Saturday, 10 February 2018

सोनेबाजाराचे एनसायक्लोपीडिया

जळगाव शहरातील पत्रकारितेत मला २२-२३ वर्षे झाली आहेत. या प्रवासात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्री झाली. कधी बातम्यांच्या विषयानिमित्त तर कधी जाहिरात अथवा इव्हेंट आयोजनाच्या निमित्त. अशा मान्यवरांमध्ये सर्वांत बुजूर्ग मार्गदर्शक जर कोणी असेल तर ते आहेत, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक तथा विस्तार करणारे स्वतः श्री. रतनलालजी बाफना तथा भाईसाहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांच्या प्रवासातील काही प्रसंग इतरांना सांगायला हवेत.

मध्यंतरी एका विषयावर काम करताना बाफनाजींशी किमान ८-१० वेळा तास-तासभर गप्पा करण्याची संधी मिळाली. श्री. मनोहर पाटील यांच्या सहकार्यामुळे हा योग जुळून आला. बाफनाजी मुळात कमी बोलतात, पण जे बोलतात ते अगदी “मन की बात”सांगितल्याप्रमाणे. त्यांच्याशी केलेल्या गप्पा म्हणजे, निष्ठा, विश्वास आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर एका नोकरदाराने सुरु केलेला प्रवास थेट सोने-चांदी दागिन्यांच्या सहा शोरुमच्या मालकापर्यंत नेणारा आहे. ते जेव्हा बोलत तेव्हा मी भारावून जात असे. कारण, त्यांच्या अनुभवातून त्यांच्या यशाची सूत्रे उलगडत जात. त्यांना आलेल्या अडचणी व त्यावर संयम व मितभाषेने केलेली मात, हे लक्षात येत गेले.

बाफनाजी म्हणजे, जळगावच्या सूवर्ण पेठेचा सुमारे ६० दशकांचा चालता बोलता इतिहासच. अगदी "एनसाक्लोपीडिया" म्हटले तरी चालेल. बाफनाजींनी सोने-चांदी विक्री व्यवसायात काळानुरुप अनेक बदल आणले. पूर्वी ग्राहकांचा कल हा सोन्याची पोत, हार, बांगड्या या पारंपरिक दागिन्यांसह किंवा गुंतवणूक म्हणून बिस्किट, नाणी खरेदी करण्याकडे असे. बाफनाजींनी ग्राहकांना रेडिमेड व फॅन्सी दागिने खरेदी करण्याकडे वळविले. हा विषय रंजक आहे.

काँग्रेसच्या काळात गोल्ड कंट्रोल ॲक्ट होता. त्यामुळे सोन्याचे विक्रेते ठराविक परंपरा पाळून पेढ्या चालवित असत. रोजी रोटी नसल्यामुळे दागिन्यांचे कारागिर आत्महत्या करीत. अशा वातावरणात बाफनाजींनी दिल्लीत असलेल्या गोल्ड कंट्रोल ऍथोरिटीकडे व्यवसाय करण्याचा परवाना मागितला होता. त्यावेळी प्रशासनाने त्यांना नकार दिला. बाफनाजींनी तेथे स्वतःची बाजू मांडून सांगितले की, मी सोन्याचे रेडीमेड दागिने विकणार आहे. त्यामुळे माझा व्यवसाय हा परंपरेपेक्षा वेगळा असेल. त्यांच्या या कल्पनेवर संबंधित अधिकाऱ्यांचा विश्वास तेव्हा बसला नव्हता. नंतर बाफनाजींना व्यवसाय परवाना मिळाला. त्याच काळात गोल्ड कंट्रोल ॲक्टही शिथील झाला. जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने तयार करण्यासाठी ग्राहकांना सवलती मिळाल्या. त्यानंतर सोन्याचे दागिने विक्री व्यवसायाची भरभराट होत गेली.

भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून सोन्याचे कारागिर जळगावात आणून गुजराती, मद्रासी, कर्नाटकी, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी प्रांतातील फॅन्सी व पारंपरिक दागिने विविध आकार, प्रकार व भरपूर डिझाईनमध्ये घडवून तयार करण्याची परंपरा बाफनाजींनी जळगावात सुरू केली, असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. कारण आज जळगाव बाजारात असलेल्या सर्व सुवर्णपेढ्या, शोरुम व मॉलची संख्या लक्षात घेतली तर किमान १० हजार सूवर्ण कारागिर जळगावात काम करीत आहेत.

बाफनाजींनी सूवर्ण बाजारातील अनेक ट्रेण्ड काळानुरुप बदलले. अगदी अलिकडच्या काळात बाफनाजींच्या नेतृत्वात दुसऱ्या व तिसऱ्या पिढीने सुद्धा व्यवसायातील बदलाचे नवे माईलस्टोन रोवले आहेत. विश्वासही परंपरा आहे हे ब्रीद कायम ठेवत बदल केला गेला. तो म्हणजे, ग्राहक जर सोन्याच्या दागिन्यांची विक्री करीत असेल तर वजनातील घट पूर्णतः बंद करण्यात आली आहे. म्हणजे, ग्राहकाने जेवढ्या वजनाचे दागिने मोडीसाठी आणले असतील तेवढ्याच वजनाची किंमत त्याला दिली जाईल. जळगाव बाजारात हा ट्रेण्ड बाफनाजींनी आणला.

गेल्या काही दिवसात सूवर्ण बाजारात आणखी दोन महत्त्वपूर्ण ट्रेण्ड बाफनाजींनी आणले. पहिला म्हणजे, सोन्याचे दागिने खरेदी केल्याच्या दिवसापासून त्यांना विमा संरक्षण देण्याची योजना सुरू झाली. यासाठी प्रत्येक दागिन्याला कोडींग करुन त्याला चोरी व इतर आपत्तीपासून संरक्षण दिले जात आहे. यासाठी विम्याचा पहिला वार्षिक हप्ता  हा विक्रेते म्हणून रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स भरत आहेत. या बरोबरच दुसरा ट्रेण्ड हा ग्राहकांना सोन्याचा दागिना खरेदी करण्यासाठी शुभलक्ष्मी गोल्ड बचत योजना जी दरमहा रक्कम गोळा करण्याची योजना सुरु करण्याचा आहे. महिलांनी दरमहा ठराविक रक्कम १२ महिन्यांपर्यंत गोळा करायची. त्या एकत्रित रकमेत १३ वा बोनस हप्ता रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचा असेल. अशा रकमेतून ग्राहकांना हवा तो दागिना खरेदी करता येईल. यासाठी शुभलक्ष्मी गोल्ड योजना आहे.जी लवकरच जाहीर करण्यात येईल.

राजस्थानातून रोजगारासाठी जळगावात आलेल्या युवावस्थेतील बाफनाजींनी १९ वर्षे स्वतः सर्व्हिस केली. ज्वेलरी व्यवसायातला अनुभव दीर्घ घेऊन त्यांनी स्वतःची फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. परवान्यासाठी त्यांना दिल्लीपर्यंत धडक मारावी लागली. त्यानंतर रतनलाल. सी. बाफना ज्वेलर्सचा आणि इतर ठिकाणच्या शोरुमचा इतिहास घडत गेला. बाफनाजींच्या फर्मचे नाव संपूर्ण भारतात केवळ माऊथ टू माऊथ पब्लिसीटीने झाले. सोन्याचे दागिने विक्रीत रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला.

स्वतःच्या यशाविषयी बाफनाजींची काही सूत्रे आहेत. ते म्हणतात, कोणतेही काम प्रामाणिकपणे करा. स्वतः कमी सुट्ट्या घ्या. स्वतःचा हिशोब स्वतः करा. शिकवणाऱ्या माणसाचा आदर करा. कोणतेही काम कधी छोटे मानू नका.

बाफनाजींच्या वैचारिक धारणेचा पाया हा अध्यात्मिक व धार्मिक संस्कारांवर पूर्णतः अवलंबून आहे. जैन धर्माचा मूलतः संस्कार हा “अहिंसा परमो धर्म” असल्यामुळे बाफनाजींनी शाकाहाराचा प्रचार करताना गोपालक म्हणून स्वतःचे कार्य चौफेर उभे केले आहे. त्यांच्याच संकल्पेनेतून गोमाता संशोधन केंद्र, अहिंसा तीर्थ उभे राहिले. जैन धर्मियांचा दैनंदिन स्वाध्याय सुद्धा ते आजही तेवढ्याच पवित्र भावनेने करतात. पौर्णिमा, अमावस्या आदी प्रसंगी त्यांचा निवास जैन स्थानकात एखाद्या साधकाप्रमाणे असतो. सचोटी,विश्वास आणि इमानदारी या गुणांची जोपासना करण्याचे बळ धार्मिक संस्कारांनी दिले, असे ते म्हणतात.

बाफनाजी स्वतःच्या आयुष्या विषयी एक गोष्ट आवर्जून सांगतात, ती म्हणजे, त्यांचे कुटूंब ठरवून व निग्रहाने राजकारणापासून लांब राहिले. राजकारणातील लोकांशी त्यांची उत्तम मैत्री आहे पण राजकारण करायला पुढे जाण्याचा विचार त्यांनी केला नाही. धर्म नेहमी कर्माला महत्त्व देते. म्हणूनच त्यांनी अपंग, अंधांना मदत,गाई, प्राणी रक्षा, शाकाहार प्रचार आदी कामे केली आणि आजही सुरूच आहेत.

रतनलालजी बाफना यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचा वसा अंगिकारला आहे. शाकाहार, गो पालन, गो जन्य वस्तुंसाठी संशोधन, विविध धार्मिक उपक्रमात मदत, सामाजिक संस्थांच्या उपक्रमात मदत अशी कामे जबाबदारी म्हणून रतनलालजी बाफना यांनी स्वीकारली आहेत.

जळगाव शहरासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे, या शहरात दानशूरपणा आचरणात ठेवणारी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी असून त्यांनी आपापले सामाजिक कार्य निष्ठा, परंपरा व वसा समजून जपले आहे. बाफनाजी अशा दानशुरांच्या यादीत नक्कीच अव्वल आहेत.आज त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्याची प्रार्थना परमेश्वराकडे करु या...

No comments:

Post a Comment