Saturday 19 May 2018

स्फटिकासम मित्र हा !

जळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा माझे मित्र सुशील अत्रे यांचा आज वाढदिवस. त्यांचे अभीष्टचिंतन करीत असताना त्यांच्याशी असलेली माझी मैत्री उलगडून दाखविणाऱ्या माझ्या भावना मी त्यांचे तिसरे पुस्तक ‘देवळे राऊळे’ यात व्यक्त केल्या आहेत. समाजातील काही मान्यवरांशी आपली मैत्री असावी असे आपणास वाटत असते. सुशीलभाऊ माझ्यासाठी अशा मान्यवरात अव्वल आहेत. लेखन, भटकंती (पर्यटन), फोटोग्राफी आणि माणसं जोडणे हे चार छंद सुशीलभाऊंना आहेत. आमची मैत्री १९९२-९३ पासूनची. जळगावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात तो काळ प्रचंड उलाथापालथींचा होता. लोकशाहीच्या चार आधारस्तंभांपैकी राजकारण व प्रशासन हे स्तंभ परस्पर विरोधात दुर्दैवाने उभे ठाकले होते. दोघांच्या संघर्षात तिसरा स्तंभ न्यायालय निर्णय देत होते. चौथा स्तंभ त्या निर्णयांना प्रसिध्दी देत होता. सुशीलभाऊ न्यायालयीन प्रक्रियेत बड्या राजकारणी मंडळींची बाजू सांभाळत होते. वृत्तपत्रात बातमी देण्यासाठी पत्रकार म्हणून माझा रोज त्यांच्याशी संपर्क येत असे. त्यांचे पिताश्री स्व. अच्युतराव अत्रे हे सिनियर विधिज्ञ होते. सुशीलभाऊंचा आणि माझा आपापल्या क्षेत्रात तो उमेदीचाच काळ होता. तेव्हापासून आजपर्यंत आमची मैत्री ‘रौप्य महोत्सवी’ आहे.


अलिकडे तीनवर्षांपूर्वी सुशीलभाऊ न्यायालयातील कामकाजातून ठरवून बाजुला झाले. त्यांनी ‘विधी सल्लागाराची’ भूमिका स्वीकारली आहे. वाढते वय आणि अनुभव हे  वकिली व्यवसायात आर्थिक गणिते वाढविण्याच्या कामी येते. पण सुशीलभाऊ ठरवून या सरळधोट मार्गावरुन बाजुला झाले. आता आपला बराच वेळ सामाजिक व शैक्षणिक कार्याला ते देत आहेत.


मध्यंतरी सुशीलभाऊ, अनिलभाई कांकरीया आणि मी ‘मीडिया ट्रायल’ या ज्वलंत विषयावर महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांचे मुंबईस्थित संपादक व विधिज्ञ यांच्यासोबत चर्चासत्र घेतले. हा कार्यक्रम जळगावकरांच्या प्रचंड गर्दीने लक्षात राहिला. या चर्चासत्रात निःस्पृह व अभ्यासू सूत्रसंचालक म्हणून सुशीलभाऊ होते.


सुशीलभाऊंचे व्यक्तिमत्व ‘अत्रेय आश्रमात’ घडले. त्यांच्या पिताश्रींना सर्वजण ‘अत्रेबाबा’ म्हणत. पालक व गुरु अशा दुहेरी भूमिकेत ते होते. संस्कारासोबत कडवी शिस्त हा तेथील शिरस्ता होता. तो आजच्या पिढीतही आहे. सुशीलभाऊंनी निष्ठावंत व आज्ञाधारक शिष्याप्रमाणे सारे अंगिकारले. आत्मसात केले आणि ठरवून वर्तनात आणले.


सुशीलभाऊंचे शालेय शिक्षण जळगावात झाले. विधी शाखेचे शिक्षण पुण्यात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अत्रेबाबांच्या तालिमीत न्यायालयिन व्यवस्था व कामकाजाचा सराव त्यांनी सुरू केला. जळगाव जिल्हा न्यायालयात १९८८ पासून वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. फौजदारी खटल्यांचे निष्णात वकील म्हणून त्यांचा लौकिक झाला. महाराष्ट्रातील विविध विशेष न्यायालयांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील अनेक खटले त्यांनी चालविले. त्यांच्या विधी कौशल्याची प्रशंसा अनेक खटल्यात न्यायाधीशांनी केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नियमित कायदेशीर सल्लागार म्हणून सुशीलभाऊ काम पाहतात. ‘उमवि’च्या तदर्थ कायदा समितीचे मागील वर्षापासून ते अध्यक्ष आहेत.


२५ वर्षांच्या अथक व्यावसायिक कार्यानंतर म्हणजे २०१३ पासून त्यांनी ‘अत्रेवकील’ (atrevakil) ही स्वतःची ‘लॉ फर्म’ सुरु केली आहे. फौजदारी, दिवाणी, कामगार आदी सर्वच क्षेत्रांतील कायदे व कज्जे विषयक कामांसाठी कायदेशीर सल्ला देणारी ही बहुधा खान्देशातील एकमेव व्यावसायिक लॉ फर्म आहे. जळगाव येथील प्रसिध्द जैन उद्योग समूहाचे गेली ३० वर्षे ते कायदेशीर सल्लागार आहेत.


