Monday 18 June 2018

जळगाव भाजपतील यादवी ... !

भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा शाखेत उभी फूट पडली आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलेले मात्र मंत्रीपदाची तीव्र इच्छा आजही बाळगून असलेले एकनाथराव खडसे यांचा एक गट आहे. त्यांच्या सोबत खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे हे दोघेच दिसून येतात. दुसरा गट विद्यमान जल संपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचा आहे. त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जळगाव महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे (कधी इकडे कधी तिकडे) यांच्यासह खासदार ए. टी. पाटील, आमदार उन्मेष पाटील, हरिभाऊ जावळे, सौ. स्मिता वाघ, चंदुभाई पटेल यांचे गूळपीठ दिसते.

जळगाव जिल्हा काँग्रेस मुक्त करीत करीत आता बहुतांश सरकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा पक्ष किंवा सत्ताधारी म्हणून भाजपच उरला आहे. खेटायला आणि संघर्षाला समोर कोणीही विरोधक नाही अशी अवस्था आहे. प्रबळ विरोधक नसला की राजसत्ता उन्मत्त होते. सत्तेचा कैफ मग आपापसातच कट कारस्थान करुन हातघाईवर येतो. अशा अवस्थेचे प्रत्ययकारी चित्रण महाभारताच्या उत्तरार्धात आहे. संपूर्ण मानवजातीला जगण्याचा शहाणपणा गितोपदेशातून देणाऱ्या कृष्णाच्या यादव कुळाचा संहार हा आपापसातील भांडणामुळे कसा झाला ? याची कथा "यादवी" या एका शब्दात सामावलेली आहे. "यादवी होणे" किंवा "यादवी माजणे" हे दोन वाक्प्रचार याच स्थितीतून तयार झाले आहेत.

कुरुक्षेत्रावर कौरवांच्या सकल कुलाचा नाश केल्यानंतर कृष्णाने पांडवांना धृतराष्ट्र  आणि गांधारीच्या भेटीसाठी नेले. या भेटी प्रसंगी दोघांचे पूत्रप्रेम संतापातून व्यक्त होण्याचा अंदाज कृष्णाला होता. दुर्योधनाचा वध करणाऱ्या भीमावर धृतराष्ट्र आपला संताप काढेल हे लक्षात घेऊन कृष्णाने भीमाचा पुतळा तयार करुन घेतलेला होता. दुःखावेगात धृतराष्ट्राने पुतळ्याला भीम समजून अलिंगन देत स्वतःच्या ताकदीने त्याचा चक्काचूर केला. पण नंतर भीम मेला हे समजून धृतराष्ट्र निराश व पश्चातापदग्ध झाला. त्याचा संताप निवळल्यानंतर कृष्णाने भीम जिवंत असल्याचे धृतराष्ट्रला सांगितले. याच वेळी गांधारीने कौरवांच्या नाशाचा दोष पांडवांना न लावता सारा संताप कृष्णाप्रति व्यक्त केला. गांधारीने कृष्णाला विचारले, 'तू युध्द थांबवू शकला असता तरी तू तसे केले नाही. कौरव सर्व मारले गेले.' गांधारीने अधिक क्रुध्द होत कृष्णाला शाप दिला की, 'तुझ्या आप्तस्वकीयांचा शेवट अशाच एका गृहकलहात होईल. तुझे आप्तमित्र एकमेकांना ठार मारतील.'

महाभारत युद्धानंतर पांडव आणि यादवांचेच राज्य सर्वत्र होते. बहुतेक सगळी राज्ये विनाश पावली होती. जी काही थोडीफार उरली होती, त्यांना  कृष्णार्जुनाने मिळून अश्वमेधात संपवले. एक अख्खी पिढी कापली गेली होती. कृष्णार्जूनाने "विरोधक मुक्त" पांडव व यादव साम्राज्य केले होते. जसे आता काँग्रेस मुक्त जळगाव जिल्हा आहे.

यादवांकडे मात्र स्वतः कृष्ण, बलराम, सात्यकी, कृतवर्मा, कृष्णाची ८० मुले, त्यातला एक प्रद्युम्न तर सात्यकी प्रमाणेच अतिरथी, दुसरा सांब, शंकराच्या वरदानाने प्राप्त झालेला नातू अनिरुद्ध, गद आणि सारण, अक्रुरादि इतर मुत्सद्दी आणि यौद्धे होते. या सर्वांच्या समोर तेव्हा विरोधक नव्हते. त्यामुळे  प्रत्येकात गर्व, मद, अहंकार वाढला होता. आपले युध्दविषयक पौरुष दाखवण्यासारखे त्यांना काही उरले नव्हते. संपत्ती होती, सुबत्ता होती, शांती होती, शत्रू नव्हते आणि करण्यासारखे इतर काही नव्हते. जसे आता जळगाव जिल्ह्यात खासदार, आमदार बहुमतात भाजपचे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपच आहे. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ भाजपकडे आहे. सध्या निवडणुकांचा माहौल नाही. खेटायला विरोधक नाही.

