Monday 2 October 2017

गांधी मुखातून गांधीवाद ...!!!

जळगाव येथील गांधीतिर्थमध्ये युवकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची भेट झाली. जवळपास दोन तास सोबत होतो. त्यांनी युवकांशी साधलेला संवादही ऐकला होता. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या सर्वसामान्य व सर्वमान्यपणाविषयी मी तुषारजींशी बोलत होतो. त्यांच्याशी झालेला हा संवाद माझ्यासाठी गांधी मुखातून गांधीवाद ऐकण्याएवढा आनंददायी होता.
जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्याशी मैत्री असल्याचे अनेक दृश्य व अदृश्य लाभ घेता येतात. ज्यांना जे देणे शक्य आहे, ते देण्याची तयारी त्यांची असते. या मैत्रिचा लाभ माझ्यासारखा पत्रकार चार चांगले मित्र जोडणे व मान्यवरांचा सहवास अशा स्वरुपात करुन घेतो. अशा व्यवहारात पत आणि प्रतिष्ठा टिकून राहते.

मध्यंतरी गांधीतिर्थमध्ये युवकांसाठी महात्मा गांधी विचारावर आधारित कार्यशाळा होती. युवकांना मार्गदर्शनासाठी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आले होते. तुषारजींनी स्वतःच्या नेतृत्वात गांधी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. जगभरात इतर कोणत्याही संस्था किंवा प्रतिष्ठानाला महात्मा गांधीजींचे नाव, चित्र, छायाचित्र, भाषणातील वक्तव्ये अथवा चित्रफित वगैरे वापरायची असेल तर त्यासाठी गांधी कुटुंबातील हयात काही वारसदारांची परवानगी घ्यावी लागते. त्यातील रॉयल्टी विषयक काही अधिकार तुषारजींकडे आहे हे मला वाचून माहित होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची संधी मी शोधत होतो. अशोकभाऊंच्या सूचनेमुळे तशी संधी अनायसे चालून आली.

महात्मा गांधींविषयी मला जुजबी माहिती आहे. गांधीजींची आत्मकथा मी वाचली आहे. पण गांधी एकदा, दोनदा वाचून समजत नाही. आचरणात आणणे तर दूरच. मग जो काही गांधी माहिती आहे तो सुध्दा काही मान्यवरांच्या भाषणातील तपशिल ऐकून. अशा अपुऱ्या माहितीवर तुषारीजींशी चर्चेचे धाडस नव्हते. पण युवकांशी संवाद साधताना ज्या साधेपणाने बोलत होते तो पाहून माझ्या मनांतील भिडस्तपणा दूर झाला.

तुषारजी म्हणाले, मध्यंतरी मी महात्मा गाधीजींवर लिहायचे ठरवले. पण लगेच काही लिहिण्याचे जमेच ना. वर्षभर काहीच झाले नाही. मग कधीतरी काही लिहिले. पण पुन्हा काम थंडावले. मला वाटायला लागले मी लिहू शकणार नाही. अखेर पाच वर्षांत मी गांधीजींविषयी लिहू शकलो. महात्मा हा सहज सोपा विषय नाही. मोहन नावाचा मुलगा महात्मा कसा झाला हे समजून घेण्याची स्थिती म्हणजे महात्मा गांधी कसे घडले हे समजून घेणे आहे.

तुषारजी पुढे म्हणाले, मध्यंतरी मी विदेशात महात्माजींवर बोलायला गेलो. तेव्हा माझी प्रकृती अवाढव्य होती. शिडशिडीत व्यक्तित्व असलेल्या गांधीजींचा मी वारस अवाढव्य आणि जीन्स घालणारा होतो. तेथे सूत्रसंचालन करणाऱ्याने महात्माजींच्या व्यक्तिमत्वाची तुलना माझ्याशी करीत व्यंगात्मक टीपणी केली. मला ती भाषा समजत नव्हती म्हणून श्रोते हसत असतानाही मी पण हसत होतो. तेव्हा नाराज झालेल्या द्विभाषक युवतीने मला तो प्रकार समजावला. भाषेच्या अज्ञानामुळे मला काही कळले नव्हते.

गांधीजींचा वारस असल्यामुळे आम्हाला जगभरात ओळख मिळाली, असे स्पष्ट करीत तुषारजी म्हणतात, पण लोकांची आमच्याकडे पाहताना अपेक्षा आम्हीच महात्मा आहोत अशी असते. महात्मा होणे हा वारसा होवू शकत नाही. लहानपणी मी शाळेत असताना इतिहाच्या तासाला स्वातंत्र्य चळवळ शिक्षक शिकवत असे. तेव्हा वर्गातील मुले माझ्याकडे पाहत, तेव्हा छान वाटत असे. पण आता महात्माजींचा वारसा म्हणून आमच्याकडून इतर अपेक्षा करणे योग्य ठरत नाही. माझ्या मुलांनाही असाच अनुभव येतो. एकदा एका शिबिरात सहभागी मुलीस जेव्हा आयोजकांनी तिला महात्माजींची वारस म्हणून ओळखले तेव्हा ती ओशाळली. असे वारंवार घडते. कोट्यवधी लोकांत एखादा महात्मा घडतो. तो वारसाने घडत नाही. याची जाणिव आम्हालाही आहे.

काँग्रेसी मंडळींनी महात्माजींचे चरित्र एका चौकटीत अडकवले हे मान्य करीत तुषारजी म्हणतात, मोहन ते महात्मा हाच प्रवास जर समजून घेतला तर महात्माजी कळतात. कारण मोहन हा प्रत्येकाच्या बालपणाचा भाग आहे. मी मोहन आहे आहे मला महात्मा व्हायचे आहे अशा सर्वसाधारणपणे गांधींजी समजून घेणे आवश्यक आहे.

यावर मी म्हटले की, गांधीजींचे व्यक्तिमत्व अगदी साध्या साध्या गोष्टीतून लोकांना समजावणे शक्य आहे का ? यावर तुषारजींनी मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, महात्माजींचे कार्य अलौकिक आहे. ते अगदी सर्वसाधारण करायचा प्रयत्न केला तर त्यातील महात्मा होण्याचा भागच संपून जाईल. त्यामुळे महात्मा गांधींना सिम्पल करायच्या नादात मोहनचे व्यक्तिमत्व खूजे होते. तसे केले तर मोहन वेगळा आणि महात्माजी वेगळे होतात.

चर्चेचा रोख नरेंद्र मोदी आणि चरखा याकडे गेला. यावर तुषारजी म्हणाले, खरे तर जे काँग्रेसला जमले नाही ते मोदींनी केले. पण आजच्या काळात मोदींनी समजावलेला महात्मा गांधी चुकीचा ठरू शकतो. महात्मा गांधी हे मोदींचे ब्रैण्ड होवू शकत नाही. महात्मा गांधींचे खरे व्यक्तित्व आजच्या जनतेसमोर जावे म्हणून मी सुध्दा मोदींच्या गांधी विषयक प्रकल्पात सहभागी होते. तसे करुन योग्य तेच गांधी मांडण्याची जबाबदारी माझ्यावर येते.

विषय आला नथुरामकडे. त्यावर तुषारजी म्हणतात, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देणार होते म्हणून बापुंची हत्या केली हा नथुरामचा व नंतर गोपाळ गोडसेचा दावा म्हणजे पश्चातबुध्दी (आफ्टर थॉट्स) आहे. कारण, पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देण्याची चर्चा सुध्दा तेव्हा झालेली नव्हती. वि. दा. सावरकरांनी हा मुद्दा नंतर नथुरामच्या मुखी घातला. बोलत नथुराम होता पण शब्द सावरकरांचे होते, असे तुषारजी ठामपणे म्हणतात.

तुषारजींशी गप्प करताना एक भन्नाट तपशिल त्यांनी दिला. ते म्हणाले, जगभरात जेव्हा हिंसाचाराचे थैमान डोके वर काढते तेव्हा महात्मा गांधींच्या वक्तव्यांचा आधार समाजमनाला शांत करुन धीर देण्याच्या कामी येते. उदाहरण म्हणजे जेव्हा अमेरिकेवर २६/११ चा हल्ला झाला त्यानंतर अमेरिकन प्रशासन आणि तेथील अनेक सामाजिक संस्थांनी गांधी फाऊंडेशनला मेल करुन महात्माजींची वक्तव्ये तपासून घेतली. अमेरिकन प्रशासन रोज असे मेल पाठवत असे. त्याचा उपयोग अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणात असे. अफ्रिकन देश, अरब देश येथूनही अशा प्रकारे विचारणा होते असेही तुषारजी म्हणाले.

बापुंनी दलितांना हरिजन म्हटले आणि ते दलितांना विशेष अधिकार द्यायला विरोध करीत होते असा तपशिल चर्चेत आल्यावर तुषारजी म्हणाले, एका बापुंच्या आश्रमात दलित जोडपे मुक्कामी होते. तेव्हा त्यांच्या बहिणीने बापुंना सांगितले, या दोघांना बाहेर काढा नाहीतर मीबाहेर जाते. तेव्हा बापुंनी बहिणीला बाहेर जायला सांगितले. पुण्यातही करार करताना दलितांना विशेष अधिकार द्यायला महात्मा गांधींचा विरोधच होता.

तुषारजी हे गांधी आणि भगतसिंग, गांधी आणि सुभाषचंद्र बोस, गांधी आणि आंबेडकर, गांधी आणि सावरकर, गांधी आणि नेहरु, गांधी आणि सरदार या विषयांवरही रंजक व लक्षवेधी माहिती देतात.

तुषारजींच्या मुखातून महात्मा गांधींचे चरित्र ऐकताना पुन्हा एकदा गीत रामायणातील काही ओळु बदलून गुणगुणण्याचा मोह होतो. अश्वमेघ यज्ञाच्या प्रसंगी रामचरित गाणारे लवकूश म्हणजे, पूत्र सांगती चरित पित्याचे असे गदिमा म्हणतात. तर तुषारजी जेव्हा महात्माजींविषयी बोलताता तेव्हा पणतू सांगती चरित आजोबांचे असे म्हणण्याचा मोह होतो.

गांधी गप्पांचा कट्टा

तुषारजींशी चर्चा करताना त्यांना जळगाव शहरात गांधी गप्पांचा कट्टा सुरु करण्याची कल्पना मांडली. जळगाव आता गांधीतिर्थमुळे ओळखले जाते. गांधी उद्यानही नूतन झाले आहे. तेथेही खुला गप्पाकक्ष तयार केला आहे. अशा वातावरणात गांधीविषयी जळगावातही गप्पा सुरु व्हाव्यात म्हणून हा गांधी गप्पा कट्टाची कल्पना सांगितली. समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी महिनाभरातून एकदा एकत्र येवून महात्मा गाधींविषयी वाचलेली माहिती इतरांना शेअर करतील जेणे करुन ५/५० जण गांधी विषयावर बोलू लागतील. अर्थात, ही कल्पना त्यांना भावली. पण गांधी गप्पा कट्टा सुरु होण्याविषयी मीच हमी देवू शकलो नाही.

No comments:

Post a Comment