Saturday 28 October 2017

शरद पवार नेहमीच खरे बोलतात !

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले अभ्यासू, अनुभवी, लोकप्रिय आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले आणि अलिकडे जाणता राजा म्हणून लौकिक लाभलेले शरश्चंद्र तथा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बालिश मुख्यमंत्री अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षांत महाराष्ट्रातील निवडणुकांच्या राजकारणात फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने पवार कुटुंबियांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार धोबीपछाड दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार यांच्या ताब्यातील अनेक गढ्या या फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने काबिज केल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्या आडून टीका करताना मुख्यमंत्री पदावरील व्यक्तिस बालिश म्हटले आहे.

दोन-तीन वर्षे वय असलेले बालक उभे राहायला, चालायला आणि धावायला शिकले की घरात फिरताना इकडे तिकडे लघुशंका करीत असते. कधीकधी अशा बालकाला कोणी पाहुण्याने कौतुकाने कडेवर घेतले तर बालक हमखासपणे पाहुण्याच्या अंगावर लघुशंका करते. तेव्हा अंगावरील कपडे ओले झाले तरी कोणताही पाहुणा त्या बालकावर रागवत नाही. कारण तेव्हा तो लघुशंका करणारा बालक हा पाहुणे व पालकांच्या दृष्टीने बालकच असतो. बालबुध्दीचा असतो. बालिश असतो.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशाच प्रकारची एक घटना आहे. पवार यांच्या कुटुंबातील एका राजकीय नेत्याने पाणी टंचाईच्या मुद्द्यावर बोलताना, आता धरणात जावून मुतायचं का ? असा जाहीर प्रश्न केला होता. खरे तर ती कोणती बुध्दी होती ? हा सारा प्रकार पाहुनही पवार यांनी आपल्या नातेवाईकाला बालिश हा शेलका शब्द वापरला नव्हता. पण, फडणवीस यांच्या संदर्भात खोचक शब्दांचा वापर करण्याची परंपरा गेले तीन-साडेतीन वर्षे पवार पाळत आहेत.

पवार हे फडणवीस यांच्यावर टीका करताना नेहमी विसरतात, की फडणवीस हे लोकशाही पध्दतीने मुख्यमंत्रीपदावर पोहचलेले भाजपचे निष्ठावंत राजकारणी आहेत. या वास्तवाकडे बहुधा पवार जाणुन बुजून दुर्लक्ष करताना दिसतात. फडणवीस यांना टीकेसाठी टार्गेट करताना पवार कशाचा विखार किंवा विषाद मनात बाळगत असावेत ? हा प्रश्न पडतो. याचे एक सुस्पष्ट कारण आहे, ते म्हणजे पवार यांना फडणवीस हे विशिष्ट जातीचे किंवा समाजाचे असावेत याचा सतत राग येत असावा. पवारांच्या अनेक वक्तव्यांची सुसंगती लावली तर हा तर्क योग्य असल्याचे दिसते.

येथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, पवार यांचे वय आणि अनुभव याची तुलना फडणवीस यांचे वय आणि अनुभवाशी केली तर पवार यांच्या समोर फडणवीस हे बालकच आहेत. इतिहासाच्या पानांतील नोंदी या गोष्ट स्पष्ट करतात. पवार हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले तो दिवस होता, दि. २२ फेब्रुवारी १९६७. फडणवीस हे आयुष्यातील पहिली निवडणूक नागपूर मनपात नगरसेवक म्हणून जिंकले. तो दिवस होता, दि. २२ फेब्रुवारी १९९२. हे दोघेही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एकही निवडणूक हरलेले नाहीत. पवार यांची राजकीय कारकीर्द ५० वर्षे पूर्ण करीत आहे तर फडणवीस यांची कारकीर्द २५ वर्षे पूर्ण करीत आहे. पवार यांच्यापेक्षा फडणवीस यांचा अनुभव निम्माच आहे. अशावेळी पवार जर फडणवीस यांना बालिश म्हणत असतील तर पवार खरेच बोलत आहेत.

