नाथाभाऊंचा आज वाढदिवस. जवळपास
पाच दशकांचा राजकिय प्रवास नाथाभाऊ पूर्ण करीत आहेत. त्यातील किमान तीन दशके
नाथाभाऊंना पत्रकाराच्या नजरेतून अनुभवतोय. राजकारण व समाजकारणाच्या व्यासपीठावर
अनेक पद आणि प्रतिष्ठा स्वकर्तृत्वाने मिळून नाथाभाऊंचे व्यक्तिमत्त्व सद्गुण संपन्न
झाले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर समोर आलेल्या परिस्थितीत नाथाभाऊ कसे
वागले, बोलले आणि गप्प सुद्धा राहिले याचा एक दृश्यात्मक आलेख समोर येतो. ज्ञानेश्वरीत
सोप्या भाषेत स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे समजावली आहेत. नाथाभाऊंचे आजचे
व्यक्तिमत्त्व हे स्थितप्रज्ञ अवस्थेतील आहे असे वाटते. ज्याची बुद्धी पूर्णतः
स्थिर आहे, अशाच व्यक्तिला श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ म्हणतो ...
संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे सोप्या
भाषेत ज्ञानेश्वरीत निरुपण करताना स्थितप्रज्ञ अवस्थेची लक्षणे सांगितली आहे. ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा
पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ माणसाला
कोणतीही आशा, अभिलाषा
नसते. तो सदा तृप्त असतो. सुख व दुःख यामुळे त्याला आनंद
किंवा उद्वेग होत नाही. कासव ज्याप्रमाणे
आपले अवयव स्वतःच्या
इच्छेनुसार आवरून घेतो किंवा बाहेर काढतो त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ माणूस स्वतःची इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो.
राजकारण व समाजकारणाच्या
क्षेत्रात वावरणारा माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेला लवकर जात नाही. किंबहुना तशी
अवस्था त्याला प्राप्त होत नाही. कारण, तो स्वतः विविध प्रकारच्या व्यापात
गुंतलेला किंवा गुरफटलेला असतो. राजकारणातील माणसाला तर मोठ्या आणि मिळाले तर त्यापेक्षा
ही मोठ्या पदाची अभिलाषा नेहमी असते. मात्र, आज संपूर्ण महाराष्ट्रात राजकिय
क्षेत्रात स्थितप्रज्ञ या अवस्थेला पोहचलेल्या मोजक्या राजकारणी मंडळीत खान्देशी
मुलूखमैदान तोफ नाथाभाऊंचा समावेश आहे. नाथाभाऊंची ही अवस्था तूर्त त्यांच्या सर्व
आशा, अपेक्षा आणि ईच्छांना आवरुन घेणारी आहे. ती निश्चयाने आली आहे किंवा
परिस्थितीने आणली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात
पुन्हा मंत्री म्हणून परतीची नाथाभाऊंची एकमेव ईच्छा सध्या आहे. ही ईच्छा असताना
त्यांना स्थितप्रज्ञ का म्हणायचे ? असा प्रश्न विचारला जावू शकतो. अर्थात, त्याचे उत्तर सरळ
आहे. कौरवांसारख्या स्वकियांवर विजय मिळविण्यासाठी जेव्हा अर्जून रणांगणात आला
तेव्हा काही काळासाठी तो सुद्धा निराश झालेला होता. आपल्याच माणसांशी लढून विजय कसा
मिळवायचा असा प्रश्न कृष्णाला विचारुन अर्जूनाने शस्त्र खाली टाकले होते. त्यानंतर
जेव्हा कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तोच नंतर गीतोपदेश म्हणून प्रचलित झाला. अर्जुनाला
उपदेश करताना स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणेही कृष्णाने सांगितली. बुध्दी स्थिर ठेवून
स्वकियांशी लढ हाच खरा उपदेश त्यामागे होता. नाथाभाऊंची अवस्था आज अर्जुनापेक्षा
काय वेगळी आहे ? नाथाभाऊंचा लढा हा स्वकियांशी सुरूच आहे. केवळ आपले निर्दोषत्त्व सिद्ध
करण्यासाठी.
नाथाभाऊ यांच्या विचारांची
बैठक आधीपासून अध्यात्मिक किंवा वारकरी विचारांशी जवळखी साधणारी आहे. लहानपणी
भागवत कथा सांगण्यासाठी नाथाभाऊ कोथळी परिसारात जात. आमदार असताना नाथाभाऊ किर्तनही
करीत. कधीतरी मनमोकळ्या मुलाखतीत नाथाभाऊंनी स्वतःच मला हे सांगितले आहे. सांगायचा
मुद्दा एवढाच की, नाथाभाऊंची वैचारिक बैठक अध्यात्माची आहे.
अर्धशतकाच्या राजकिय व
सामाजिक वाटचालीत आनंदाचे व अपेक्षा भंगाचे अनेक प्रसंग नाथाभाऊंनी अनुभवले.
तेव्हा त्यांचे वागणे, बोलणे व गप्प राहणे हे स्थितप्रज्ञ अवस्थेत होते.
नाथाभाऊ पहिल्यांदा जेव्हा
आमदार झाले तेव्हा खान्देशातून भाजपचे एक-दोन आमदार निवडून येत. विधीमंडळात
बोलायची संधीही मिळत नसे. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर स्व. प्रल्हादराव
पाटील यांच्या गटाची पकड होती. जिल्हा बँक हे सहकाराचे सर्वोच्च शिखर होते. या
संस्थेत नाथाभाऊंना प्रवेश मिळू नये म्हणून संस्थांचे ठराव स्वीकारणे व नाकारणे
असे राजकारण होत असे. जिल्हा बँकेतील गैरव्यवहारावर बोलण्यासाठी नाथाभाऊंना
तासंतास बोट वर करावे लागे. संधी मिळालीच तर प्रसिद्धी माध्यमात बातम्या सुद्धा
येत नसत. अखेरिस नाथाभाऊ जळगावात येत व स्थानिक वृत्तपत्रातील प्रतिनिधींशी बोलून
विधीमंडळातील कामकाजाच्या बातम्या देत.
नाथाभाऊंचा उमेदीचा काळ हा
विरोधी पक्षातला आणि जन आंदोलनांचा होता. शेती आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर
नव्या नव्या पद्धतीची आंदोलने नाथाभाऊ आणि त्यांचे सहकारी करीत. अशाच प्रकारे एक
आंदोलन कपडे काढून करण्यात आले होते. सर्वसंग परित्याग अवस्थेतील.
महाराष्ट्रात पहिल्यांदा
शिवसेना-भाजपचे सरकार आरुढ झाले. नाथाभाऊंना मंत्री होण्यासाठी सहा महिने उशीरा
संधी मिळाली होती. भाजपच्या विस्तारात सिंहाचा वाटा असतानाही नाथाभाऊंना पदाने
हुलकावणी दिली होती. जळगावमधील काही जुन्या व्यक्तिंचा नाथाभाऊंविषयीचा फिडबॅक
पेंडींग होता. तो काळ नाथाभाऊंच्या संयमाचा होता.
पाटबंधारे मंत्री असताना
नाथाभाऊंनी महाराष्ट्राला विविध प्रकारच्या महामंडळांची देणगी दिली. महामंडळामुळे
सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढली. मात्र, याच महामंडळातील कामांच्या गैरव्यवहाराबद्दल
नाथाभाऊंवर कथित आरोप झाले. अर्थात, या मागे जळगाव जिल्ह्यातील नेतृत्वाच्या
संघर्षाची काळी किनार होती. याच माध्यमांनी नंतर नाथाभाऊंच्या कर्तृत्वाच्या
पुरवण्या प्रसिद्ध केल्या.
पोलीस विभागातील वरिष्ठ
पदांच्या भरती संदर्भात गैरप्रकारांचे एक प्रकरण नाथाभाऊंनी समोर आणले. त्यातील एकाच
कुटुंबातील अधिकाऱ्यांची काही काळ पदावरुन गच्छंती झाली. या विषयावरील वादविवादात
नाथाभाऊंची बदनामी करण्यात आली. तेव्हाही नाथाभाऊ शांत होते.
स्व. गोपिनाथ मुंडे
यांच्यानंतर विधीमंडळातील विरोधीपक्षनेता पद नाथाभाऊंना मिळाले. त्या काळात
त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या भूखंड घोटाळ्यांचे शेकडो प्रकरणे पुराव्यासह समोर
आणली. आपल्या बगलबच्चांची पोलखोल होते आहे हे लक्षात आल्यानंतर विरोधातील जेष्ठनेत्यांनी
नाथाभाऊंवर खंडणीखोर विरोधीपक्षा नेता अशा शेलका आरोप केला. नाथाभाऊ स्थितप्रज्ञ
राहिले.
स्व. निखीलच्या अकाली
मृत्यू प्रकरणानंतर नाथाभाऊ बराच काळ स्तब्ध व अबोल होते. पण, जेव्हा निवडणुकांचा
काळ सुरू झाला तेव्हा त्यांनी कौटुंबिक दुःख बाजूला सारून प्रचारात झोकून दिले.
स्व. निखिलच्या दुरावण्याचे अश्रू सुकवून टाकले.
रात्रंदिन प्रचारात
गुंतलेल्या नाथाभाऊंना नंतर विविध आजारांनी घेरले. मुत्रपिंडाचा आजार गंभीर होता.
डायलेलीस आणि पुन्हा प्रचार. रुग्णालयात जाण्याची धावपळ आणि पुन्हा प्रचार. अशा
स्थितीत स्वतःच्या आरोग्याची आबाळही नाथाभाऊंनी केली. एकदा या विषयावर नाथाभाऊ
जाहिरपणे हळवेही झाले. माझ्याच मरणावर टपून बसलेल्या लोकांच्या दुष्ट इच्छांपेक्षा
हितचिंतकांच्या सदिच्छा मला परत घेवून आल्या असे नाथाभाऊ जाहिरपणे म्हणाले. आजही
तो प्रसंग भावनांचा गलबला निर्माण करतो.
राज्यभरातील प्रचाराचा
धुराळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे राज्यात भाजप नेतृत्वातील सरकार
सत्तेत आले. तेव्हा नेतृत्वाची सुप्त इच्छा मनात होती. ते त्यांनी बोलूनही दाखविली
होती. पण तसे झाले नाही. पक्षाने त्यांची भरपाई करताना जवळपास १४ खात्यांचा
मंत्रीपदभार दिला. त्या काळात नाथाभाऊंनी सर्वच खात्यांचे जे निर्णय घेतले, ते
आजही जनतेच्या भल्याचे ठरत आहेत.
नाथाभाऊंवर विविध
प्रकारच्या आरोपांची मालिका एकाचवेळी सुरू झाली. आरोपांचे खंडन सुद्धा तेवढ्याच
गतीने झाले. पण, कधीकधी नियती प्रतिकूल डाव टाकते. शकूनीचे फासे उलटा कौल देतात.
पणाला लागलेली प्रतिष्ठाही गमावली जाते. अशावेळी स्थितप्रज्ञाचीच स्थिती कामाला
येते. नाथाभाऊंचा तो काळ सुरू झाला. सुरू आहे. शकूनीचे फासे फसवे होते, हेही आता
इतरांच्या लक्षात येते आहे. प्रतिष्ठेला नवी झळाळी मिळते आहे. हितचिंतकांच्या
मनातील, हृदयातील नाथाभाऊंचे स्थान आजही अभेद्य आहे.
नाथाभाऊंना मनापासून अभीष्टचिंतन ...
No comments:
Post a Comment