कायद्याचे अभ्यासक असलेल्या सुशीलभाऊंचा पिंड समाज शिक्षकाचा आहे. विविध संस्था व संघटन यात कार्य करीत असतानाते प्रशासकाच्या भूमिकेपेक्षा सहकारी होण्याकडे लक्ष देतात. जळगाव येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात त्यांनी सात वर्षे मानद अध्यापक म्हणून काम केले. ‘उमवि’तील ‘मेडिकल ज्युरिपृडन्स’ या पदविका अभ्यासक्रमासाठी मानद अध्यापन केले.


सुशीलभाऊंनी रंगमंचावर अभिनय सुद्धा केला आहे. कायदे आणि कज्जे अशा रुक्ष विषयांना साहित्य वर्तुळात आणण्याचे काम सुशीलभाऊंनी केले. ‘फौजदारी खटले : कायदा व प्रक्रिया’ हे कायद्यावरील सोप्या भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले. देश-विदेशातील ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांना भेट देणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि त्यावर सोप्या मराठी भाषेत लेखन करणे याची त्यांना आवड आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच गडकिल्ले त्यांनी पाहिले आहेत. विदेशात केलेल्या भ्रमंतीवर आधारित ‘पिरॅमिडच्या देशात’ आणि ‘तरुण तुर्कस्तान’ अशी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘किस्त्रीम’ आणि ‘धनंजय, या दिवाळी अंकांमध्ये गेली काही वर्षे नियमित लेखन ते करीत आहेत. त्याशिवाय दैनिक ‘लोकमत’ मध्ये नियमितपणे ललित लेखन सुरु आहे. सध्या ‘हम्पी-विजयनगर’ या विषयावरील पुस्तकाचे लेखन सुरु आहे.


‘मुद्रा, जळगाव’ या कलासंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून मराठी नाट्यक्षेत्रात बरीच वर्षे त्यांनी कार्य केले. आतापर्यंत आठ नाटके व तीन एकांकिकांचे लेखन केले आहे. ही सर्व नाटके राज्यनाट्य स्पर्धेत सादर झाली आहेत. एक नाटक व्यावसायिक रंगभूमीवरही आलेले आहे. नाटकांमध्ये स्वत: अभिनय देखील केलेला आहे.


‘शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव’ या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये २०१५ पासून चेअरमन (कार्याध्यक्ष) म्हणून कार्यरत आहे. या संस्थेतर्फे दोन माध्यमिक, चार प्राथमिक व एक इंग्रजी माध्यमातील अशा शाळा चालविल्या जातात. या शाळांच्या माध्यमातून जळगावातील शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या ‘वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय’ या जुन्या संस्थेत १९९५ पासून ते कार्यकारिणी सदस्य आहेत. २००१-२०१३ ला कार्याध्यक्ष होते. २०१३ पासून उपाध्यक्ष आहे.  ‘ब्राह्मण सभा, जळगाव’ या संस्थेत २०१२ पासून आजतागायत अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जळगावचे ग्रामदैवत, 'श्रीराम मंदिर संस्थान' मध्ये सुशीलभाऊ विश्वस्त आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था, भगूर’ या संस्थेत विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य आहेत. सावरकरांची विचारधारा आणि त्यांचे कार्य या विषयी अभ्यासपूर्ण व परखड ‘पोस्ट’ लेखन सोशल मीडियातून ते करीत असतात.


वरील सर्व भूमिका निभावताना सुशीलभाऊ मित्र परिवार, हितचिंतक व समविचारी मंडळींच्या सोबत स्फटिका प्रमाणे स्वच्छ व पारदर्शी व्यवहार करतात. त्यांचे विधी विषयक व्यावसायिक काम जेवढे प्रामाणिक आहे तेवढेच सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रांतील काम नितळ आहे. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांना घेऊनच त्यांचे साहित्य लेखनही होत असते.


‘देवळे राऊळे’ पुस्तकातील मंदिर विषयक लिखाण हे सद्यस्थितीवर आणि प्रत्यक्ष पाहाणीवर आधारलेले आहे. जे दिसले ते लिहिले. इतिहासाचे जे संदर्भ मिळाले ते सुद्धा लिहिले. पण त्यातून धार्मिकता किंवा कट्टरतेचा अविर्भाव सुशीलभाऊंनी कुठेही व्यक्त केलेला नाही. साहित्य क्षेत्रात आज खऱ्यासह खोट्याची चलाखीने रसमिसळ करण्याचा जमाना असताना सुशीलभाऊंनी तटस्थपणे मंदिरांविषयी निरीक्षण नोंदले आहे. सुशीलभाऊ मला ‘स्फटिक समान मित्र’ भासतात ते या ठिकाणी. साहित्य क्षेत्रात सुशीलभाऊंच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

No comments:

Post a Comment