पवार यांचे राजकारण समाजवादी आणि पुरोगामी मानले जाते. असे असले तरी पवार यांचा मनांतील रोष नेहमी विशिष्ट जात व समाजाविषयी राहिलेला आहे. हा रोष व्यक्त करताना पवार भाषा शेलकी वापरतात पण त्याला झालर ही शाब्दीक फुलोऱ्याची असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांची नियुक्ती केली तेव्हाही पवार हे जोशींचा उल्लेख श्रीमंत मनोहरपंत जोशी असा करीत. पवार यांचा रोख महाराष्ट्रात पुन्हा पेशवाई अवतरली हे दाखविण्याकडे होता.

तीन-साडेतीन वर्षांपूर्वी जेव्हा भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची निवड केली तेव्हा सुध्दा पवार यांनी फडणवीस यांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला. पवार यांच्या पोटात असलेला हा विषाद राज्यसभेवर भाजपने खासदार म्हणून संभाजी राजे यांना नियुक्त केल्यानंतर अधिक ठळकपणे उघड झाला. कारण प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले होते, पेशव्यांकडून छत्रपतींची नेमणूक पहिल्यांदाच होत आहे. या वाक्याच्या मागील अर्थ होता, फडणवीस हे पेशवे म्हणून सत्तेत आहेत आणि त्यांच्या शिफारशीवरुन छत्रपतींचे वारसदार संभाजी राजे हे राज्यसभेवर नियुक्त होत आहेत.

पवार हे विशिष्ट जात किंवा समाजातील मंडळींवर टीका करताना स्वतःच्या आंतरिक असलेला विषाद शब्दातून चलाखीने व्यक्त करीत असतात. याची आणखी दोन ठळक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील वीज टंचाई व भारनियमन विषयावर माधवराव गोडबोले यांनी एक अहवाल सादर केला होता. तेव्हा गोडबोले म्हणाले होते, पवार यांनी हा अहवाल वाचावा. त्यावर पवारांचे उत्तर होते, लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही ! पवार यांच्या या वाक्यात व्यक्त झालेले ते ठराविक लोक कोण होते ? हे सांगायची गरज नाही.

दुसरे उदाहरण हे शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर टीका करताना पवार यांनी वापरलेल्या वाक्याचे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासंदर्भात शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन उभारुन अनेक कारखान्यांमध्ये गाळप बंदची स्थिती निर्माण केली होती. शेट्टींच्या या आंदोलनात बहुजन असलेला शेतकरी सुध्दा सहभागी होता. पण, पवार यांना आंदोलनातील बहुजनांच्याऐवजी साखर कारखाने चालविणाऱ्यांमधील बहुजन दिसले. पवार हा संदर्भ घेवून बोलून गेले, शेट्टी ऊस दरासाठी साखर कारखाने बंद पाडत असताना, ते मराठ्यांच्या हाती असलेल्या कारखान्यांनाच टाळी लावत आहेत आणि वैश्य समाजाच्या हाती असलेलेल कारखाने जोमाने चालू आहेत. एखाद्या आंदोलनात आंदोलनकर्त्याची व कारखाने चालवणाऱ्यांची जात शोधण्याचे कामही पवार यांनी केले आहे. पवार यांनी गोडबोले व शेट्टी यांच्या विषयी वापरलेली भाषा त्यांच्या मनांतील विशिष्ट जात-समाज या विषयीचा रोख स्पष्ट करते.

पवार हे स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपूत्र किंवा वारसदार समजले जातात. यशवंतराव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधान तथा संरक्षणमंत्री असताना सुसंस्कृत राजकारणी म्हणून केवळ भारतातच नाही तर विदेशातही प्रसिध्द होते. कुठलाशा विषयावर एकदा स्व. आचार्य अत्रे यांनी मुंबईत जाहीर भाषण करताना चव्हाण यांचा उल्लेख षंढ म्हणून केला होता.  तेव्हा वस्तुस्थिती अशी होती की, चव्हाण आणि स्व. सौ. वेणुताई यांना मुलबाळ नव्हते. या मागील कारण माहीत नसताना अत्रे सभेत बोलून गेले होते. चव्हाण यांना अत्रेंचे ते वाक्य जिव्हारी लागले. पण त्यांनी अत्रेंची जात किंवा कूळ शोधून उत्तर दिले नाही. चव्हाण दाम्पत्य अत्रेंच्या घरी गेले. तेथे त्यांनी अत्रेंना वेणुताईंच्या पहिल्या गर्भपाताची कहाणी सांगीतली. चलेजावच्या चळवळीत यशवंतराव भूमिगत असताना वेणुताई गर्भवती होत्या. ब्रिटीशांच्या पोलीसांनी यशवंतराव यांचा ठावठिकाणा विचारायला वेणुताईंचा छळ केला. त्यात त्यांचा गर्भपात झाला. तेव्हा डॉक्टरांनी वेणुताईंना पुन्हा गर्भवती न होण्याचा सल्ला दिला. तो सल्ला चव्हाण दाम्पत्याने नंतर आयुष्यभर पाळला. हे वास्तव ऐकून अत्रे शरमेने मिंधे झाले. त्यांनी चव्हाण दाम्पत्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागीतली.

अत्रे हे नेहमी यशवंतरावांवर टीका करीत. आपल्या मराठा या दैनिकाचा अंक यशवंतराव यांना पाठवत. मात्र, अत्रे हे विखारी लिहतात हे लक्षात घेवून यशवंतरावांनी मराठा वाचणे बंद केले. आपल्या या कृती विषयी यशवंतराव म्हणाले, अत्रे हे चांगले साहित्यिक असल्याचे मी मानतो. पण अलिकडच्या त्यांच्या लिखाणामुळे माझा तो समज चुकू शकेल म्हणून मी मराठा वाचणे बंद केले आहे. (ही आठवण काँग्रेसचे नेते स्व. उल्हासदादा पवार यांनी यशवंतराव यांच्याविषयी भाषणात सांगीतली होती.)

यशवंतराव आणि शरद पवार यांच्यातील सुसंस्कृतपणाची तुलना वरील उदाहरणांमधून अनावधानाने होते. अत्रे हे यशवंतराव यांना बोचेल असे लेखन करीत पण यशवंतराव यांनी त्यावर विखार व विषाद व्यक्त केला नाही. मात्र फडणवीस यांनी निवडणुकांच्या खेळात पवार यांच्या पक्षाला वारंवार मात दिलेली आहे. तरी सुध्दा पवार हे फडणवीस यांचा उल्लेख बालिश मुख्यमंत्री असा शेलका शब्द वापरुन करतात. पवार यांची राष्ट्रीय राजकारणात बेभरवशाचे नेते म्हणून प्रतिमा आहे. ते बोलतात काही आणि करतात काही असे विरोधक म्हणतात. तरी सुध्दा फडणवीस यांच्या विषयीचा पवार यांनी केलेला उल्लेख लक्षात घेवून उपरोधाने म्हणावे लागते, शरद पवार नेहमीच खरे बोलतात !

संदर्भ -

१) तोरसेकर भाऊ / जागता पहारा ब्लॉग/ पेशवे, छत्रपती आणि जाणता राजा / http://bhautorsekar.in/पेशवे-छत्रपती-आणि-जाणता-र/

२) देशपांडे देविदास / न्यूजटेल / राजकीय सदर / सव्वा शहाणा फडणवीस / http://www.newstale.in/fadanvis/

३) फेसबुक वॉल / फैक्ट राईजर / https://m.facebook.com/chatrapatideshbhakta/

४) सामना दैनिक / अग्रलेख / शरद पवार हे बे भरवशाचे राजकारणी / http://m.marathi.eenaduindia.com/State/Mumbai/2014/11/19135149/sharad-pawar-unpridictable-samana-write-on-pawar-lier.vpf

2 comments: