Wednesday, 25 April 2018

शेतकऱ्यांची पिढी घडविताना ...

शेतकऱ्यांच्या आठवी आणि नववीत असलेल्या मुला मुलींना शेतीचे अत्याधुनिक तंत्र माहिती करुन देत आणि नफ्यातील शेती व्यवस्थापनाचे कौशल्य शिकवून एक नवीपिढी घडविण्याचा अनोखा प्रयत्न 'ॲक्शन प्लाटफॉर्म' या कंपनीच्या माध्यमातून 'फाली' (फ्युचर ॲग्रीकल्चर लीडर्स अॉफ इंडिया) या कृतीशील संशोधन प्रकल्पातून केला जातोय. या अंतर्गत महाराष्ट्र व गुजरात मधील सुमारे ५२५ मुला मुलींचे चौथे संमेलन जैन इरिगेशन सिस्टीम  च्या सहकार्याने नुकतेच पार पडले. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पूर्णवेळ विविध कार्यक्रमात उपस्थित राहता आले.

शेतकरी कुटुंबातील अवघ्या चौदा, पंधरा वर्षे वयोगटातील मुले मुली शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय प्रकल्पांच्या उभारणीचे प्रकल्प अहवाल सादर करीत होते. अत्याधुनिक विज्ञान व तंत्र शेती अवजारे व पीक व्यवस्थापनात कसे वापरता येईल ? या विषयी मुले मुली प्रयोग सादर करीत होते. हे दोनही कार्यक्रम आणि त्यात सहभागी मुला मुलींचा अभ्यास, आत्मविश्वास पाहून लक्षात आले की, शेतकऱ्यांची भावी पिढी घडविण्याचा हा 'फाली' प्रयोग आगळा वेगळा असला तरी तो आश्वासक आहे. शेती करण्याविषयी शेतकऱ्यांच्या मुला मुलीत आत्माभिमान जागवणारा आहे. पुढील दशकात या प्रयोगातून पुढे सरसावलेली मुले मुली इच्छित शिक्षण पूर्ण करुन शेती करण्याचा वसा आपल्या कार्य कर्तृत्वाने निश्चितपणे जपतील आणि पुढील पिढीत त्याचे वहन सुध्दा करतील.

नॅन्सी बेरी फाऊंडेशन व ॲक्शन प्लाटफॉर्म या अमेरिकन संस्था आहेत. त्याच्या प्रमुख ६४ वर्षे वयाच्या नॅन्सी बेरी आहेत. अमेरिकेतही 'फ्युचर ॲग्रीकल्चर लीडर्स अॉफ अमेरिका हा उपक्रम त्या २८ वर्षांपासून पुढे नेत आहेत. सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींमध्ये शेती विषयक रुची, आवड व आत्मविश्वास निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. तीन वर्षापूर्वी नॅन्सी बेरी यांनी असाच कार्यक्रम भारतातील 'कृषि क्षेत्रातील भविष्य दर्शी नायकांचा' शोध घेण्यासाठी सन २०१४ मध्ये सुरु केला. पहिल्या वर्षी यात केवळ ४ शाळांमधीले मुले मुली सहभागी होती. यावर्षी महाराष्ट्रातील ६९ आणि गुजरातमधील ६ शाळांमधील ६,१५० हजारावर मुलांची चाचणी घेऊन सुमारे ५२५ मुले मुली निवडण्यात आली.

'फाली' या कार्यक्रमात १४,१५ वर्षे वयोगटातील मुला, मुलींना सहभागी करण्याचे एकमेव कारण हेच की, या वयोगटातील मुले नवे काही शिकायला उत्सुक असतात आणि या वयोगटात निर्माण होणारी नाविन्यपूर्ण कामाची आवड नंतर महाविद्यालयीन शिक्षणालाही दिशा देते. 'फाली' त मुला मुलींना सहभागी करण्याची एक निश्चित पध्दत आहे. मुला मुलींची आवड निवड जाणून त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यातून मुला मुलींचे गट निवडून त्यांना वर्षभर कृषि विषयक शिक्षण दिले जाते. 'फाली' चे स्वतंत्र प्रशिक्षक नेमून मुला मुलींना दर आठवड्यात दोन दिवस शेती पद्धती व तंत्र शिकवले जाते. यासाठी प्रात्यक्षिक म्हणून मुला मुलींना शेत शिवार किंवा संशोधन प्रकल्पस्थळी नेले जाते. शेतीचे नवे तंत्र समजावून सांगताना तुम्ही सुध्दा नव्या तंत्राचा अविष्कार करा यासाठी प्रोत्साहन व साहित्य दिले जाते. या बरोबरच शेतीतील नफा वाढावा म्हणून शेती पूरक अथवा शेती उत्पादनावर आधारित उद्योग, व्यवसाय प्रारंभासाठी प्रकल्प अहवाल तयार करायला शिकवले जाते.

या दोन्ही प्रकल्पांची चर्चा वार्षिक संमेलनात तज्ञांच्या उपस्थित होऊन पहिल्या पाच प्रकल्पांना बक्षीसे दिली जातात. यावर्षीचे चौथे संमेलन जळगाव येथे जैन इरिगेशन सिस्टिमच्या मुख्यालय जैन हिल्स येथे पार पडले. या संमेलनाच्या आयोजनात मुख्य भूमिका जैन उद्योग समुहाची होती. त्या सोबतच 'फाली' प्रकल्पात रयत शिक्षण संस्था, युपीएल (युनायटेड फॉस्फरस लिमिटेड), गोदरेज ॲग्रोवेट, बायर व स्टारॲग्री यांचाही सहभाग होता.

मुले मुलींच्या उद्योग, व्यवसायांचे प्रकल्प अहवाल सादरीकरण पाहता आले. फळे, दूध अशा विषयांवर मुले मुली भागभांडवलची आकडेवारी सांगून प्रकल्पात कोणते यंत्र व तंत्र वापरणार ? याची माहिती आत्मविश्वासाने देत होते. नफ्याचे गणित मांडताना तज्ञ परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. अर्थात, मुला मुलींना त्यांच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन होतेच.

शेतकऱ्यांची भावी पिढी घडत असतानाचा सर्वोत्तम आनंद हा शेती संशोधनाचे प्रदर्शन पाहताना आला. पेरणी, खत देणे, रसायन फवारणी, पाणी व्यवस्थापन, मातीतील आर्द्रता तपाहणी, फळे काढणी, भाजीपाला निर्जलीकरण, तण कापणी, वृक्ष स्थानांतरण, मका काढणी, चारा कापणी अशा अनेक विषयांवरील चल प्रकल्प पाहता आले. सहभागी असलेली मुलेमुली धडाडीने माहिती देत होते. फळांच्या (संत्रा व लिंबू) वर्गवारीचा अगदी साधा प्रकल्प सादर होता. पाईपांचा वापर करुन ही वर्गवारी शक्य असल्याचे मुलांनी दाखविले होते. याच प्रकल्पाला पहिले बक्षीस सुध्दा मिळाले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कुलच्या मुला मुलींनी हा प्रकल्प सादर केला होता. उद्योग, व्यवसाय सादरीकरणात सातारा जिल्ह्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयातील मुला मुलींच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला  प्रथम बक्षीस मिळाले. 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात 'फाली संमेलन २०१८' चा बक्षीस व समारोपाचा कार्यक्रम झाला. यावेळी जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन, डॉ. डी. एन. कुळकर्णी, फाली फाऊंडेशनच्या समन्वयिका नॅन्सी बेरी, गोदरेज कंपनीचे व्यवस्थापक डॉ. संजय टोके, युपीएलचे व्यवस्थापक नथा डोडीया, स्टार ॲग्रीचे विष्णु गुप्ता, बायरचे श्री. प्रितम, रयत शिक्षण संस्थेचे कमलाकर महामुनी, विलास मंडलीक, दिव्या बारमनी, बालाजी हाके, अलिबिया मुजूमदार, विरेन ब्रह्मा उपस्थित होते.

जैन इरिगेशनच्या तिसऱ्या पिढीचे युवालीडर व फार्म फ्रेश या प्रकल्पाचे संचालक अथांग जैन यांनी मुला मुलींशी सुसंवाद साधला. ते म्हणाले की, "माझे आजोबा श्रध्देय भवरलालजी जैन यांनी शेती व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे तंत्र व उत्पादनावर आधारित उद्योग समुह विस्तारला. मी सुध्दा लंडन स्कूल अॉफ इकॉनॉमिक्स मधून पदवी घेताना हाच उद्योग कसा विस्तारेल व शेतकऱ्यांच्या भावी पिढीसाठी आम्ही नवे काय करु शकू हा विचार घेऊन या उद्योगात आलो आहोत. केवळ मनुष्यप्राणीच नाही तर पशू, पक्षी व प्राणी यांच्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत. 'फाली' चे उद्दिष्ट शेतकऱ्यांची भावी पिढी घडविण्याचे आहे. आम्ही सुध्दा त्याच हेतू व दिशेने कार्य करीत आहोत. दोन्ही संस्था मिळून शेतकऱ्यांची भावी पिढी घडवू हा विश्वास आहे."

मुला मुलींचे सादरीकरण आणि सहभागी झाल्यानंतरचा आत्मविश्वास पाहून नॅन्सी बेरी म्हणाल्या, "या कार्यक्रमाचे नाव फ्युचर ॲग्रीकल्चर लीडर्स अॉफ इंडिया असे आहे. पण मुला मुलींचा प्रतिसाद बघून या प्रकल्पाचे नाव आता बदलून 'टुडेज् ॲग्रीकल्चर लीडर्स अॉफ इंडिया' असे करावे लागेल." नॅन्सी बेरी यांच्या या आश्वासक शब्दांत शेतकऱ्यांची भावी पिढी निश्चित अशा दिशेने संस्कारित व क्रियाशील होत असल्याचे दिसून येते.

1 comment:

  1. खूप उत्तम आणि महत्वाकांक्षी प्रकल्प ....असाच प्रकल्प आणखी वेगवेगळ्या प्रदेशात व्हायला हवा. मुख्य शेती करणे ही एक प्रतिष्ठेची बाब ठरायला हवी.

    ReplyDelete