Saturday 14 April 2018

'दमाने या' बाईंची दमनगिरी ...

कोणत्या नेतृत्वाचा उदय कोणत्या परिस्थितीतून होतो, यावर त्या नेत्याची सामाजिक प्रतिमा आणि नेतृत्व वाहून नेण्याचा काळही ठरतो. एखाद्या सनसनीखेज घटनेतून झपाट्याने पुढे आलेल्या नेत्या भोवती समर्थकांची थोडी बहुत गर्दी होते. ही गर्दी सामान्य माणसाचे लक्ष वेधून घेते पण सामान्य माणूस त्या गर्दीचा भाग होत नाही. नंतर काळाच्या प्रवाहात नेते मंडळी विचारांनी खुजे असल्याचे समाजाला जाणवू लागते. आपल्यापासून समाज लांब जातोय असे दिसू लागले की, खुज्या नेतृत्वाचे सामाजिक उपद्रव मूल्य सुरु होते. हे उपद्रव मूल्य दोन प्रकारात असते. पहिला प्रकार म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करायला लावणारे मुद्दे मांडून सद्भाव व ऐक्य नष्ट करणे. जसे, गुजरात व राजस्थानमध्ये सामाजिक आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन हिंसक आंदोलने केली गेली. उपद्रवाचा दुसरा प्रकार म्हणजे, व्यक्तिद्वेषाचे मुद्दे हाती घेऊन एखाद्या व्यक्तिला सतत अडचणीत आणणे. या प्रकारची उदाहरणे दिल्ली पासून गल्लीपर्यंत भरपूर आहेत.

कल्पना इनामदार यांच्या एका खुलाशातून उपद्रवाचे असेच एक नेतृत्व चर्चेत आले आहे. बहुचर्चित या नेतृत्वाचे संपादीत नाव आहे 'दमाने या बाई'. आपण त्यांची दमनगिरी समजवून घेणार आहोत. कारण या बाईंच्या अलिकडच्या सामाजिक आंदोलनांचे स्वरुप इतरांसाठी दमगिरीप्रमाणेच आहे. सन २०१२ पासून अनेकांना व्यक्तिगत दोष लालणारी ही दमाने या  बाई एकही आरोप सिध्द करु शकलेली नाही.

या बाईंच्या नेतृत्व उदयाची कहाणी तशी रंजक आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी अभियानातून काही नेत्यांचा उदय झाला. त्यातून दोघा तिघांना ओळख मिळाली. सन २०११ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील कोंडाणे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहीत करण्याच्या प्रकारातून दमाने या बाईंचे नाव चर्चेत आले. प्रकल्पासाठी जमीन द्यायला बाईंचा विरोध होता. प्रकल्पाच्या चौकशीतून व माहितीच्या अधिकारातून कामातील, वाढीव खर्चातील काही अनागोंदी दमाने या बाईंनी पुढे आल्या.

दुसरीकडे हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी अभियानचा लाभ उठवत मात्र हजारेंना बाजुला सारुन केजरीवाल सारख्या काही मंडळींनी एकत्र येऊन सन २०११ मध्ये आम आदमी पार्टी (आप) ची स्थापन केली. या पार्टीच्या महाराष्ट्रस्तर नेतृत्वाची धुरा अर्थात दमाने या बाईंकडे होती.

याच दरम्यान महसूल प्रशासनाने दमाने या बाईंच्या मालकीची कर्जत तहसील क्षेत्रात असलेल्या खरवंडी येथील शेतजमिनीची चौकशी सुरु केली. या प्रकरणात एका इंग्रजी दैनिकात दावा केला होता की, दमाने या बाईने आपल्या ३० एकर शेतजमीन जवळ सन २००७ मध्ये २ आदिवासी शेतकऱ्यांची ७ एकर जमीन शेतीसाठी खरेदी केली. या जमिनीचा वापर शेतीसाठी केला जाईल असे प्रतिज्ञापत्र दिले होते. पण सन २०११ मध्ये संपूर्ण ३७ एकरवर ३९ प्लॉट पाडले गेले. यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असा बचाव दमाने या बाई करीत आहेत. या प्रकरणामुळे आम आदमी पार्टी अडचणीत आली. भ्रष्टाचार विरोधात बोलणारी बाई स्वतःच कायदे मोडते अशी चर्चा सुरु झाली. बाईने सुध्दा  आपलीच कार्यवाही कायद्याला धरुनच आहे असे वारंवार या सांगितले. दमनगिरीचा हा पहिला अध्याय म्हटला जाईल.

