Sunday 21 January 2018

मनमौजी निरागस मित्र !

जळगाव शहराचे बारावे महापौर आणि मनसेच्या १२ नगरसेवकांचे नेते ललितभाऊ कोल्हे यांचा आज वाढदिवस. जवळच्या आणि जिवाभावाच्या काही मित्रांचे त्यांच्या वाढदिवसाला मनःपूर्वक अभीष्टचिंतन करताना त्यांच्या विषयी चांगल्या गोष्टी लिहण्याचा वसा अनेक वर्षांपासून मी जपला आहे. वृत्तपत्राच्या व्यापातून बाजुला झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. ओळखीचे रुपातंर परिचयात झाले. परिचयातून मैत्री वृद्धींगत झाली. काही मोजक्या लोकांशी विवाद होवूनही गाढ मैत्री झाली. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून हक्काच्या वाचकांपर्यंत पोहचताना मित्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरांना माहित नसलेले पैलू उलगडण्याची संधी साधत आलो आहे. याच परंपरेत आज ललित कोल्हे यांच्या विषयी ठरवून लिहित आहे. विवादातून झालेल्या या मैत्रिची प्रवास लक्षवेधी आहे.

खरेतर, कोल्हे परिवाराचा आणि माझा परिचय थेट स्व. पंडीतराव अण्णांपासून. म्हणजे, ललित कोल्हे यांच्या आजोबांपासून. सन १९८९ च्या दरम्यान वृद्धावस्थेमुळे स्व. पंडीतराव अण्णा राजकारणातून निवृत्त झालेले होते. कन्झुमर सोसायटीच्या कार्यालयात ते रोज आराम करीत असत. तेथे बऱ्याचवेळा स्व. दिलीपअण्णांशी भेट होत असे. स्व. बबनभाऊ बाहेती, स्व. दिलीपअण्णा आणि मी बाहेतींच्या कार्यालयाजवळ रात्री उशीरापर्यंत गप्पा करीत असू. याच गप्पांमधून जळगावच्या राजकिय इतिहासाचे अनेक बारकावे तेव्हा समजले. मी पत्रकार असल्यामुळे स्व. दिलीपअण्णा माझ्याशी आदराने बोलत. दरवर्षी सामुहिक विवाह सोहळा ते आयोजित करीत. याशिवाय, काशिबाई उखाजी काल्हे विद्यालयात वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ असे. या दोन कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून न चुकता हजेरी लावावी लागे. ललितभाऊंचे वडील विजयबापू कोल्हे यांची आणि आमची बैठक दाणाबाजारातील स्व. कौशिक तिलीया यांच्या दुकानातील. अख्ख्या जळगावातील तेव्हाची दादा मंडळी याच दुकानात बसत असे. आतील गोटाच्या बातम्या मिळविण्याची ती एक जागा होती. अशा प्रकारे कोल्हे कुटुंबियांशी दोन पिढ्यांचा माझा संपर्क आहे. ललित कोल्हे हे तिसऱ्या पिढीतले.

ललिल कोल्हे हे जळगाव नगर पालिका व त्यानंतर महापालिकेत सन १९९६ पासून नगरसेवक आहेत. काही काळ ते बांधकाम सभापतीही होते. तोपर्यंत माझा ललित कोल्हे यांचा थेट परिचय नव्हता.

एमआयडीसीत दैनिकाच्या कार्यालयात जाताना कधीतरी रेमंडजवळ कामगारांच्या घोळक्यात ललित कोल्हे दिसायचे. रेमंडमधील कामगार संघटनांच्या वादविवादातून ललित कोल्हेंचे नाव चर्चेत असे. तत्कालिन विरोधीपक्ष नेत्यांच्या काही समर्थकांना रेमंडच्या कामगार संघटनेत रस निर्माण झाला होता. दोन्ही गटात यातून होणाऱ्या विवादाच्या बातम्या चर्चेत असत.

ललित कोल्हे त्यांच्यातील संघटन कौशल्य आणि राजकिय घोडदौडला संधी मिळाली ती सन २०१३ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत. या निवडणुकीत नव्या दमाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व ललित कोल्हे यांनी करीत १२ नगरसेवक निवडून आणले. या विजयामुळे जळगावातील मनसेचा डंका मनसे सुप्रिमो राज ठाकरेंच्या समोर मुंबईत वाजला. हा विजय मिळविल्याबद्दल आम्ही दैनिकाची मंडळी ललिल कोल्हेंचे अभिनंदन करायला गेलो. तेव्हा सर्व नगरसेवकांसह ते मुंबईला राज ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना होत होते. घाईत फारसे बोलणे झाले नाही. जळगाव शहरांतर्गंत या विजयाने ललित कोल्हेंची ओळख ललितभाऊ म्हणून ठळकपणे करुन दिली.

मनपा निवडणुकीनंतर काही काळ ललितभाऊंची भूमिका तळ्यात मळ्यात होती. रेमंडमधील वादविवाद टोकाला गेले. पोलिसात तक्रारीही झाल्या. त्यानंतर ललितभाऊंनी खाविआशी साथसंगत केली आणि ती आजपर्यंत कायम ठेवली. खाविआशी जुळवून घेतल्याने ललितभाऊंना उपमहापौरपद मिळाले. अखेरच्या टप्प्यात महापौर होण्याचीही संधी मिळाली. ललितभाऊंचा हा सत्तावाटणीचा निर्णय हुशारीचा ठरला.

मध्यंतरी जी. एस. मैदानावर दैनिकातर्फे ऑटो एक्स्पो आयोजित होता. तेथे ललित कोल्हेंशी जवळून परिचय झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. स्टॉल पाहणी करताना बातचित झाली. मला दिलीपभाऊ म्हणत ते ओळखून होते. पुढील काळात आमच्या कॉलनीतील साईमंदिरा करिता मदत मिळावी या हेतूने ललितभाऊंकडे जाणे-येणे झाले. तेथून परिचय वाढत गेला.

मधल्या काळात एल. के. फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमांची माहिती मिळत गेली. जळगाव शहरातील स्वच्छतेसाठी फाऊंडेशनचे स्वच्छतादूत वापरुन आगळेवेगळे काम एल. के. फाऊंडेशनने केले.

महापौरपदी विराजमान झाल्यानंतर ललितभाऊंनी पहिला हात शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता या विषयाला घातला. गिरणा टाकीची दुरवस्था लोकांच्या समोर आणली. तेथील पाहणी करण्यासाठी पत्रकारांना नेण्यात आले. सुरवात अशी धडाक्यात झाली. गप्पांच्या ओघात ललित कोल्हेंना एकदा मी म्हणालो, ललितभाऊ प्रभागांचे दौरे करा. मनपा सुविधा देवू शकत नाही. पण, किमान लोकांचे ऐकून घ्या. त्यांनी काही काळ तसे केले. अशा गोष्टींमधून परिचय हा मैत्रीत वृध्दींगत होत गेला.

ललितभाऊ कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची दिशा ठरलेली आहे. पारंपरिक सण-उत्सव सामुहिकपणे धुमधडाक्यात साजरा करण्याचा ललितभाऊंना शौक आहे. राजेशाही दहीहंडी, आतषबाजीसह रावण दहन, दिवाळी पाडवा पहाट गाणी, पतंग महोत्सव यांच्या आयोजनातून एल. के. फाऊंडेशनला सांस्कृतिक ओळख मिळाली आहे.

ललितभाऊंच्या कार्यातील दोन गोष्टी इतरांना फारशा माहित नाही. पहिली म्हणजे, गरीब आणि गरजू कुटुंबातील जवळपास ३५० ते ४०० रुग्णांवर शस्त्रक्रियांचा खर्च त्यांनी केला आहे. अशा प्रकारची मदत आजही सुरूच असते. दुसरी गोष्ट म्हणजे, जळगाव शहरात हेलिकॉप्टर बोलावून लहान मुलांना हवाई सफर घडवून आणण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. याशिवाय, फॉगिंगसाठी ४ खासगी मशीन आणणे, गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर वाटप असेही उपक्रम सुरूच असतात.

कोणाशीही एकदा मैत्री केली की गुण दोषांसकट त्याला स्वीकारायचे असते. ललितभाऊंचे मित्र म्हणून घेताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंग पिच्छा सोडत नाहीत. त्या विषयीचे आक्षेप घेणारे विरोधक मित्रांना भंडावून सोडतात. सहजीवनाच्या बाबतीत जोडीदार निवडण्याचा ललितभाऊंचा निर्णय हा चुकत गेला असेल. होते असे कधीकधी एखाद्याचे. पण, व्यक्तिगत जिवनातील ही एक विषय सोडला तर ललितभाऊंवर आक्षेपाचा थेट विषय नाही.

ललितभाऊंच्या वागण्या बोलण्यात एक मनमौजीपणा आहे. तो कधीकधी निरागस मुलासारखा आहे तर कधीकधी टोकाचा हट्टी आहे. हा माणूस कपडे, घड्याळ, बूट अशा भौतिक आकर्षणाच्या वस्तूत रमणारा. राजकारणाची गंभीर चर्चा सुरू असताना आपल्याकडील महागडी वस्तू कौतुकाने इतरांना दाखवणारा. अगदीच्या मूडमध्ये असला तर मित्रांवर महागड्या भेटवस्तुंची लयलूट करणारा. म्हणूनच ललितभाऊ मला मनमौजी वाटतात. जे मनात येईल ते करणारा एक सच्चा निरागस मित्र ... अशा मैत्रित मग आक्षेपाचे सारे सारे मुद्दे गळून पडतात ...

वाढदिवसानिमित्त ललितभाऊंचे अभीष्टचिंतन आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ...No comments:

Post a Comment