आयएनएस राजपूत. गाझीला वाटत होते, तीच विक्रांत आहे. भारतीय नौदलाच्या सापळ्यात गाझी फसते आहे याचा अंदाज दि. २५ नोव्हेंबरला आला. कराची येथील नौदलाच्या मुख्यालयाने गाझीसाठी दिलेला संदेश भारतीय नौदलाने पकडला. तो होता, विक्रांत विशाखापट्टण बंदरात उभी आहे. या संदेशाने एक गोष्ट नक्की केली. ती म्हणजे गाझी विक्रांतच्या मागावर असल्याचे स्पष्ट झाले.

दि. १६ नोव्हेंबरला गाझी मुंबईजवळून निघाली. दि. १९ नोव्हेंबरला तीने श्रीलंकेला वळसा घातला. दि. २५ नोव्हेंबरला गाझी मद्रासजवळून गेली. मधल्या काळात आयएनएस राजपूत खोटे संदेश देवून गाझीला चकवा देत होते. गाझीचे लक्ष्य विक्रांतला शोधणे व पाण सुरूंग पेरणे हे होते. दि. १ डिसेंबराला श्री. कृष्णन यांनी भारत सरकारला माहिती दिली की भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानच्या पाणबुडीने प्रवेश केला आहे. दि. २ डिसेंबरला आयएनएस राजपूतने गाझीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांना गाझीचा सुगावा लागला नाही. मात्र, ठरलेल्या कारस्थानानुसार दि. ३ डिसेंबरला पाकिस्तानकडून युध्दाला तोंड फुटले. गाझी आपले टार्गेट पूर्ण करेल आणि भारतीय नौदलाचे कंबरडे मोडले जाऊन भारतीय वायुदलही असहाय्य होईल असा अंदाज करुन पश्चिम पाकिस्तानातून ऑपरेशन चंगिजखान अंतर्गत भारताच्या दक्षिणेकडील शहरांवर हवाई हल्ले करण्यात आले. प्रत्युत्तरासाठी भारतीय वायुदल तैनात असल्याने पाकिस्तानी वायुदल फारसे नुकसान करु शकले नाही.

इकडे गाझीचा इतिहास वेगळाच लिहिला जाणार होता. विशाखापट्टण जवळ गाझी विक्रांतचा शोध घेत स्वतःला खोल पाण्यात दडवून घेत होती. त्याचवेळी आयएनएस राजपूत विक्रांतची भूमिका बजावत गाझीला चकवा देत होती. दि. ३ च्या मध्यरात्री आयएनएस राजपूतला विक्रांत समजून गाझीने हरकत केली. तेव्हा त्यांचे सागरी तळात पाण सुरुंग पेरणे सुरू होते. विक्रांत जवळ आली समजून गाझी खोल तळाशी गेली. रात्रीच्या अंधारात त्यांना दिशा व खोलीचा अंदाज आला नाही. तळाशी चिखलही होता. तेथेच गाझीला जलसमाधी मिळणे निश्चित झाले. दि. ४ डिसेंबरच्या पहाटे गाझीचे अवशेष समुद्रावर तरंगताना दिसले.

गाझीला जलसमाधी मिळाल्याची तीन कारणे सांगितली जातात. पहिले, गाझीचे नुकसान आयएनएस राजपूत वरुन सोडलेल्या पाण तिरांनी केले. दुसरे, गाझी स्वतः पेरलेल्या पाण सुरुंगाचा धक्का लागून बुडाली. आणि तिसरे, गाझीतील बँटऱ्यांमधून हायड्रोजन वायु जास्त प्रमाणात बाहेर पडला. त्याद्वारे गाझीतील स्फोटकांचा अंतर्गत स्फोट झाला. यापैकी कारण कोणतेही असो गाझीला जलसमाधी मिळाली. द गाझी अट्याक चित्रपटात भारतीय पाणबुडीच्या पाण तिरांनी गाझीचे नुकसान होते असे दाखविले आहे.

विशाखापट्टणजवळ आढळलेले गाझीचे अवशेष
पहाटे गाझी बुडाल्याची आनंददायी बातमी भारतीय नौदलाचे धैर्य वाढविणारी होती. कारण तिचाच धसका नौदलास होता. पाकिस्तानने दि. ३ डिसेंबरला युध्दाला तोंड फोडले होते. त्यामुळे आम्ही पाकिस्तानच्या हल्ल्यास प्रतिकार सुरु केला असे दाखविण्याची संधी इंदिरा गांधी यांना मिळाली. भारताने दि. ४ डिसेंबरला ऑपरेशन ट्रायडंट सुरु करुन थेट कराची बंदर व तेथील तेलसाठे उध्वस्त केले. दि. ५ डिसेंबरला ऑपरेशन पायथॉनने उरले सुरले बंदर अक्षरशः जाळले. नौदलाच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून तेव्हा पासून दि. ४ डिसेंबरला भारतीय नौदलदिन साजरा केला जातो.

ऑपरेशन ट्रायडंटऑपरेशन पायथॉन ची कहाणी रंजक व थरारक आहे. युद्धाच्या खुमारीसाठी चवताळलेल्या पश्चिम पाकिस्तानने दि. ३ नोव्हेंबर १९७१ ला भारतीय क्षेत्रातील ११ महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. परंतु त्यांना फार काही हाती लागले नाही. कारण भारतीय वायूदलाने त्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केलेली होती. मात्र पश्चिम पाकिस्तानसाठी दि. ३ नोव्हेंबर १९७१ ही दिनांक अशुभ ठरली कारण त्याच मध्यरात्री विशाखापट्टण जवळ गाझीला जलसमाधी मिळ्याचे वृत्त दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आले. ही बातमी पश्चिम पाकिस्तानचे सर्व आखाडे चुकवून कांबरडे मोडणारी होती.

