Sunday, 29 April 2018

काश्मिरमधील विवाहितांची दुसरी बाजू - हाफ विडो

पुनीत शर्मा यांची नवी कादंबरी

कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे केलेल्या खुनाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेत जम्मू-काश्मिरमधील समाज जिवनाचे काळेकुट्ट प्रतिबिंब उमटले आहे. मुस्लिम-हिंदू समाजातील वर्चस्वाचा वाद, दुसऱ्या समाजाला घाबरवण्यासाठी केलेला गुन्हेगारी कट, गुन्हेगारांना पोलिसांची मदत आणि गुन्हेगारांना संरक्षणासाठी निर्माण केलेले जनमत असे ठळक विषय कठुआ घटनेत समोर येतात. याच पार्श्वभूमीवर जळगावचे लेखक पुनीत शर्मा यांनी 'हाफ विडो' ही काश्मिरात घडणाऱ्या काल्पनिक कथाबिजावर आधारलेली कादंबरी मला वेगळी वाटते. अर्थात, कठुआ प्रकरण घडण्यापूर्वी ही कादंबरी मी  वाचली आहे. पुनीत शर्मा यांची ही दुसरी साहित्यकृती. यापूर्वी त्यांचे 'एनिमी ईन मी' हे स्वयंशोधाचे समुपदेशनात्मक पुस्तक बाजारात आले आहे.

Thursday, 26 April 2018

पांडुरंग भेट व्हाया गांधी ...

किशोर राजे निंबाळकर पांडुरंगाची मूर्ती भेट देताना.
अनेक मित्रांकडून गेल्या काही वर्षांत राष्ट्रपुरुष, संत आणि देवादिकांच्या लहान मूर्ती मला सस्नेह भेट मिळाल्या आहेत. घरातील मोठ्या शोकेसमध्ये सध्या देवी सरस्वती, देवी महालक्ष्मी, भगवान परशुराम, भगवान गौतम बुध्द, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत साईबाबा, संत गजानन महाराज आदींच्या मूर्ती अगदी शांततेत व सुस्थितीत विराजीत आहेत. काही मूर्तींचा एकमेकांना स्पर्श होतो पण त्या एकमेकांसाठी अछूत आहेत असे कधीही मला वाटत नाही. बहुधा वैचारिक एकात्मतेचा हा असा हा अनोखा प्रयोग माझ्याकडेच असावा.

Wednesday, 25 April 2018

शेतकऱ्यांची पिढी घडविताना ...

शेतकऱ्यांच्या आठवी आणि नववीत असलेल्या मुला मुलींना शेतीचे अत्याधुनिक तंत्र माहिती करुन देत आणि नफ्यातील शेती व्यवस्थापनाचे कौशल्य शिकवून एक नवीपिढी घडविण्याचा अनोखा प्रयत्न 'ॲक्शन प्लाटफॉर्म' या कंपनीच्या माध्यमातून 'फाली' (फ्युचर ॲग्रीकल्चर लीडर्स अॉफ इंडिया) या कृतीशील संशोधन प्रकल्पातून केला जातोय. या अंतर्गत महाराष्ट्र व गुजरात मधील सुमारे ५२५ मुला मुलींचे चौथे संमेलन जैन इरिगेशन सिस्टीम  च्या सहकार्याने नुकतेच पार पडले. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पूर्णवेळ विविध कार्यक्रमात उपस्थित राहता आले.

Tuesday, 24 April 2018

रस्त्यावर थुंकणारे विषारी नाग, कोळीचे वारस !

आपण रस्त्याने चालत असलो किंवा दुचाकी वाहनावर असलो, की आपल्या पुढच्या दुचाकीवरील किंवा चार चाकीतील एखादा माणूस पचकन रस्त्यावर थुंकतो. वाऱ्याच्या वेगासोबत थुंकीचे थेंब आपल्या शरीर व कपड्यांवर उडतात. हा अनुभव भयंकर असतो. बहुतांशवेळा थुंकणाऱ्याला त्याने असा काही अपराध केला याची लाजलज्जा नसते. एखाद दुसरा दुचाकीस्वार वाहन वेगाने दामटून थुंकणाऱ्याला समजही देतो. पण रस्त्यावर थुंकण्याची ही सवय संबंधितांना एखाद्या आजारागत शरीरात भिनलेली असते. शिव्या खाऊनही तो काही सुधारत नाही. मला असे अनुभव नेहमी येतात.

Friday, 20 April 2018

असिफा, आम्ही सारेच दोषी !

जम्मुतील कठुआ जिल्ह्यातील रायसना गावातील बंजारा बकरवाल समाजाच्या पशूपालक कुटुंबातील अवघ्या आठ वर्षांच्या असिफा बानो या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केल्याच्या घटनेने संवेदनाशील असलेल्या प्रत्येक माणसाचे हृदय हेलावले आहे. तब्बल तीन- साडेतीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेविषयी चर्चा करताना अनेक विषयांवर समाज विभाजीत होताना दिसतो आहे. पीडित असिफा ही मुस्लिम समाजाची तर संशयित क्रूर आरोपी हे हिंदू समाजाचे आहेत. विभाजीत एक गट असा धर्माशी संबधित आहे. कट्टर हिंदुत्त्ववादी मंडळी असिफा बानोशी घडलेल्या अत्याचाराचा दोष जम्मुतील सध्याच्या परिस्थितीला देतात. घुसखोरी व दहशतवादी कारवायांना समर्थन देणाऱ्या स्थानिक लोकांच्या कृत्याचे भोग असिफाच्या नशिबी असल्याचा दावा हिंदुत्व संघटन करते. दुसरीकडे पुरोगामी, समाजवादी मंडळी असिफावरील अत्याचाराचा दोष कट्टर पंथियांना लावते. तिसरी अजून एक विभागणी आहे. ती म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील मुस्लिम हा स्वतःला भारतीय समजतो का ? या प्रश्नाच्या उत्तरात आहे. असिफा बानोवरील अत्याचारासाठी देशभरातील जनता अश्रू गाळते आहे. मोर्चा, निषेध व मेणबत्ती मार्च निघतोय. पण देशात इतरत्र होणाऱ्या अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जम्मू- काश्मीरातील नागरिक भारतीयांसाठी अश्रू गाळतात का ? याचे सुध्दा उत्तर अपेक्षित आहे. अजून एक विभाजित गट हा मानवतावादी दृष्टीकोनाचा आहे. अत्याचार पीडित मुलगी कोणत्याही समाजाची व प्रांताची असो, तिच्यावर झालेले अत्याचार हे अमानविय असून त्याचा निषेध झालाच पाहिजे. या शिवाय, संशयित आरोपींवरील आरोप लवकर सिध्द करुन त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळायला हवी, असे या गटाला वाटते. आता राहिला शेवटचा एक गट. तो म्हणजे, सध्या देशात काहीही झाले तरी त्याचा दोष केंद्रातील सरकार व पंतप्रधानांचा असल्याचे ठासून सांगणारा गट.

Sunday, 15 April 2018

जैन बंधू आणि पवारसाहेब!

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या पश्चात जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचा अखिल भारतीय पातळीवरील कृषि क्षेत्रातील अग्रगण्य व अत्यंत प्रतिष्ठेचा 'पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान झाला. स्व. मोठेभाऊंच्या पश्चात पवार यांच्या उपस्थितीत झालेला हा पहिला कार्यक्रम. स्व. मोठेभाऊंच्या आठवणींनी पवार गहिवरले होते. अशोकभाऊ, अनिल, अजित व अतुल या जैन बंधुंनी स्व. मोठेभाऊंच्या पश्चातही त्यांच्या कार्याचा वसा अधिक उत्तमपणे जपल्याबद्दल पवार यांनी जाहिरपणे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. पवार साधारणतः २५ मिनिटे बोलले. त्यात त्यांनी स्व. भवरलालजींशी असलेल्या मैत्रीतील अनेक हळवे प्रसंग सांगितले. त्याचवेळी नव्या पिढीने पवार - जैन कुटुंबाचा ऋणानुबंध कायम ठेवल्याचा उल्लेखही केला.

Saturday, 14 April 2018

'दमाने या' बाईंची दमनगिरी ...

कोणत्या नेतृत्वाचा उदय कोणत्या परिस्थितीतून होतो, यावर त्या नेत्याची सामाजिक प्रतिमा आणि नेतृत्व वाहून नेण्याचा काळही ठरतो. एखाद्या सनसनीखेज घटनेतून झपाट्याने पुढे आलेल्या नेत्या भोवती समर्थकांची थोडी बहुत गर्दी होते. ही गर्दी सामान्य माणसाचे लक्ष वेधून घेते पण सामान्य माणूस त्या गर्दीचा भाग होत नाही. नंतर काळाच्या प्रवाहात नेते मंडळी विचारांनी खुजे असल्याचे समाजाला जाणवू लागते. आपल्यापासून समाज लांब जातोय असे दिसू लागले की, खुज्या नेतृत्वाचे सामाजिक उपद्रव मूल्य सुरु होते. हे उपद्रव मूल्य दोन प्रकारात असते. पहिला प्रकार म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करायला लावणारे मुद्दे मांडून सद्भाव व ऐक्य नष्ट करणे. जसे, गुजरात व राजस्थानमध्ये सामाजिक आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन हिंसक आंदोलने केली गेली. उपद्रवाचा दुसरा प्रकार म्हणजे, व्यक्तिद्वेषाचे मुद्दे हाती घेऊन एखाद्या व्यक्तिला सतत अडचणीत आणणे. या प्रकारची उदाहरणे दिल्ली पासून गल्लीपर्यंत भरपूर आहेत.

Thursday, 12 April 2018

जामनेरची कुस्ती निकाली काढणारे गिरीषभू ...

काँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे. केंद्रातील सत्ताप्राप्तीनंतर देशातील जवळपास २१ राज्यात भाजपाची सत्ता आहे. यात १५ राज्यात स्वबळावर आणि उर्वरित राज्यात भाजपाच्या नेतृत्वात मित्र पक्षांचा सत्तेत सहभाग आहे. देशात अजूनही ४ राज्यात (मिझोराम, कर्नाटक, पंजाब आणि पुदुचेरी) काँग्रेसची सत्ता आहे. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधून 'भाजपा मुक्त भारत' चा नारा देण्याचा प्रयत्नही होतो आहे. मोदी-शहा विरोधातील वातावरण तापवून पुन्हा सत्ताप्राप्तीची स्वप्ने विरोधकांना पडत आहे. या स्वप्नाला सुरुंग लावणारा निकाल जामनेरमधून आला आहे.

Tuesday, 3 April 2018

कोणीही यावे टपली मारुनी जावे ...

जळगावचे बुजूर्ग नेते एकनाथराव खडसे सध्या दोन विषयांमुळे चर्चेत आहेत. एक तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर नमस्कारासाठी झुकल्यामुळे आणि दुसरा विषय २१ आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या खोट्या बातमीमुळे. या दोन्ही बातम्यांविषयी खडसेंनी खुलासे केले आहेत. किंबहुना त्यांनी ते वेळीच करणे आवश्यक होते. खडसेंची आजची अवस्था ही त्यांनी स्वतः ओढवून घेतलेली आहे. त्यांच्या काही उत्साही समर्थकांनी ही वेळ खडसेंवर आणली आहे.