Sunday 15 April 2018

जैन बंधू आणि पवारसाहेब!

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या पश्चात जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचा अखिल भारतीय पातळीवरील कृषि क्षेत्रातील अग्रगण्य व अत्यंत प्रतिष्ठेचा 'पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान झाला. स्व. मोठेभाऊंच्या पश्चात पवार यांच्या उपस्थितीत झालेला हा पहिला कार्यक्रम. स्व. मोठेभाऊंच्या आठवणींनी पवार गहिवरले होते. अशोकभाऊ, अनिल, अजित व अतुल या जैन बंधुंनी स्व. मोठेभाऊंच्या पश्चातही त्यांच्या कार्याचा वसा अधिक उत्तमपणे जपल्याबद्दल पवार यांनी जाहिरपणे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. पवार साधारणतः २५ मिनिटे बोलले. त्यात त्यांनी स्व. भवरलालजींशी असलेल्या मैत्रीतील अनेक हळवे प्रसंग सांगितले. त्याचवेळी नव्या पिढीने पवार - जैन कुटुंबाचा ऋणानुबंध कायम ठेवल्याचा उल्लेखही केला.

पवार यांचे मोठे बंधू स्व. आप्पासाहेब पवार यांचा स्व. मोठेभाऊंशी स्नेह होता. स्व. आप्पासाहेब शेतीतील संशोधक होते तर स्व. भवरलालजी शेतीतंत्राचे संशोधक होते. त्यामुळे दोघांच्या मैत्रीचा बंध हा शेती या विषयावर गुंफला गेला होता. स्व. भवरलालजी हयात असताना त्यांच्याच कल्पनेतून स्व. आप्पासाहेब यांच्या नावे कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दर दोन वर्षांनी देणे सुरु झाले. यंदा पुरस्कार प्रदान करण्याचे १४ वे वर्ष होते. वडनेर भैरव (जि. नाशिक, ता. चांदवड) येथील प्रगतीशील शेतकरी अविनाश मनोहर पाटोळ यांचा सपत्नीक सत्कार सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते.

या कार्यक्रमास मागील एका कार्यक्रमाचे पूर्वासूत्र होते, पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाचे. भारताचे दोन वेळा कृषिमंत्री, एकवेळा संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री तसेत कृषि, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग व शिक्षण क्षेत्रात कार्य कृर्तृत्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवलेल्या, प्रदीर्घ अनुभव असलेल्या 'जाणत्या भूमिपूत्रा' चा अमृत महोत्सवानिमित्त कृषिपंढरी, जलतीर्थ नगरी जैनहिल्सवर जळगाव येथे समस्त शेतकरी बंधू - भगिनींच्यावतिने प्रातिनिधिकदृष्ट्या भावस्पर्शी गौरव व्हावा, त्यांचे अभीष्टचिंतन व्हावे, कृषि क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा असा श्रध्देय मोठ्या भाऊंचा मानस होता.

दिल्लीत, पुण्यात तसेच मुंबईत या आधी पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणाचे सत्कार झाले होते. मात्र स्व. आप्पासाहेब पवार पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या व्यासपिठावर झालेला गौरव संस्मरणीय ठरला होता. या आनंद सोहळ्यास महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यातील शेतकरी बंधू - भगिनी अंतरीच्या उत्कट श्रध्दाभावासह उपस्थित होते. भूमिपूत्रांच्या वतिने, भूमिपूत्रांच्या उपस्थितीत, 'जाणत्या भूमिपूत्राचा' हृदरस्पर्शी सत्कार सोहळा महाराष्ट्राचे तरुण तडफदार मुख्यमंत्री व जे स्वतः शेतकरी आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास राज्याचे इतर मंत्री, आमदार, खासदार आणि कृषि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दोन वर्षांपूर्वी स्व. मोठेभाऊ इहलोकी निघून गेले. पण त्यांनी स्व. आप्पासाहेबांच्या नावे दिलेला पुरस्काराचा वसा दुसऱ्या पिढीतील जैन बंधुंनी काळानुरुप पुढे नेला. यावर्षीचा पुरस्कार स्व. मोठेभाऊंच्या पश्चात दिला जाणारा पहिला पुरस्कार असल्यामुळे त्या कार्यक्रमातील गरीमा व गुणवत्ता कायम असावी अशी जय्यत तयारी अशोकभाऊंच्या नेतृत्वात जैन बंधुंनी केली होती. पुरस्कार वितरण कार्यक्रमात जेव्हा पवार बोलू लागले तेव्हा साऱ्यांचे लक्ष त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे होते.

पवार यांनी भाषणाचा प्रारंभ आप्पासाहेब व भवरलालजींच्या आठवणींनी केला. ते पहिलेच वाक्य म्हणाले, 'भवरलालजींच्या नंतर सामाजिक भान ठेवून जैन उद्योगासंबंधीची वाटचाल प्रभावी रितीने करणारे अशोक, अनिल, अजित, अतुल आणि सगळा जैन परिवार. आपण या ठिकाणी हा सोहळा करीत असतो. भवरलालजी असताना या कामाची सुरुवात झाली आणि बहुतेक वेळा या कार्यक्रमाला माझी उपस्थिती ही कायम असते. या पुर्वीचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी व्हायचे. त्याच्यामध्ये भर टाकणारी कामगिरी नव्या पिढीने केली याचा मला आनंद आहे.' जैन बंधुंच्या पाठीवर पवार यांनी दिलेली ही पहिली कौतुकाची थाप होती.

पवारसाहेबांच्या नंतरच्या भाषणात स्व. मोठेभाऊ व स्व. आप्पासाहेबांच्या आठवणींनी जागा व्यापली. ते म्हणाले, 'एका गोष्टी संबधीची अस्वस्थता आहे, की जळगावला आल्यानंतर जैन हिल्सला गेल्यानंतर भवरलालजींच्या बरोबर सुसंवाद करण्याची संधी मिळत नाही. गेली अनेक वर्षे आमचा स्नेह होता. समान विषयासंबंधीची आस्था आम्हा उभयतांमध्ये होती आणि त्यामुळे साहजिकच या विषयांच्या संबंधी सुसंवाद करावा, चर्चा करावी याची संधी आम्ही दोघे घेतल्याशिवाय राहत नसत. दिल्लीमध्ये ते आले तर ते हक्काने माझ्याकडे असायचे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये मी जळगावला आल्यानंतर प्रामुख्याने जैन हिल्सवर भवरलालजींच्या सोबत राहिलेलो आहे. शेतीची चर्चा व्हायची, अर्थव्यवस्थेची चर्चा व्हायची, शिक्षणाची चर्चा व्हायची, शेतकर्‍याचे जीवनमान सुधारण्यासाठी काय करायचे याची चर्चा व्हायची. कधी कधी वादही व्हायचे, पण त्या वादाच्या पाठीमागे शेतकरी आणि बळीराजाच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचे जे मार्ग आहेत कदाचित त्या संबंधीची भिन्नता असायची. त्यामुळे वाद असले, वाद झाले तरी मनातला ओलावा हा कधी ढासळलेला नाही हे त्याच वैशिष्ट्य होत.'

स्व. भवरलालजीं विषयी मनातील हळवेपण पवार लपवू शकले नाही. स्व. भवरलालजी एखाद्या विषयावर पवारांशी युक्तिवाद करीत त्या प्रसंगाचा संदर्भ घेवून पवार हळूवारपणे म्हणाले, 'मला कोणीतरी विचारले की भवरलालजींच्या बद्दल तुम्हाला काय वाटत ?  मी त्यांना सांगितले की 'भवरलाल मला फणसासारखे वाटतात. फणस हा बाहेरून ओबडधोबड असतो, पण तो उघडल्यानंतर त्यातील गरे हे अत्यंत स्वादिष्ट असतात. भवरलाल एखाद्या वेळी एखाद्या प्रश्‍नासाठी धोरण योग्य नाही असे त्यांना वाटले तर स्पष्टपणाने बोलतील, पण त्यांच्या अंतकरणात असलेला प्रेमाचा ओलावा यद्किंचीत सुद्धा कमी नसतो. तो झरा कधी आटत नाही. हा माझ्या आयुष्याभरातला त्यांच्याबद्दलचा संबंध आहे.'

स्व. आप्पासाहेब आणि स्व. भवरलालजींच्या स्नेहातील संबंधांचा गुंताळा पवारांनी उलगडला. ते म्हणाले, 'आप्पासाहेब पवार माझे वडील बंधु होते, पण त्यांची आस्था आणि बांधिलकी ही शिक्षणामध्ये होती. शेतीच्या बद्दलची होती. ते शेती विषयक पदवीधर होते. त्यांनी सहकारामध्ये काम केले. यशस्वीरितीने कारखानदारी उभी करून चालवली. भवरलालजींचे आणि त्यांचे सुद्धा संबंध अतिशय मैत्रीचे होते. मला आनंद आहे की जैन परिवाराने पुरस्कार देताना आप्पासाहेबांना जी दृष्टी होती, नव्या पिढीला शेतकर्‍यांमध्ये प्रोत्साहित करण्याची त्यांची निती होती, नेमका तोच विचार घेऊन त्या दृष्टीने काम करणारा कुणी तरुण शेतकरी असेल तर त्याचा सन्मान करण्याची भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन परिवाराने घेतली. मला आनंद आहे. नेमक जे अभिप्रेत आप्पासाहेबांना होते, जे अभिप्रेत या ठिकाणी भवरलालजींना होते, आज त्याची अंमलबजावणी पुढची पिढी करते याचा मला स्वतःला आनंद आहे.' पवारसाहेबांच्या या ओघवत्या व उत्स्फूर्त वक्तव्यात जैन बंधुंच्या पाठीवर कौतुकाची ही दुसरी थाप होती.