त्यानंतर दि. ४ डिसेंबर १९७१ ला भारतीय सैन्याने पाकिस्तानशी युद्धात थेट उडी मारली. गाझीची भीती संपल्यामुळे भारतीय नौदलाने सहा युद्धनौकांचा एक गट घेवून कराचीकडे प्रस्थान केले. कराचीपासून ४६० किलोमीटवर  हा गट थांबला. पाकिस्तानचा संपूर्ण सागरी व्यापार कराचीमधूनच चालत असल्यामुळे नौदल आणि व्यापारी जहाज कंपन्या यांची मुख्यालये कराचीतच होती. इराणी आखातामार्फत होणारा तेलसाठा कराची बंदरातच मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवला जात होता. साहजिकच कराची बंदराची संरक्षण व्यवस्थाही मजबूत होती. हे लक्षात घेऊनच भारतीय नौदलाने योजना आखली होती. त्या योजनेचे सांकेतिक नाव होते ऑपरेशन ट्रायडंटट्रायडेण्ट म्हणजेच त्रिशूल. आयएनएस नि:पात’, आयएनएस निर्घातआणि आयएनएस वीरया तीन क्षेपणास्त्रधारी जहाजांनी कराचीवर हल्ला करायचे निश्चित होते. प्रत्येक जहाजावर स्टाईक्सही ४० सागरी मैल पल्ल्यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे होती. या तीन क्षेपणास्त्रधारी जहाजांना पाकिस्तानी पाणबुड्यांपासून संरक्षण देण्यासाठी आयएनएस किलतान आणि आयएनएस काटचाल ही दोन पाणबुडीरोधक जहाजे आणि या सगळ्यांना इंधन पुरवण्यासाठी आयएनएस पोषक हे तेलवाहू टँकर जहाज असा हा सहा जहाजांचा गट होता. कराचीपासून २५० सागरी मैल दूर असल्यामुळे पाकिस्तानच्या शोधक रडार यंत्रणेपासूनही हा गट सुरक्षित होता. या गटाने पीएनएस खैबर विनाशिका, एम व्हीनस चॅलेंजर हे मालवाहू जहाज, त्याला संरक्षण देणारी पाकिस्तानी विनाशिका पीएनएस शहाजहान, आयएनएस मुहाफीज ही पाकिस्तानची सुरुंगशोधक नौका एकाच दिवसात नष्ट केल्या. त्यानंतर भारतीय गट कराची पासून अवघ्या १४ सागरी मैल अंतरावर येऊन उभा राहिला. कैमारी या ठिकाणच्या अवाढव्य तेल टाक्या तेथून उध्वस्त करण्यात आल्या. स्वतःच्या सैनिकाच्या रक्ताचा थेंबही न सांडता शत्रूच्या गोटात विनाश आणि विध्वंस करुन सहा जहाजांचा गट मुंबईत परत आला.

दि.    ८ डिसेंबर १९७१ रोजी ऑपरेशन पायथॉन ही दुसरी कारवाई सुरू झाली. पायथॉन म्हणजे अजगर. त्या दिवशी सूर्य मावळला. ठीक ६ वाजता भारतीय नौदलाची आय. एन. एस. विनाश ही क्षेपणास्त्रवाहू नौका पुढे सरकली. भारताच्या सर्वभक्षक अजगराचे हे तोंड होते. तर त्याचा देह होता आयएनएस तलवार आणि आयएनएस त्रिशूल या फ्रिगेट जातीच्या युद्धनौका. मार्‍याच्या टप्प्यात पोचल्यावर विनाशने कैमारी तेलसाठ्याच्या उर्वरित टाक्यांवर एक क्षेपणास्त्र सोडले. दाट अंधार पडला होता आणि समुद्र खवळला होता. तशातच पाकिस्तानी इंधनवाहू टँकर पीएनएस डाक्का, पनामा या देशाचा तेलवाहू टँकर एसएस गल्फ स्टार आणि ब्रिटिश मालवाहू जहाज एसएस हरमत्तन हे भारतीय नौदलाच्या मार्‍यात सापडले. गल्फ स्टार आणि हरमत्तन बुडाली, तर डाक्का जायबंदी झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कैमारी तेलसाठे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ही आग एवढी भीषण होती की, ती नंतर आठ दिवस, बर्‍याच लांबूनही दिसत होती.
भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल एस. एम. (सरदारीलाल मथरादास) नंदा यांच्या आदेशानुसार, आरमार कारवाईप्रमुख व्हाईस ऍडमिरल हिरानंदानी यांनी ही कारवाई पूर्ण केली. 

पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली परंतु त्यांना पुढील वेग राखता आला नाही. कारण त्यांना आदेश देणारी यंत्रणा एकमेव याह्या खान केंद्रीत होती. भारतीय सैन्य दल प्रमुखांना इंदिरा गांधीनी हवे ते करण्याचे अधिकार दिले होते. नौदल, वायुदल आणि भूदल एकत्रपणे काम करीत होते. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी सैन्यदलाने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्‍न केलापरंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही चालले नाही. लोंगेवालाच्या लढाईत त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती (रणगाडा) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले. हा इतिहासही आता समोर आलेला आहे. भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौरस किलोमीटर इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.

भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगाव येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या. भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठा प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने ढाका शहर काबीज केले. ९०,००० हून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले. दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. दुसर्‍या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली.

भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए. के. नियाझी यांनी शरणागतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. याह्या खान यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. दि. १० जानेवारी १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले. ते नंतर पंतप्रधान झाले. या युद्धात भारताचे जवळपास ४ हजार सैनिक कामी आले. 

1 comment: