Friday 20 April 2018

असिफा, आम्ही सारेच दोषी !

जम्मुतील कठुआ जिल्ह्यातील रायसना गावातील बंजारा बकरवाल समाजाच्या पशूपालक कुटुंबातील अवघ्या आठ वर्षांच्या असिफा बानो या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केल्याच्या घटनेने संवेदनाशील असलेल्या प्रत्येक माणसाचे हृदय हेलावले आहे. तब्बल तीन- साडेतीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेविषयी चर्चा करताना अनेक विषयांवर समाज विभाजीत होताना दिसतो आहे. पीडित असिफा ही मुस्लिम समाजाची तर संशयित क्रूर आरोपी हे हिंदू समाजाचे आहेत. विभाजीत एक गट असा धर्माशी संबधित आहे. कट्टर हिंदुत्त्ववादी मंडळी असिफा बानोशी घडलेल्या अत्याचाराचा दोष जम्मुतील सध्याच्या परिस्थितीला देतात. घुसखोरी व दहशतवादी कारवायांना समर्थन देणाऱ्या स्थानिक लोकांच्या कृत्याचे भोग असिफाच्या नशिबी असल्याचा दावा हिंदुत्व संघटन करते. दुसरीकडे पुरोगामी, समाजवादी मंडळी असिफावरील अत्याचाराचा दोष कट्टर पंथियांना लावते. तिसरी अजून एक विभागणी आहे. ती म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील मुस्लिम हा स्वतःला भारतीय समजतो का ? या प्रश्नाच्या उत्तरात आहे. असिफा बानोवरील अत्याचारासाठी देशभरातील जनता अश्रू गाळते आहे. मोर्चा, निषेध व मेणबत्ती मार्च निघतोय. पण देशात इतरत्र होणाऱ्या अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जम्मू- काश्मीरातील नागरिक भारतीयांसाठी अश्रू गाळतात का ? याचे सुध्दा उत्तर अपेक्षित आहे. अजून एक विभाजित गट हा मानवतावादी दृष्टीकोनाचा आहे. अत्याचार पीडित मुलगी कोणत्याही समाजाची व प्रांताची असो, तिच्यावर झालेले अत्याचार हे अमानविय असून त्याचा निषेध झालाच पाहिजे. या शिवाय, संशयित आरोपींवरील आरोप लवकर सिध्द करुन त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळायला हवी, असे या गटाला वाटते. आता राहिला शेवटचा एक गट. तो म्हणजे, सध्या देशात काहीही झाले तरी त्याचा दोष केंद्रातील सरकार व पंतप्रधानांचा असल्याचे ठासून सांगणारा गट.


असिफा संदर्भातील घटना जानेवारी २०१८ या महिन्यातील होती. ती अलिकडे चर्चेत आल्यानंतर प्रथम मी सुध्दा या घटनेकडे जम्मू- काश्मीरातील मुस्लिमांचा प्रश्न याच हेतूने पाहिले. नंतर जेव्हा काँग्रेस पक्षाने अफिसाच्या प्रश्नाला हात घातल्याचे भासवून पारंपरिक व्होट बैंक कुरवाळायला सुरुवात केली तेव्हा अफिसा ही 'जीव गमावलेली शेळी' वाटायला लागली. कारण काँग्रेसचा हेतू असिफासाठी न्याय मागण्याचा कमी व केंद्र सरकारला दोष लावण्याचा अधिक आहे. काँग्रेस सोबत प्रवाद करणाऱ्या भाजपचा हेतू असिफाला न्याय देण्यापेक्षा इतिहास उगाळण्यात धन्यता मांडणारा आहे. जम्मू- काश्मीरातील सततचे वातावरण व तेथील रहिवाशांची भारत सरकार विषयी (प्रचलित शब्द, गव्हर्नमेंट अॉफ इंडिया) असलेली कोरडी भूमिका लक्षात घेऊन मी सुध्दा अफिसाचा प्रश्न हा आपल्या देशापासून विलग प्रांताचा समजूनच पहिली प्रतिक्रिया दिली. हा विचार नक्कीच संकुचित आहे. पण मी जेव्हा स्वतःला प्रश्न केला की, जम्मू- काश्मीरातील अफिसासाठी जेव्हा आम्ही अश्रू गाळतो तेव्हा जम्मूतील रहिवासी दिल्लीतील किंवा कोपर्डीतील 'निर्भया' साठी असेच अश्रू गाळतो का ? अशा प्रकारची संवेदना जर जम्मू- काश्मीरातील रहिवाशांना इतरांप्रती नसेल तर 'मोले घातले रडायाला, ना प्रेम ना माया' या म्हणीचा प्रत्यय येऊन असिफासाठी ओघळणारा प्रत्येक अश्रू 'रुदाली' च्या भूमिकेत घेऊन जातो.