याच काळात केजरीवाल यांनी दमाने या बाईसह प्रशांत भुषण व मयंक गांधी यांच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या चौकशीसाठी खास समिती नेमली होती. त्याचे पुढे काय झाले हे समजले नाही. पण आपल्याच पक्षात चौकशीला सामोरे जाण्याचा प्रसंग दमाने या बाईवर ओढवला.

राज्य सरकार आपल्याला कोंडीत पकडते आहे हे पाहून दमाने या बाईंनी अजित पवार यांच्या नावाने चर्चेत असलेल्या ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यास हात घातला. या घोटाळ्यात पवार यांच्यावर गडकरी कारवाई करीत नाही कारण शरद पवार व नितीन गडकरी यांची धंदेवाईक पार्टनरशीप असल्याचा दावा दमाने या बाईने केला होता. याला पार्श्वभूमी होती ती पाटबंधारे विभागातील अधिकारी विजय पांढरे यांनी एका पत्रात विभागातील भ्रष्टाचाराचा उकरुन काढलेला मुद्दा. अर्थात, बाई व पांढरे हजारेंच्या आंदोलनात सोबत होते. बाईंनी गडकरींवर केलेल्या आरोपांची जशीच्या तशी रि अरविंद केजरीवाल यांनी ओढली. त्यांनीही गडकरींना भ्रष्ट राजकारणी म्हटले.

यापूर्वीसुध्दा गडकरींच्या पूर्ती शुगर व पॉवर प्रोजेक्टसाठी अनधिकृतपणे जमिन लाटल्याचा आरोपही दमाने या बाई करीत होती. या आरोपांमुळे गडकरींना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागले. या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या गडकरींनी केजरीवाल व दमाने या बाईवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला.

समाजसेविका म्हणून ओळख मिळाल्यानंतर दमाने या बाई अधिक जोमाने गडकरी विरोधात कामाला लागल्या. सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दमाने या बाई आपच्या चिन्हावर थेट गडकरींच्या विरोधात रिंगणात उतरल्या. या लढतीला माध्यमांनी हवा भरली. प्रत्यक्षात गडकरी यांना ५ लाख ८७ हजारांवर मते मिळाली तर दमाने या बाईला ६९ हजारवर मते मिळाली. बाईंचा दारुण पराभव झाला.

२०१३ पर्यंत असेही समोर आले की, दमाने या बाईंने केलेल्या आरोपात तथ्य नाही. कालांतराने केजरीवाल यांनी गडकरींची माफी मागितली. दमाने या बाई मात्र आजही म्हणतात, मी न्यायालयात लढणार ! केजरीवाल हे माघारी वळल्यानंतर या दमाने या बाईने असाही दावा केला की, मला गडकरी विरोधात लढायला केजरीवाल यांनी सांगितले. माझा मुलगा तेव्हा १२ वीची परीक्षा देत होता. तरी मी निवडणूक रिंगणात उतरले.

आम आदमी पार्टीतून बाहेर पडताना दमाने या बाईने अरविंद केजरीवालवर आरोप लावला की, केजरीवाल यांनी दिल्लीतील आपचे सरकार वाचवायला भाजप आमदारांचा घोडे बाजार करायचा प्रयत्न केला. हा आरोप बाईंनी एका बहुचर्चित ध्वनीफितीचा आधार घेवून केला होता.

इथपर्यंतचा दमाने या बाईंचा प्रवास काय दाखवतो तर, हजारे यांचे सोबत आंदोलनात सहभागी झाले. नंतर हजारे यांना सोडले. पवार-गडकरींवर आरोप केले. एकही सिध्द झाला नाही. केजरीवाल यांनी गडकरींची माफी मागितली. त्यानंतर बाईंनी केजरीवालवरच आरोप केले. यानंतर दमाने या बाईने आम आदमी पार्टीच सोडली.

