
खिचडीला राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करण्याचा हा उतावळेपणा प्रथमतः हिंदी व इंग्रजी माध्यमे व नंतर मराठी माध्यमांनी केला. वास्तविक दिल्लीत होणाऱ्या महोत्सवाचे नाव वर्ल्ड फूड इंडिया असे आहे. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे, जगाला ओळख करुन देण्याचा भारतीय खाद्यपदार्थ खिचडी असा होतो. संपूर्ण भारतातील विभिन्न लोकजीवनात तांदूळ आणि मूग वापरुन तयार केली जाणारी खिचडी हे सामायिक व सामुहिक अन्न आहे. शालेय विद्यार्थ्यांना नियमित हजेरीसाठी माध्यान्ह भोजन म्हणून खिचडी वाटप सुरु झाल्यापासून हा पदार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. हे सुध्दा तेवढेच खरे आहे.
भारतात प्रमुख खाद्य म्हणून खिचडीला प्राधान्य दिले जाते. आरोग्यासाठी खिचडी पोषक असते. भारतात गरीबांपासून अतिश्रीमंत लोकांमध्येही खिचडी हा खाद्यपदार्थ लोकप्रिय आहे. हा धागा पकडून अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने वर्ल्ड फूड इंडीया महोत्सव आयोजित केला आहे. या अंतर्गत सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना ग्रेड इंडिया फूड स्ट्रीटचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वात इतर ५० शेफ आज खाद्यदिनी दि. ४ नोव्हेंबरला ८०० किलो मुगाची खिचडी तयार करणार आहेत. या खिचडीचा स्वाद भारतातील विदेशी राजदूत आणि पर्यटकांना दिला जाणार आहे. अशा प्रकारे भारतीय अन्न म्हणून खिचडीची ओळख जगाला करुन दिली जाणार आहे. अर्थात, हा विक्रम गिनीज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला जाईल. या प्रक्रियेत कुठेही खिचडीला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करण्याचा संदर्भ नाही. पण, माध्यमातील भाषांतरकारांनी वर्ल्ड फूड इंडियाचे रुपांतरण किंवा ब्राण्ड इंडिया फूडचे भाषांतर भारतीय विशेष खाद्यपदार्थ ऐवजी थेट राष्ट्रीय अन्न खिचडी असे करुन टाकले. तशा बातम्या चैनल, वेब पोर्टल व सोशल मीडियात व्हायरल झाल्या. विदेशात असलेल्या खान्देशींनी खिचडीच्या या संभाव्य दर्जाबद्दल आनंद व्यक्त करुन भारतातील नातेवाईक व मित्रमंडळींचे अभिनंदनही करुन टाकले. अशा प्रकारे सोशल मीडियात खिचडीची अफवा शिजली.
खिचडीच्या अफवेमुळे एक गोष्ट चांगली झाली की, या खाद्यपदार्थाकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष वेधले गेले. अकबर आणि बिरबलच्या कथेतील न शिजणारी खिचडी बहुतांश लोकांना माहिती आहे. वेगळ्या विचारांचे दोन-चार जण एकत्र आले की ते सुध्दा विचार व कृतीची वेगळी खिचडी पकवतात (हिंदी शब्द पकाना म्हणजे शिजविणे)
भारतीय समाज खिचडीकडे पूर्णान्न म्हणून पाहतो. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाच्या घरात मुगाची खिचडी शिजवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. डाळ, तांदूळ आणि मसाले वापरुन खिचडी तयार होते. मुगाची खिचडी ही पौष्टिक तर आहेच शिवाय चविष्ट, कमी वेळेत आणि खर्चात तयार होते.
खिचडी विषयी इंटरनेट मीडियात शोध घेतला असता अनेक प्रकारची रंजक माहिती समोर येते. भारतीयांसाठी खिचडी हे जसे सामान्य खाद्य आहे तसेच ते वेगवेगळ्या सण-उत्सव प्रसंगी तयार करण्याचे विशेष व पवित्र खाद्य सुध्दा आहे. मकर किंवा तीळ संक्रांतीला बहुतांश भारतीयांकडे खिचडी शिजवली जाते, हे त्याचे उत्तम उदाहरण. इतिहास संशोधक मोहसिना मुकादम यांनी खिचडीला अति प्राचिन लोक खाद्य म्हटले आहे.
मकर संक्रांत आणि खिचडीचा संबंध काय ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर दंतकथा समोर येते. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे मकर संक्रांतीला खिचडी मेळा (खिचडी पर्व) लागतो. या मागे दंतकथा आहे. भगवान शंकराचे रूप असलेले नाथ संप्रदायातील बाबा गोरखनाथ यांनी खिचडी तयार करायला प्रारंभ केला. भारतावर जेव्हा अल्लाउद्दिन खिलजीने आक्रमण केले तेव्हा लढवय्या नाथ जोगी संप्रदायाने त्याला विरोध केला. खिलजीच्या सैन्याशी लढत नाथ योगी हे थकून जात. त्यांना भोजन तयार करुन खाण्यास वेळ मिळत नसे. उपाशी पोटी त्यांना लढावे लागे. त्यामुळे त्यांनी झटपट शिजणाऱ्या खिचडीचा वापर सुरु केला. बाबा गोरखनाथ यांनी मूगडाळ, तांदूळ व काही भाज्या एकत्र करुन खिचडी शिजवली. हा खाद्यपदार्थ लढवय्या नाथ जोगींना आवडायला लागला आणि त्यांना शारीरिक श्रमासाठी पोषक आन्न घटकही मिळू लागले. याच गरजेतून खिचडीचा जन्म झाला व पिढीजात ती पुढे सरकत राहिली. बाबा गोरखनाथ यांनीच या खाद्यपदार्थाला खिचडी हे नाव दिले. म्हणून गोरखपूर येथे बाबा गोरखनाथ यांच्या मंदिराजवळ दरवर्षी मकर संक्रांतीला खिचडी मेळा लागतो. बाबा गोरखनाथसह सूर्यालाही खिचडीचा भोग लावला जातो.
आचार्य चाणक्य यांनी सुध्दा उत्तम स्वादाची खिचडी तयार करण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. सभ्य लोकांसाठी संतुलित आहार म्हणजे खिचडी असे स्पष्ट करुन चाणक्य म्हणतात, १.४ पाऊंड (साधारणतः तीन भाग) तांदूळ, याच्या चौथा भाग मूगडाळ घ्या. या साहित्याच्या ६२ अशापैकी एक भाग तेल अथवा तूप आणि एक भाग मीठ घेवून खिचडी शिजवा. अशा प्रकारे शिजवलेले अन्न हे संतुलित आहार आहे.
वैदिक काळातील लेखनातही खिचडीचे संदर्भ आढळतात. त्या खिचडीचा उल्लेख खिक्का असा आहे. त्याचे वर्णन तांदूळ आणि मूगडाळ मिळून केलेला खाद्यपदार्थ असा आहे. पूर्वी खिचडी तयार करताना तीत दूध व दही टाकत असाही उल्लेख आहे.
मोगलांच्या काळात खिचडी हा खाद्यपदार्थ विजय साजरा करण्याचे प्रतिक होते. खाद्यपदार्थांचे इतिहास संशोधक पुष्पेश पंत यांच्या संशोधनानुसार शहजादा सलिम हा गुजरातकडील मोहिम फत्ते करुन आल्यानंतर बादशाह अकबरने दरबारातील सर्वांना लझिझन खिचडी खाऊ घातली होती.जहाँगिरला तिखट व मसालेदार खिचडी आवडत असे. तिलाच लझीझन खिचडी म्हणत. यात एक खिचडी केशर, बदाम, काजू, पिस्ता व शाही मसाला टाकून तयार होत असे. जहाँगिरच्या खिचडी प्रेमाचा हा संदर्भ रशियन प्रवासी व्यापारी अथनासियस निकीतीन यांच्या लेखातही आहे. हा दस्तावेज १४ व्या शतकातील आहे. मोगल कालिन इतिहासकार अबू फझल याने एन ए अकबरी ग्रंथात अकबराच्या राजेशाही स्वयंपाक घरात विविध प्रकारच्या खिचडी तयार होत असे म्हटले आहे. १४ व्या शतकात भारत प्रवासावर आलेला मोराक्कन प्रवासी बटुटा याने लिहून ठेवले आहे की, भारतीय लोक रोज खिचडीचा नास्ता करतात. डाळ व तांदूळ शिजवून त्यावर तूप टाकून खातात. बादशाह औरंगजेब खानपान बाबत चौकस होता. त्याने स्वतः लक्ष घालून आलमगिर खिचडीचा फॉर्मुला तयार केला. यात मासे आणि उकडलेली अंडी असत.
१६ व्या शतकातील फ्रेंच प्रवासी जेन बापतिस्ते यांनी सुध्दा खिचडीचा उल्लेख सायंकाळचे खाद्य म्हणून केला आहे. भारतावर ब्रिटीश अंमल असलेल्या काळातही खिचडी लोकप्रिय होती. आतापर्यंत इंग्लण्डमध्ये सकाळी नास्ता म्हणून अंडी, मांस मिश्रीत खिचडी खाल्ली जाते. १९ व्या शतकात लखनऊचा नबाब नसर उद्दीन शहा याच्याकडे खिचडी शिजवणारा रकाबदार हा खास खानसामा होता. तेव्हा पासून खिचडीचा लखनवी पाहुणचार म्हणजे खिचडी, दही, पापड आणि लोणचे असा होता. हैद्राबादच्या निजामाने मांस (खिमा) मिश्रित खिचडी तयार केली आहे.
खिचडी विषयी आणखी एक रंजक माहिती अशी की, भारतीय राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून खिचडीला मान्यता देण्याचाविषय बारगळला असल तरी इजिप्त या देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून खिचडीला मान्यता आहेच. तेथे १० व्या शतकापासून खिचडी संदर्भातील नोंदी उपलब्ध आहेत. खिचडीत तांदूळ, डाळसोबत विशिष्ट प्रकारच्या शेवया (मैकेरोनी) सुध्दा टाकतात.
भारतात प्रांतनिहाय खिचडीचे प्रकार असून तिच्यासोबत खाण्याचे उपपदार्थही वेगवेगळे आहेत. गुजरातमध्ये खिचडीसोबत गुजराती गोड, तिखट कढी असते. तामिळनाडूत पोंगल सण साजरा करताना खिचडीसोबत तूप असते. हिमाचलप्रदेशात खिचडीत काबुली चना व सोयाबिन टाकतात. कर्नाटकमध्ये चिंच, गूळ, खोबरे, हंगामानुसार भाजी व कढीपत्ता घालतात. पश्चिम बंगालमध्ये दूर्गापुजा प्रसंगी नैवेद्याची खिचडी तयार करतात. तीत भाज्या व इतर खाद्य पदार्थांचे मिश्रण टाकतात. घरगुती पाहुणचारात खिचडी सोबत मासेही असतात. काश्मीरातही धार्मिक उत्सवात खिचडी शिजवतात. महाराष्ट्रात खिचडी साधी आणि मसाल्याची असते. बटाटा, शेंगदाणा आणि वटाणा टाकून खिचडी करतात.
भारतीय खिचडीला सातासमुद्रापार नेण्याचे कार्य कृष्णभक्तांच्या इस्कॉन या संप्रदायातील मंडळींनी केले. मुगाच्या पौष्टीक खिचडीचा फॉर्मुला त्यांनी तयार केला. अनेक ठिकाणी इस्कॉनतर्फे खिचडी वाटप केले जाते.
खिचडी पुराण भारतीय राजकारणातील खिचडी सरकारे ता फॉर्म्युल्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. विभिन्न विचारांचे राजकीय नेते केवळ सत्ताप्राप्तीसाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा खिचडी सरकार तयार होते. असे सरकार हे कोणतेही नैतिक बंधन, तत्व वगैरे पाळत नाही. तेथे फक्त संधीसाधुपणा हाच ऐकमेव गुणधर्म असतो.
वा..!! खिचडीची खिचडी जबरदस्त शिजली आहे. नाटकानंतर कलाकारांसाठी कढी खिचडी हे आवडते खाद्य आहे...!
ReplyDelete