अफिसा प्रकरणाविषयी रोज येणाऱ्या उलट सुलट बातम्या मी वाचत होतो. अफिसाचे अपहरण व तिच्यावर केलेला अत्याचार हा मला एक कटाचा भाग वाटत होते. कारण त्या हेतूने केलेले वृत्तांकन सामान्य माणसाच्या मनांत भ्रम निर्माण करणारे होते. मात्र, जेव्हा घडलेली घटना नेमकी काय आहे ? आणि संशयावरुन पकडलेल्या आरोपींचा हेतू काय असावा ? हे जेव्हा मी समजावून घ्यायला लागलो तेव्हा मला माझ्याच एकांगी विचाराविषयी अपराधीपण वाटू लागले.

अफिसा प्रकरणातील मुलगी हरविल्याची घटना, मुलीचा मृतदेह मिळाल्याचा पंचनामा, अल्पवयीन संशयित आरोपीने दिशाभूल करण्यासाठी दिलेला पहिला जबाब, कट रचणाऱ्यांची निष्पन्न झालेली नावे, कटाची गुंफलेली साखळी, पोलिसांचाही सहभाग नंतर राजकीय पक्षांनी उचललेला मुद्दा, संशयित आरोपींच्या बचावासाठी सुरु झालेले जनभान विचलीत करणारे अभियान, संशय निर्माण करणारे संदेश, अगदी असिफावर अत्याचारच झाला नाही असे सांगणारी पोस्टमार्डेम रिपोर्टची चुकीची बातमी अशा अनेक विषयांनी मेंदूला झिणझिण्या आणल्या. माझे एक मत मात्र नक्की झाले ते म्हणजे, कट्टर विचारसरणीला पूरक भूमिका घेणारे वेबपोर्टल 'शंखनाद' वरुन असिफा प्रकरणात संशयाच्या भेदांची पेरणी करण्यात आली. अर्थात, अशा अनेक 'फेकन्यूज' शंखनाद या पोर्टलने यापूर्वी प्रसारित केल्या असून त्यातील खोटेपणा इतर वेबपोर्टलने वस्तुस्थिती मांडून उघड केला आहे. असिफा प्रकरणात शंखनादने असेच काहीसे केले आहे.

जम्मू- काश्मीरातील रहिवाशांचे अनेक प्रश्न आहे. त्यापैकी एक जम्मू प्रांतातून पंडीतांच्या निर्वासित होण्याचा विषय सतत चर्चेत असतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यास वैतागून जम्मूतील पिढीजात पंडीत आपली भूमी सोडून जम्मू बाहेर जात आहे. हा प्रकार आंतर राष्ट्रीय माध्यमातही चर्चेत असतो. कठुआ हा जम्मुतील एक जिल्हा. तेथील रायसना या गावात हिंदुंची वस्ती जास्त आहे. या हिंदुंच्या शेतजमिनी परिसरातील डोंगरी भागावर आहे. या परिसरात असलेले भटके पशूपालक त्यांच्याकडील मेंढ्या व घोडे चरायला डोंगरी भागात आणतात. एक प्रकारे हिंदुंच्या शेत शिवारावर होणारे हे अतिक्रमणच. बकरवाल हे असेच भटके पशूपालक. महाराष्ट्रात गुरे चारण्यासाठी काठेवाडी समाज भटकंती करतो. या समाजाच्या मालकीची जनावरे शेतात बसवायला आपण रोख रक्कम देतो. जम्मूत मात्र अशा पशू चराईमुळे तेथील हिंदू समाजात बकरवाल यांच्या अतिक्रमणाची भीती आहे. हिंदूचे एखादे शेत पशूपालकाने खरेदी केले तर तेथे मनोमनी तीव्र नाराजी होते. असिफा प्रकरण घडण्यामागे याच मानसिकतेचे खरे कारण आहे.

असिफा बानो ही घोडे चरायला रायसना गावाजवळ जंगलात आणत असे. गाव म्हणजे डोंगर परिसरातील शेतकऱ्यांची २०/२५ घरे. फारशी वर्दळ नसलेला परिसर. बकरवाल पशूपालक आपल्या शेत शिवारात गुरे चारतात याचा राग रायसना गावातील काहींना होता. त्यापैकी एक होता महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी सांझी राम. बकरवाल पशूपालकांना रायसना परिसरात पशू चरायला आणण्यापासून प्रवृत्त करायचे असेल तर काही तरी भयंकर कृत्य करावे लागेल याची जाण सांझी रामला होती. एखाद्याचा जंगलात खून झाला की पशूपालक घोडे चराई बंद करतील हा त्याचा अंदाज होता. असिफा ही घोडे चरायला आणते हेही त्याला माहित होते. प्रौढ व्यक्तिने असिफाला काहीही केले तर प्रकरण गंभीर होईल. पण हेच काम अल्पवयीन मुलांकडून करुन घेतले तर मुलांचे कृत्य म्हणून माध्यमांमध्ये चर्चा होईल आणि मुलांना शिक्षाही होणार नाही, असे पाताळयंत्री कारस्थान अखेरीस मांझी रामने अमलात आणले.

