Sunday 4 February 2018

सुमार दर्जाचा तद्दन मसालापट ... पद्मावत !

संजय लिला भन्साळी यांचा विवादीत चित्रपट पद्मावत पाहिला. तब्बल तीन तास केवळ तीन पात्रांभोवती फिरणारा चित्रपट रतन सिंह आणि पद्मावतीचे प्रेमगुंजन आणि अल्लाउद्दीन खिलजीची पद्मावतीप्रती लालसा हे दोनच मनोरंजनाचे रस प्रेक्षकांना देतो. बाकी चित्रपटाचा मसाला हा  राजवाड्याचे भव्यदिव्य सेट आणि चकाचक कपडे, दागिने याचाच आहे. चितौडगडची तटबंदी उध्वस्त करायला अल्लाउद्दीन खिलजीने आणलेले अग्नीगोळ्यांचे लाकडी रथ हे बाहुबली चित्रपटातील दगडी गोळ्यांची आठवण करुन देतात. संजय लिला भन्साळीचा सिनेमा असाही पात्रांमधील भावभावनांचे रस कधीच दाखवत नाही. मोठमोठ्या सेटवर दागिन्यांचे वा कपड्यांचे ओझे वाहणारी पात्रे भांबावलेली व बावरलेलीच दिसतात. अशी कचकड्याची पात्रे अभिनयाच्या नावाने केवळ संवाद फेकतात. चित्रपट डोळ्यांना भावतो, पण हृदयात शिरत नाही आणि मेंदूला पटत नाही.

पद्मावत विषयी अनुभव असाच आहे. हा चित्रपट भव्यदिव्य आहे, पण त्याची कथा ही जुन्या चांदोबा मासिकातील आहे. चांदोबात चित्रकथा येत. बहुतांश राजेरजवाड्यांच्या असत. बालकांना चांदोबा वाचायला आवडत. त्यातील काल्पनिक वाटणारा आशय आता संगणकिय चमत्कृतिने पडद्यावर भव्यदिव्य दिसायला लागला आहे. संजय लिला भन्साळीचे कथाबीज हे चांदोबातील कथेच्या लायकीचे आहे आणि सादरीकरण संगणकिय चमत्कृतीचे आहे.

पडद्यावर काय दिसते, पद्मावती ही सिंहल देशाचा राजा गंधर्वसेन व राणी चंपावती यांची कन्या. तिच्या बाणाने रतन सिंह घायाळ होतो. एका नजरेत रतन सिंहच्या प्रेमात पडलेली पद्मावती उच्छृंखल वाटते. अखेर विवाह करुन दोघे चित्तोडगडला येतात. दोघांचा शृंगार गुरु राघव चेतन हा पाहतो. पद्मावती त्याला देशबाहेर काढायला लावते. तिकडे दिल्लीची गादी मिळवायला अल्लाउद्दीन खिलजी हा काका जलालुद्दीनला ठार मारतो. दिल्लीचे राज्य मिळवतो. अपमानित राघव चेतन हा खिलजीच्या आश्रयाला जातो. अल्लाऊद्दीन बाईलवेडा असल्याने राघव चेतन त्याच्या मनात पद्मावतीची अभिलाषा निर्माण करतो. त्यानंतर आहे चित्तोडगडला खिलीजच्या सैन्याचा वेढा, नंतरचा शह-काटशह, अखेरीस खुले युध्द आणि शेवटी राजपूत महिलांनी केलेला सामुहिक जौहार. अशी ही सरळधोट कथा. जुन्या काळातील दंतकथांमध्ये अशीच पात्ररचना आहे. संजय लिला भन्साळीने ही कथा तीनच पात्रांभोवाती गुंफताना प्रेम, लालासा, ईर्षा आणि परंपरा याचे मसाला मिश्रण केले. चित्रपटाच्या चौकटी सुध्दा ठरलेल्या. भव्य सेट. उंची वस्त्र प्रावणे आणि दागिने. प्रेमाचे संवादही देवदास, बाजीराव मस्तानीच्याच पठडीतले. बहुतांश चौकटीत कोणीतरी निरोप घेवून येतो असेच प्रसंग आहेत.

पद्मावत हा चित्रपट २०० रुपये देवून पाहावा असा मुळीच नाही. याला कारणेही दोन तीन आहेत. पहिले कारण म्हणजे, राजपुतान्याच्या इतिहासात राणी पद्मावती व राजा रतन सिंह यांच्या विषयीची फारशी पाने नाहीत. राजा रतन सिंह व पद्मावतीचा काळ हा अवघा दोन-तीन वर्षांचा आहे. सन १३०२-१३०३ या काळात चितौडगडवर रतन सिंह रावल यांचे राज्य होते. ते सिसोदिया राजवंशाचे होते. त्यांच्या १३ पत्नी होत्या. पद्मावती ही त्यांची १४ वी पत्नी. तिच्याशी लग्न करुन आल्यानंतर वर्षभरात अल्लाउद्दीन चितौडवर चालून आला. दि. २८ जानेवारी १३०३ ला अल्लाउद्दीनने चितौडगडला वेढा टाकला आणि दि. २६ अॉगस्ट १३०३ ला तो राजपुतांचा पराभव करुन चितौडगडमध्ये होता. अशा प्रकारे पद्मावतीची मौखिक कथा ही आजही चितौडगडची दंतकथा आहे. कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहीलेला आहे. त्यातही रतन सिंह व पद्मावतीचा उल्लेख नाही. मात्र सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर हीराचंद ओझा यांनी रतन सिंह यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे.

इतिहासाच्या पानांत शोधले तर मलिक मुहम्मद जायसी याने इ. स. १५४० च्या सुमारास अवधी भाषेत पद्मावत नावाचे महाकाव्य लिहिले आहे. या महाकाव्याने पद्मावती नावाच्या काल्पनिक पात्राला जन्म दिला, असेच सांगण्यात येते. पद्मावतीचे नाव इतिहासात सापडत नाही. संजय लिला भन्साळीचा चित्रपट याच पद्मावतवर आधारित आहे. तशी सूचना सुरुवातीलाच आहे. म्हणून त्याचे नाव बदलून पद्मावत केले आहे.

राजपुतान्याच्या इतिहावर संशोधन करणारे तज्ञ सुध्दा पद्मावतीच्या लालसेपोटी अल्लाउद्दीनने चितौडगडवर आक्रमण केले असे मान्य करीत नाही. अलिकडील संशोधनातील एक तर्क असा आहे की, अलाउद्दीन हा साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा बाळगून होता. त्याने राज्य विस्तारासाठीच चितौडगडवर हल्ला केला. कारण चित्तौडगड हे सैनिक आणि व्यापारीपेठेचे ठिकाण होते.  गुजरात, माळवा, मध्यप्रदेश, संयुक्त प्रांत, सिंध आदी भागातील व्यापारी मार्ग हे चित्तौडगडवारुन जात होते. ते दिल्लीच्या ताब्यात हवे म्हणून अल्लाउद्दीन हा चितौडगडवर चालून आला. इतिहास संशोधक प्रा. के. जी. शर्मा म्हणतात, ते युद्ध केवळ राजनैतिक लाभासाठी झाले होते. तेव्हा प्रेमाचा वगैरे विषय नव्हता. ही केवळ कवी कल्पना आहे. इतिहासकार प्रा. आर.एस. खंगारोत हे सुध्दा असेच म्हणतात. अल्लाउद्दीन हा पद्मिनीच्या प्रेमात होता असे म्हणणे चुकीचे आहे. खिलजीने ते युद्ध  राजनैतिक लाभासाठीच केले होते. इतिहास दाखवायला चित्रपट जरूर बनवावेत. मात्र, कथा ही संशोधन करुन लिहावी. 

पद्मावत चित्रपटात दाखवलेला अल्लाउद्दीन हा अवघा एका वर्षातला आहे. अल्लाउद्दीन हा दिल्लीचा सुलतान होता व त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ कालावधीत राज्य केले. अल्लाउद्दीनने अनेक राजपूत राज्ये, तसेच महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांना पराभूत करून संपवले. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर त्याने इस्लामी राज्य स्थापन केले. पद्मावती चित्रपटात केवळ १३०२/३ चे चित्रण आहे. वास्तविक अल्लाउद्दीन हा खिलजी घराण्यातील कर्तबगार सुलतान होता. त्याने चित्तोडसोबत, गुजरात (१३०४), रणथंबोर (१३०५), माळवा (१३०५), सिवाना (१३०८), देवगिरी (१३०८), वारंगल (१३१०), जलोर (१३११), द्वारसमुद्र (१३११) आदी राज्ये आक्रमणे करुन जिंकली. परमार, वाघेला, चामहान (चौहान), यादव, काकाटीय, होयसाळ, पांड्य आदी साम्राज्ये त्याने उद्ध्वस्त केली. साम्राज्य वाढवताना त्याने क्रूरपणे धर्मपरिवर्तन केले. महिलांचा शीलभंग करुन त्यांना जनानखान्यात भरती केले.

काही इतिहासकारांच्या मते, अल्लाउद्दीनने केलेला साम्राज्य विस्तार लक्षात घेता तो कुशल शासक सुध्दा होता. त्याने राज्यकारभार करण्यासाठी अर्थव्यवहार सुधारला. मुस्लिमांच्या कला, साहित्याला त्याने राजाश्रय दिला. राज्य कारभार व धर्म हे त्याने वेगळे केले. पण इस्लामच्या प्रचारासाठी त्याने इतरांवर अत्याचार केले.

अल्लाउद्दीनचा शेवट मात्र सम्राटासारखा झाला नाही. अखेरच्या तीन चार वर्षात तो प्रकृतीने खालावला. त्या विस्मरणाचा आजार झाला होता. त्याचा गुलाम मलिक काफूरनेच राज्यकायभार चालवला. असे म्हणतात की, अल्लाउद्दीन व मलिक काफूर यांचे समलिंगी संबंध होते. चित्रपटात संजय लिला भन्साळीने तसे काही संवादातून सूचविले आहे. सुलतान मोहंमद इब्न तुघलकचे सहकारी म्हणून काम करणाऱ्या बरानी यांनी अल्लाउद्दीनच्या शेवटच्या दिवसांचा संदर्भ देत लिहिले आहे की, त्या चार-पाच वर्षांत सुलतानची स्मरणशक्ती सारखी हरपत होती. ते मलिक काफूरच्या (मलिक नायब) प्रेमात बुडाले होते. त्यांनी सरकार आणि नोकरांची सगळी जबाबदारी मलिक नायबच्या हातात दिली होती.

महत्त्वाचे संदर्भ -


राणी पद्मावती नेमकी कोण होती?
http://www.india.com/marathi/others/rani-padmini-history-in-marathi/

कौन थीं रानी पद्मावती, क्या है उनकी शौर्य गाथा?
http://www.prabhasakshi.com/news/column/who-was-rani-padmavati-why-is-the-dispute-happening/36001.html

रत्नसिंह
https://hi.m.wikipedia.org/wiki/रत्नसिंह

अलाउद्दीन खिलजी का इतिहास
http://www.gyanipandit.com/alauddin-khilji-history-in-hindi/

अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर यांचं काय होतं नातं?
https://www.bbc.com/marathi/india-41758166सुमार दर्जाचा तद्दन मसालापट ... पद्मावत !

No comments:

Post a Comment