जळगाव मनपाचे माजी आयुक्त,
कुशल प्रशासक आणि नागपूरमधील स्मार्ट सीटी प्रोजेक्टचे सीईओ
डॉ. रामनाथ सोनवणे यांनी ब्रिटनमधील राजघराण्याच्या संदर्भातील अनेक दंतकथांची
नायिका ठरलेली लेडी डायना विषयी अत्यंत उत्कंठावर्धक आणि प्रत्ययकारी शब्दांत नाटक
लिहीले आहे. इंग्रजी भाषेत रचलेला हा नाट्यसंवाद "लेडी डायना द क्विन ऑफ हार्टस्" या नावाने अवघ्या ९८
पानांचा आहे.
सहज आणि सोप्या इंग्रजीत
नाट्यलेखनाचे कौशल्यपूर्ण काम रामनाथ सोनवणे यांना सहजपणे साधले आहे. लेडी डायनाची
कहाणी जगभरातील संवेदनशिल जनतेच्या मनाला हुरहूर व चटका लावणारी ठरली होती. जगभरात
राजे-रजवाडे खालसा झाल्यानंतरही
ब्रिटनने राजघराण्यांचा डामाडौल आजही परंपरा म्हणून जपला आहे. मात्र, अशा राजघराण्यातील मानवी प्रवृत्ती सुध्दा सामान्य
माणसांच्या घरातील प्रश्न घेवून मखमली पडद्यात वावरत असतात आणि त्यांच्या कौटुंबिक
समस्यांचे निराकरण घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयाने होते, हे लेडी डायना व प्रीन्स जॉर्ज यांच्यांतील
घटस्फोटाने जगाला दाखवून दिले होते.
एवढेच नव्हे तर प्रीन्सच्या
आयुष्यात दुसरी महिला म्हणून जुनी मैत्रिण पामेला आली आणि घटस्फोटीत डायनालाही नवा
मित्र इजिप्तच्या संपत्तीशहाच्या
घराण्यातील डोडी मिळाला हे सुध्दा
जगाने पाहिले. प्रीन्स आजही राजेशाही अविर्भावात जगतोय. मात्र, डायना आणि डोडी हे दोघे गूढ अपघातात ठार झाल्याने काळाच्या पडद्याआड गेले
आहेत. नियतीचे खरे नाट्य हे आहे. रामनाथ सोनवणे यांनी ते रंगमंचावरील नाट्यात
साकारले आहे.
डायनाची कहाणी रामनाथ
सोनवणे यांनी नाट्यरुपात उतरवली आहे. लेखक कवी मनाचे आहेत. कॅप्सूल नावाचा त्यांचा काव्यसंग्रह साहित्य
वर्तुळात चर्चित आहे. रामनाथ सोनवणे यांनी अत्यंत तरलपणे नाट्य लेखन केले आहे.
डायनाच्या आयुष्यातील जगाला माहित असलेल्या सामान्य प्रसंगासह काही काल्पनिक प्रसंग
नाट्य लेखनात ओघाने आले आहेत. मात्र ते कृत्रिम वाटत नाहीत. नाटकात पात्रे आहेत. मात्र लक्षवेधी पात्रे सहा आहेत नाटकाचा प्रारंभ पाप्पाराझी (अमेरिकेत सेलिब्रीटींच्या मागे धावून मसाला
स्टोरी शोधणारे फोटोग्राफर्स) आणि दैनिकाचा संपादक यांच्या संवादातून होतो. याला
पार्श्वभूमीच तशी आहे. कारण, घटस्फोटीता डायना डोडीच्या
रिलेशनशिपमध्ये आहे ही बातमी ब्रिटनच्या जनतेला आणि राजघराण्याला हादरवणारी असते.
त्या बातमीचे मूल्य तो फोटोग्राफर आणि संपादक जाणतो.
डायनाच्या लग्नापूर्वीच्या
मानसिकतेचा पटही नाटकात उलगडलेला आहे. राजघराण्यात राजकुमारी झालेली डायना
नैराश्यात काही काळ असते. राजकुमारी असण्याचा बुरखा व मानगुटावरील मुकूट तिला
सतावतो. याच मानसिकतेत डायनाने एकदा आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला असतो. पुढे
जगायचे कसे आणि कोणासाठी ? हा प्रश्न डायनाच्या समोर
आहे. तेव्हा तिला मार्ग सापडतो. समाजासाठी विश्वस्त होवून जगण्याचा निर्धार ती
करते. राजकुमारी होण्यापूर्वी ती अशाच घटकांसोबत राहिलेली असते. लग्नानंतरही तिला
समाजासाठी काही करावे असे वाटते. राजघराणे तिला यासाठी पाठबळ देत नाही. कारण,
तेथील राजघराण्यातील काही पाने आजही जनतेपासून अलिखीतच
आहेत. दुरावत जाणाऱ्या राजघराण्यापेक्षा डायनाला युध्दातील आपदग्रस्त किंवा
सामाजिक दुर्घटनेतील त्रस्त आपले वाटू लागतात. ती त्यांच्यात रमू लागते. डायनाला
नैराश्यातून बाहेर काढणारा डॉ. फ्रेऊड असतो. त्यांच्यातील संवाद प्रत्ययकारी आणि
संवेदनशिल आहेत. हे संवाद लेखकाने एखाद्या
निराशाग्रस्त महिलेच्या समुपदेशनाच्या अंगाने लिहीली आहेत. नाट्यातील काल्पनिकता
आहे ती या प्रसंगात. मात्र, ती कथानकासाठी गरजेची आहेत. त्या अनुषंगाने आलेले संवाद
हे समर्पक आहेत.
डायना सामाजिक कार्यात
रमते. एकाकीपणात तिला मित्रही भेटतात. त्यातून दंतकथा निर्माण होतात. पाप्पाराझ्झी
असे खाद्य माध्यमांना पुरवतात. डायनाचे मित्र म्हणून नावे चर्चेत येतात. तेव्हाच प्रीन्स जॉर्जही
जुन्या मैत्रिणीकडे ओढला गेलेला असतो. यात डायना ही जगासाठी दंतकथा होते. घटस्फोटाच्या कारणाची बीजे येथे पेरली जातात.
डायना व जॉर्जच्या घटस्फोटाची कहाणी नाटकातील एक उपकथानकातून उलगडते. ड्यूक आणि ड्यूचेस यांची ही कहाणी आहे. ड्यूक हा पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला स्वीकारुन नाते जपण्याचा प्रयत्न करतो.
मात्र, ड्यूचेस ही घटस्फोटाची मागणी करते. डायनाच्या
आयुष्यातही असाच प्रसंग आहे. पण, तेथे विवाहबाह्य संबंध
जॉर्जचे आहेत. राजकुमारी असण्याच्या दिखाऊपणाला तिलांजली देत लाजाळू डायना
जॉर्जकडे कठोरपणे घटस्फोट मागते. तेव्हा तिच्यातील कठेर महिला ठळकपणे समोर येते. ज्येष्ठ नाटककार विल्यम सेक्सपिअर याने विचारलेला प्रश्न
घेवून डायना आपल्या आयुष्यावरही प्रश्न चिन्ह लावते, माझेच भविष्य मी काळोखाचे करीत आहे. भविष्यात राणी होण्याची संधीच मी गमावून
टाकते आहे ! डायनाच्या व्यक्तिमत्वातले हे पैलू रामनाथ सोनवणे यांनी उत्तम संवादातून
मांडले आहेत. डायनाचे दुर्बल व गरीबांप्रति असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि जॉर्जचे
डायनाकडून असलेले विषय सुखाचे ईप्सिप्त हे लेखकाने नेमक्या संवादात उलगडले आहे.
सर्वच पात्रांचा संवाद हा प्रभावी आहे. नाटकाची गतीही उत्तम आहे.
भारतीय लेखकाने ब्रिटीश
राजकुमारीची दंतकथा सोप्या इंग्रजीत ताकदीने मांडली आहे. हे नाटक ॲमेझॉनवर अवघ्या ४९ रुपयांत विक्रीस आहे.
किंडलवर पेड स्वरुपात त्याचे वाचन करता येते. ॲमेझॉनवर वाचकांच्या प्रतिक्रिया सुध्दा
आहेत.
डॉ. रामनाथ सोनवणे - एम.ए.
एल.एल.बी पीएच. डी. मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषांवर
प्रभुत्त्व. कॅप्सुल काव्य संग्रह प्रकाशित. रामनाथ सोनवणे यांनी हिंदीत रचलेली साईभजने
सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल यांनी गायली आहेत.
नाटकाच्या अधिक माहितीसाठी
...
रामनाथ सोनवणे
यांचा मो. क्रमांक - +91 99674 40222
No comments:
Post a Comment