Tuesday 3 April 2018

कोणीही यावे टपली मारुनी जावे ...

जळगावचे बुजूर्ग नेते एकनाथराव खडसे सध्या दोन विषयांमुळे चर्चेत आहेत. एक तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर नमस्कारासाठी झुकल्यामुळे आणि दुसरा विषय २१ आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या खोट्या बातमीमुळे. या दोन्ही बातम्यांविषयी खडसेंनी खुलासे केले आहेत. किंबहुना त्यांनी ते वेळीच करणे आवश्यक होते. खडसेंची आजची अवस्था ही त्यांनी स्वतः ओढवून घेतलेली आहे. त्यांच्या काही उत्साही समर्थकांनी ही वेळ खडसेंवर आणली आहे.

सत्तेच्या प्रभावळीत वावरणाऱ्या माणसाला वारंवार प्रभावळीतून आत बाहेर व्हावे लागते. कोणाचेही प्रभावलय हे अखंड नसते. अमर्याद सत्ता असली की माणसाच्या वर्तनावर अंकूश नसतो. खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. प्रभावलय हे मंत्रीपदाचे होते. ते हिरावले गेले. वलय संपले की प्रभा (हुशारी, बुध्दी) सुध्दा दगा द्यायला लागते. अशा व्यक्तीकडे अगोदर दुर्लक्ष व्हायला लागते. नंतर उपेक्षा सुरु होते. अती उपेक्षा संयमाचा कडेलोट करते. नंतर बंडखोरी होते किंवा हाराकारी होते. हाराकारी म्हणजे आपल्याच माणसांवर बेसावधपणे केलेला हल्ला. खडसेंचे काही असेच होते आहे. प्रभावलय गेले. नंतर दुर्लक्षाची अवस्थाही झाली. आता बहुधा उपेक्षा सुरु झाली आहे.

लहानपणी एक खेळ आम्ही खेळायचो. ज्याच्यावर राज्य यायचे त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जात असे. मग इतर मुले त्याला गरागरा फिरवून सोडून देत. नंतर सर्वजण शक्य तेव्हा त्याच्या डोक्यावर टपली मारत. 'कोणीही यावे टपली मारुन जावे' असा हा खेळ होता. टपली कोण मारते आहे हे पट्टी बांधलेल्यास दिसत नसे.  त्याने टपली मारणाऱ्यास ओळखले की त्याचे राज्य संपून ओळख पटलेल्याला पट्टी बांधली जात असे. खडसेंच्या बाबतीत सध्या असेच टपली मारणे सुरु आहे.

अर्थात हे सारे खडसे यांनी स्वतःवर ओढवून घेतले आहे. मंत्रीपद गमावल्याचे शल्य ते विसरु शकत नाही. स्वकीयांना खडसेंना न्याय द्यायचा नाही. मग खडसे आपली गाऱ्हाणी विरोधकांच्या ओट्यावर बसून मांडत आहेत. अशावेळी गल्लीतील एखाद्या बोलभांड बाई विषयी जशी नवनवी चर्चा रोज रंगते तसे काहीसे होत आहे. 'सामना' दैनिकाने खडसेंविषयी पदर ढळलेल्या बाईची उपमा दिली आणि प्रतिष्ठेचा स्तरच घसरला. टपली मारण्याच्या पुढे जाऊन हे वस्त्रहरणच झाले.

खडसेंविषयी व्यक्तिशः आज अनेकांना सहानुभूती आहे. पण अशा लोकांमध्ये जी मंडळी आहेत, त्यांनी कधी खडसेंच्या सत्तेचा लाभ घेतलेला नाही. खडसेंच्या दीडवर्षांच्या मंत्रीपदाच्या काळात ज्यांनी लाभ घेतले तेच आज खडसेंसोबत नाहीत. हेच तर भयंकर आहे. एवढेच नव्हे तर खडसेंच्याही नागरी सुविधांविषयी अनेक भूमिका बदलत राहिल्या. त्यातून जळगाव शहरातील प्रश्न चिघळले. केवळ प्रश्न मांडण्याचा अभ्यास करणारे नाथाभाऊ जळगावचा एकही प्रश्न विना वाद व विना तंटा सोडवू शकले नाहीत. हे सत्य आहे.

इसापनितीतील एक गोष्ट आहे. एक सिंह फार म्हातारा झाला होता. तो अगदी मरावयास टेकला होता. हे कळताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता ते सगळे सूड घेण्यासाठी तो पडला होता तेथे आले. बैलाने आणि रेड्याने आपली शिंगे रोवून त्याला जखमी केले. कुत्र्याने त्याच्या अंगावर भुंकून त्याला चावे घेतले. रानडुकराने आपले सुळे त्याच्या पोटात खुपसले.  शेवटी गाढव पुढे होऊन त्याने त्याच्या तोंडावर लाथा झाडल्या. त्या वेळी मरावयास टेकलेला तो सिंह म्हणाला, 'देवा रे देवा, माझी ही काय स्थिती केली आहेस ?' शूर व पराक्रमी अशा प्राण्यांनाही थरथर कापविणारा जो मी, त्याला आज नीच गाढवाच्या लाथा निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत. यापेक्षा हजार मृत्यूंचे दुःख मी मोठ्या सुखाने पत्करले असते.' ही गोष्ट काय सांगते तर जेव्हा आपल्यावर वाईट अवस्था येते तेव्हा अत्यंत क्षुद्रही त्याचा सूड घेतल्याशिवाय राहात नाहीत. क्षुद्राचा हल्ला हा स्तर खालावलेला असतो.

खडसे यांनी स्वतःच अशी अवस्था ओढवून घेतल्याचा घटनाक्रम दाखविणाऱ्या काही बातम्यांच्या लिंक मुद्दाम शेअर करीत आहे. खडसे समर्थक या लेखनामुळे दुखावले जाण्याची शक्यता आहे. अचकट विचकट प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक लिंक वाचावी. सर्व आशयाची गोळाबेरीज एकच सांगेल ... कोणीही यावे टपली मारुन जावे हीच तर खडसेंची अवस्था आहे ...

१) नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर
http://www.sarkarnama.in/nathabhau-and-ajit-khadase-19180

२) नाथाभाऊ राहुल गांधींना भेटले
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/nathabhau+rahul+gandhinna+bhetale+konges+praveshachi+shakyata-newsid-80939773

३) नाथाभाऊ काँग्रेसच्या वाटेवर
http://www.pudhari.news/news/National/Eknath-Khadse-on-the-way-to-Congress/m/

४) माझी अवस्था अडवाणींसारखी - नाथाभाऊ
https://www.thodkyaat.com/eknath-khadse-on-lalkrushna-advani-270817/

५) २१ आमदार घेऊन खडसे राष्ट्रवादीत जाणार

धनंजय मुंडेंच्या नावे असलेल्या बनावट फेसबुक पेजवरील खडसेंसंदर्भातील पोस्ट
http://www.sarkarnama.in/jalgaon-khadase-munde-22083

६) पदर ढळला की हे घडायचेच! अग्रलेख सामना
http://www.saamana.com/editorial-on-eknath-khadse/

७) खडसेंचे भाजपला घरचे आहेरच आहेर ...

बोदवडचा कार्यक्रम
http://abpmajha.abplive.in/videos/jalgaon-eknath-khadse-on-bjp-506774

नागपूर अधिवेशन
http://m.marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Nagpur/NagpurCity/2017/12/14130521/Eknath-khadse-reply-on-government-over-emplyoment.vpf

नागपूर अधिवेशन
http://www.dainikprabhat.com/खडसेंचा-भाजपला-घरचा-आहेर/amp/

मुंबई अधिवेशन
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra+desha-epaper-mahdesh/aamhala+pan+kuthetari+transaphar+kara+khadasencha+bhajapala+gharacha+aaher-newsid-84026887

मुंबई अधिवेशन
https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-3123/

८) भुजबळ समर्थकांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट !

https://lokmat.news18.com/special-story/bhujbal-supporters-meet-ekanath-khadse-281641.html

९) ‘तोडपाणी’चा आरोप करणाऱ्या पवारांना वाकून नमस्कार
http://www.sarkarnama.in/jalgaon-khadase-munde-22083


१०) खडसेंवर भाजप नाराज
https://www.loksatta.com/mumbai-news/eknath-khadse-give-respect-to-sharad-pawar-bjp-1656263/