Monday 27 November 2017

ना. गिरीषभाऊ ! टू राईट अॉर नॉट राईट ?

संपूर्ण राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प करुन वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन आणि त्यांची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या संकल्पनेचे मूळ जनक ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने व विक्रमी शल्यचिकित्सक डॉ. रागिनी पारेख हे दोघेही दिवसाला २०० वर रुग्णांचे मोतीबिंदू काढत आहेत. ज्येष्ठ व सर्वांत बुजूर्ग समाजसेवक अण्णा हजारे यांनी ना. महाजन यांच्या आरोग्य महाशिबिर आयोजनाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

ना. महाजन यांच्या जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांची पुनःश्च निविदा कार्यवाही करुन संभावित खर्चात बचत करणाऱ्या निविदा मंजूर केल्या आहेत. असे सारे काही अॉल ईज वेल असताना ना. महाजन यांच्याकडून सार्वजनिक जीवनात होणारे एखादे वर्तन नवनव्या वादांना जन्म देणारे ठरते आहे. म्हणूनच, ना. गिरीषभाऊ ! टू राईट अॉर नॉट राईट ? असा प्रश्न पडतो.

या इंग्रजाळलेल्या वाक्याचे शुद्ध मराठी भाषेत दोन अर्थ होतात. दोन्ही अर्थ ना. गिरीषभाऊंच्या वर्तनास चपखल बसतात. पहिला अर्थ हा की, ना. गिरीषभाऊ आपणावर टीका करणारे लिहावे की न लिहावे ? अर्थात, तटस्थपणे लेखनाचा धर्म पाळायचा असेल तर ना. गिरीषभाऊ आपण चुकला आहात, हे ठणाकावून लिहावेच लागेल. या शिवाय दुसरा अर्थ हा की, ना. गिरीषभाऊ हे योग्य आहे की अयोग्य आहे ? अर्थात, जे अयोग्य आहे ते अयोग्यच लिहावे लागेल.

चाळीसगाव तालुक्यात जवळपास दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. ही बाब जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी मंडळींसाठी आनंद देणारी आहे. खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्याला लागून असलेल्या वन विभागात टायगर कॅरिडॉर मंजूर व्हावा म्हणून गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहे. याच परिसराशी लागून असलेल्या जळगाव शहरालगतच्या शिरसोली भागातही बिबट्याचा वावर आढळून आला आहे. तशा नोंदी सुध्दा आहेत.

यावल, रावेर आणि चोपडा या तालुक्यांमधील वन क्षेत्रात आदिवासींना वन हक्क कायद्यानुसार जमिनीचे तुकडे बहाल करताना बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांच्या वावराचे क्षेत्र कमी कमी होत आहे, या समस्येकडे कोणाचेही लक्ष नाही. या मागील एक कारण म्हणजे, व्याघ्र गणना कालावधीत उपरोक्त वन परिसरात वाघ, बिबट्या वावरतो याच्या ठोस पाऊलखुणा मिळत नाहीत. त्यामुळे वन्यजीव संरक्षकांचा आवाज क्षीण असतो व वन जमिनींवर दावे करणारे जोषात असतात. असो. हा आज लेखाचा विषय नाही.

विषय आहे तो, बिबट्याचा वध करण्यासाठी ना. गिरीषभाऊ महाजन यांनी हाती धरलेल्या पिस्तुलचा. चाळीसगाव तालुक्यातील जंगल परिसरात वावरणाऱ्या बिबट्याने अगदी कालपर्यंत सहा मानवी बळी घेतले. पशू पक्षांचेही बळी आहेतच. चाळीसगाव तालुक्यातील किमान २०/२२ गावांतील ग्रामस्थ बिबट्याच्या हल्ल्यामुळे भयभित आहेत. या ग्रामस्थांनी वन विभागाकडे गाऱ्हाणे मांडून बिबट्यासाठी दिसेल तेथे गोळी झाडा हा आदेश मिळवला आहे. तशी कार्यवाही सुरु झालेली आहे. या अंतर्गत काल दि. २७ नोव्हेंबर २०१७ ला बिबट्याच्या शोधाची व्यापक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ना. गिरीषभाऊ सहभागी झाले. त्यांची ही कृती दिलखुलास स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट करणारी आहे.

