Thursday 9 November 2017

मैत्रिच्या मण्यांमधील धागा ...

अनिल जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना मैत्रीतील दोन- चार गोष्टी लिहायची मनस्वी इच्छा आहे. सन १९९२ पासून अनिल आणि मी घट्ट मित्र आहोत. बहुतांश गोष्टी आम्ही एकमेकांकडे शेअर करतो. तरीही अरे - तुरेचे नाते काही आमच्यात निर्माण झाले नाही. याचे कारण म्हणजे, अनिल यांनी  व्यक्तिशः माझा आदर करणे कधीही सोडले नाही. नोकरीत शिकाऊ असल्यापासून आम्ही सहकारी होतो. वयाने मी मोठा असल्याने अनिल यांना दरडावण्याचा अधिकार मी खूप वेळा वापरला मात्र, अनिल यांनी प्रत्युत्तर न देता नेहमी आदरच केला. नंतर मान सन्मानाच्या पदावरही दोघांनी सोबत काम केले. अनेकवेळा अनिल आणि माझ्यात विवादाचे विषय आले. मी वेळप्रसंगी टोकाचा वागलो. पण अनिल यांनी संभाव्य वाद नेहमी जेवणाच्या टेबलावर मिटवला.
माझ्या स्वभावाच्या विपरित मला "बापू" ही उपाधी अनिल यांनी जोडली. फार थोड्या मंडळींना हे माहित आहे. आजही विक्रेता संघटनेचे पदाधिकारी मला बापू म्हणतात. जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधीजींचे जनमानसातील टोपण नाव "बापू" हे अनिल यांनी मला का दिले ? हे आजपर्यंत समजले नाही. कारण, मी शिघ्रकोपी व तामसी असल्याची जाणिव मला असताना माझा "बापू" म्हणून उल्लेख झाल्यावर मी ओशाळून जात असे हे सत्य आहे. आजही अनिल हे मला "बापू" म्हणतात तेव्हा आजूबाजूची मंडळी दचकून माझ्याकडे पाहते.

अनिल आणि माझ्या मैत्री संदर्भातील अनेक आठवणी मी यापूर्वी शेअर केल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती करायची नाही. नव्या काही गोष्टी सांगायला हव्यात. अनिलचे आणि माझे नाते नेहमी कृष्णार्जुनासारखे राहिले. शब्दांचे बाण समोरच्या टार्गेटवर मारण्याचे धारिष्ट्य माझ्याकडे नक्कीच आहे. अचूक नेम साधणेही मला जमून जाते. पण शब्दांच्या युध्दाची जागा आणि समोरील शहाण्यांना  शब्दांचा मार कितपत द्यावा हे समजून सांगत कुशलतापूर्व सारथ्य करण्याचे भान अनिल यांना आहे. माझ्या आयुष्यातील अनेक चक्रव्युहांचा भेद करताना अनिल यांनी थेट सारथ्य केले आहे.

अनिलच्या आयुष्यातील स्थिरावलेल्या सुखांचा काळ हा अगदी अलिकडचा. सई आणि स्वराच्या कौतुकाचे दिवस आता कुठे सुरु झालेत. पण एक काळ असा होता की, अनिल आणि सौ. निलम हे दोघेही जीवघेण्या आजारातून एकाच वेळी सावरण्याचा प्रयत्न करीत होते. दोघांचेही स्वास्थ ढासळत होते आणि मित्र म्हणून आम्ही चिंतित होत असू. आजारपणाने अनिलला एका पायाचे कायम स्वरुपी दुखणे दिले तर वहिनींच्या चेहऱ्यावरील हास्य बराच काळ लोपले होते. असाच काहीसा काळ मी सुध्दा कौटुंबिक पातळीवर अनुभवला. बऱ्याचवेळा मी आणि अनिल या अडचणींवर बोलत असू. माझ्या डोळ्यांत पाणी लवकर येत नाही मात्र अनिल हे वहिनींविषयी बोलताना डोळे पाणावत.

आता मात्र मुलांच्या कौतुकाचे दिवस आहे. सॉफ्ट बॉल खेळात सई आंतराष्ट्रीय स्तरावर खेळते आहे. दुसऱ्यांदा परदेशात जाण्याच्या तयारीत ती आहे. अनिल आणि वहिनींसह आमच्या सर्वच मित्र परिवाराला सईचे कौतुक आहे. सईच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर दीड - दोन लाख रुपये खर्च करू शकणारा एक संवेदनशिल पिता मी अनिल यांच्यात अनुभवला. अर्थात, वहिनींचा तेवढाच महत्त्वपूर्ण पाठिंबा आहे.

अनिल कौटुंबिक संबंध जपणाराही आहे. आई - वडील शिंदखेडा येथे असताना दोघेही त्यांच्या सतत संपर्कात होते. वडीलांच्या स्वर्गवासानंतर आई जळगावात आली. अनिलची बहिण आणि पाहुणे हेही जळगावातच आहेत. सासू, सासरेही जळगावातच आहेत. त्यामुळे परिवाराचा गोतावळा अधुनमधून जमलेला असतो. वडीलांनी परंपरा म्हणून पाळलेले सण - उत्सव साजरे करायची जबाबदारी आता अनिल यांचीच. त्यातलाच एक दरवर्षीचा परिपाठ म्हणजे तुळशीचे लग्न हा विधी. वर्षभरात अशाच दोन - चार निमित्ताने अनिल यांच्याकडे जाणे होते.

माझ्या आयुष्यातील एक गंमतशीर अध्याय हा अनिल जोशींमुळे लिहिला गेला आहे. तो म्हणजे आमच्या मैत्रिच्या परिघात मैत्रिणींचा सहभाग वाढविण्याचे कार्य जोशींनी केले. मी स्वभावाने खडूस असल्याने सोबत असलेल्या महिला सहकारी थोड्या लांबच असत. अशावेळी सामाजिक क्षेत्रातील यशस्वी व नावलौकिक असलेल्या महिलांशी ओळख करुन मैत्री करणे माझ्यासाठी अशक्य होते. याचे घरगुती उदाहरण सांगतो. सौ. सरोज पत्नी आहे पण तिला कोणी जर विचारले की, तुम्ही तिवारींची मैत्रिण होणार का ? तर तिचा हमखास नकारच असेल. असे हे वास्तव आहे. ते असो. पण अनिल यांनी समाजातल्या मान्यवर मैत्रिणींशी सलोख्याचा व्यवहार करण्याची संधी मला मिळवून दिली. महिला वर्गासाठी आम्ही आयोजित केलेल्या एका अभिनव कार्यक्रमाच्या निमित्ताने !

केवळ मैत्रिणीच नाही तर जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम यशस्वी मान्यवरांना माझे मित्र करायचे श्रेय सुध्दा अनिल यांना आहे. या मैत्रीत सर्वच सामाजिक घटक आहेत. दोन महिन्यांपूर्वी माझा अर्धशतकी वाढदिवस साजरा करताना आवर्जून आलेले १०० टक्के मित्र हे अनील जोशींच्या सोबत माझेही मित्र झालेले होते आणि आजही आहेत. अनिलने मैत्री करणे आणि ती निभावणे हे माझ्यासह इतरांनाही शिकवले. मित्र भरपूर असतात. मात्र आपत्तीच्या काळात मित्राला निभावून पुन्हा उभे करणारे मोजकेच असतात. अशा मित्रांचा परिवारच अनिल यांनी उभा केला. मित्रांच्या मण्यांना अनिल नावाच्या धाग्याने गुंफून ठेवले आहे.

अनिल आणि त्यांच्या सोबतच्या ५/७ मित्रांचे एक सर्कल आहे. ही मंडळी प्रत्येक मित्राचा वाढदिवस आवर्जून एकत्रितपणे साजरा करतात. कधी तरी चुकून माकून माझी या सर्कलशी भेट होते. आमचे हे सामाईक मित्र आपापल्या क्षेत्रात लाखो आणि कोटींचे आहेत. पण आमच्यातील मैत्रिचा धागा अनमोल आहे. अनिल माझ्यासाठी तरी त्या धाग्याच्या रुपाने अस्तित्वात आहे. बहुधा यालाच ऋणानुबंध म्हणतात.

अनिल जोशींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! दीर्घायुषी तर तो आहेच.

3 comments:

  1. Excellent dilipji ,Anil is always great friend and we all r proud of him

    ReplyDelete
  2. तिवारीजी, छान व्यक्त झालात. मैत्रीचा मण्यांचा हार अश्या अदृष्य धाग्यांनीच अस्तित्वात येतो. त्याचं महत्व जाने जाणलं तो जाणकार. अनिलजींना आभाळभर शुभेच्छा !

    ReplyDelete
  3. सर, तुमच्या मैत्रीच्या मण्यांमधील धागा दिवसेंदिवस मजबूत होत राहो़
    अनिल जोशी सरांना खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete