Thursday 7 December 2017

लिमजीचे आनंददायी स्मरण ...

जैन उद्योग समुहाचा कर्मचारी लिमजी जलगाववाला हा सच्चा पर्यावरणवादी कार्यकर्ता होता. त्याच्या स्मृती ताज्या होण्याचे कारण म्हणजे, लिमजी जलगाववालाच्या नावाने जैन उद्योग समुहाने पुरस्कृत केलेल्या पर्यावरण क्षेत्रातील विविध कार्यासाठीच्या पुरस्कारांचे व सन्मानचे वितरण जळगाव येथे दि. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाले. लिमजीच्या निधनानंतर झालेल्या सभेत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी अशा प्रकारचे पुरस्कार देण्याची इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात लिमजीच्या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. हाच प्रसंग लिमजीच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि आनंददायी होता. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर श्री. अशोक जैन यांनी असेही घोषित केले की, लिमजीच्या नावाचे पुरस्कार भविष्यातही सुरु राहतील आणि त्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील निवड करावयाच्या व्यक्ती, समुह याचा दर्जाही उंचावत नेला जाईल.

जळगाव शहरात पर्यावरण क्षेत्रात सर्वच विषयांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक पिढी गेल्या १०/१२ वर्षांत तयार झाली आहे. केवळ वृक्षारोपण किंवा संवर्धन या पलिकडे जावून जल, जंगल, जमीन आणि जनावरे यासह आता स्वच्छता विषयावरही पर्यावरणवादी मंडळी उत्तमपणे काम करीत आहेत. जंगल बचाव, प्राणी बचाव अशी भूमिका घेणाऱ्यांसमोर जंगलवर आमचा हक्क आहे असा दावा करीत संघर्ष करणाऱ्यांनी आव्हान उभे केले आहे. अशा वातावरणात लिमजी सारख्या अभ्यासक पर्यावरणवादी व्यक्तीच्या नावे आज व भविष्यातही पुरस्कार देण्याचे नियोजन केल्याबद्दल श्री. अशोक जैन व वसुंधरा महोत्सव आयोजकांचे आभार मानलेच पाहिजेत. आपल्या उद्योग समुहातील एखाद्या कर्मचाऱ्याच्या नावे एकाच क्षेत्रात ५ पुरस्कार उद्योग समुहाने प्रायोजित करण्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे.

लिमजीच्या नावाने आणखी एक गौरव या महोत्सवात होत आहे. तो म्हणजे, वसुंधरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदा पर्यावरण साहित्य संमेलन होत आहे. त्याचे औचित्य साधून पर्यावरण आणि निसर्गासाठी लिखाण करणारे जेष्ठ लेखक व पक्षी अभ्यासक श्री. मारुती चितमपल्ली यांना लिमजी जलगाववाला वसुंधरा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लिमजीच्या स्मृती नेहमी जागृत ठेवण्याचा हा अनोखा पायंडा कौतुकास्पद आहे.

श्री. अशोक जैन यांच्या भाषणात लिमजीच्या कार्याचा उल्लेख येणे क्रमप्राप्त होते. लिमजी जैन उद्योग समुहात ५/६ वर्षे होता. त्याच्यातील पर्यावरण अभ्यासाचा गुण हेरुन त्याला त्याच्याच आवडीचे काम दिले गेले होते. जैन हिल्स, जैन व्हॅली आणि भाऊंची सृष्टी अशा प्रकारे १,४०० एकर परिसरात विस्तारलेल्या क्षेत्रातील जैवविविधतेचा अहवाल लिमजीने तयार केला होता. जैन उद्योग समुहाच्या या विस्तिर्ण परिसरात ११० पक्षी, २०/२५ प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती, झाडे-झुडपे असल्याचे निरीक्षण लिमजीने अहवालात नोंदले आहे. हा अहवाल पुस्तक रुपात प्रसिध्द करणार असेही श्री. अशोक जैन म्हणाले आहेत.

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलालजी जैन यांनी निसर्गाप्रति वारंवार कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते नेहमी म्हणत, आम्हाला मिळालेली ही निसर्ग संपदा भावी पीढीसाठी आता आहे त्यापेक्षा अधिक समृध्द करुन ठेवा. त्यांच्या या विचारधारेला पूरक ठरणारे लिमजीच्या नावाचे पुरस्कार समाजातील इतर घटकांनाही पर्यावरण रक्षण व संवर्धनास प्रवृत्त करतील या विषयी विश्वास आहे.

लिमजीचे स्मरण करताना योगायोगाने एक आठवाण होते.  सध्या चाळीसगाव तालुक्यात वरखेडे परिसरात एक बिबट्या त्याच्या आहारासाठी नागरी वसाहतीत घुसून माणसांचे बळी घेत आहे. सात जणांना त्याने खाद्य बनविले आहे. या बिबट्याला ठार करण्यासाठी वनविभाग धावपळ करीत आहे. लिमजी विषयीची आठवण याच घटनेशी समांतर आहे. बहुधा सन २०१२ मध्ये यावल व वडोदा या संरक्षित वन क्षेत्रात वाघ अस्तित्वात आहे असा दावा सातपुडा बचाव कृती समिती करीत होती. त्याचवेळी वनविभागाने हा दावा धुडकावून लावत वाघ नाही असे स्पष्ट केले होते. या संभ्रमित वातावरणात वनविभागाने जंगाल क्षेत्रात लावलेल्या छुप्या कॅमेरात वाघीणीचा फोटो क्लिक झाला होता. त्यावेळी लिमजीसह इतर मंडळींनी आनंद व्यक्त करीत वडोदा वनक्षेत्रातील व्याघ्र प्रकल्प मार्गी लागावा म्हणून सरकारी दप्तरी पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर हा विषय नेहमीप्रमाणे पिछाडीला पडला. आता वरखेडे परिसरात वस्त्यांमध्ये बिबट्याने निर्माण केलेली दहशत पाहता जळगाव जिल्हा परिसरात व्याघ्र संरक्षणाचा विषय पुन्हा गंभीरपणे चर्चा करण्याचा झाला आहे. वसुंधरा महोत्सवात यावर चर्चा होणार आहे. त्यातून सरकार दरबारी योग्य दिशेने पाठपुरावा होईल, अशी अपेक्षा करु या. तसे झाले तर ती लिमजीच्या स्मृतीला खरी आदरांजली असेल.

No comments:

Post a Comment