Friday, 9 February 2018

सावलीचा होतोय वटवृक्ष !

संपूर्ण जगभरात पीव्हीसी पाईप आणि ठिबक सिंचन संच निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आणि ठरवून जळगावातच मुख्यालय ठेवणाऱ्या जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा आज वाढदिवस. अशोकभाऊंचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन करताना त्यांच्या दिनचर्येचा मागोवा घेण्याची इच्छा होते.


समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांच्या पश्चात समुहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर साजरा होणारा अशोकभाऊंचा हा तसा दुसरा वाढदिवस. मोठेभाऊंच्या पश्चात चौथ्यापिढीला कुटुंबवत्सल करण्याची जबाबदारीही अशोकभाऊंनी निभावणे सुरु केले आहे. त्याचाही आज योगायोग.

मोठेभाऊ हयात असताना समुहाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अशोकभाऊंवर होती. तेव्हाही समुहाच्या विस्तार विषयक अनेक निर्णयात अशोकभाऊंचा तीन बंधुंसह सक्रिय सहभाग होताच. मोठ्याभाऊंनी लावलेल्या उद्योग - व्यवसायाचा विस्तार उद्योग समुहात होत गेला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या भागभांडवलावरील समुहाने नंतर पाच हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचा पल्ला गाठला. आज हा समुह सात हजार कोटी रुपयांची उलाढालीची सिमा ओलांडून जगभरातील अनेक नामांकित उद्योगांच्या रांगेत पोहचला आहे. अर्थात, या यशाची मुहूर्तमेढही मोठेभाऊंच्या हयातीतच झाली आहे. मात्र, मोठेभाऊंच्या पश्चात गेल्या वर्षभरात समुहाने अनेक किर्तिमान नव नव्या क्षेत्रात स्थापित केले आहे. हे यश अशोकभाऊंसह बंधू अनिलभाऊ, अजितभाऊ आणि अतुलभाऊ यांच्या एकत्रित निर्णयासह एकत्रित कुटुंब पध्दतीतील घट्ट ऋणानुबंधालाही आहे. हा संस्कार भवरलालजींनी अत्यंत दूरदृष्टी व परिश्रमातून दुसऱ्या व तिसऱ्या पिढीत रुजवला.

कधी काळी मोठेभाऊंच्या वटवृक्षासमान व्यक्तिमत्वाच्या सावलीत संगोपित झालेल्या अशोकभाऊ व इतर बंधुंचे व्यक्तिमत्व नानाविध अनुभवातून संपन्न होत गेले. मोठेभाऊंच्या व्यक्तिमत्वात अनेक गुणांचा व कौशल्यांचा समुच्छ संचय होता. त्यांचे व्यक्तिमत्व शिखराच्या समान होते. मात्र, समुहाच्या विस्ताराची एक एक जबाबदारी मुलांवर सोपवित आपल्यातील गुणांची विभागणी मोठ्याभाऊंनी अत्यंत कुशलतेने केली. त्यांनी केवळ समुहाचा वारसा दुसऱ्या पिढीला दिला नाही तर आपल्यातील गुणांचे सिंचन विचार व कृतीतून मुलांमध्ये आणि नातवंडांमध्ये झिरपवले. म्हणूनच मोठेभाऊंच्या पश्चात एकत्रित संपूर्ण जैन परिवार हा परिपूर्ण मोठेभाऊंच्या शिखररुपी व्यक्तिमत्वाचा वटवृक्षच आहे.

समुहाचे उपाध्यक्ष असताना अशोकभाऊंकडे सामाजिक आणि कौटुंबिक ऋणानुबंध जोपसणे व जपणे हा वसा मोठेभाऊंनी सोपविला होता. सामाजिक, सांस्कृतिक, खेळ आणि मदत अशा कार्यात अशोकभाऊंची पूर्वापार ओळख आश्रयदाते म्हणूनच आहे. याच कार्याचा विस्तार आता कांताबाई ॲण्ड भवरलाल जैन ट्रस्टच्या माध्यमातून होतो आहे. जनतेसोबत संपर्काची ही सामाजिक नाळ आजही अशोकभाऊंशी जुवलेली आहे. मात्र समुहाच्या अध्यक्षपदाचे घटनात्मक व कायदेशीर अधिकार व जबाबदारीमुळे अशोकभाऊंचा संपर्क थोडा प्रलंबित व्हायला लागला आहे. याची जाणिव त्यांनाही आहेच. तरीही जळगाव शहर व जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व खेळाशी संबंधित अनेक विषयात अशोकभाऊंचा थेट अथवा अप्रत्यक्ष सहभाग निश्चित आहे.

जैन उद्योग समुहाच्या अध्यक्षपदावरुन एक कुशल प्रशासक म्हणून काम करताना अशोकभाऊंची प्रेरणा ही श्रध्देय मोठेभाऊ असते तर त्यांनी कसे केले असते ? याच विचाराशी सतत प्रामाणिक व कर्तव्य कठोर असल्याचे दिसते व जाणवते. समुहाच्या चेअरमन अॉफिसमध्ये मोठेभाऊंचा कक्ष आजही अगदी जसाचा तसा आहे.  मोठेभाऊ कामानिमित्त बाहेर असावेत अशाच संवेदना तेथे आजही जाणवतात. समुहाशी संबंधित काही अती महत्वाचे व दूरगामी परिणामाचे निर्णय घ्यायचे असतील तर अशोकभाऊ व इतर तिघे बंधू मोठेभाऊंच्या कक्षात चर्चेसाठीच्या टेबलजवळ जावून बसतात. चर्चा करतात आणि निर्णय घेतात. अशा निर्णयाला मोठ्याभाऊंच्या सानिध्याची एक संवेदनशिलता असते आणि मोठेभाऊंच्या संस्कारापासून दूर जात नाही असा विश्वास असतो.

अशोकभाऊंची भेट पूर्वीसारखी सहज होत नाही, हे खरे आहे. अर्थातच ज्यांना त्यांची दिनचर्चा माहित आहे, अशी अत्यंत जवळची मंडळी या विषयी वास्तव जाणून आहेत. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्या वर्षभरात अशोकभाऊंना दैनंदिनचर्चेच्या अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने व परिश्रमातून बदलाव्या लागल्या. खरे तर शरिराची केमेस्ट्री बदलण्याचाच हा प्रकार आहे. समुहांतर्गत असलेल्या नैसर्गिक उपचार आणि योगा सेंटरमधून मिळालेल्या सूचना व सल्ल्यातून उद्दिष्ट साध्य होत गेले.

अशोकभाऊंच्या दिनचर्येतून त्यांच्यावर समुहांतर्गत असलेल्या कामकाजाच्या जबाबदारीची जाणिव होते. त्यांचा दिवस पहाटे ४.४५ वाजता सुरू होतो. घड्याळाचा अलार्म पूर्वी उठवत असे. वर्षभरात अलार्मच्या बरोबरीने स्वतःच उठायची सवय झाली. ५.१५ पर्यंत प्रातःविधी करुन मॉर्निंग वॉकला सिध्द व्हावे लागते. मोठेभाऊंच्या मित्रपरिवारातील बुजूर्ग मंडळी आणि कंपनीतील काही सहकारी तोपर्यंत उपस्थित होतात. सर्वजण जैन हिल्सवर ५०० एकर परिसरात आकाराला येणाऱ्या भाऊंच्या सृष्टीकडे जातात. हे स्थळ म्हणजे मोठेभाऊ चिरंतन आपल्या सोबत असल्याची जाणिव करुन देणारे प्रेरणास्थळ. सध्या ते आकाराला येत आहे. या ठिकाणी किमान दोन किलोमीटर मॉर्निंग वॉक केला जातो. सोबतच्या मंडळींशी शांतपणे बातचित होते. त्यानंतर मोठेभाऊंच्या पुतळ्याजवळ योगासने व प्राणायाम केला जातो. यावेळेत उजाडायला सुरुवात होवून सूर्य कोवळी किरणे घेवून बाहेर डोकावतो. अशा या किरणांकडे पाहत थोडे चालणे होते. सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यामुळे दृष्टी तीक्ष्ण होते.

भाऊंच्यासृष्टीतील पहाटेचे सर्व विधी आवरल्यानंतर अशोकभाऊ अनुभूति स्कूल परिसरात असलेल्या निसर्गोपचार केंद्राकडे जातात. तेथे साडेसात नंतर साधारणतः व्यायाम करुन मसाज घेतला जातो. अशा  प्रकारे शरिर व अवयवांना गरजे एवढा ताण दिला जातो. त्यानंतर वॉटर थेरपीचे प्रयोग करुन शरिराला आराम दिला जातो. ही थेरपी केरळी प्रकारातील आहे.

व्यायाम व स्नान वगैरे आटोपून अशोकभाऊ नऊ वाजता सकाळच्या अल्पोपहारासाठी तयार होतात. हा आहारही ठरलेला आहे. त्यात खाण्यापेक्षा पथ्याधारित नैसर्गिक प्रकारातील सूप व भीजवलेले कडधान्य असते. एकदा हे आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष आपल्या दैनंदिन कामकाजाच्या मार्गावर निघतात. बहुधा साडेनऊला अशोकभाऊ आपल्या कक्षात असतात. दिवसाचा हा प्रवास दुपारच्या जेवणाची वेळ पाळत रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असतो. यात कधी नियमित औषधे, कधी चॉकलेट तर कधी बिस्कीट खाणे असते. कारण, कार्यालयिन कामाच्या सोबतच शहरातील इतर सामाजिक उत्तरदायित्वही पार पाडावे लागते.

रात्री ८ वाजता जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात असलेल्या जुन्या बंगल्यावर तिसऱ्या पिढीतील मुलांसोबत गप्पा टप्पा करीत जेवण असते. एरवी इतर बंधुही सोबत असतात. या जुन्या बंगल्यावर रोज रात्री स्नेहपूर्ण जेवणाची परंपरा मोठेभाऊंनी निर्माण केली. ती तिसऱ्या पिढीतही कायम आहे. अर्धा ते पाऊण तासात जेवण आटोपल्यानंतर तासभर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व इतर कामांच्या संदर्भात भेटायला येणाऱ्यांशी चर्चा असते. अनेक महत्त्वाचे निर्णय यावेळी होतात. तासाभराच्या गप्पांनंतर अशोकभाऊ जैन हिल्सकडे निद्रा आरामासाठी रवाना होतात. पुन्हा सकाळी ४.४५ वाजता जागे होण्यासाठी ...

आज अशोकभाऊंच्या वाढदिवसाचा मुहूर्तसाधून त्यांची दिनचर्या मुद्दाम सविस्तर लिहिली आहे. श्रध्देय मोठेभाऊंच्या संस्कारात संगोपित हा वटवृक्षही आता आकार धरतोय. अशोकभाऊंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणा दीर्घायुरारोग्य लाभावे ही भगवान महावीर चरणी प्रार्थना !!

No comments:

Post a Comment