Friday, 1 June 2018

ना. गिरीषभाऊंचा अटकेपार झेंडा !

पालघर मतदार संघात भाजप उमेदवार राजेंद्र गावीत यांना विजयी करुन जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्ह्याबाहेरील दुसऱ्या निवडणुकीत नेतृत्वाचा "अटकेपार झेंडा" लावला आहे.  नाशिक महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावून ना. महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द खरा करुन दाखविला होता. पालघरचा विजय हा त्यापुढील मोहिम असून आणि बदलत्या वातावरणात शिवसेनेच्या नाकावर टीच्चून जागा कायम राखण्याचे राजकीय कौशल्य ना. महाजन यांनी दाखविले आहे.


ना. महाजन यांच्या यशावर लिहीत असताना पालघर मतदार संघातच शिवसेनेची आक्रमक धुरा सांभाळून जबाबदारी निभावणारे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबभु पाटील यांचेही कौतुक करावे लागेल. भाजपचा उमेदवार शिवसेनेने ऐनवेळी आपल्या तंबूत आणल्यानंतर त्याला किमान २ लाखांवर मतदान मिळवून देण्याची लक्षवेधी मजल ना. गुलाबभुच्या नेतृत्वात मारली गेली.

निवडणुका जिंकण्याचा एक यशस्वी फॉर्म्युला ना. गिरीषभाऊंना साधला आहे. विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघातून चंदूभाई पटेल यांना घवघवित मताधिक्य मिळवून देत ना. महाजन यांनी भल्याभल्यांना चकीत केले होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात झालेल्या ग्राम पंचायत निवडणूक व नगर पालिकांच्या निवडणुकीतही ना. महाजन यांनी जेथे जेथे लक्ष घातले तेथे भाजपला मोठे यश मिळाले. ना. गिरीषभाऊ जसे मताधिक्य मिळवून देतात तसेच तेथील पडद्यामागील अर्थकारणही चर्चेत असते.  अमळनेर पालिकेत भाजप विरोधात स्थापन आघाडीने नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळविले होते. मात्र तेथे ना. महाजन यांच्या मध्यस्थिने झालेल्या शिष्टाईत सर्व पदाधिकारी भाजपत प्रवेशकर्ते झाले. नंतरच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आणि ना. महाजन यांनी पसंती दिलेले सदस्यच पदाधिकारी झाले.

अलिकडे झालेल्या जामनेर पालिकेचा निकाल संपूर्ण देशात गाजला. शत प्रतिशत भाजप काय असते ? हे दाखवून देताना ना. गिरीषभाऊंनी जामनेर पालिका विरोधक मुक्त केली. भाजपचेच सर्व सदस्य निवडून आले. यापूर्वी व आजही जळगाव जिल्ह्यातील भल्या भल्या पुढाऱ्यांना असे यश स्वतःच्या शहर किंवा तालुक्यात मिळवता आलेले नाही.

ना. गिरीषभाऊंच्या निवडणुका जिंकण्याच्या यशाला अटकेपार झेंडे का म्हणायचे ? तर ते समजून घेऊ. १७५२ मध्ये अफगाणिस्तानचा अहमदशाह अब्दालीने तत्कालीन हिंदूस्तानातील लाहोर आणि मुलतान या मोगलांच्या प्रांतावर स्वारी करून ते काबीज केले होते. या बातम्या पुण्यात पेशव्यांकडे आल्यानंतर मराठ्यांना करारानुसार बादशहाच्या रक्षणासाठी जाणे आवश्यक होते. त्याप्रमाणे रधुनाथाराव पेशव्यांच्या पुढाकराखाली उत्तरेची मोहीम काढण्यात आली. रघुनाथराव दिल्लीला गेले तेव्हा खुद्द बादशहानेच मराठ्यांविरुद्ध कारस्थान चालविलेले पाहून रघुनाथरावाने त्यास कैद केले व बहादुरशाहाचा एक नातू अजीजउद्दीन यास तख्तावर बसवून व रोहिलखंडात बंदोबस्त ठेवून तो दक्षिणेत परतला. राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यंत अशी धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तेथे रोवला. ही घटना मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक होती. या पराक्रमाला अनुसरुन "अटकेपार झेंडे रोवणे" नावाची म्हणही अस्तित्वात आली.

पालघरमध्ये भाजपकडे असलेल्या विद्यमान जागेसाठी मित्र पक्षानेच सवतासुभा उभा केल्यानंतर आहे ते टिकवून ठेवायला राघोबादादा प्रमाणे ना. महाजन यांना धावून जाणे आवश्यक होते. ना. महाजन तेथे गेले आणि नव्या उमेदवारासह जागा जिंकून स्थिरस्थावर करुन परत आले. म्हणूनच ना. महाजन यांच्या नेतृत्वातील हा विजय अटकेपार झेंडा असाच ठरतो.

राघोबादादांच्या इतिहासात आनंदीबाईंचा आग्रह आणि "ध चा मा" केल्याच्या आक्षेपाचे पान आहे. ना. गिरीषभाऊंच्या व्यक्तिगत कौटुंबिक पातळीवर अशी स्थिती नाही. सौ. साधना महाजन यांचे स्वतःचे एक वलय जामनेरात आहे. विरोधकांचे संख्याबळ असतानाही त्याच नगराध्यक्ष होत्या आणि आतातर जबरदस्त मताधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. कार्यकर्त्यांशी कसे वागावे ? याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला असून इतर महिलांसाठी तो अनुकरणीय आहे.

ना. गिरीषभाऊंच्या घरातून "ध चा मा" होत नाही. पण त्यांच्या भोवतीच्या कोंडाळ्यातील मोजके भाऊबंद आणि मित्र मंडळी "ध चा मा" करणारे आहेत हे नक्की ! कधीकधी अटकेपार मुशाफरी करणाऱ्या ना. गिरिषभाऊंना भागिदारीतील हे दोन तीन उजरे-हुजरे अडचणीत आणतील हे नक्की. ना. गिरीषभाऊंच्या आडून सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडायला लागला आहे. या धुराळ्याला ना. महाजन यांची फूंकर असल्याची शंका आहे. असे जे होते आहे ते भुषणावह नाही.

ता.क. - जळगाव मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजपचे नेतृत्व ना. गिरीशभाऊंकडे हवे अशी अपेक्षा बहुतांश संभाव्य उमेदवारांची आहे. कारण ना. महाजन हे साम, दाम या दोनच गोष्टींचा वापर कौशल्याने करतात असे सांगितले जाते.

(ना. गिरीष महाजन विरोधकांनी वाचावे, पण प्रतिक्रिया  देऊ नये)

No comments:

Post a Comment