Sunday, 2 July 2017

आपण पत्रकार का व्हावे ?

प्रिंट, रेडीओ, टीव्ही आणि वेब अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्त माध्यमांसाठीचा बातमी स्वरुपातील आशय हा शब्द, ध्वनी, चित्र आणि चलचित्र स्वरुपात असतो. या आशयाची निर्मिती करणारा घटक हा पत्रकार असतो. पत्रकारासोबत आशय संकलन, संपादन आणि सादरीकरण करणारी यंत्रणा असते. ही यंत्रणा यंत्र, तंत्र आणि विज्ञानाचा वापर करीत वाचक, श्रोता व प्रेक्षकाला समजेल अशा स्वरुपात आशय निर्मिती करते. लोकांना म्हणजेच जनतेला समजेल असा आशय निर्माण करुन तो सादर करणे यालाच जनसंवाद म्हणतात. उत्तम प्रकारे जनसंवाद करुन सर्वोत्तम प्रकारचा कृतिशील जनप्रतिसाद मिळवायचा असेल तर सर्व प्रकारची कौशल्ये आत्मसात असलेला आणि त्याचा वापर करु शकणारा पत्रकार हवा.
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात भाषा, साहित्य, संस्कृती, दृश्य कला, समाज विज्ञान, तंत्र विज्ञान, पर्यावरण, भूगोल, इतिहास, कायदा, क्रिडा, पर्यावरण अशा नागरी जीवनशैलीशी संबंधित अनेक विषयांचा समावेश होतो. या विषयांची प्राथमिक माहिती आणि त्यांचा मानवी जीवनशैलीतील वापर, उपयुक्तता आणि परिणाम याचे अध्ययन पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात करता येते. म्हणजेच समाज जीवनाशी संबंधित सर्वाधिक विषयांचा अभ्यास पत्रकारिता शिकताना करावा लागतो.

शैक्षणिक भाषेत समजून घ्यायचे तर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात माध्यम सिद्धांत, बातमीदारी, संपादन, माध्यम समीक्षण, जनसंपर्क आणि जनसंवाद, शोध पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधन, ग्राफिक डिझायनिंग, जाहिरात सिद्धांत, दूरचित्रवाणी अभ्यास, चित्रपट अभ्यास, माध्यम कायदे, माध्यम संस्थांचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय जनसंपर्क, माध्यम अर्थशास्त्र, माध्यम निर्मिती, माध्यम आणि संस्कृती, विकास संवाद, जाहिरात संवाद आणि व्यवस्थापन, विपणन, माध्यम नियोजन, फोटोग्राफी, स्थिर व चल फोटोमुद्रण, वेब आणि आधारित माध्यमे असे किमान २०० वर विषयांचा अभ्यास करता येतो. माणसाला चौकस करणारा आणि चौफेर ज्ञानाची कवाडे उघडणारा पत्रकारितेचा अभ्यासक्रम आहे.

पत्रकारितेचे अभ्यासक्रम प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अशा प्रकारात आहेत. जळगाव येथील सुप्रसिध्द एम. जे. कॉलेजमध्ये एम. ए. (मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम) हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येते. सध्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून दि. ८ जुलै २०१७ ला अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी काय आहेत ? याचाही विचार आवश्यक आहे. याचे उत्तर म्हणजे, पत्रकारितेचा अभ्यासक्रम विशिष्ट कौशल्ये आत्मसात करुन पूर्ण केला तर खासगी स्वरुपात आणि सरकारी सेवेत रोजगार व स्वयं रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सरकारी क्षेत्रात राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागात जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयातील माहिती संचालक जिल्हाधिकारी, क्षेत्रीय प्रचार कार्यालये येथे माहिती सहाय्यक पासून तर इतर वरिष्ठ पदांसाठी एम. ए. पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना संधी मिळू शकते. प्रसार भारतीच्या बहुतांश पदांवरही पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.

खाजगी क्षेत्रांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये सुध्दा जनसंपर्क अधिकारी नेमले जातात. कंपनी क्षेत्रासह सहकार क्षेत्रातही बाह्य जगातील ग्राहक, उपभोक्ता किंवा वापरकृर्ता यांच्याशी संवाद साधायला जनसंपर्क अधिकारी हवे असतात. बाह्य जगातील हितचिंतक, गुंतवणूकदार, पुरवठादार अथवा ठेकेदार यांच्याशी सुसंवादाची जबाबदारीही जनसंपर्क अधिकाऱ्यांची असते. म्हणजेच जनसंपर्क अधिकारी हा कंपनी, संस्था अथवा व्यक्तिसाठी नाक, कान, डोळे आणि मेंदू बनून कार्य करतो.

एखादी व्यक्ति राजकारणी, समाजकारणी, अभिनेता, क्रिडापटू, उद्योजक अथवा व्यावसायिक आशा कोणत्याही प्रकारातील मान्यवर (सेलिब्रीटी) असेल तर त्यांच्यासाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून किम करण्याची संधी पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना असते.

चित्रपट, प्रिंट, टीव्ही, वेब आदी माध्यमांमध्ये आशय निर्मितीचे कार्य पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती कौशल्याने करु शकते. या माध्यमांमध्ये शब्द, चित्र, ध्वनी आणि चलचित्र नोंदणी पासून त्याचे संकलन, संपादन, मांडणी, सादरिकरण व प्रसारण असे कार्य पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती करु शकते. पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना वृत्तपत्र, चित्रपट, टीव्ही, मालिका निर्मिती संस्था किंवा जाहिरात संस्थांमधून रोजगार विषयक संधी असते. शिवाय, अशा प्रकारच्या सेवा खासगी स्वरुपात देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकते.

नोकरी, रोजगार व स्वयंरोजगाराच्या सर्व प्रकारच्या संधी या वाढती लोकसंख्या, जनतेच्या गरजांविषयक कार्याची सरकारवर वाढणारी जबाबदारी आणि विस्तारणारी बाजारपेठ यावर अवलंबून असतात. त्यामुळे नागरी गरजेशी संबंधित सरकारी योजनेचा प्रचार प्रसार किंवा उद्योग, व्यापार, व्यवसायशी संबंधित सेवा, उत्पादन याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आज प्रत्येक घटकाला जनसंपर्काची गरज आहे. अशा गरजांची पूर्तता करण्यासाठीची भाषा, तंत्र विषयक कौशल्ये पत्रकारितेच्याच अभ्यासक्रमात आहेत. म्हणूनच पत्रकारिता हा अभ्यासक्रम सर्वाधिक रोजगाराभिमुख आहे.

एम जे कॉलेज ...
नैक द्वारा अ श्रेणी प्राप्त कॉलेज ...
आयएसओ ९००१ ः  २००८ प्रमाणपत्र प्राप्त ...
युजीसी तर्फे कॉलेज अॉफ पोटेन्शिअल गौरव प्राप्त ...

No comments:

Post a Comment