Thursday 4 January 2018

शालेय शिक्षणातला अनोखा प्रयोग - एड्युफेअर २०१८

आंतराष्ट्रीयस्तरावरील शालेय शिक्षणाचे उच्च मानांकन पूर्ण करीत हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंटरनॅन्शल स्कूलची निर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत तथा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन तथा मोठेभाऊ यांनी अत्यंत दूरदृष्टीने सामान्य समाज घटकातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलची सुध्दा निर्मिती केली. मोठेभाऊंनी लावलेली शालेय शिक्षणाची ही दोन रोपे आता वृक्षागत बहरत आहेत. दोन्ही शाळांमधील अध्यापन आणि अध्ययनाची संकल्पना ही हसत खेळत शिक्षण आणि खेळता खेळता शिक्षण अशी आहे. शिक्षकांच्या सोबतच विद्यार्थीही नाविन्यपूर्ण अध्यापन साहित्याचा शोध घेवून शिक्षण प्रक्रियेला सहज, सोपी, सुलभ व आनंदायी करीत आहे.


खरे तर हे लेखन अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तोंडभरुन कौतुक करण्यासाठी आहे. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे एड्युफेअर २०१८ हे आज (दि. ५) पासून सुरु होवून दि. ७ जानेवारीपर्यंत जी. एस. ग्राऊंडवर भरणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकडून भरवलेला हा एक आनंदमेळाच आहे. दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळा तालुका अथवा जिल्हास्तरांवर विज्ञान मेळावे घेतात. काही शाळा फनफेअर घेतात. हे दोन्हीही उपक्रम शालेय शिक्षणाचा उपचार म्हणून पूर्ण केले जातात. शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी उपचार पूर्ण करतात आणि उपक्रम पूर्ण होतात. त्या मागील हेतू नेमका काय व तो कितपत साध्य झाला याचा पाठपुरावा अथवा मूल्यांकन होत नाही. वर्षानुवर्षे हे चक्र सुरु आहे.

याच परंपरांना छेद देत शालेय मुलांचे फनफेअर आणि एज्युफेअर असे एकत्रित करीत त्याचे एड्युफेअर करण्याचे धाडस अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले आहे. आम्ही कसे शिक्षीण घेतो, ते कसे आत्मसात करतो, त्या वापर व्यवहारात कसा होतो, इतरांना आम्ही कसे शिकवू शकतो, यात आमच्या आनंदाची सीमा कोणती अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा कृतिशील प्रयत्न या एड्युफेअर २०१८ मधून घडतोय. शाळेच्या मुलांची एक आनंदयात्रा उद्यापासून सुरु होत आहे. ही आनंदयात्रा पहिली ते आठवीच्या मुलांसाठी आहे पण त्यापेक्षा जास्त ती पालकांनाही क्रियाशील करीत आपले बालपण व सामान्यज्ञान जागृत करुन देणारी आहे. एका अर्थाने शैक्षणिक खेळाचा हा प्रयोग श्रध्देय मोठेभाऊ यांच्या संकल्पनेतील कृतिशील, कौशल्याधारित शिक्षणाचा आहे.

या एड्युफेअरचे हे दुसरे वर्ष आहे. यापूर्वी सन २०१५ मध्ये मोठेभाऊ हयात असताना पहिल्या एड्युफेअरचे आयोजन शाळांतर्गत झाले होते. आता हे दुसरे एड्युफेअर थेट शहराच्या मध्यवस्तीत होत आहे. शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. यावर्षी शहर व जिल्ह्यातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना, शहरवासीयांना आनंददायी शिक्षणाची अनुभूती व्हावी या हेतूने एड्युफेअर होते आहे. उद्या दुपारी ४ वा. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, टीव्ही वरील डान्स चॅम्पिअन तनय मल्हारा, हर्ष धारा, देवाशिष मोटवानी यांच्या हस्ते या फेअरचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या एड्युफेअर विषयी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी भरभरुन बोलतात. श्रध्देय मोठेभाऊंनी शालेय शिक्षणात खेळत खेळत शिका व शिकतशिकत खेळा हा मूलमंत्र दिला. त्याला अनुसरुनच हे एड्युफेअर असल्याचा उल्लेख करीत त्या म्हणतात, सन २०१५ मध्ये शाळेतच झालेल्या एड्युफेअरचे यश पाहून मोठेभाऊ म्हणाले होते आता पुढचे फेअर शहरात करा. म्हणून हे दुसरे फेअर शहरात होते आहे.

या फेअरमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेत नाविन्य आहे. सृजनशिलता आहे. ते प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता आहे.  त्यातून आनंद देणे आणि घेणे याची अनुभूती आहे. या एड्युफेअर २०१८ चे पाच भाग आहेत. अभ्यास व सामान्यज्ञानावर आधारित ७० खेळ आहेत. ४० वस्तुंसोबत फॅन्टसी लॅण्ड आहे. अफलातून टॅलेन्ट शो आहे.  विलोभनिय हस्तकलेचे ५० वर प्रकार आहेत. आणि सर्वात उत्सुकतेची खाऊ गल्ली आहे. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पहिल्यांदा घराबाहेर पडून केलेला व्यवसायाचा हा प्रयोग आहे.

एड्युफेअर २०१८ हे विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी तर आहेच. पण सतत धावपळीत तणावात राहणाऱ्यांसाठी श्वास घेवून विसावण्याचे ठिकाण आहे. सतत भटकंती करीत गप्पांचे कट्टे शोधणाऱ्या युवावर्गासाठी हा फनकट्टा आहे. मुला मुलींचे करियर घडण्याची चिंता असलेल्या पालकांसाठी दिशादर्शनाचा मार्ग आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, एक माहितीपूर्ण शैक्षणिक सहल म्हणून एड्युफेअर २०१८ ला आवर्जून भेट द्या !!

2 comments:

  1. Congratulations! Very useful project ...All The Best

    ReplyDelete
  2. आदरणीय मोठेभाऊंचा हा उपेक्षितवर्गासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणारा असा हा समाज शुध्दिकरणाचा प्रकल्प आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.-विजय मोहरीर

    ReplyDelete