Monday 29 January 2018

सौंदर्याची कार्यव्रती सौ. संगिता पाटील

मित्रांच्या गोतावळ्यातील जुन्या परिचित मैत्रिण तथा जळगाव शहरातील मोजक्या सेलिब्रिटी वर्तुळातील सौ. संगिता प्रमोद पाटील यांचा आज वाढदिवस. जळगाव शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना सर्वजण आदराने संगितामैम म्हणतात. व्हीआयपी मंडळींच्या व्हाट्सऍप गृपमध्ये मी त्यांना संगिताबाई म्हणत असे. अर्थात, त्यांनी कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. या मागील कारण होते की, मैम या शब्दात असलेला औपचारिकपणा हा बाई शब्दांतून गळून पडतो. बाई हे मराठी संवादातही अधिकाराचेच पद आहे. त्यामुळे सौ. संगिताबाईंनी कधीही माझ्या लेखनावर आक्षेप घेतला नाही. त्यांचे पती व सहकार कायद्याचे विधीज्ञ प्रमोद पाटील यांच्याशीही माझा असाच मोकळाढाकळा परिचय आहे.

जळगाव सारख्या निम महानगर असलेल्या शहरात फॅशन व इंटेरियर डिझाईनशी संबंधित महाविद्यालय गेले एक तप यशस्वी व गुणवत्तापूर्ण सुरू ठेवण्याचा प्रयत्न सौ. संगिताबाईंनी केला आहे. कौशल्याधारित या अभ्यासक्रमातील विविध विद्या शाखा उत्तमपणे पुढे नेताना त्यांनी दुर्लब, मागास व गरीब घटकातील विद्यार्थी-विद्यार्थिनी कसे गुणवंत घडतील याकडे लक्ष दिले आहे. वेगळ्या वाटेवर धाडसाने प्रत्येक पाऊल टाकत यशाला गवसणी घालणाऱ्या मोजक्या मान्यवर महिलांमध्ये सौ. संगिताबाईंचा समावेश आहे.

महिलांच्या वाढदिवसाला त्यांच्याविषयी लिहीण्याची संधी कमी मिळते. कारण, त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक वाटचालीची फारशी माहिती नसते. महिलांच्या सामाजिक अथवा त्यांच्या प्रभावाच्या कार्यक्षेत्रातील कामकाजाची जुजबी माहिती असते. मात्र, सौ. संगिताबाईंच्या कार्याविषयी सन २००६-७ पासून मला उत्तम माहिती आहे. विविध क्षेत्रांतील महिलांचे कार्य समाजासमोर मांडण्यासाठी दैनिकाच्या माध्यमातून तेजस्विनी पुरस्कार सन्मान सोहळा आम्ही सुरु केला होता. या सोहळ्यात सौ. संगिताबाईंचा सहभाग होता. तेव्हा फॅशन डिझाईनचे कॉलेज असते आणि त्यात मुला-मुलींना विविध प्रकारच्या फॅशनचे पोशाख अथवा पेहराव तयार करायला शिक्षण दिले जाते, याची फारशी माहिती कोणाला नव्हती. सन २००५ मध्ये सौ. संगिताबाईंनी जळगावात आयएनआयएफडी महाविद्यालय सुरू केले आहे. बहुधा त्याचे दुसरे वर्ष तेव्हा असावे. या निमित्ताने त्यांच्या कार्याची जुजबी ओळख तेव्हा झाली होती. नंतर काळ पुढे सरकला. पुन्हा सन २०१३ च्या सुमारास सौ. संगिताबाईंशी अशाच स्पर्धेच्या निमित्ताने संपर्क आला. तेव्हा त्या सन्मानिय परिक्षक होत्या.

जळगाव शहरात पुरुषांचे वर्चस्व आणि सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या रोटरी वेस्टमध्ये खूप अगोदरपासून सौ. संगिताबाई विविध पदांवर कार्य करीत आहेत. पुढीलवर्षी (सन २०१८-१९) त्यांच्याकडे या क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा असणार आहे. अशा प्रकारे अध्यक्ष होणाऱ्या या क्लबच्या त्या पहिला महिला असतील.

