Thursday 12 April 2018

जामनेरची कुस्ती निकाली काढणारे गिरीषभू ...

काँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे. केंद्रातील सत्ताप्राप्तीनंतर देशातील जवळपास २१ राज्यात भाजपाची सत्ता आहे. यात १५ राज्यात स्वबळावर आणि उर्वरित राज्यात भाजपाच्या नेतृत्वात मित्र पक्षांचा सत्तेत सहभाग आहे. देशात अजूनही ४ राज्यात (मिझोराम, कर्नाटक, पंजाब आणि पुदुचेरी) काँग्रेसची सत्ता आहे. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधून 'भाजपा मुक्त भारत' चा नारा देण्याचा प्रयत्नही होतो आहे. मोदी-शहा विरोधातील वातावरण तापवून पुन्हा सत्ताप्राप्तीची स्वप्ने विरोधकांना पडत आहे. या स्वप्नाला सुरुंग लावणारा निकाल जामनेरमधून आला आहे.

विरोधकांची एकत्र जंत्री केली तरी मतदारांचा विश्वास आजही भाजपावरुन तुसभर कमी झालेला नाही असा अनुभव जामनेर पालिका निवडणूक निकालावरुन येतो आहे. राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या निवासाचे जामनेर हे शहर आहे. त्यांच्या सौभाग्यवती सौ. साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्ष होत्या. त्याच पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदी दणदणीत मताधिक्य घेत विजयी झाल्या. त्यांच्या सोबत भाजपाचे सर्व उमेदवार म्हणजे २५ पैकी २५ नगरसेवक निवडून आले. एकमेकांची तोंडे न पाहणारे पारंपरिक विरोधक केवळ 'महाजन हटाव' हा अजेंडा घेऊन एकत्र आले तरी सुध्दा जामनेराच्या मतदारांनी त्यांना घरी बसवले. यालाच 'सुपडा साप होणे' हा वाक्प्रचार फिट्ट बसतो. माजी आमदार ईश्वरलाल जैन या निवडणुकीपासून लांब राहिले. हे त्यांचे व्यवहार चातुर्य म्हणू या.

ना. गिरीषभाऊ महाजन यांना कुस्तीचा शौक आहे. गावाकडील जत्रा-यात्रांमध्ये कुस्ती लावणे व पंचगिरी करणे यात त्यांचा सहभाग असतो. नगर पालिका निकाल जाहिर झाल्यानंतर ना. गिरीषभाऊंना संपूर्ण भारतातून अभिनंदनाचे कॉल येत होते. समोरुन बोलणारी व्यक्ती अभिनंदन करताना बहुधा म्हणत असायची, 'भाऊ तुम्ही विरोधकांना धोबी पछाड दिला !' यावर कुस्तीचे शौकीन असलेले भाऊ म्हणत होते, 'नाही. हा धोबी पछाड डाव नाही. या निकालाला 'कुस्ती निकाली' काढली असे म्हणतात.' दोन चार वेळा कुस्ती निकाली निघाली हे ना. महाजन यांच्या तोंडून ऐकल्यावर हा काय प्रकार आहे ते समजून घेतले. एखादा पैलवान जेव्हा आपल्या संपूर्ण शक्ती व युक्तीने प्रतिस्पर्धीला पूर्णतः १८० कोनात उचलून जमिनीवर पाठीच्या बाजुने आपटतो आणि तो प्रतिस्पर्धी पुन्हा उभाच राहू शकत नाही याला 'कुस्तीचा निकाल' लावणे असे म्हणतात. थोडक्यात 'दंगल' चित्रपटात गिता फोगाटने टाकलेला डाव किंवा 'सुलतान' चित्रपटात सलमानखानने टाकलेला डाव. ना. गिरीषभाऊंनी सर्व विरोधकांना असेच १८० च्या कोनात आपटले आहे. बहुधा  विधानसभेच्या आगामी निवाडणुकीपर्यंत विरोधक उभेच राहू शकणार नाही.

या निवडणुकीच्या आधी पासून जामनेरच्या नगराध्यक्ष सौ. साधना महाजन आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि ना. गिरीषभाऊंच्या पाठपुराव्याने जवळपास ३०० कोटींची विकास कामे आज शहरात सुरु आहे. यात पाणी योजना, भूमिगत गटार योजना, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्र, बस स्टैण्ड नुतनिकरण, एमआयडीसी स्थापना अशा योजना आहेत. शहरातील सर्वांत वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरण व अतिक्रमण हटाव ही कार्यवाही अचंबित करणारी आहे. अतिक्रमण हटावने लोक दुखावतात हा इतर ठिकाणचा समज. शिवाय, तीन तलाकवरील बंदी, मुस्लिम आरक्षणाचा प्रलंबित विषय असे काही कळीचे मुद्दे भाजपा विरोधात असतानाही मुस्लिम बहुल मतदार असलेल्या वॉर्डातही ७ मुस्लिम उमेदवार भाजपा चिन्हावर निवडून आले. शिवाय, मुस्लिमांच्या मतांवर एक हिंदू उमेदवारही विजयी झाला. हा निकाल लक्षात घेतला तर जामनेरकरांनी फक्त आणि फक्त ना. गिरीषभाऊंवर विश्वास दाखवला असे म्हणता येते.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वीच जामनेरकरांनी शहराच्या नेतृत्वाची धुरा सौ. साधना महाजन यांच्यावर सोपविली होती. भाजपाचे अल्पमत असतानाही सौ. साधना महाजन यांना बिनविरोध नगराध्यक्ष करण्याचा चमत्कार साधला होता. सन २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला २० पैकी १४ तर भाजपला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भाजपाकडून कोणी नगराध्यक्ष होऊ शकेल असा विचारही ध्यानीमनी नव्हता. मात्र, नंतर अडीच वर्षासाठी झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या ५ नगरसेवकांनी उघडपणे सौ. साधना महाजन यांचे समर्थन केले आणि त्या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर जामनेरकरांच्या झोळीत विकासाचे एकo एक प्रकल्प ना. गिरीषभाऊंनी टाकले.