पक्ष आणि सोबतची माणसे सोडल्यानंतर सतत प्रसिध्दीत राहण्यासाठी दमाने या बाईला इतरांवर आरोप करायला विषय हवे होते. राज्यात फडणवीस सरकार स्थिर स्थावर झाले होते. तेव्हा एकनाथराव खडसे यांच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या अनेक पुढाऱ्यांनी संगनमत करुन आरोपांचा धुराळा उठवला. हे आरोप पुरविण्यात भाजपचीच मंडळी होती. दमाने या बाईचे वडील आरएसएसचे होते. तो संबंध यावेळी वापरला गेला. खडसेंच्या कथित पीएचे लाच प्रकरण, जावयाची लिमोझीन कार, एमआयडीसीत जमीन खरेदी, दाऊद सोबत कॉल प्रकरण, अपसंपदा गोळा करणे असे आरोप एका पाठोपाठ आले. गडकरींप्रमाणेच खडसेंना मंत्रीपद गमवावे लागले.

दमाने या बाईंनी पवार, गडकरी, ठाकरे, खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले मात्र त्यांनी कधीही मुख्यमंत्र्याला दोष लावला नाही हे सुध्दा ठळकपणे लक्षात येते.

खडसेंवर आरोप करताना कारागृहात असलेले छगन भुजबळ यांच्या आरोग्यसेवे विषयी आरोप करीत डॉ. तात्याराव लहाने यांनाही दमाने या बाईने टार्गेट केले. डॉ. लहाने हे भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट देतात असा आरोप दमाने या बाईने केला होता. मात्र, अशा प्रकारे थेट सेवा देण्याविषयी कोणतेही आदेश मी दिलेले नाही, हे डॉ. लहाने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

दमाने या बाईने अलिकडे असाही दावा केला की, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी व मुलगा आदित्य ठाकरे हेही पाटबंधारे घोटाळ्यात सहभागी आहेत. कमोद ट्रेडर्स प्राइव्हेट लिमिटेड आणि पद्मनिश एक्झिम प्राइव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये ठाकरे कुटुंबिय सहभागी आहेत. या दोन्ही कंपन्यांची नावे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात आहेत.

दमाने या बाईने सिंचन घोटाळ्यातील माहिती दडविल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही केला. परंतु सोमय्या यांनी त्याचा इन्कार केला.

खडसे यांच्यावर दमाने या बाईने केलेल्या विविध आरोपांना आता जवळपास ३ वर्षांचा काळ झाला आहे. त्यातील एकही आरोप दमाने या बाई सिध्द करु शकलेल्या नाही. उलट खडसे समर्थकांनी दमाने या बाई विरोधात अनेक ठिकाणी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यांमध्ये दमाने या बाई हजर झालेल्या नाहीत. दोनवेळा न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर बाईंनी आजारपणाचे कारण पुढे केले आहे.

मध्यंतरी खडसे विरोधातील आरोपांविषयी माहिती घेण्यासाठी दमाने या बाईने जळगाव आरटीओ कार्यालय व मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यकर्ते घुसवून दमनगिरीचा प्रयत्नही केल्याचे आढळले आहे.

दमनगिरीचा हा प्रवास कल्पना इनामदार या महिलेने दिलेल्या माहितीवरुन उघड झाला आहे. त्या बाई म्हणाल्या, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत 'दमाने या' यांनी मला सांगितले होते. मी तसे करण्यास नकार दिल्यावर दमाने या यांच्याकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला होता. आतासुद्धा त्या माझ्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार.

इनामदारबाईंच्या आरोपानंतर दमाने या बाईने खुलासा केला आहे की, ही इनामदार बाई भुजबळ यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर आरोप करीत आहे. अर्थात, हा खुलासा फारसा प्रभावी नाही.

दमाने या बाईंनी आपल्या दमनगिरीची अशी अनेक उदाहरणे इतरांच्या सोबत केलेली आहेत. सन २०११ ते २०१८ अशा ७ वर्षांच्या सामाजिक व राजकीय प्रवासात अनेकांची साथ संगत करीत नंतर त्यांच्यावरच आरोप केल्याचा दमाने या बाईंचा इतिहास आहे.

*(हा लेख विडंबनात्मक आहे. लेखणी व चित्रातील व्यंगाने समाजातील विसंगती मांडली आहे. कोणाच्याही बदनामीचा हेतू नाही)

No comments:

Post a Comment