Thursday 31 August 2017

प्लास्टीक तांदुळाचे थोतांड ते कुभांड ...

भारतात एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपती दूध पीत असल्याची तद्दन फालतू बातमी टीव्ही माध्यमातून जगभरात दाखविली जाते. फोनच्या माध्यमातून ती अफवा देशभरात पोहचते. त्यानंतर घराघरातील तहानलेले गणपती गटागटा दूध प्यायला लागतात. टीव्ही आणि फोन माध्यमाद्वारे निर्माण झालेल्या या अफवेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.  
रात्री मानमोडीची साथ येणार अशी अफवा मोबाइल माध्यमातून खेड्यापाड्यात पोहचल्यानंतर महाराष्ट्रातील गावेच्या गावे रात्री १२ पासून पहाटेपर्यंत जागरण करीत असल्याचा अनुभव सुद्धा अगदी अलिकडचा. माध्यमांची जनतेपर्यंतची शीघ्र पोहच आणि त्यातून अनुभवाला येणारे अशा प्रकारचे सामुहिक किंवा सार्वत्रिक मुर्खाकारण आता रोजच्या जगण्याचा भाग होवून बसले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण याप्रमाणेच आता मुर्खाकारण असा नवा शब्दप्रयोग रुढ करायला कोणाचीही हरकत नसावी. सोशल मीडियातील विविध पर्यायी माध्यमांच्या अनिर्बंध वापरामुळे रोज नव्या अफवांचा जन्म आणि त्यांचे मोफत शीघ्र प्रसारण हे नित्याचे झाले आहे.

अशाच प्रकारच्या दोन अफवांनी अलिकडे जन्म घेतला आणि सोशल माध्यमातील रिकामटेकड्यांनी व्यापक समाज हिताचा अंधदृष्टीकोन बाळगून त्याचे मोफत प्रसारण सुरू केले. त्यापैकी पहिली अफवा आहे, प्लास्टीकची अंडी बाजारात आल्याची. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दुसरी अफवा आहे प्लास्टीकचे तांदूळ बाजारात आल्याची. सोशल मीडियातील आशयाच्या खरेपणाची शहनिशा करण्याची अक्कल नसलेली बिनडोक मंडळी या दोन्ही अफवा आणि त्यांच्याशी संबंधित व्हीडीओ अगदी गतीने प्रसारित (फास्ट फटर्वरड) करीत आहेत. मुळात प्लास्टीकची अंडी आणि तांदूळ यांच्या अस्तित्वाचे जागतिक थोतांड रचले गेले आहे. प्लास्टीक तांदूळ आपल्या जळगावात पोहचले असा दावा करणे हे त्यापुढचे कुभांड आहे.

प्लास्टीक तांदूळ जळगाव शहरात आला, तो शिजवला गेला आणि संबंधित दुकानदाराला जाबही विचारण्यात आला अशा आशयाचा मजकूर व्हाट्स ऍप माध्यमातून दोन-तीन दिवसांपूर्वी प्रसारित झाला. यासोबतच एक व्हीडीओ सुद्धा प्रसारित केला गेला. हा प्रकार एखाद्या धान्यविक्री करणाऱ्या फर्मविषयी खोट्या-नाट्या घटनेचे कुभांड रचण्यासारखा होता.


जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने जळगावात प्लास्टीक तांदुळ विक्री होत नाही, असा खुलासा करणारी जाहिरात वृत्तपत्रातून दिली आहे. महामंडळाचा हा प्रयत्न योग्य असून जनतेच्या मनांतील संभ्रम दूर करणारा आहे. महामंडळाने केवळ खुलासा करुन थांबू नये. ज्या व्यक्तिने प्लास्टीक तांदुळाचे कुभांड रचले त्याच्या विरोधात पोलिसात रितसर तक्रार देवून त्याला आयटी ऍक्टच्या कलमांनुसार अद्दल घडवावी. याचे कारण म्हणजे, जगभरात कुठेही प्लास्टिक तांदूळ अस्तित्वात नसल्याचा एकही पुरावा नाही. इंटरनेटवर प्लास्टीक तांदूळ अस्तित्वात आहे का ? असा इंग्रजीत प्रश्न विचारुन शोध घेतला तर प्लास्टीकचे अंडे आणि प्लास्टीकचे तांदूळ याविषयी जगभरात पसरलेल्या अफवांच्या (थोतांडच्या) लाटा समोर येतात. एवढेच नव्हे तर या संदर्भातील व्हीडीओ सुद्धा कसे फसवे आहेत याचे स्पष्टीकरण तज्ञांनी दिल्याचे दिसते. हा सर्व दस्तावेज लक्षात घेवून प्लास्टीक तांदुळाची अफवा पसरवून कुभांड रचणाऱ्यांच्या पार्श्वभागावर भरपूर फटके पोलिसांनी हाणायला हवेत.

जगभरातील कोणत्याही बनावट, खोट्या, नकली उत्पादनाविषयी चर्चा सुरू झाली की, त्याचे उगमस्थान हे प्रामुख्याने चीनमध्ये असते. भारतात एकेकाळी स्वस्त आणि डुप्लिकेट उत्पादनांच्या निर्मितीचे ठिकाण म्हणून उल्हासनगर मार्केटच्या नावाची चर्चा असायची. त्यानंतर दिल्ली मार्केट चर्चेत आले. अलिकडे चायना मार्केटची चर्चा असते. त्याप्रमाणेच चीनमधून भारतात प्लास्टीकचा तांदूळ आयात व्हायला लागला अशा बातम्या सन २०१५ पासून येण्यास प्रारंभ झाला. अशा प्रकारचा कृत्रिम तांदूळ गुजरातमध्ये सुरतमार्गे आला आणि तो वापरातही आला अशी चर्चा सुरू झाली. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्लास्टीकच्या तांदुळाचे एक संशयास्पद पाकिटही अन्न व भेसळ प्रतिबंधक यंत्रणेकडे दिले, अशीही बातमी आली. पण, त्या पाकिटाचे पुढे काय झाले किंवा त्यावर संबंधितांचा खुलासा काय, हे कधीही समोर आले नाही.

गुजरातमध्ये पोहचलेला प्लास्टीकचा तांदूळ नंतर आंध्र, तेलंगणा, उत्तरखंडमध्येही केवळ चर्चेत पोहचला. हैद्राबाद व मुंबईतही प्लास्टीक तांदूळ आल्याच्या बातम्या वृत्तपत्रांनी दिल्या. अर्थात, मुंबईतील सहाय्यक आयुक्त (अन्न) चंद्रशेखर साळुंखे यांनी अशा प्रकारच्या प्लास्टीकच्या तांदुळाचे अस्तित्व नाकारुन ती अफवा असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. या पलिकडे प्लास्टीक तांदुळाविषयी खात्रिशीर माहिती इंटरनेटवर मिळत नाही.

काही दैनिकांनी प्लास्टीक तांदूळ निर्मितीचा फॉर्म्यूलाही छापला आहे. प्लास्टीक दाणा (पीव्हीसी ग्रॅन्युअल्स), बटाटा आणि रताळे याचे मिश्रण तयार करुन प्लास्टीक तांदूळ तयार करण्यात येतो असे अनेक माध्यम समुहांच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे. गंमत अशी की, अशा प्रकारचे कृत्रिम तांदूळ उत्पादन करणारा कारखाना आहे कुठे ? त्याची वितरण व्यवस्था कशी ? प्लास्टीक तांदूळ हा खऱ्या तांदुळात भेसळ केला जातो की, थेट विक्रीला आणला जातो ? याचे उत्तर प्रसिद्ध बातम्यांमध्ये मिळत नाही.

एवढेच नव्हे तर प्लास्टीक तांदूळ पाण्यात टाकल्यावर तरंगतो, तो जड नसतो. खरा तांदूळ भांड्याच्या तळाशी जातो. प्लास्टीक तांदूळ शिजवल्यानंतर कडक राहतो, त्यात प्लास्टीकचा चिकट द्रव तयार होतो वगैरे दावेही प्रसिद्ध बातम्यांमध्ये आहेत. पण, अशा प्लास्टीकचा भात कोणाच्या घरी शिजवला गेला, तो खाण्यात आला, त्यावर इतर कार्यवाही झाली अशी तक्रार सध्या तरी समोर आलेली नाही.

प्लास्टीक तांदूळ निर्मिती मुद्दा एकाच कसोटीवर पूर्णतः भंपक ठरतो. ती कसोटी म्हणजे, बाजारात सध्या बासमती प्रकारातील सर्वसाधारण तांदूळ ६० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. सर्वसाधारण तांदूळ ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो आहे. प्लास्टीक तांदूळ निर्मिती करायची तर पीव्हीसी ग्रॅन्यूअल, बटाटे आणि रताळी आणावी लागतील. प्लास्टीक ग्रॅन्युअल सध्या ८० ते १२० रुपये प्रतिकिलो आहेत. बटाटा २० आणि रताळी २० रुपये प्रतिकिलो आहेत. म्हणजेच, प्लास्टीक, बटाटा व रताळी पासून तयार केलेला कथित प्लास्टीक तांदूळ निर्मितीचा खर्च हा सध्या बाजारातील विक्रीच्या संभावित किमतीपेक्षा जास्त जातो. समजा बासमती प्रकारातील प्लास्टीक तांदूळ वगळून सर्वसाधारण प्रकारातील प्लास्टीक तांदूळ तयार केला तर त्याचा निर्मिती खर्च प्रतिकिलो ८० रुपये असेल. त्याची विक्री ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने करावी लागेल. असा आतबट्ट्याचा व्यवहार कोणाला परवडणार आहे ? कृत्रिम उत्पादन किंवा भेसळीची वस्तू तयार करताना मूळ उत्पादन-वस्तुच्या किमतीपेक्षा नफा भरमसाठ मिळेल असे गणित संबंधित उत्पादक मंडळी मांडतात. प्लास्टीक तांदूळ निर्मितीत अशा प्रकारची शक्यता दुरान्वये सुद्धा नाही.

प्लास्टीक तांदुळाची अफवा आली कोठून याची कहाणी सुद्धा मजेदार आहे. सन २०१० मध्ये चीनमध्ये उचांग तांदूळ घोटाळा गाजला. सरकारी योजनेत जास्त दराचा व चांगल्या प्रतिचा तांदूळ पुरवठा करण्याचा ठेका मील चालकांना दिलेला होता. त्यांनी कमी किमतीचा व कमी दर्जाचा तांदूळ पॉलीश करुन पुरवठा केला. कमी दर्जाचा तांदूळ पॉलीश केल्यामुळे तो प्लास्टीक तांदूळ सारखा दिसत होता. त्यामुळे उचांग तांदूळ घोटाळ्यात पहिल्यांदा प्लास्टीक राइस हा शब्द वापरला गेला. मात्र, नंतर चीन मधील प्रशासनानेच तो तांदूळ कमी दर्जाचा व खाण्यालायक असल्याचे जाहिर केले.

सन २०११ मध्ये पुन्हा प्लास्टीक तांदूळ चर्चेत आला. द कोरिअन टाईम्सने या विषयावर स्टोरी करीत बाजारात प्लास्टीक तांदूळ आल्याचा दावा केला. मात्र, नंतर त्यांनीही अशा प्रकारे तांदूळ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले.

सन २०१६ मध्ये बीबीसी माध्यमाने नायजेरियात सुमारे २.५ टन प्लास्टीक तांदूळ जहाजातून नेताना जप्त केला अशा बातम्या दिल्या होत्या. मात्र, नंतर नायजेरियानेही दावा केला की, तो प्लास्टीक तांदूळ नसून कमी दर्जाचा व प्रदुषित (बॅक्टेरिअल इनफेक्शन असलेला) तांदूळ होता. याच काळात अफ्रिकेत प्लास्टीक तांदूळ तयार करण्यात येत असल्याचे व्हीडीओ व्हायरल व्हायला लागले. सेनेगल, ब्रुकिना, गॅम्बिआ प्रांतात हे व्हीडीओ फिरत होते. अर्थात, त्यामागील कारण असे होते की, तेव्हा अफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात होत होता. अफ्रिकेतील तांदूळ निर्यात रोखण्यासाठी प्लास्टीक तांदूळ निर्मितीचे थोतांड तेव्हा रचले गेले होते. ही बाबही नंतर सिद्ध झाली.

भारतात सन २०१५ च्या सुमारास प्लास्टीक तांदूळची अफवा आली. नंतर ती विस्तारत विस्तारत आज सन २०१७ मध्ये जळगाव शहरात प्लास्टीकचा तांदूळ पोहचला. त्याचा व्हीडीओ सुद्धा प्रसारित (व्हायरल) झाला आहे. आता प्रश्न हाच आहे की, निर्मिती खर्च प्रति किलो किमान ८० रुपये असलेला प्लास्टीकचा तांदूळ ४० ते ५५ रुपये दराने कोण विक्री करीत आहे ? किंवा बासमतीच्या किमतीत प्लास्टीक तांदूळ खाणारे कोण आहेत ?

प्लास्टीक तांदुळाची कहाणी अशी थोतांडपासून सुरू होवून कुभांडजवळ संपते. अशा मूर्खाकारणातील पात्रांच्या पार्श्वभागावर पोलिसांनी फटके मारायला नको का ?

तांदुळात काय असते ... ?

तांदुळ हा कार्बोहैड्रेट व प्रोटीन मिळून तयार होतो. त्यात स्टार्च कमी जास्त असण्यावर त्याचा लवचिकपणा अवलंबून असतो. स्टार्च जास्त असेल तर भाताचा गोळा चेंडू प्रमाणे उसळतो.

संदर्भ –