मांझी रामने असिफाच्या अपहरणासाठी नात्यागोत्यातील अल्पवयिन मुले परवेश व शुभम यांना वापरले. पोलिसांच्या तपास कामात मदत व्हावी म्हणून दीपक व सुरेश यांना कटात सामिल करुन घेतले. मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला गुंगीत ठेवण्यासाठी दीपकने नशेच्या गोळ्या आणून दिल्या. दोघा अल्पवयीन मुलांसह या पोलिसांनीही असिफावर अत्याचार केले. दि. १० जानेवारीला असिफा रायसना गावाजवळ जंगलात घोड्यांचा शोध घेत असताना घोडे शोधायचे निमित्त करुन  शुभमने तिचे अपहरण केले. दि. ११ ला कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली. दि. १२ ला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान शुभम व साथीदारांनी असिफाला गावाजवळच्या मंदिरात लपवून ठेवले. हे मंदिर सांझी राम याच्या ताब्यात आहे. तेथे तिला नशेच्या गोळ्या खाऊ घातल्या. असिफा दि. १० ते १४ जानेवारी या नराधमांच्या तावडीत होती. दि. १४ ला तिचे डोके ठेचून खून करण्यात आला. नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. तो दि. १७ जानेवारीस आढळला. हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तपास करणाऱ्या हिरानगरच्या पोलीस निरीक्षकाने व हेडकॉन्स्टेबलने असिफाच्या शरीरावरील कपडे धुऊन नंतर तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले. सांझी रामसह असे ७ संशयित कटात सामील झाले. दि. १७ जानेवारीस असिफाच्या खुनास वाचा फोडायला जनआंदोलन झाले. दि. १८ जानेवारीस पोलिसांनी अल्पवयीन शुभमला ताब्यात घेतले. तपासात त्याला पोलिसी इंगा दाखवताच तो पोपटागत बोलायला लागला. असिफाचे कपडे धुणाऱ्या पोलिसांचे नाव समोर येताच त्यांना व मदत करणाऱ्याइतरांना निलंबित केले गेले. दि. २२ जानेवारीस गुन्हे शाखा तपासाला लागली. सांझी राम व इतर सर्व ७ जण अटकेत गेले. दि. २३ जानेवारीस संशयित आरोपींच्या समर्थनार्थ हिंदुंच्या नावे संघटन स्थापन झाले. त्यानंतर या क्रूर व अमानविय घटनेला संशयाचे पदर जोडून संभ्रम तयार करायचे काम सुरु झाले. 'शंखनाद' सारखे माध्यम हे काम करु लागले. दबावासाठीच्या संघटनात भाजपचे नेते घुसले. त्यानंतर वकील संघाने कोर्टात चार्जशीट ठेवायला विरोध केला. जम्मू- काश्मीर सरकारमधील भाजपचे मंत्री सुध्दा पोलीस तपासावर संशय घेऊ लागले. अशा पध्दतीने असिफाचे प्रकरण साऱ्या बजूने विवादास्पद झाले.

पोलीस तपास जेव्हा मांझी राम भोवती फिरायला लागला तेव्हा अल्पवयीन शुभमला संशयित आरोपी म्हणून हजर करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून असिफाच्या अपहरणाची कहाणी सुध्दा पाठांतर करुन घेतली होती. पण पोलिसांच्या मारामुळे त्याने तोंड उघडून गुह्याची घडलेली हकिगत सांगून टाकली. असिफाचे डोके दगडाने ठेचून मीच खून केला, हे ही त्याने कबूल केले. जेव्हा शुभमला न्यायालयात नेले तर त्याची रवानगी बाल सुधारगृहात झाली. पण नंतर शुभमची चौकशी त्याच्या नातेवाईकांच्या समोर होऊन असिफावरील अत्याचार व कटाची कहाणी उलगडत गेली. जे घडले त्याचे सविस्तर विवेचन काही वृत्तात आले आहे. ते वाचताना अंगावर शहारे येतात.

असिफा बानोच्या प्रकरणामुळे साऱ्यांनाच दोष लागला हे ही तेवढेच सत्य आहे.

या प्रकरणाची माहिती देणाऱ्या महत्त्वपूर्ण लिंक ...
घटनेची संपूर्ण माहिती देणारे चार्जशीट ...
http://www.mediavigil.com/news/chargesheet-of-kathua-rape-case/

सोशल मीडियातील खोट्या दाव्यांचा पर्दाफाश ...
https://www.thequint.com/news/webqoof/what-really-happened-kathua-rape-case

अफिसावर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट ...
https://theprint.in/governance/kathua-rape-victims-uterus-was-injured-report-confirms-brutal-sexual-assault/47911/

'शंखनाद' वरील इतर खोटा प्रचार ...
https://www.altnews.in/alt-news-investigation-upcoming-fake-news-site-coveragetimes/



No comments:

Post a Comment