Monday 30 October 2017

दोन मंत्र्याच्या ... दोन तऱ्हा ... !!

राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन सध्या द ग्रेट शो मैन ठरले आहेत. जळगाव, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हास्तरावरील आरोग्य महा शिबिरे आयोजित करुन सर्व सामान्य घटकातील रुग्णांना रोगमुक्त करण्याचा एक अभिनव उपक्रम महाजन यांनी गेले वर्षभर सुरु ठेवला आहे. महाजन यांच्या सोबतच्या मंडळींचे सहकार्य घेवून राज्याच्या पुरवठामंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी सुध्दा बीड येथे जिल्हास्तरावरील महा शिबिर घेतले. आता तालुकास्तरांवरील शिबिरांना प्रारंभ झाला आहे.

महाजन हे आज मंत्री पदावर असले तरी ते आमदार असल्या पासून शो मैन आहेत. जामनेर शहरात टपरीवर भेटणारा आमदार म्हणून घ्यायला त्यांना आवडते. दुचाकी बुलेट पळवून ते स्वतःला बुलेट मैन म्हणवून घेतात. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाजन स्वतः ट्रक ड्रायव्हर होतात. कमरेला पिस्तूल लटकावून गन मैन म्हणत स्वतःवर टीका ओढवून घेतात. अपघातातील जखमींना रुग्णालयात पाठवताना रोड साईडर मसिहा बनतात. अशा कित्तेक रुपात महाजन यांना पाहिले आहे. विरोधी पक्षात असताना कापसाच्या दरासाठी प्रदीर्घ काळ उपोषण करणारे आमदार म्हणून महाजन यांना महाराष्ट्र ओळखतो. जलसंपदा विभाग हा वर पासून खालपर्यंत भ्रष्ट असल्याचे खळबळजनक विधान त्याच खात्याचे मंत्री महाजन करतात. प्रकल्पांचे ठेके पुढे सुरु राहावेत म्हणून मला लाच द्यायचा प्रयत्न झाला असे जाहिरपणे सांगून महाजन स्वतःच टीकेचे धनी ठरतात. असे एकूणच मसालेदार व्यक्तिमत्व असलेले महाजन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील द ग्रेट शो मैन ठरले आहेत. ते कसे हेही पाहू.

सरकारी पातळीवर अधिकारी वर्ग लोकशाही दिन आयोजित करतात. जिल्ह्यातील जनता आपापल्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून न्याय मिळण्याची अपेक्षा करते. अशा प्रकारचे लोकशाही दिन हे ठोकळेबाज होवू लागले आहेत. तक्रारदाराला न्याय देण्याच्या ऐवजी लालफितीत बंद फाईल वरील केवळ लेखी खुलासे देणे म्हणजे लोकशाही दिन असा समज बहुतांश सरकारी यंत्रणांचा होतो आहे. अशाही यंत्रणेत जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या सारखा वेगळ्या वाटेने जाणारा अधिकारी असतो. लोकशाही दिनी तक्रारदारांपर्यत पोहचून त्यांच्या समस्या सोडवतो.

महाजन यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना जनता दरबार भरविण्याचा अभिनव आणि मेगा इव्हेंट पार पाडला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण (ग्रामपंचायत असलेली गावे) आणि शहरी (मनपा व पालिका असलेली शहरे) जनतेला आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी एक संपूर्ण दिवस महाजन यांनी दिला. तब्बल नऊ तास एका जागेवर बसून महाजन यांनी नाशिक जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यावर तेथेच निर्णयात्मक भूमिका घेतली. पहिला जनता दरबार दि. ३० अॉक्टोबरला पार पडला. यात जवळपास २०० वर विषयांचा निपटारा झाला. अजून इतर ठिकाणीही महाजन यांचा जनता दरबार होणार आहे.

या जनता दरबारसाठी महाजन यांनी अभिनव पध्दत अवलंबली. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जनतेला स्वतंत्र कक्षात प्रश्न, तक्रारी सादर करायचे आवाहन केले गेले. तेथे नोंदलेल्या तक्रारींवर महाजन यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. तेथे महसूल आयुक्तासह सर्व सरकारी यंत्रणांचे प्रमुख हजर होते. त्यामुळे महाजन यांनी निर्णय जाहीर करताना संबंधिताशी समोरासमोर चर्चा झाली. जनतेला निर्णय सत्वर झाल्याचे समाधान मिळाले. आता यापुढे त्या निर्णयांची अंमलबजावणी होण्याकडेही महाजन यांना लक्ष द्यावे लागेल.

महाजन यांच्याकडे नाशिकसह नंदुरबार जिल्ह्याचे सुध्दा पालकमंत्रीपद होते. नंदुरबार-धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर त्यांना नंदुरबारचे पालकमंत्रीपद दिले गेले. मात्र महाजन हे ज्या जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्या जिल्ह्यात कार्यक्षम पालकमंत्री देण्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे सातत्याने दूर्लक्ष होत आहे. सात आमदार, दोन खासदार, जिल्हा परिषदेसह अनेक पंचायत समित्या, पालिका व ग्रामपंचायती भाजपला देणाऱ्या जळगाव जिल्ह्यासाठी पालकमंत्री मात्र अनिवासी आहे. सरकारमध्ये मंत्री असताना एकनाथराव खडसे पालकमंत्री होते. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतर पांडुरंग पुंडकर हे पालकमंत्री झाले. पण त्यांचे दर्शन दुर्लभ असल्याने त्यांना बदलून चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री झाले. पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार जळगावात आहे. बहुधा या मित्र परिवाराकडून योग्य तो फॉलोअप घेवून पाटील जिल्ह्याचे प्रश्न सोडवतील असे वाटत होते. पण पाटील हे तब्बल दोन, तीन महिन्यांनी जळगाव जिल्ह्याकडे फिरकत आहेत, असा इतिहास नोंदला जातोय. त्यामुळे जळगावचे प्रश्न सुटण्याऐवजी प्रलंबित राहत असल्याचा अनुभव आहे. पाटील यांना फिडबैक देणारी यंत्रणा सुस्तावल्याचेही दिसते आहे. जेव्हा एखादा पालकमंत्री निष्क्रिय असल्याचे लक्षात येते तेव्हा त्या जिल्ह्यात बाबुगिरी करणाऱ्यांचे फावते. अधिकारी वर्ग हा इतर लोकप्रतिनिधींवर भारी पडतो. जळगाव जिल्ह्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींची सध्या अशीच अवस्था आहे.

जळगाव शहरातील प्रश्न, व्यापारी गाळ्यांचे प्रश्न, मनपाला मिळालेल्या २५ कोटींचा खर्च, समांतर रस्ते व चौपदरीकरण, नाट्यगृह अपूर्ण बांधकाम, पारोळा तालुक्यातील पाणी टंचाईसह संभाव्य दुष्काळीस्थिती, शहरी व ग्रामीण रस्ते, आरोग्य सेवेचे प्रश्न असे कितीतरी विषय पेंडींग आहेत. संपूर्ण जळगाव शहर डेंग्यू व चिकनगुनियाच्या विळख्यात आहे. मनपाची यंत्रणा पूर्णतः निष्क्रिय ठरली आहे. अशा वातावरणात पालकमंत्र्यांनी विशेष सभा घेवून मिशन म्हणून जळगाव शहर रोग मुक्त करायला हवे. पण पालकमंत्र्यांना जळगावसाठी वेळ नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन आहेत. ते सुध्दा जळगाव शहराराठी आरोग्य यंत्रणेला कामाला लावू शकतात.

आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील मतदारांनी एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा. ज्या भाजपला भरभरुन बहुमत दिले, त्याच जिल्ह्याची सरकार दरबारी उपेक्षा करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. जे सरकार स्थानिक मंत्र्याला पालकमंत्री करु शकत नाही, ते सरकार जळगाव जिल्हावासियांना उपऱ्या आणि पुरेसा  वेळ न देणाऱ्या मंत्र्याच्या पदरी बांधून मतदारांची उपेक्षा करीत आहे. या प्रवृत्तीला धडा शिकवायची जागा म्हणजे ईव्हीएम मशीनची रुम असणार आहे. तेथे काय करायचे हे लिहायला हवे का ??

No comments:

Post a Comment