Sunday 18 February 2018

छत्रपती शिवरायांचे सोशल इंजिनियरींग ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रित्राचा अभ्यास देशी आणि विदेशी अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर सखोलपणे केला आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेचे जेव्हा वाचन केले जाते तेव्हा त्यातील नाविन्यपूर्ण विषय नेहमी समोर येत असतो. शिवचरित्र हे एकमेव असे चरित्र आहे की, ज्यात अनेक विद्याशाखांच्या मूलभूत सिद्धांतांची कृतिशीलता सिद्ध होते. कोणत्याही क्षेत्रात यश अथवा निर्धारित उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सोशल इंजिनिअरींग करणे आवश्यक ठरते.


आपल्या देशात लोकशाही पद्धतीने होणाऱ्या विधीमंडळ अथवा संसदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी डावपेचांचा भाग म्हणून नेते मंडळी सोशल इंजिनियरींग हे तंत्र म्हणून वापरतात. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सोशल इंजिनियरींग ही व्यापक संकल्पना आणि तंत्र आहे. धर्म, जाती आणि लिंग यात विभागलेल्या समाजाला सत्ता अथवा अधिकार प्राप्तीसाठी समान सूत्राने एकत्र आणून सत्तेत संख्याबळानुसार हिस्सेदारी मिळवून देण्याचे  तंत्र म्हणजेच, सोशल इंजिनियरींग होय.

भारतीय राजकारणात मायावती यांनी उत्तर प्रदेशात, शरद पवार यांनी महाराष्ट्रात, नितीशकुमार यांनी बिहारमध्ये अशा प्रकारे सोशल इंजिनियरींगचा वापर करुन विधी मंडळात सत्ता प्राप्त केल्याची उदाहरणे आहेत. अलिकडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सोशल इंजिनियरींगचा वापर करुन सत्ताप्राप्त केली आहे. सोशल इंजिनियरींगचा तंत्राचा गाजावाजा आजची नेते मंडळी कितीही उताविळपणे करीत असली तरी या तंत्राचा पहिल्यांदा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला आहे. शिवरायांनी सोशल इंजिनियरींग करुन ज्या पध्दतीने समाज घटकांना स्वराज्य आणि सुराज्यासाठी जोडले, क्रियाशील केले आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य केले असे यश अद्याप इतर कोणासही मिळालेले नाही. शिवरायांनी वापरलेले सोशल इंजिनियरींगचे तंत्र आजही एखाद्या व्यवस्थापन शास्त्राला अचंबित करणारे आहे. टप्प्या टप्प्याने ते समजून घेतले तर त्यातील समयसूचकता, रोमांचकता आणि यशस्वीता लक्षात येते.

निर्धारित उद्दिष्ट

भारतातील राज्यव्यवस्था ही दिल्लीचा औरंगजेब, विजापूरचा अदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि अहमदनगरचा अहमद निजामशाह या चार मुस्लिम बादशाह यांच्यात विभागलेली होती. गढ्या, किल्ले आणि वतने सांभाळणारे सरदार या चारही शाहींचे मांडलीक होते. अशा वातावरणात शिवरायांनी माँ जिजाऊँचा आदेश शिरसावंद्य मानून स्वराज्य व सुराज्य निर्मितीचे उद्दिष्ट निर्धारीत केले. स्वराज्य हवे असेल तर युक्ति आणि शक्ति वापरण्याचे तंत्र शिवरायांनी अंगिकारले. खऱ्या अर्थाने सोशल इंजिनियरींगचा तो प्रारंभ होता.

विविध समाज सोबत

स्वराज्य निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेव्हा गढ्या, वाडे यात असलेल्या सरदार वा वतनदारांचे सहकार्य मिळणार नाही हे शिवराय जाणून होते. त्यामुळे त्यांनी समाजातील उपेक्षित अठरा पगड जातीपातीच्या तरुणांना सोबत घेतले. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी त्यांच्यातील पराक्रमाला जागे केले. सोबत राहण्याची व लढण्याची शपथ घेतली.

समाजाची मानसिकता ओळखणे

सोशल इंजिनियरींगचे तंत्र अवलंबण्यापूर्वी आपल्या सभोवतालचा समाज आणि त्यातील घटकांची मानसिकता ओळखणे आवश्यक असते. शिवरायांनी अवती भोवतीच्या समाजाचा व शत्रूच्या क्षमतांचा अभ्यास केला होता. मोगलशाहीत सुस्तावलेले जमीनदार, वतनदार स्वराज्याला मदत करणार नाही पण मोगलांसह इतरांच्या अन्यायाला वैतागलेले दुर्लक्षित समाज घटक स्वराज्यासाठी प्राणांची पर्वा करणार नाही हे शिवरायांना माहित होते. शिवाजी राजे गरजेनुसार भूमिका वठवित असत. अफजल खान चालून आला तेव्हा राजेंनी 'घाबरलो' म्हटले, सिद्दी जौहरने वेढा घातला तर राजे म्हणाले, 'थोड्या दिवसात शरण येतो’ औरंगजेबाने बोलावले तर राजे भेटीला गेले आणि नंतर कैदेतून निसटले. राजेंनी आपल्या राज्यात जातीभेद, उच्च-नीच जातीभेदाला थारा दिला नाही.

भूगोलाचा अभ्यास

सत्ता मिळविण्यासाठी डावपेचांची रचना करताना जेथे संघर्ष करायचा तेथील भुगोल आणि वातावरणाची बारीक सारीक माहिती असणे गरजेचे असते. शिवरायांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा माहित करुन घेतला होता. त्यांना डोंगर, रस्ते, नद्या आणि समाज जीवन याची परिपूर्ण माहिती होती. अफझलखानाच्या सैन्याला जावळीच्या जंगलात तर कारतलब खानाच्या सैन्याला उंबरखिंडीतील गर्द जंगलात गाठून झोडपले होते.

गनिमी काव्याचा वापर

सत्तेच्या लढाईत केवळ भुगोल आणि वातावरण माहित असून उपयोग नसतो. ज्या भागात लढायचे तेथील परिस्थितीचा लाभ उठवत विरोधक अथवा शत्रुला बेजार किंवा जर्जर करायचे असते. यासाठी कधीकधी चकवा देणारी कृती करावी लागते. कधी लपून छपून हल्ला करायचा असतो तर कधी थेट समोर यायचे असते. शिवरायांच्या काळात यालाच गनिमी कावा म्हणत. शत्रूला बेसावध ठेवणे, कमीत कमी सैन्य वापरणे, कमीत कमी वेळात काम पूर्ण करणे, शत्रूच्या मानसिकतेवर आघात करणे, पूर्ण यश मिळवणे किंवा अपयशाची शक्यता वाटल्यास निघून जाणे हे गनिमी काव्यातील डावपेच होते. पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखानावर अचानक केलेला हल्ला, तानाजीने कड्याच्या बाजुने दोरखंडाचा वापर करुन चढून सिंहगड घेणे किंवा अवघ्या साठ मावळ्यांसह कोंडाजी फर्जंदने पन्हाळा जिंकणे ही गनिमी काव्याची उदाहरणे होती.

सत्ता टिकविण्याची हमी

सोशल इंजिनियरींग करुन सत्ता प्राप्त झाली तर ती दीर्घ काळ टिकवता यावी याचेही नियोजन करावे लागते. सत्तेच्या पारंपरिक साधनांची वाटणी करावी लागते. गरजेनुसार नवी साधने निर्माण करावी लागतात. तेथे विश्वासू लोकांना बसवावे लागते. शिवरायांनी मोगलांचे किल्ले जिंकले. तेथे आपले किल्लेदार नेमले. राजे जंजिरा किल्ला जिंकू शकले नाही. तो मिळत नसला तरी शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तमिळनाडूत वेल्लोरचा किल्ला जिंकता आली नाही म्हणून जवळच  साजरा आणि गोजरा हे किल्ले बांधले. त्यामुळे जिंकलेल्या भूमीवर राजे वर्चस्व व लक्ष ठेवू शकले.

माहिती प्राप्तीची व्यवस्था

सोशल इंजिनियरींग तंत्रात समाजमन काय म्हणते आणि विरोधकांची सर्व माहिती राज्यकर्त्यांना असावी. यासाठी पूर्वी हेर काम करीत. ही मंडळी बेमालुमपणे शत्रुच्या गोटात शिरुन बातम्या आणत. शहाजहान बादशाहच्या आजारपणाच्या काळात केलेली मोहिम, सुरतची दोनवेळा लूट, लाल महालातील हल्ला या मोहिमा हेरांच्या माहितीमुळेच यशस्वी झाल्या.

भविष्यातील अंदाज

छत्रपती शिवाजी महाराज हे भविष्याचा वेध घेणारे राजकारणी होते. जे काही निर्णय घेत आहोत, त्याचा भविष्यात स्वराज्य आणि आपल्या प्रजेवर कोणता परिणाम होईल, याचा विचार ते कायम करायचे. म्हणून रयत त्यांना ‘जाणता राजा’ म्हणत असे.

सुराज्य व्यवस्थापन

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजे आणि प्रशासक होते. त्यांनी त्यांच्या काळात सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. प्रत्येक मंडळाची जबाबदारी त्या-त्या प्रधानावर होती. या अष्टप्रधान मंडळामुळे राजे पारदर्शक कारभार करु शकले. तसेच त्यांनी त्यावेळी परराष्ट्र व्यवहार आणि गुप्तहेर खातेही मंत्रिमंडळात सुरू केले होते. शिवाजी महाराजांपूर्वी मुघल आणि इतर शाही या रयतेकडून दामदुपटीने कर गोळा करीत. राजेंनी आपल्या प्रशासनात ही पद्धत बंद करुन प्रजेवर नगण्य कर लावला. त्या कर-महसुलातून मिळणारा पैसा ते रयतेच्या भल्यासाठीच वापरीत. अशा तऱ्हेने त्यांनी जनता व राज्य कारभारातील पारदर्शीपणा दाखवला. सुराज्याविषयी विश्वास निर्माण केला.

अशाप्रकारे शिवरायांनी सर्व प्रथम सोशल इंजिनियरींग तंत्राचा वापर करुन रयतेसाठी ‘कल्याणकारी राज्य’ निर्माण करू शकले. त्यांच्या राज्यात कुणबी, माळी, धनगर, दलित, मुस्लिम यांच्यासह मराठा आणि ब्राह्मणांना समान अधिकार होते. शिवरायांनी चारही शाहींना आव्हान देत स्वराज्याचा विस्तार केला.

3 comments:

  1. छान अभ्यासपूर्ण लिखाण.

    ReplyDelete
  2. खुपच छान सर
    नॉलेज मध्ये भर पडली

    ReplyDelete
  3. खुपच छान सर
    नॉलेज मध्ये भर पडली

    ReplyDelete