Monday 28 May 2018

राझी चित्रपटाच्या निमित्ताने ...

१९७१ मधील युद्धाचा रंजक, रोमांचक आणि उत्कंठा वाढविणारा इतिहास
पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझी
मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला आणि नौदलातील वरिष्ठ निवृत्त अधिकारी लेफनन्ट कमांडर हरिन्दर सिक्का यांच्या कॉलिंग सेहमतया पुस्तकावर आधारित आणि अभिनेत्री आलिया भट हिची मध्यवर्ती भूमिका असलेला "राझी" (मराठीत अर्थ एखादे काम करण्यासाठी राजी होणे)  चित्रपट बघितला. बघितला हा शब्द गुळमुळीत वाटतो. चित्रपट अनुभवला असेच म्हणायला हवे. 


"राझी" चित्रपट हा यापूर्वी चर्चेत नसलेल्या भारतीय गुप्तचर महिलेची खरी कहाणी आहे. अशा बहुतांश गुप्तचरांनी गरजेच्या ठिकाणी भारतासाठी जोखीम घेत केलेल्या अनेक कामगिरीच्या कहाण्या आजही गोपनियतेच्या आवरणाखाली भारतियांच्या समोर आलेल्या नाहीत. सिक्का यांनी तब्बल आठ वर्षे पाठपुरावा करुन सेहमतची कहाणी पुस्तक रुपात वाचकांच्या समोर आणली आहे. ती कहाणी प्रत्ययकारी आहेच. मात्र, याला जोडून असलेला भारत – पाकिस्तान दरम्यानच्या दुसऱ्या युद्धाचा इतिहास सुद्धा तेवढाच रंजक, रोमांचक आणि उत्कंठा वाढविणारा आहे.

सन १९९९ दरम्यान झालेल्या कारगिल युध्दात सिक्का हे कर्तव्यावर होते. पाकिस्तानातून भारतात झालेल्या सैनिकी व दहशतवादी घुसखोरीकडे भारतीय गुप्तचर संघटनेचे दुर्लक्ष कसे झाले, त्या गुप्तचरांचा देशाभिमान कुठे कमी पडला ? असे संतप्त प्रश्न सिक्का यांना अस्वस्थ करीत होते. त्याची उत्तरे शोधत ते इतिहासाचीही अभ्यास करीत होते. वेगवेगळ्या मार्गाने मिळालेल्या माहितीचे संकलन आणि योग्य अंदाज घेणारे विश्लेषण भारतीय गुप्तचर संघटना करु शकली नाही असे मत सिक्का यांचे तयार झाले होते.

कारगिल मोहिम फत्ते करीत असताना सिक्का यांना पंजाबमधील सहकारी भेटला. गप्पांच्या ओघात तो म्हणाला, पाकिस्तानातून अनेक भारतीय महत्त्वाची माहिती गुप्तचरांना पुरवतात. त्याचे विश्लेषण करण्यात अडचणी येतात. हा मुद्दा स्पष्ट करीत असताना त्या अधिकाऱ्याने त्याच्या आईची कहाणी सिक्का यांना सांगितली. त्या अधिकाऱ्याची आई पाकिस्तानात कराची येथे सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याची सून व मुलाची पत्नी म्हणून राहिली होती. तेथे राहून तिने भारतासाठी हेरगिरी केली होती. ती देशाभिमानी व निर्भय होती. तिला या कामगिरीवर तिच्याच वडिलांनी पाठविले होते. भारतीय नौदलात कर्तव्य बजावणारा हा अधिकारी पाकिस्तानी अधिकाऱ्याचा मुलगा होता. सिक्का हे या कहाणीमुळे भारावले. महिला गुप्तहेराच्या या अनोख्या जोखिमीने त्यांना अस्वस्थ केले. त्यांनी अधिक माहिती घेणे सुरु केले. त्या अधिकाऱ्याची आई वृध्दावस्थेत होती. तिलाही बऱ्याच गोष्टी आठवणे अवघड होत होते. शिवाय त्यांची नावे, ओळख व स्थान गोपनिय ठेवणे आवश्यक होते. संपूर्ण कहाणी उलगडल्यानंतर त्यावर पुस्तक लिहावे असे सिक्का यांना वाटले.

त्या महिला गुप्तहेराची कहाणी सत्य होती. पण ती लिहिताना तीला काल्पनिक नाव देणे आवश्यक होते. कल्पनेतून नाव मिळाले सेहमत खान. पुस्तकाचे नाव झाले "सेहमत कॉलिंग"

आलिया भटच्या राझी चित्रपटाचे पोस्टर
सिक्का यांनी पुस्तकात उलगडलेल्या माहितीनुसार सेहमत ही काश्मिरातील एका श्रीमंत व्यापाऱ्याची महाविद्यालयात शिकणारी हुशार मुलगी होती. तिच्या वडीलांचा पाकिस्तानशी संबंधित व्यापार होता. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी सेहमतच्या वडिलांशी सलगी ठेऊन होते. कारण भारतातील घडामोडींची माहिती घेण्याचा त्यांचा हेतू असे. मात्र, सेहमतचे वडील हे सच्चे देशभक्त होते. कमी महत्त्वाच्या माहितीच्या बदल्यात ते पाकिस्तानातून भारतासाठी उपयुक्त माहिती मिळवित असत. ते सुद्धा भारतीय गुप्तचर संस्थेचे खबरी होते. सन १९७०-७१ दरम्यान पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान यांच्यात आपापासात गृह कलह सुरू होता. पूर्व पाकिस्तानात स्वतंत्र देशाची मागणी बळावत होती. ही मागणी करणाऱ्या बंडखोरांना भारताची फूस आहे असे पश्चिम पाकिस्तानाला वाटत होते. त्यामुळे भारताशी युद्ध करण्याची तयारी तेथे सुरू होती. अशा वातावरणात नेमकी माहिती मिळावी म्हणून सेहमतच्या वडिलांनी पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीचा फायदा उठवत सेहमतचा निकाह त्यांच्या वरिष्ठ अधिकारी मुलाशी (इकबाल) लावून दिला. कराचीत सेहमतने केवळ सून म्हणून न जाता भारताची प्रशिक्षित गुप्तहेर म्हणून जावे अशी जबाबदारी वडिलांनी सोपविली. सेहमतचे आजोबा सुद्धा देशाभिमानी होते. आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सेहमत भारतासाठी हेरगिरी करायला राजी (राझी) झाली. असे कथानक सिक्का यांच्या पुस्तकात आहे आणि तसेच ते चित्रपटातही आहे.

भारतात करावयाच्या घातपाती कारवायांचे नियोजन व बैठकी या सेहमतचे सासरे व पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी असलेल्या खानसाहेबंच्या घरात होत. सेहमतसाठी अशा बैठकांवर लक्ष ठेवणे व मिळालेली माहिती भारतात पाठविणे अत्यंत जोखीमेचे होते. सेहमतने ही कामगिरी कशी केली याचे चित्रण चित्रपटात प्रत्ययकारीपणे आहे.

मेघना गुलजारचा "राझी" हा चित्रपट एक सशक्त कथानक घेऊन सेहमतची कहाणी उलगडत जातो. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि दृशांकन हेच त्याचे बलस्थान आहे. घडलेली घटना सत्य आहे अशी संवेदना जेव्हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनांत निर्माण करतो तेव्हा पडद्यावर साकारणारे कथानक ते अनुभवल्याचे समाधान देते. अशा चित्रपटात भूमिका करणारी आलिया भट आपल्या अभिनयाचे पैलू सुद्धा सिद्ध करते. विक्की कौशल (इकबाल) सह रजित कपूर, जयदीप अहलावत, सोनी राजदान आणि अश्वत्थ भट्ट हे कलाकार देखील भूमिकांना न्याय देवून जातात.

सिक्का यांनी आठ वर्षे सेहमतच्या कहाणीचा पाठपुरावा केला. या दरम्यान ते निवृत्त झाले. वृद्धावस्थेतील सेहमत काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांचा मुलगा नौदलातून निवृत्त झाला. सिक्का नौदलातील निवृत्तीनंतर दुसऱ्या सेवेत रुजू झाले. सन २००८ मध्ये त्यांचे "सेहमत कॉलिंग" हे पुस्तक तयार झाले. सेहमतची ही कथा काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांना सुद्धा माहित होती. त्यांनी सिक्का यांना विनंती केली, सेहमतची खरी ओळख पुस्तकात दाखवू नका. सिक्का यांनी ती विनंती स्वीकारली आणि त्या गुप्तहेर महिलेचे पात्र पुस्तकात आणि त्यानंतर चित्रपटात सेहमत या काल्पनिक नावाने आपली कहाणी घेऊन आले. तरीही सिक्का यांनी सेहमतचा एक खरा संदर्भ काही मुलाखतीत सांगितला. तो म्हणजे, पाकिस्तानातील सेहमतच्या कामगिरीचा सुगावा तेथील गुप्तचर विभागाला लागल्यानंतर भारतीय गुप्तचर संघटनेने सेहमतला भारतात आणले. तेव्हा ती गर्भार होती. सेहमतची खरी ओळख होवू नये म्हणून नाव बदलून तिला मलेरकोटला (पंजाब) येथे वास्तव्याला नेण्यात आले. ती तेथेच स्थारावली. पुढे तिने मुलाला जन्म दिला आणि तो योग्य वेळी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाला.

पाकिस्तानची अत्याधुनिक पाणबुडी "पीएनएस गाझी" ला भारतीय उपखंडात बंगालच्या उपसागरात विशाखापट्टण जवळ जलसमाधी मिळालेल्या कहाणीचा पूर्वार्ध म्हणजे सेहमतची कहाणी आहे. गाझीच्या फसलेल्या हाराकारीवर आधारित संकल्प रेड्डी या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा "द गाझी अट्याक" हा चित्रपट वर्षभरापूर्वी येऊन गेला आहे. म्हणूनच "राझी" हा चित्रपट "द गाझी अट्याकचा" पूर्वार्ध मानावा लागेल. सन १९७१ मध्ये बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) मुक्तीसाठी भारताने पाकिस्तानशी (पश्चिम पाकिस्तानशी) केलेल्या युध्दाच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या यशस्वी सापळ्यात अडकून गाझीला जलसमाधी मिळाली होती. त्याची शौर्य कथा द गाझी अट्याक मध्ये आहे.

भारतीय नौदलाची शान असलेली "आयएनएस विक्रांत" ही विमानवाहू अजस्त्र नौका उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकन बनावटीची अत्याधुनिक पाणबुडी गाझीला कराची बंदरातून अरबी समुद्र व बंगालचा उपसागर पार करुन विशाखापट्ट्ण जवळ पाठविण्याचे कारस्थान रचले होते. हे कारस्थान भारतीय गुप्तहेरांच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून व ठरवून गाझीला जलसमाधी देण्याची स्थिती निर्माण केली.

द गाझी अट्याक चित्रपटाचे पोस्टर
गाझी ही पाणबुडी भारतीय उपखंडातील बंगालच्या उपसागरात का आणि कशी बुडाली ? याचे अधिकृत कारण कधीही समोर आलेले नाही. गाझीला भारतीय नौदलातील आयएनएस राजपूत या पाणबुडीने चकवा देत जलसमाधी दिली हा इतिहास आता सर्वमान्य झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी नौदल आजही असेच म्हणते की, गाझी ही स्वतःच पेरलेल्या पाण सुरुंगामुळे बुडाली किंवा तिच्यातील मशिनरीत बिघाड होऊन ती बुडाली. अथवा तीत हाड्रोजनचे प्रमाण वाढून त्याचा स्फोट झाला. मात्र, गाझी भोवती खोट्या माहितीचा सापळा रचून तिची शिकार केली गेली हेच सत्य आहे. राझी चित्रपटाची कथा एक संदर्भ असा देते की, गाझीच्या हरकतींची माहिती सेहमतमुळे भारतीय नौदलास मिळाली.

गाझी पाणबुडी अमेरिकेने सन १९६३ मध्ये पाकिस्तानला भाडेतत्वावर दिली होती. तिचे मूळ नाव यूएसएस डाइब्लो होते. त्यापूर्वी अमेरिकेने १८ वर्षे तिचा वापर केला होता. पाकिस्तानच्या नौदलात तिचे आगमन पीएनएस गाझी या नावाने सन १९६४ मध्ये झाले. गाझी ७५ दिवस पाण्याखाली राहू शकत होती. व तिच्या जलप्रवासाचा टप्पा होता २० हजार किलोमीटर. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सन १९६५ मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानने गाझीचा वापर करुन भारतातील समुद्राजवळच्या अनेक शहरांवर हल्ले करुन नुकसान केले होते. नंतरच्या काळात भारताने सुद्धा तेव्हाच्या संयुक्त रशियाकडून पाणबुड्या मिळविल्या. सन १९५७ पासून भारताकडे आयएनएस विक्रांत ही विमानवाहू अजस्त्र नौका होती. ती भारताने ब्रिटनकडून खरेदी केलेली होती. या नौकेच्या वापरामुळे भारताचे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावर वर्चस्व निर्माण झाले होते. या नौकेरुन लढाऊ व मालवाहू विमाने उड्डान करीत. तसेच नौकेवर लहान लहान लष्करी होड्या होत्या. त्यामुळे सागरी क्षेत्रात छापामार सारखी त्वरित कार्यवाही करता येत असे. ही नौका म्हणजे एक परिपूर्ण लष्करी बंदर होते.

राझी चित्रपटात सेहमत विषयी आणखी एक वास्तव संदर्भ आहे. तो म्हणजे, सेहमत ही पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांच्या कुटुबियांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून होती. याचा संदर्भ वास्तवातील सेहमत पाकिस्तानचे जनरल याह्या खान यांच्या नातवांना शिकवित होती याच्याशी आहे.

राझीद गाझी अट्याक हे दोन्ही चित्रपट वास्तववादी इतिहासाचे चित्रण करतात. म्हणून त्याला बघणे नव्हे तर अनुभवणे असे म्हणावे लागते. राझीद गाझी अट्याक चित्रपटांची कथा समजून घेत असताना भारत आणि पाकितान दरम्यान सन १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश मुक्ती युद्धाची पार्श्वभूमि सुद्धा समजून घेणे आवश्यक ठरते.


भारत - पाकिस्तान दरम्यान दुसरे युद्ध १९७१ मध्ये का झाले त्याची स्टोरी लवकरच....

1 comment:

  1. मर्मभेदी समीक्षण!७१ च्या पार्शभूमीची वाट बाघतोय.

    ReplyDelete