कृष्णाच्या समोरच यादव साम्राज्यात आपापसातील भांडणे सुरू झाली. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखविणे सुरु झाले. दुसऱ्याला तुच्छ लेखणे सुरु झाले. लोक जुगार, मद्याच्या नादी लागले. जळगाव जिल्हा भाजपत आज हिच स्थिती आहे. एकमेकांना तुच्छ लेखणे सुरु आहे. आपले मंत्रीपद सोडायला एका मंत्र्याने षडयंत्र रचले असे खडसे म्हणतात. खडसेंकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी ते माध्यमांच्या समोर आणावेत, असे मंत्री गिरीश महाजन म्हणतात. अर्थातच, खडसेंनी नुसते मंत्री न म्हणता थेट त्या कारस्थानी व्यक्तिचे नाव जाहिर करायला हवे. अन्यथा माझ्या मागे मंत्रीचे षडयंत्र होते असे म्हणत खडसे केवळ कार्यकर्त्यांची व मतदारांची सहानुभूती मिळवत आहे असे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनीही खडसेंना खिजावत म्हटले आहे, 'नाथाभाऊ तो मंत्री कोण नाव सांगा !'

भाजपतील यादवी येथेच थांबत नाही. जिल्हा बँकेतील कारभारावर भाजप जिल्हाध्यक्ष व संचालक उदय वाघ यांनी टीका केली. त्याचे अनुकूल व प्रतिकूल पडसाद अजून सुरुच आहे. या वादात अमळनेरचे पूर्वाश्रमीचे भाजपचे व आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावलेले अनिल पाटील हे खडसेंच्या बाजुने उतरले. वाघ - पाटील हा जुना संघर्ष आहेच. दुसरीकडे गांजा विक्रेत्याकडून वाघ यांनी १० लाख रुपये लाच घेतली असा आरोप व त्या पुष्ठ्यर्थ व्हीडीओ क्लिप समोर आली आहे. ही क्लिप सुध्दा अनिल पाटील यांनीच आणली. पाटील यांच्या आरोप पाठोपाठ खडसेंनी वाघ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. केवळ गांजाच नाही तर जिल्ह्यात सर्वच अवैध धंदे जोरात आणि भररस्त्यांमध्ये सुरु आहेत. हे म्हणजे, भाजपतील यादवीच होय. खडसे मंत्री असताना वाळू चोरट्यांना अभय मिळाल्याच्या कहाण्या होत्याच.

कृष्णकूळ सुध्दा अशाचा प्रकारे आपापसात लढायला तयार होता. त्यामागे उपकथानक कण्व, नारद, विश्वामित्र आदी ऋषीमुनींच्या शापाचेही आहे. यादवी माजण्याची क्रिया म्हणजे लोक मुक्तपणे स्वैराचार करु लागले. कृष्ण, बलरामालाही जुमानेसे झाले. या सर्वांचा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा कृष्णाचे सुदर्शन क्षितिजात विलीन झाले, त्याचा दैवी रथ आणि ४ दैवी घोडे अचानकपणे पळत जाऊन समुद्रात विलीन झाले. जिल्हा भाजपत खडसे किंवा महाजन यांना भाजपतील काही नेते व कार्यकर्ते जुमानत नाही असे आजचे चित्र आहे. खडसेंची अवस्था मंत्रीपद नसल्याने कृष्णागत असहाय्य झाली आहे.

अखेर यादव कुळाच्या अंताची वेळ आली हे लक्षात घेऊन कृष्णाने सर्व प्रमुख यादवांना बरोबर घेऊन पवित्र प्रभास क्षेत्री जाऊन समुद्रस्नान करु असे म्हटले. तीर्थक्षेत्री जाताना यादवांनी मांस आणि मद्याचा साठा बरोबर घेतला. तेथे घात झाला. मद्यधुंदावस्थेत भांडणे लागली. एकमेकाला तुच्छ संबोधले गेले. भोज आणि वृष्णी,अंधक असे सरळ दोन वेगळे गटच पडले. सात्यकीने कृतवर्म्याचे डोके उडवले. हे बघून कृतवर्म्याच्या भोज जमातीतील लोकांनी सात्यकीवर हल्ला चढवला. त्याच्या बाजुने प्रद्युम्न गेला. त्या दोघांनी अनेकांना मारले पण अखेर कृष्णाच्या समोर भोजांनी त्या दोघांना इहलोकी पोचवले. नंतरच्या तुंबळ युद्धात गद, सारण, अनिरुद्ध, सांब सगळे मरण पावले. त्यानंतर कृष्णाने दु:खावेगात इतरांना मारले. जळगाव भाजपत आता एकमेकाला मारणे सुरु झाले आहे. वाघ यांच्या राजीनाम्याची मागणी हा पहिला बळी ठरेल. त्यानंतर इतरांचा क्रमांक आहेच. वाकडी येथील मागासवार्गीय मुलांच्या मारहाण प्रकरणात विरोधकांना फूस लावणारे व मंत्री महाजन प्रकरण दडपतात असे म्हणणारे भाजपचेच आहे, असेही सांगितले जात आहे. अशा प्रकारे जळगाव जिल्हा भाजपत सध्या तरी यादवी माजलेली आहे.

6 comments:

  1. बहुत बढ़िया विश्लेषण

    ReplyDelete
  2. वास्तविकता रोखठोक मांडली तिवारी साहेब यात खरोखर सत्ताधारींनी बोध घेतलाच पाहिजे नाही तर तिथ गेल्यावर भित पुजण्यासारखे होईल आपसात भाजपा गोट्यात जर असेच षंडयत्र सुरू राहिले तर पश्ताप करण्याची वेळ येऊन ठेपल्या शिवाय राहणार नाही.आपला हा लेख वाचुन फार बोध घेण्यासाठी सारखे आहे.

    ReplyDelete