बिबट्याच्या शोध मोहिमसाठी मंत्री, आमदार व कलेक्टर यांनी कुरुक्षेत्रावर जाणे समजू शकतो. पण बिबट्याला शोधण्यासाठी झाडांच्या जाळीत मंत्री महोदयांनी हाती पर्सनल पिस्तुल घेवून डोकावणे हे कितपत योग्य आहे ? बिबट्याला ठार मारायचे आदेश वनविभागाला आहेत. त्यामुळे कोणीही हाती पिस्तुल घेवून बिबट्याच्या शिकारीसाठी बाहेर पडणे, हा तसा कायदेशीर मुद्दा आहे. येथे ना. गिरीषभाऊ यांच्या पिस्तुलद्वारे शूट करण्याच्या कौशल्यावर शंका नाही. ना. गिरीषभाऊ बऱ्याचवेळा राजकीय नेम अचूक धरुन गोळी झाडतात व इतर विरोधकांना गारद सुध्दा करतात. पण माणसावर धरायचा नेम आणि बिबट्यावर धरायचा नेम यात फरक आहे. विरोधात माणस असली तरी त्यांना माहिती आहे की, ना. गिरीषभाऊ मंत्री आहेत. बिबट्यावर नेम धरला तरी बिबट्याला कुठे माहित असते की, समोर मुख्यमंत्र्यांचा मित्र व आवडता मंत्री आहे म्हणून ? शिवाय माणसे मारायचा कायदा हा वन्यजीव मारण्यापेक्षा सौम्य आहे.

ना. गिरीषभाऊंनी शोध मोहिमेत सहभाग घेतला व हाती पिस्तुल घेवून भटकंती केली. याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ते पाहत असताना मनांत वारंवार प्रश्न होता की, या स्टंटची खरेच गरज होती का ? आणि याचेच उत्तर आहे, ना. गिरीषभाऊ ईट ईज नॉट राईट (वर्तणूक म्हणून) आणि दुसरेही उत्तर आहे, ईट हैज टू बी राईट (पत्रकार म्हणून हे लिहिलेच पाहिजे)

बऱ्याच दिवसांनी कमरेला पिस्तुल लावलेले ना. गिरीषभाऊ काल दिसले. नंतर हाती पिस्तुल घेवून बिबट्याला शोधणारे सुध्दा भाऊ दिसले. हेच पिस्तुल कमरेला लावून भाऊ शाळेतील कार्यक्रमात गेले होते. पिस्तुल बाळगण्याच्या या भाऊंच्या हौसेचे समर्थन मुख्यमंत्र्यांनी सुध्दा केले आहे. ना. गिरीषभाऊंच्या उत्साहात अशा अनेक घटना तात्कालिक प्रसिध्दी देणाऱ्या असल्या तरी त्या मंत्रीपदाची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या आहेत.

ना. गिरीषभाऊ टपरीवर उभे राहतात, जामनेर शहरात बुलेट चालवतात, जळगावात मोटारसायकलवर फिरतात, राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहन बाजूला करायला ड्रायव्हर होतात, नंदुरबारला-जामनेरात मिरवणुकीत लेझीम खेळतात, अपघातग्रस्तांना मदत करतात, मुलाने बेवारस सोडलेल्या असहाय्य वृद्धेला रुग्णालयात पाठवतात, दारुच्या नावाविषयी वाद ओढवून घेतात असे अनेक विषय ना. गिरीषभाऊंच्या सार्वत्रिक वर्तणुकीतून चर्चेत आले आहेत. याला काहींचा पाठींबा, समर्थन आहे तर विवेकी व विचारी लोकांचा विरोध आहे.

एक पत्रकार म्हणून व्यक्तिशः मला ना. गिरीषभाऊंचा बिबट्या शिकारीचा स्टंट काही पटलेला नाही. शूट ॲट साईट असा आदेश न्याय व्यवस्थेने दिल्यानंतर जर मंत्रिमंडळ हातात बंदुका व पिस्तुले घेवून रस्त्यावर येणार असेल तर तालिबानी राजवट आणि भगवी राजवट यात फरक तो काय ??

2 comments: