Saturday 16 December 2017

संयमाचा महामेरु प्रदीपभाऊ !!

जळगाव शहरात सन १९९१ ते १९९४ दरम्यान पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. तो काळ जळगाव शहरात प्रचंड घडामोडींचा होता. जळगाव शहर आणि सहकार क्षेत्रावर पकड होती सुरेशदादा जैन आणि त्यांच्या समर्थकांची. राज्यातले तत्कालिन सरकार होते शरद पवार यांचे. थेट पवार यांच्याशीच सुरेशदादांचा पंगा होता. त्यामुळे या सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री अरुण गुजराथी आणि सुरेशदादांचे संबंध ताणलेले होते. तत्कालीन विधानसभाध्यक्ष असलेले स्व. मधुकरराव चौधरी यांच्याशी सुरेशदादांचे कधीच जमले नाही. सुरेशदादा स्वतःच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना हंगामासाठी कर्जाची गरज असल्याने अध्यक्ष मंडळीही सुरेशदादांच्या दरबारात असत. जिल्हा दूध संघही त्यांच्याच ताब्यात होता. नाही म्हणायला पवार समर्थक असलेले ईश्वरलाल जैन विरोधात होते.

सुरेशदादांच्या या सत्तापटावर जळगाव पालिकेतील जबाबदारी सांभाळणारे वजीर होते प्रदीपभाऊ रायसोनी. पालिकेतील सर्व प्रकारच्या घटकांना सांभाळून कौशल्यपूर्ण कामकाजाची हातोटी प्रदीपभाऊंची होती. तेव्हा बोटावर मोजता येतील असे विरोधक होते ॲड. बबन बाहेती, नरेंद्र पाटील व उल्हास साबळे. त्यांनाही थोपविण्याचे कार्य प्रदीपभाऊ करीत असत. तेव्हा दलित वर्गातील नगरसेवक म्हणून स्व. राजाराम गाढे यांचा बोलबाला होता. स्व. गाढेंना हाताळायचे कामही प्रदीपभाऊ करीत.

मध्यंतरीचा एक किस्सा आहे. जळगाव मनपात सुरेशदादा नगराध्यक्ष होते आणि आमदारही होते. पवार, गुजराथी व स्व. मधुकरराव यांच्या पाठबळामुळे डॉ. ए. जी. भंगाळे यांनी नगरसेवक जमवून सुरेशदादांवर अविश्वास ठराव मांडायची खेळी केली होती. त्यांनी बहुतांश नगरसेवकांना सहलीस पाठविले होते. तेव्हा नियम असा होता की, नगराध्यक्षावर एक अविश्वास आला आणि तो बारगळला की पुढील वर्षभर पुन्हा अविश्वास मांडता येत नसे. प्रदीपभाऊ उपनगराध्यक्ष होते. डॉ. भंगाळे समर्थकांची खेळी उलटवायला स्वतः प्रदीपभाऊंनीच सुरेशदादांवर अविश्वास ठराव टाकला. आता या ठरावावर मतदानासाठी डॉ. भंगाळे यांना सहलीस गेलेले नगरसेवक जळगावात आणावे लागले असते. तसे होणार नव्हते. अर्थात, तो बारगळला असता आणि सुरेशदादांचे पद स्थिर राहिले.

जळगाव पालिकेकडून कोणती विकास कामे करायची, कोणती पेंडींग ठेवायची आणि कोणती नाकारायची याचा संपूर्ण निर्णय प्रदीपभाऊ घेत असत. तेव्हा जळगाव मनपा १०० कोटींची विकास कामे करणारी महाराष्ट्रातील एकमेव पालिका होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतील पैसा कोणाच्या झोळीत टाकायचा याचा निर्णय प्रदीपभाऊ घेत असत. प्रदीपभाऊंच्या याच अधिकाराविषयी एक दंतकथा पालिकेत होती. ती म्हणजे, प्रदीपभाऊ तीन बॉलपेन वापरतात. जे काम करायचे त्यावर हिरव्या रंगाची, जे नाही करायचे त्यावर लाल रंगाची आणि जे पेंडींग ठेवायचे त्यावर निळ्या रंगाची सही प्रदीपभाऊ करतात. अर्थात, ही दंतकथा पेरलेली होती. या मागील एक कारण होते. ते म्हणजे, जळगाव पालिकेत विविध बहुजन समाजातील बाहुबली नेते हे पांढरे कपडे घालून लोकनेते झाले होते. अशातील बरीच मंडळी प्रदीपभाऊंवर मनांतून नाराज असत. ही नाराजी आणखी एका गोष्टीमुळे वाढली. आरक्षणामुळे नगराध्यक्षपद इतरांना देणे क्रमप्राप्त झाले. यावर नियंत्रणाचा तोडगा उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निघाला. या समितीचे नेतृत्व पुन्हा प्रदीपभाऊंकडे गेले. नगराध्यक्षावर उच्चाधिकारचा अंकूश हे सुध्दा नाराजी वाढवायचे कारण झाले.

प्रदीपभाऊ हे सर्वांचीच गरजेची कामे करीत. त्यांचा स्वतःचा सिगारेट विक्रीचा ठोक व्यवसाय हा तेव्हा लाखोंचा होता. गरजुंना मदत करताना ते स्वतःच्या खिशाला तोशिश लावत. प्रदीपभाऊंना शहर विकास आघाडीचे चाणक्य म्हटले जात असे. पालिकेत कोणते ठराव मंजूर करावेत आणि टाळावेत याचे उत्तम नियोजन ते करीत. भविष्यात अडचण होईल असा ठराव चर्चेला येण्यापूर्वी ते सभागृहाच्या बाहेर ठरवून जात. प्रभारी पिठासन अध्यक्ष तो ठराव मंजूर करुन घेत. अशा प्रकारे जनतेच्या हिताचे विधायक आणि अडचणीचेही निर्णय प्रदीपभाऊ मार्गी लावत. पण, सामान्य लोक खूश असले तरी नगरसेवकही खूश ठेवावे लागतात याकडे प्रदीपभाऊंनी कानाडोळा केला. या नाराजीचा बदलाही संबंधितांनी संधी मिळल्यावर घेतला.

जळगाव शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवडणूक कायम स्मरणात राहणारी झाली. तेव्हा सुरेशदादांची शहर विकास आघाडी होती. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अर्थात प्रदीपभाऊ होते. विरोधात होते लेवापाटील समाजाचे प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. के. डी. पाटील. प्रदीपभाऊ नेते असल्यामुळे शहर विकास आघाडीचे किती नगरसेवक बिनविरोध होवू शकतात, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. ८ नगरसेवक बिनविरोध झाले. यात लेवा समाजातील एका कुटुंबातील ३ आणि दुसऱ्या कुटुंबातील २ आणि अन्य एक असे ६ जण बिनविरोध होते. ही मंडळी शहर विकास आघाडीची होती. मात्र, प्रत्यक्ष नगराध्यक्षासाठी मतदान होताना वर कमळ खाली विमान असा प्रचार झाला. बिनविरोध ८ नगरसेवकांच्या वॉर्डात प्रदीपभाऊंची पिछेहाट झाली. प्रदीपभाऊ पराभूत झाले. अनेक स्वकियांना आनंद झाला. प्रदीपभाऊंचा हा पराभव धक्कादायक होता. मी पत्रकार म्हणून प्रदीपभाऊंची विशेष मुलाखत घेतली. त्याचे शिर्षक होते, होय ! मी जळगावकरांसाठी वाईटपणा घेतला. यात प्रदीपभाऊंना काय म्हणायचे ते सारे आले होते.

नाही म्हणायला, सुरेशदादांची तीनवेळा प्रदीपभाऊंवर मर्जी खपा झाल्याचाही अनुभव आहे. सुरेशदादा प्रदीपभाऊंचे सह्यांचे अधिकार काढून घेत. अशावेळी प्रदीभाऊ कोणतेही गॉसिप तयार न करता गप्प बसत. सुरेशदादांची बदनामी त्यांनी कधी केली नाही. साथही सोडली नाही. प्रदीपभाऊ शहर विकास आघाडी सांभाळत असताना रमेश जैन यांचा राजकारणात प्रवेशही झालेला नव्हता. याच दरम्यान, राजकारणात वावरत असताना काही कौटुंबिक आघातही प्रदीपभाऊंनी संयमाने पचविले.

अलिकडे चार वर्षांत सुरेशदादा व प्रदीपभाऊ क्लेषकारक प्रसंगातून सामोरे गेले. कारागृह नशिबी आला. पण, एकदाही प्रदीपभाऊ पळवाट शोधून कारागृहाबाहेर आले नाही. उलट ते कारागृहात असताना इतर गरजू बंदींना त्यांनी मदत केली. याच दरम्यान प्रदीपभाऊ व सुरेशदादांमधील मतभेदाची चर्चा होती. ती आजही आहे. कारण, एकेकाळी सुरेशदादांचे वजीर असलेले प्रदीपभाऊ सध्यातरी शिवाजीनगरातील बंगल्यावर जात नाहीत.

एक आठवण नोंदवायलाच हवी. जळगावातील माझ्या पत्रकारितेच्या काळात प्रारंभी आम्ही सुरेशदादा विरोधक व प्रशासनाच्या बाजूने होतो. सुरेशदादा विरोधक अशी प्रतिमा होती. पण, एकदा जळगाव मनपा विकासावर पुरवणी काढायचा प्रस्ताव मी, सुरेश उज्जैनवाल व अनिल जोशी यांनी प्रदीपभाऊंना दिला. त्यांनी होकार देवून सुरेशदादांची मंजुरी मिळवून दिली. अर्थात, काही पोटदुखी मंडळी सुरेशदादांना म्हणत होती, हे तर विरोधात लिहतात. पुरवणी चांगली करतील का ? यावर प्रदीपभाऊंचे उत्तर होते, वो तिनो जो करेंगे वो अच्छा ही होगा. अपने पेपरसे अच्छी पुरवणी वो करेंगे. झाले तसेच आम्ही ८ पानी पुरवणी केली. ४ पाने रंगित व ४ पाने काळी पांढरी. अर्थात, या पुरवणीत स्व. बाहेती यांचा पालिका विरोधातील लेख होता. सुरेशदादांना पुरवणी आवडली. अनिल जोशींनी तेव्हा ३ लाख रुपये पुरवणीचे मागितले व प्रदीपभाऊंनी लगेच चेक दिला. सुरेदादांची आम्हा तिघांना स्वतंत्र भेट द्यायची इच्छा होती. पण प्रदीपभाऊ म्हणाले, त्यांना आवडणार नाही.

आज प्रदीपभाऊंच्या मनात निश्चित काही तरी अस्वस्थता आहे. ते बोलत नाहीत. पण, आगामी काळात ते नक्कीच कठोर निर्णय घेतील. जळगाव मनपा निवडणुकीच्या तोंडावर प्रदीपभाऊ सक्रिय होतील असा अंदाज आहे. प्रचंड क्षमता, संयम आणि काम करुन घेण्याची कुवत प्रदीपभाऊंची आहे. संयमाचा महामेरु म्हणावा असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आजही प्रदीपभाऊच्या सोबत उभा राहणारा वर्ग मोठा आहे. प्रदीपभाऊंच्या पुढील निर्णयांची सर्वांना प्रतिक्षा आहे. एकगोष्ट सांगायला हवी, प्रदीपभाऊंनी काही दिवसांपूर्वी माझी गळाभेट करीत शब्द दिला आहे, मी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्याशी बोलेन आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. प्रतिक्षा आहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याची ...

आज प्रदीपभाऊंचा जन्मदिवस. त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच हे लिखाण आहे. सध्या जळगाव मनपात बेभरवशाची स्थिती आहे. अशावेळी प्रदीपभाऊंच्या नेतृत्वाची गरज जाणवते. प्रदीपभाऊंचा पुढील वर्षाचा वाढदिवस हा जळगावकरांसाठी असावा हीच विनंती आहे ...

1 comment:

  1. साहेब,एकदम बढीया लेख आहे.
    जुन्या आठवणी व राजकीय घडामोडींचा वस्तुनिष्ठ संदर्भ देत आपण लेखातून दिलेल्या शुभेच्छा ह्या जळगावातील पत्रकार,राजकीय विश्लेषक व नवोदित पत्रकारितेतील विद्यार्थी यांच्या अभ्यासासाठी अगदी महत्वपूर्ण ठरतील.

    ReplyDelete