पवार यांनी जैन बंधुंचे जाहिरपणे कौतुक करताना अपेक्षाही व्यक्त केली. ते म्हणाले, 'मी आजच जैन बंधुंना सांगितले की या ठिकाणचा हा कार्यक्रम तुम्ही करता उत्तम कार्यक्रम आहे. इथे महाराष्ट्राचाच नाही तर देशातला कुठलाही शेतकरी आल्यानंतर त्या शेतकर्‍यांना नवीन तंत्र शेतीच्या क्षेत्रामध्ये आणण्याच्या संबंधी आणि नवीन संशोधन करण्या संबंधीच जे काम तुम्ही या ठिकाणी केलेले आहे त्याच दर्शन घडवा. त्यांच्या नव्या पिढीला दाखवा. हे बदल होत आहेत आणि ते बदल त्याच्या शिवारामध्ये दिसले तर त्याचा संसार बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्या कामाला आपल्याला प्रोत्साहित करायच आहे. आज खर्‍या अर्थाने त्याची आवश्यकता आहे.'

पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोकभाऊंच्या संपर्कात सतत होते. कार्यक्रमस्थळी यांत्रिकी व तांत्रिक शेतीची अवजारे व उपकरणे याचे प्रदर्शन होते. यावर्षी प्रामुख्याने शेतकऱ्यांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. जवळपास दहा हजारावर शेतकऱ्यांनी कृषी यंत्र व तंत्राचे प्रदर्शन बघितले. हेच सूत्र धरुन पवारसाहेबांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीची मर्यादा देशभरापर्यंत वाढवली. अशोकभाऊंनी प्रत्यक्ष चर्चेत पवारसाहेबांचा शद्ब पाळण्याचे अभिवचन दिले.

भाषणाच्या अखेरीसही पवार यांनी स्व. भवारलालजी आणि स्व. आप्पासाहेबांचे पाणी व शेतीचे सूत्र पकडले. स्व. भवरलालजींच्या कार्याचा गौरव करीत पवार म्हणाले,  'पाण्याचे तंत्र त्यांनी सगळ्या जगातून प्राप्त केले आहे. ते तुमच्या शिवारापर्यंत पोहोचवून तुमच्या शेताची उत्पादकता ही वाढविण्यासंबंधीची खबरदारी त्यांनी घेतली. त्याचा परिणाम आज विविध क्षेत्रातली शेती उत्पादकता वाढण्याच्यासाठी आपण यशस्वी होतो आहे. मला आनंद आहे की आज तेच काम करणार्‍या आप्पासाहेबांबद्दलचा संबंधीत पुरस्कार आणि त्या विचाराने काम करणार्‍या नव्या पिढीतल्या शेतकर्‍याचा सन्मान हा अतिशय उत्तम प्रकारचा उपक्रम आहे. त्या उपक्रमाच्या संदर्भात मी जैन परिवाराला, त्या कुटुंबातल्या सगळ्या सहकार्‍यांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या अधिकार्‍यांना, त्यांच्या तंत्रज्ञांना, त्यांच्याबरोबर काम करणार्‍या शास्त्रज्ञांना, सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि याच पद्धतीने तुम्ही अखंडपणाने काम करीत रहा. या देशातला बळीराजा आज आत्मा त्याच्या रस्त्यात विसावलेला आहे, त्याच्यातून त्याला बाहेर काढून स्वाभिमानानं उभे राहण्याची परिस्थिती सगळे मिळून निर्माण करण्याची खबरदारी या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घ्यावी. ते तुमचे प्रयत्न महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने उपयुक्त राहतील या बद्दलचा विश्‍वास या ठिकाणी बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.'

जैनांच्या दुसऱ्या पिढीचे मनसोक्त कौतुक पवारसाहेबांनी केले. यामुळे जैन बंधुंचे परिश्रम सत्कारणी लागले. पवार यांच्या प्रत्येक शद्बामुळे कार्यक्रमाची उंची वाढली. उपस्थितांनी पवारांच्या विचारांना वेळोवेळी दाद दिल्यामुळे कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा विषय बाजुला राहिला. अगदी नीट नेटका कार्यक्रम आपल्या नेहमीच्या उंची पेक्षा काकणभर सरस ठरला ...

No comments:

Post a Comment