ना. गिरीषभाऊंचे आणि जामनेरकरांचे नाते आजही 'टपरीवरील आमदार'असेच आहे. भाऊ भले वेळा पाळण्यात अघळपघळ असतील पण कार्यकर्त्यांना भेटण्यात, विचारपूस करण्यात ते कोणतीही कसर ठेवत नाही. हाच विषय त्यांच्या स्थानिक समर्थकांचा आहे. अत्यंत निष्ठेने ते आपले काम करतात. जामनेर तालुक्यातील विरोधकांचा बालेकिल्ला असलेली पहूरपेठ ग्राम पंचायत भाजपाने जिंकली. त्यानंतर जामनेर पालिकेचा हा निकाल आला आहे. ना. गिरीषभाऊंच्या नेतृत्वाचे तारे सध्या 'सातव्या आसमानवर' आहेत. आता जळगाव महानगर पालिका निवडणुकीचे नेतृत्वही ना. गिरीषभाऊंकडेच यायला हवे. जळगावात भाजपाने मिलीजुली आघाडी केली तर हमखास सत्तेत सन्मानजनक हिस्सेदारी होऊ शकेल.

स्वतःच्या शहरात अशा प्रकारे विरोधकांचा 'सुपडा साफ' करणारे यश अद्यापतरी कोणत्याही नेत्याला मिळालेले नाही. माजीमंत्री एकनाथ खडसे यांना मूळ निवासाचे गाव कोथळी किंवा मुक्ताईनगर येथे असे निर्विवाद यश लाभलेले नाही. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनाही पाळधी या निवासाच्या गावात असे यश मिळालेले नाही. इतर नेत्यांच्या तुलनेत ना. गिरीषभाऊ या ठिकाणी उजवे ठरतात.

ना. गिरीषभाऊंच्या या यशात पक्षांतर्गत विरोधकांनी अनावश्यकपणे कोंडी करण्याचा केलेला प्रयत्न हा सुध्दा एक फैक्टर आहे. एखाद्या व्यक्तीच्या यशाचा दुःस्वास वारंवार कोणी करत असेल तर त्याला त्याची जागा दाखविण्यासाठी समर्थक मंडळी जिवाचे रान करुन विजयश्री खेचून आणतात. ना. गिरीषभाऊंविषयी असा दुराग्रह असलेले नेते भाजपात आहेत. त्यांनाही जामनेरकरांनी सणसणीत चपराक हाणली आहे.

कोणत्याही निवडणुका आल्या की माध्यमांच्या प्रतिनिधींची पेड न्यूज आणि पेरलेल्या बातम्यांसाठीची पैकेजेस जाहीर होतात. आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडतो. असा कोणताही अनुभव जामनेर येथे आला नाही. माध्यमांमध्ये प्रचाराची फारशी चर्चा झाली नाही. भाजपाकडून कोणीही मोठा नेता प्रचाराला आला नाही. विरोधकांनी ना. गिरीषभाऊंवर आगपाखड केली. उत्तर देण्याच्या भानगडीत ना. महाजन पडले नाहीत. चौकसभा आणि प्रभागात मतदारांच्या भेटी यावरच त्यांनी लक्ष दिले. शहरात सुरु असलेली विकास कामे हाच खरा प्रचार होता. 'शत प्रति शत भाजप' असे ना. महाजन निवडणुकीपूर्वी म्हणाले होते. ते जामनेरकर मतदारांनी सिद्ध केले. एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे एकाही संपादकाने भाजप सर्व जागा जिंकू शकते असा अंदाज एकाही ओळीत व्यक्त केला नाही.

विरोधकांनी जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातील पाणी प्रश्न हा मुद्दा उकरुन काढला. पण शहरी मदारांनी त्याकडे दूर्लक्ष केले. ना. गिरीषभाऊंची प्रतिमा सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारसाठी संकट मोचक म्हणून आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणजेच क्रमांक दोनचे मंत्री म्हणून त्यांचे कार्य आहे. नाशिक कुंभमेळा, मराठा मोर्चा, शेतकरी मोर्चा, हजारे आंदोलन अशा प्रसिद्धी व सव्यंग टीका होवू शकेल अशा विषयांमध्ये ना. गिरीषभाऊंनी यशस्वीपणे मध्यस्थी केली आहे. अशा पॉवरफूल्ल नेतृत्वाला अव्हेरण्याचा कृतघ्न व करंटेपणा जामनेरकरांनी केलेला नाही, हे सुध्दा या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

2 comments:

  1. गिरीष भाऊ आणि टीमचे अभिनंदन.
    दादा एक खन्त आहे आम्हा चाळिगावाकरणं विषयी आपल्या लिखाणात कुठेही उल्लेख येत नाही आम्ही सुद्धा जळगाव जिल्ह्यात आहोत हो.गेल्या 4 दिवसात आम्ही आ उन्मेष दादांच्या संकल्पनेतून मोठ्या शासकीय योजनांची जत्रा कृषी आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते हजारो लाभार्थी झालेत दीड ते दोन लाख लोकांनी भेट दिली. योग्य ती दखल घ्यावी ही विंनती

    ReplyDelete
  2. सखोल व अप्रतिम निवडणूक विश्लेषण.

    ReplyDelete