![]() |
किशोर राजे निंबाळकर पांडुरंगाची मूर्ती भेट देताना. |
माझ्याकडील शोकेसमध्ये महात्मा गांधींची मूर्ती नव्हती. गांधी विचारधारेचा कोणताही गुणधर्म आपल्या वर्तनात नाही, त्यामुळे गांधी घरात असावाच असे मलाही कधी वाटले नाही. परंतु गांधीजींवरील अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. गांधी समजावणारे पहिले पुस्तक आचार्य रजनीश यांचे 'गांधी मेरी दृष्टी में' हे मी वयाच्या १६ व्या वर्षी वाचले. आचार्य रजनीश यांची कृष्ण, महावीर आणि आंबेडकर यांच्यावरील पुस्तके सुध्दा लगभग त्याच काळात वाचली. आचार्य रजनीश मला कधीही आक्षेपार्ह प्रवचक वाटले नाहीत. उलट लेखन व प्रवचन करताना भाषा कशी नितळ, नादमय आणि सोपी असावी ? याचा पहिला परिपाठ त्यांची पुस्तके वाचूनच मला मिळाला, आचार्यांच्या लेखनात नेहमी मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी असत. हीच लेखन कल्पना घेऊन वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या 'दखल' सदरासोबत 'सदराशी संबंध नसलेली गोष्ट' लिहित असे. त्यात काही गोष्टी आचार्य रजनीशांच्या प्रवचनातील सुध्दा होत्या. असो. थोडे विषयांतर झाले.
![]() |
अशोकभाऊ जैन गांधी मूर्ती भेट देताना. शेजारी डाविकडून आमर जैन, नितीन रेदासानी, अनिल जोशी. |
दोन वर्षांपासून पंढरपूरच्या पांडुरंगाचे अमोघ आकर्षण मला निर्माण झाले आहे. कधीतरी वारी करावी या निश्चयाप्रत मी आलो आहे. अकोला येथे असताना अकोला ते शेगाव अशी संत गजानन महाराज भेटीची वारी केली आहे. तशीच एक अनामिक ओढ आता पांडुरंग भेटीची आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी सध्या मैत्रिपूर्ण संपर्क आहे. आम्हा दोघांमधील चर्चेत स्वार्थाचा विषय नसतो. असते ती विषयांची निखळ चर्चा. दि. १२ एप्रिल २०१८ ला निंबाळकर साहेब यांच्यासोबत एका ठिकाणाहून जळगावला परत येणे झाले. चर्चा पांडुरंगावर आली. निंबाळकर साहेब निःस्पृहपणे काम करताना 'कर्मयोगी' आहेतच पण ईश्वराप्रती 'श्रध्दाधर्मी' सुद्धा आहेत. त्यांची प्रशासकीय सेवा अक्कलकोट येथे तहसीलदार म्हणून सुरु झाली. तेथील देवस्थानचे शासकीय विश्वस्त म्हणून त्यांना कामाची संधी मिळाली. त्यानंतर दोनवर्षे सोलापूर प्रांताधिकारी म्हणून काम करताना पंढरपूरच्या विठ्ठल संस्थानावरही शासकिय प्रतिनिधी म्हणून काम करता आले. उत्पात व बडव्यांच्या तावडीतून पांडुरंगाला सोडवायचे कार्य निंबाळकर साहेब यांच्या काळात सुरु झाले. सन २०१५ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने पांडुरंग खऱ्या अर्थाने मुक्त झाले. हा लढा कसा लढला गेला त्याचे वर्णन निंबाळकर साहेबांनी केले. प्रवासात ४० मिनिटे आणि त्यानंतर दीड तास त्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मी व अमर जैन श्रोते होतो. तो दिवस होता 'वरुथनी एकादशी' चा. चर्चा संपत असताना निंबाळकर साहेबांनी पांडुरंगाची एक सुबक मूर्ती समोर आणून मला भेट दिली. सुबकशा आवेष्टनातील ती मूर्ती पंढरपुरातील मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. एकादशीला पांडुरंगाच्या एका निस्सिम भक्ताने मला पांडुरंग भेट दिला. कर्म योग, भक्ती योग आणि शब्द योगाचा हा त्रिवेणी संगम माझ्या स्मरणात कोरला गेला.
हा प्रसंग खुप अगोदर लिहणार होतो. पण लिहायचे टाळले. त्यामागील एक कारण असेही आहे की, जळगावात अनुकरणप्रिय काही व्यक्ती आहेत. आपापल्या संबंधातून इतरांना गोड शब्दांत गळ घालणारेही आहेत. 'तुम्ही तिवारींना गांधी भेट दिला किंवा तुम्ही पांडुरंग भेट दिला, आम्हालाही द्या,' असे स्वमुखी मागणी करणारेही काही चेहरे आहेत. वरील प्रसंग वाचून ही मंडळी किमान स्वमुखाने काही मागणी करणार नाहीत अशी आशा आहे. इतरांचे स्वभाव लक्षात घेऊनच गांधी मूर्ती व पांडुरंग मूर्तीचे हे किस्से उशीरानेच लिहिले आहेत.
(ताजा कलम - माझ्याकडे स्वामी विवेकानंद यांची सुध्दा एक सुंदर मूर्ती आहे. ती मला अनिल जोशी यांनी दिली आहे. खरे तर ती मी दादागिरीने मागून आणलेली आहे)
No comments:
Post a Comment