Saturday 24 February 2018

"गोतावळा" निर्मितीची प्रेरणा !

श्रद्धेय मोठेभाऊ तथा पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या द्वितीय श्रद्धावंदनदिनी आज (दि. २५ फेब्रुवारी) माणसांचे रंग टीपणाऱ्या माझ्या तिसऱ्या पुस्तक "गोतावळा" चे  प्रकाशन होते आहे. माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योग आहे. तो कसा, हे सुद्धा सांगायला हवे. "गोतावळा" पुस्तकात समाविष्ट ५२ व्यक्तिमत्त्वांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची साखर पेरणी पानोपानी आहे. अशा शर्करायुक्त पुस्तकाचे प्रकाशन समाजाप्रति नेहमी दातृत्वाची साय देणाऱ्या मोठेभाऊंच्या श्रध्दावंदनदिनाला व्हावे हाच तर दुग्ध शर्करा योग आहे.

पुस्तक निर्मिती मागील स्मृतीपटलाची पाने उलटवत असताना मला माझ्याच लेखणीतील शाई आणि शब्दांच्या वळणांमध्ये अनुभवाधारित बदल होत गेल्याचे जाणवते. बहुधा यालाच लेखणीही प्रौढ झाली असे म्हणता येईल. पत्रकारितेच्या २९ वर्षांत माझी लेखणी पूर्वीपासून निःपक्ष आणि निर्भीड होती. ती आजही आहे. मात्र, लेखणीचे आणि कागदाचे नाते निबच्या टोकदार पात्यामुळे कागदाला जखम करणारे होते. निर्भय असण्याचा अहंकार लेखणीत बळावला की, ती शस्त्रापेक्षा घातक आणि विषारी होते. म्हणूनच म्हणतात, शस्त्राच्या जखमेचा व्रण जेवढा वेदनादायी नसतो त्यापेक्षा टोकदार शब्दांनी केलेली जखम सतत भळभळणारी असते. दुखणे बळावणारी असते.

माझ्याही लेखणीला अशाच प्रकारे टोकदार संसर्ग होण्याची शक्यता होती. ज्या समाजात वावरतो तेथील माणसं, जात, धर्म आणि त्यांचे कर्म यावर लेखणीचे घाव पडून चरे निर्माण होण्याची नकळत शक्यता होती. परंतु श्रद्धेय मोठ्या भाऊंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मोजक्याच माणसांच्या सानिध्यात आल्यामुळे माझ्या लेखणीचे वळण कधीही बिघडले नाही. उलट त्यांच्या उपदेशाने माझी लेखणी संवेदनशील झाली आणि आज "गोतावळा" घेवून समाजासमोर येताना ती प्रगल्भ सुद्धा झाली आहे.

"गोतावळा" या पुस्तकातील बहुतांश लेख हे अनेक मान्यवरांच्या वाढदिवशी लिहिले आहेत. अशा लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन श्रद्धेय मोठेभाऊंच्या श्रद्धावंदनदिनी कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याचाही उलगडा करायला हवा. मला आठवते, आ. मोठेभाऊंचा ७५ वा वाढदिवस असताना दैनिक 'देशदूत'च्या विशेष पुरवणीसाठी त्यांची मुलाखत मी घेत होतो. प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारे मोठेभाऊ कुटुंबातील प्रेम व जिव्हाळा कसा टिकून आहे ? या प्रश्नावर थोडे गहिवरले. मला म्हणाले, "मी माझ्या उद्योगातील अनेक चुकांची माहिती सर्व प्रथम माझ्या कुटुंबियांना एकत्रितपणे स्वतःच दिली. त्यानंतर झालेली चूक कंपनीच्या भाग-भांडवलदारांनाही सांगितली. त्यातून सावरण्याची हमी दिली. त्यापुढे जावून आम्ही वृत्तपत्रातून होय, आम्ही चुकलो हे मान्यही केले. चूक कबूल केल्याने अर्धे अपयश भरुन निघते आणि नंतर परिश्रम केल्याने पूर्ण अपयश धुऊन काढणारे यश मिळते. जेव्हा कुटुंब सोबत असते तेव्हा कोणतेही संकट हे आपत्ती नसते" मोठेभाऊंचे ते शब्द माझ्या लेखणीच्या चुकांना पहिले वळण देणारे होते.

