Saturday 5 August 2017

माध्यम पंढरीची अभ्यासवारी ...!!

माचवि चे कुलगुरु प्रा.डॉ. कुठियाला यांच्याकडून भेट
भोपाल शहर. मध्यप्रदेशची राजधानी. तलावांचे शहर. अजून एक ओळख. भोपाल हे माध्यमांची पंढरी सुध्दा आहे. भारतातील पत्रकारिता क्षेत्रातील विविध माध्यमांचे शिक्षण देणारे माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठ (माचवि), माध्यमांच्या क्षेत्रातील देशातला सर्वांत मोठा डीबी कॉर्प समुह हा भोपालमध्येच आहे. आणखी एक विशेष उल्लेख, भारतातील वृत्तपत्रांचे एकमेव असे माधवराव सप्रे स्मृती संग्रहालय सुध्दा भोपाळमध्येच आहे. मध्यप्रदेश सरकारने माध्यम नावाची सरकारी ॲड सर्व्हिस एजन्सी निर्माण करुन सरकारी माध्यमांचाही एक वेगळा प्रवाह निर्माण केला आहे. अशा या माध्यमांच्या पंढरीत अभ्यासवारीची एक अनोखी संधी मिळाली. निमित्त होते, पत्रकारितेच्या क्षेत्रात नविन काय घडते आहे हे पाहण्याचे आणि पत्रकारितेचे शिक्षक म्हणून भविष्यात कसे अध्यापन करावे याचा अंदाज घेण्याचे. 

खान्देश कॉलेज एज्युकेशन (खाकॉए) सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमारजी बेंडाळे आणि एम. जे. कॉलेजचे प्राचार्य यू. डी. कुळकर्णीसर यांच्या पाठबळामुळे भोपाळ आणि इंदूरमधील माध्यम समुहांचे कामकाज, माचविस माध्यम आणि सप्रे संग्रहालय पाहण्याची संधी मिळाली. एम. जे. कॉलेजमधील जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागात (जर्नालिझम विभाग) सध्या समन्वयक म्हणून कामाची जबाबदारी श्री. बेंडाळे यांनी सोपविली आहे. या विभागाची कामगिरी उंचावणे आणि खाकॉए सोसायटीच्या आगामी अमृत महोत्सव निमित्त सोशल मीडिया हाताळणे असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर आहे. श्री. बेंडाळे यांनी खाकॉए सोसायटीला एज्युकेश्नल एम्पायरचा चेहरा मिळवून दिला आहे. पारंपरिक शिक्षणासह अपारंपरिक शिक्षणाचे जवळपास ४०-४५ अभ्यासक्रम खाकॉए सोसायटीने सुरु केले आहेत. ३५ एकर क्षेत्रातील एम. जे. कॉलेजचे शैक्षणिक संकुल लवकरच अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करेल. श्री. बेंडाळे यांचा कौशल्याधारित शिक्षणातील नव्या पध्दती आणि गुणवत्तेचा दृष्टीकोन स्वीकारुन आम्ही चौघांनी सध्या जर्नालिझम विभागाची जबाबदारी स्वीकारली आहे. समन्वयक म्हणून मी, विभाग प्रमुख म्हणून विश्वजीत चौधरी आणि सहकारी म्हणून राजेश यावलकर व प्रविण चौधरी असे सोबत आहोत. या शिवाय, ओजस्वीनी कला विभागाचे प्राचार्य अविनाश काटे व वृत्तपत्र क्षेत्राचा अनुभव असलेले सुभाष तळेले असे सहा जण भोपाल व इंदूर अभ्यासवारीवर गेलो होतो.

पत्रिका कार्यालयात संपादक अमित मंडलोई यांच्यासोबत
इंदूर येथील पत्रिका माध्यम समुह हा सध्या कॉन्व्हर्जन्स फ मीडियाचा एकत्रित प्रयोग करणारा गृप आहे. तसेच इंटरनेट मीडियात भारतातील बहुविध भाषांमध्ये सर्व प्रकारच्या माध्यमात काम करणारा वेबदुनिया डॉट कॉम समुह आहे. या दोन्ही माध्यम समुहांसह डीबी कॉर्प, माचवि आणि सप्रे संग्रहालय अशी माध्यम वारी आम्ही पूर्ण केली. या दौऱ्याला आम्ही अभ्यासवारी म्हटले होते. मीडिया स्कूलचे टीचर्स म्हणून आमचा परिचय करुन देत होतो. माध्यमांमधील कामाच्या अनुभवाची शिदोरी प्रत्येकाजवळ आहे. शिवाय, अध्यापनासाठी लागणारी किमान पदव्युत्तर पदवीही आहे. तरीही आम्ही प्रशिक्षणार्थी शिक्षक बनून या अभ्यासवारीत माध्यमांच्या क्षेत्रातील नव्या आणि भन्नाट गोष्टी माहित करुन घेतल्या. तेथील मान्यवरांकडून अनुभवाचे दोन शब्द समाजावून घेतले. जे पाहिले व अनुभवले ते आता शिक्षण घेणाऱ्या युवकांना द्यायचे आहे. विद्यार्थी मुद्दाम म्हणत नाही. कारण, पत्रकारिता ही शिकून माहिती होते पण ती करायची असेल तर सरावातून अवगत होते हे माझे व्यक्तिगत मत आहे.

इंदूरची घंटागाडी
आमची अभ्यासवारी इंदूरमधून सुरु झाली. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाण्यांनी दिवस उजाडला. देशभरातून स्वच्छ शहराचा पहिला पुरस्कार मिळालेल्या इंदूरमधून कचरा कसा संकलित होतो ? हे आम्ही कचरागाडीजवळ जावून, बोलून व फोटो काढून अनुभवले. आम्ही शहराच्या मध्यवस्तीत म्हणजे राजवाडा परिसरात होतो. कचरागाडी पुढे आणि रस्ता झाडणारे मागे हे अनुभवत होतो. जे रस्ते दिसले ते चकाचक होते. कुठेही नाल्याचा घाण वास नव्हता. तेथूनच जळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांना मोबाइलवर संपर्क केला. आपली घटागाडी व इंदूरची स्वच्छता गाडीतला फरक सांगितला.

सकाळी ११ वाजता पत्रिका कार्यालयात पोहचलो. मध्यप्रदेशातील क्रमांक दोनचा माध्यम समुह कमी मनुष्यबळात विविध माध्यमांसाठी कॉन्व्हर्जन्स प्रकारात आशय तयार करणारी यंत्रणा किंवा इंटीग्रेटेड मीडिया रुम पत्रिका कार्यालयात आहे. युवा संपादक अमित मंडलोई यांनी आमच्याशी तब्बल दोन तास संवाद साधला. पत्रिकेची बलस्थाने, निर्भीडता आणि मालकाचा माध्यम हाच एकमेव व्यवसाय याविषयी त्यांनी माहिती दिली. इंटरनेटवर तयार होणाऱ्या आशयाची रोज मोजदाद कशी होते, हे त्यांनी सांगितले.

वेब दुनियात संपादक कर्णिक व सिसोदीया यांच्या सोबत
दुपारचे सत्र वेबदुनिया डॉट कॉमला होते. तेथे आशय व्यवस्थापन प्रमुख संदीप सिसोदीया, संपादक कर्णिक यांनी संवाद साधला. इंटरनेटवरील मीडियातील सर्व प्रकार विविध भाषांमध्ये हाताळणारे वेबदुनिया एकमेव आहे. आशय प्रकारातील शब्द, फोटो, व्हिडीओ आणि आलेख हा वेबदुनियाचा मूळ गाभा आहे. या शिवाय, ज्योतिष, अंकशास्त्र, तोडगे या आशयासोबत पर्यटनासंदर्भात वेब दुनियाचे बलस्थान आहे. तेथे भाषांतर कक्ष, स्टुडीयो, डिझाईन या बाबी जवळून पाहिल्या. 

माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठातून निरोप
दुसऱ्या दिवशी सकाळी भोपाळला पोहचून माचविच्या प्रांगणात आलो. तेथील मास कॉमचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अविनाश वाजपेयी हजर होते. तेच आमच्या संपर्कात होते. त्यांनी विद्यापीठाची सर्व माहिती दिली. भारतातले हे एकमेव विद्यापीठ मध्यप्रदेश सरकारच्या मान्यतेने चालते. मात्र, त्याला सरकारी अनुदान नाही. विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या संलग्नता शुल्कावरच या विद्यापीठाचा खर्च भागतो. या विद्यापीठाने जर्नालिझमचे विषय बीएसस्सी, एमएस्सी आणि एमबीए पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात तयार केले आहेत. सर्व वर्गात प्रवेश संख्या फुल्ल असते. पहिली तासिका ही पीडी म्हणजे पर्सनालिटी डेव्हलपमेंटची असते. वर्गातील मुले विविध गटात विभागलेली असतात. विविध विषयांवर चर्चा करुन ते प्रकल्प निश्चित करतात. माचविच्या प्रत्येक वर्गाची संगणक शाळा स्वतंत्र असून ॲपलच्या संगणकावर आणि सर्वोत्कृष्ट ॲपवर मुले प्रात्यक्षिके करतात. तेथील सर्व विभाग प्रमुखांनी अत्यंत आस्थेने माहिती दिली.

प्रा. संजय द्विवेदी यांच्याकडून पुस्तक भेट
आमच्या या अभ्यासवारीचा परमोच्च भेटीचा प्रसंग कुलगुरु प्रा. डॉ. ब्रिजकिशोर कुठियाला यांच्याशी चर्चेचा होता. चर्चेत मी सहज म्हणालो, पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रात्यक्षिके आधारित पत्रकार तयार व्हावेत. यावर कुठियालासर म्हणाले, केवळ प्रात्यक्षिकावर मॅकेनिक होता येते. अभियंता व्हायचे असेल तर पुस्तकी ज्ञान हवेच. नंतर ते असेही म्हणाले, तुम्ही केवळ कम्युनिकेटकर (संवादक) निर्माण करणार आहात की, पत्रकार ? याचा विचार करा ! त्यांनी आजच्या माध्यमातील अनेक बलस्थाने सांगितली. पत्रकारिता शिक्षणाचे काही वेगळे पैलू त्यांनी स्पष्ट केले. कुठियालासर हे मध्यप्रदेशातील अनेक पत्रकारंचे गुरु असून त्यांना दुसऱ्यांदा कुलगुरुपदाची मुदत वाढ मिळाली आहे.  माचवितर्फे प्रकाशित होणाऱ्या विविध प्रकाशनांचा संच त्यांनी आम्हाला भेट दिले. तेथील अभ्यासक्रमाची पुस्तके आम्ही खरेदी केली.

दैनिक भास्करजवळ संपादक गणेश साकल्ले यांचे सोबत
यानंतर सर्वाधिक आनंददायी भेट ही डीबी कॉर्पला झाली. देशात बहुमाध्यमी अग्रेसर समुह म्हणून भास्कर गृपचे नाव घेतले जाते. भास्करची भोपाल आवृत्ती कार्यालय आणि कार्पोरेट फिसला आम्ही गेलो. तेथे संपादक गणेश साकल्ले यांनी आम्हाला गृपची माहिती दिली. त्यानंतर विविध विभाग आणि तेथील कामकाज पाहिले. राष्ट्रीय व राज्यस्तर पाने कशी लावली जातात त्याची माहिती घेतली. संदीप देशमुख यांनी कार्पोरेट कामकाज समजावून दिले. संशोधन बेस असलेली किंवा अधिक माहितीपूर्ण पाने तयार करणे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे हा मुद्दा त्यांनी सांगितला. 

डीबी कॉर्पमध्ये फिरताना कॅन्टीनजवळ कॅरम दिसले. कर्मचाऱ्यांना कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी काही काळ करमणूक म्हणून ते ठेवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सर्वाधिक उत्कंठा दिव्य भास्कर डिजिटल आवृत्तीत आली. तेथे संपादक अनुज खरे यांनी उत्तम माहिती दिली. भास्करची वेब आवृत्ती स्वतंत्र आहे. आम्ही तेथे असताना चित्रपटावर आधारित पुरवणीवर होणारी व्हिडीओ कॉन्फरन्स अनुभवली. डीबी कॉर्पच्या सर्व प्रमुख मंडळींनी जेवणाचा आग्रह केला. एक गोष्ट नक्कीच नमुद करावी लागेल. महाराष्ट्रातील पत्रकारांपेक्षा मध्यप्रदेशातील ही सर्व ज्येष्ठ मंडळी अधिक सौजन्यशाली वाटली. (या भेटीचे इतर फोटो फेसबुकवर पाहावीत)

माध्यम कार्यालयात पुप्षेंद्र पाल सिंह यांच्या सोबत
दुपारुन मध्य प्रदेश माहिती व जनसंपर्क विभागाच्या अंतर्गत असलेल्या माध्यम या स्वतंत्र सरकारी एजन्सी कार्यालयात गेलो. तेथील विशेष कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्र पाल सिंह यांनी माध्यम यंत्रणेचे कार्य समजावले. चित्रपटातील अभिनेता होण्याची पर्सानिलीटी पुष्पेंद्रसर यांची आहे. मध्य प्रदेश सरकारला प्रसिद्धीची अनेक कामे करताना काही कामे ठेकेदारीवर व खुल्या पध्दतीने करावी लागतात. माध्यम ही सरकारी एजन्सी स्थापन करुन तिच्या मार्फत गुणवत्तापूर्ण आणि हव्या त्या खासगी एजन्सी कडून काम करुन घेता येते हा विषय त्यांनी समजावला. मध्य प्रदेश सरकारच्या प्रसिध्दीची अनेक कामे माध्यमच्या नेतृत्वात गुणवत्तापूर्ण झाल्याचे तेथील अनेक संच पाहून लक्षात आले. नर्मदा योजना व सिंहस्थाचे बूकलेट आकर्षक असल्याचे आम्ही अनुभवले. ग्रामीण मंत्रालयासाठी प्रसिद्धी पत्रके कशी छापली जातात, याचा थेट अनुभव घेतला.

माधवराव सप्रे संग्रहालयात
भोपाल अभ्यासवारीत नियोजन व सहकार्याचा फार मोठा सहभाग हा पुष्पेंद्र पाल, माचविचे प्रा. डॉ. अविनाश वाजपेयी, उज्जैनचे पत्रकार प्रतिक खेडेकर आणि भुसावळचे सुश्रूत जळूकर यांचा होता. पुष्पेंद्रसर यांच्या विनंतीवरून आम्हाला सप्रे वृत्तपत्र संग्रहालय पाहाता आले. सायंकाळी ते बंद होण्याची वेळ होती. आमच्या पाहणीसाठी तब्बल तासभर उशिराने ते बंद झाले.

दोन दिवसांच्या या अभ्यासवारीत आम्ही अनुभवांची शिदोरी भरुन आणली. पत्रकारितेत आम्हीही कार्यरत असताना इतर ठिकाणचे खूप नवे पैलू आम्ही सोबत आणले. आगामी काळात एम. जे. कॉलेजमधील जर्नालिझम विभाग हा अधिक प्रात्यक्षिक आधारित करायचा आहे. जळगावच्या माध्यम क्षेत्रात कार्यरत अनेकांना जोडायचे आहे. एक नक्की, हा जर्नालिझम विभाग मीडिया स्कूल करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे.

अधिक फोटो पाहा ... फेसबुकवर ...

https://www.facebook.com/dilipktiwarijalgaon/posts/10212543812544567

No comments:

Post a Comment