सौ. संगिताबाई शक्य होईल त्या सामाजिक कार्यात आपली भूमिका निभावतात. त्यांचा सहभाग विविध उपक्रमात असतो. माझ्या माहितीतील काही उदाहरणे बोलकी आहेत. जळगावच्या मल्टीमिडीया फिचर्स या जाहिरात संस्थेने शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक वॉर्डनच्या मदतीला चौकाचौकात उभे करण्याची अभिनव योजना राबविली होती. या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत अर्थ सहाय्य देण्याची जबाबदारी सौ. संगिताबाईंनी निभावली होती. जळगाव येथे जिल्हा पत्रकार संघ व रोटरी क्लबच्या सहकार्याने महिला दिनाचा कार्यक्रम साजरा झाला होता. या कार्यक्रमात सहभागी महिला-मुलींना बी केअरफूल हे समुपदेशन व सल्ला देणाऱ्या लेखांचे पुस्तक सौ. संगिताबाईंनी भेट दिले होते. अशीच एक आठवण शेंदुर्णी येथील शाळेला त्यांनी दिलेल्या भेटीची आहे. तेथे प्रमुख पाहुण्या म्हणून भेटीसाठी जाताना त्यांनी रंग आणि कागद सोबत नेले होते. मुलांना चित्र काढायचा आग्रह केला होता. या अनोख्या गिफ्टमुळे मुले हरखून गेली होती.

सौ. संगिताबाई या स्पष्ट वक्त्या आहेत. आपले मत सौम्यपणे मांडतील पण ते ठाम असते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न आणि लाघवी आहे. सुंदरता आणि सौंदर्य याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या त्या स्वतः संचालिका असल्यामुळे स्वतःचा पोशाख आणि पेहराव याच्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. जळगाव शहरात फॅशन डिझाईनशी संबंधित मॉडेल शो करण्याची परंपरा सौ. संगिताबाईंनी धडाडी आणि धाडसाने सुरू केली. ती आजही कायम आहे.  

जळगाव शहरात महामार्ग लगत समांतर रस्ते तयार करावेत या मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीने १० जानेवारीस महामार्ग रोको आंदोलन केले. सौ. संगिताबाई एवढ्या खमक्या की, त्यांनी महाविद्यालयातील विदर्याथ्यांसह आंदोलनस्थळी ठिय्या मांडला. शहराच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील आंदोलनात आम्ही सहभागी झालेच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

सौ. संगिताबाईंच्या काही घरगुती आठवणींचा उल्लेख करावा लागेल. त्या मूळच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावातील आहेत. आई व वडील हायस्कूल टीचर होते. त्यामुळे घरात शिस्त होती. १८ व्या वर्षी ऍड. प्रमोद यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर बीए केले. नंतर सासऱ्यांच्या आग्रहाखातर विधी शाखेला प्रवेश घेतला. मात्र प्रमोद यांनी फॅशन डिझाईनमध्ये करिअर करायचा सल्ला दिला. बीए, एमए (हिंदी) करुन नंतर एमएस्सी फॅशन टेक्नॉलॉजी केले. येथे एक गंमत आहे. त्यांच्या सासुबाई तारकाबाई सातवी उत्तीर्ण होत्या. पण त्यांनी सुनबाईला शिकायला नेहमी प्रोत्साहन दिले.

फॅशन डिझाईनचा महागडा अभ्यासक्रम केल्यानंतर खरे तर मोठ्या महानगरात त्यांना चांगली संधी मिळू शकली असती. महागडे ब्युटीकही त्या सुरू करु शकत होत्या. काही काळ त्यांनी शिक्षकाचीही भूमिका निभावली. परंतु सौ. संगिताबाईंनी जळगाव येथे स्वतंत्रपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला. खान्देशमध्ये कौशल्याधारित शिक्षणापासून वंचित असलेल्या आदिवासी, दुर्बल घटकातील युवा वर्गाला या नव्या क्षेत्राकडे घेवून जायचे आव्हान त्यांनी स्वीकारले. सन २००५ मध्ये जळगाव आयएनआयएफडी सुरु झाले. तेव्हा पासून सौ. संगिताबाईंचा प्रवास सर्वांनाच माहिती आहे. खेड्यातील मराठा समाजातील पारंपरिक जीवनशैलीतील सौ. संगिताबाईंचा हा प्रवास शिस्तीत वाढलेली कन्या, सासू-सासऱ्यांची आवडती व नवे शिकणारी सुनबाई, शिक्षण घेताना मातृत्व स्वाकारणारी माता, विधीज्ञ पतीच्या व्यापात घर सांभाळणारी गृहिणी, फॅशन व इंटेरिअरच्या क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि सामाजिक कार्यातील कार्यकर्ती असा अनोखा व लक्षवेधी आहे. फॅशन आणि इंटेरिअर डिझाईन हे दोन्ही विषय सौंदर्याशी संबंधित आहे. त्यात सतत कार्यरत असलेल्या सौ. संगिताबाईंना म्हणूनच सौंदर्याची कार्यव्रती म्हटले आहे. सौ. संगिताबाईनी सासुबाईंच्या नावे तारका फाऊंडेशन सुरू केले आहे. आपले कार्य हे व्रताप्रमाणे पूर्ण करण्याचा ध्यास घेणाऱ्या सौ. संगिताबाईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! 

3 comments:

  1. Dear friend Sangeeta your great humen Bing... salute🙏🏻 your dedication and hardworking...
    I am always with you...

    ReplyDelete