जैन परिवाराशी माझा संबंध सन १९८९ पासून आहे. आ. अशोकभाऊंशी तेव्हापासून परियच होता. आमची परस्पराप्रति ओळख मात्र सन २००६ मध्ये झाली. तेव्हा मी दैनिक 'सकाळ' चा सहयोगी संपादक झालो होतो. दैनिकाचा संपादक म्हणून समाजात वावरताना कोणत्या प्रकारच्या "गोतावळ्यात" मी वावरतो याची सुस्पष्ट व सौम्य शब्दांत जाणीव अशोकभाऊंनी करुन दिली. "माणसं तोडू नका पण गोत असे जोडा की त्याचा तुमच्या प्रतिमेला आणि प्रभावाला लाभ होईल," हा अशोकभाऊंचा सल्ला मला सतत मार्गदर्शक ठरला. "गोतावळा" कसा जमवावा याचे माझ्या व्यक्तित्वाला वळण या ठिकाणी लाभले.

स्मृतिंची पाने चाळताना अजून एक आठवण आहे. ती आ. अतुलभाऊ जैन यांच्या परखड शब्दांची आहे. पत्रकाराची लेखणी निर्भय असावी. मात्र ती बोचून जखम करणारी नसावी असा व्यावहारिक सल्ला आ. अतुलभाऊंनी मला दिला. कधीतरी त्यांच्या भेटीचा योग आला. गप्पा झाल्या. तेव्हा ते सौम्य भाषेत मला म्हणाले, "तुम्ही छान लिहिता. पण विषयाच्याऐवजी माणसांची चिकित्सा करता. पत्रकाराने विषयाचे विश्लेषण करायला हवे" यातील चिकित्सा आणि विश्लेषण या शब्दांतील भेद मी माझ्या वडीलांकडून समजून घेतला. लेखणीला दुसरे वळण येथे लाभले.

दोन वर्षांपासून मी सोशल मीडियात काम करतोय. जळगाव शहरातील अनेक नामांकित ब्रैण्ड आणि मान्यवरांशी कामातून संपर्क येत गेला. प्रत्येकाशी मोकळा आणि विश्वासार्ह संवाद करताना माणसं अनुभवता येत गेली. माणसं वाचता यायला लागली. माणसांचे स्वभाव रंग समजून घेता आले. तेव्हा असे लक्षात आले की, माणसांमधील एखाद दुसरी वाईट बाजू ही पेरलेल्या किंवा पसरवलेल्या बिजातून गाजर गवतासारखी फोफावते. पण माणसांतील चांगुलपणाचा शोध हा परिश्रमातून व सहवासातून घेता येतो. तुळशी वृंदावनात जसे तुळशीचे एकच रोप जपायचे असते, वाढवायचे असते आणि त्याला श्रध्देने नमस्कार करायचा असतो अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकातील चांगुलपणा जोपासला गेला पाहिजे. लेखणीने त्या गुणांचे कौतुकही केले पाहिजे. माझ्या लेखणीचे वळण बदलणारी ही सुध्दा एक जागा आहे.

माझा ५१ वा वाढदिवस माझ्या "गोतावळ्या"ने साजरा केला. अगदी प्रेमाने आणि हट्टाने. तेव्हा मला या "गोतावळ्या"चे भावविश्व अनुभवता आले. माझ्या लेखणीच्या निर्भीडपणाचे कौतुक बहुतेक मित्र व ज्येष्ठांनी केले. काही मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केली की, 'आता तिवारींच्या लेखणीने प्रगल्भ होवून जागल्याची भूमिका निभवावी'. स्वभावात सौम्यपणा हवा अशीही अपेक्षा केली गेली. अशा अनेक सूचना व ममत्त्वाचे सल्ले मी मनांत साठवलेले आहेत. त्यावर अंमलबजावणी करण्यासाठीच "गोतावळा" या पुस्तकाची निर्मिती आहे. ज्या "गोतावळ्या" ने स्वीकारले आणि विस्तारले त्याच्याप्रति लेखणीची ही कृतज्ञ भावना आहे. लेखणीने चांगुलपणाकडे घेतलेले हे वळण आहे. यापुढे लेखणी निर्भयपणे लिहिताना कागद फाटणार नाही याची काळजी घेणार आहे. शब्दांचा प्रहार "वैरा" चा नव्हे तर "विचारा"चा असेल अशी या "गोतावळ्या"ला हमी आहे.

"गोतावळा" प्रकाशननिमित्त आजही मित्रांचा जमघट भाऊंचे उद्यानात सायंकाळी ५.३० ला होईल. तेव्हाही हीच जाणीव मनांत असेल, अजून बऱ्याच जणांवर लिहायचे आहे ... "गोतावळा" विस्तारायचा आहे ...

1 comment: