Friday, 23 June 2017

येसूबाई - प्रत्येक महिलेने वाचावी अशी चरित्रात्मक कादंबरी ... !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक घटनांचे संदर्भ नव्याने लिहीण्याचे प्रयत्न होत आहेत. जुने, नवे ऐतिहासिक दस्तावेज आणि त्यांच्या सत्यतेबाबतची खात्री करुन काही विषयांची नव्याने मांडणी करण्यात येत आहे. पूर्वी लिहीलेल्या शिवचरित्रावर भाट, शाहिर, कवी आणि लेखकांच्या जाती, धर्माचा शिक्का मारुन एकांगीपणे व विशिष्ट हेतूने त्यांनी लेखन केल्याचा दावा केला जात आहे. शिवचरित्राचे पुनर्लेखन करण्याच्या निमित्ताने इतिहास संशोधकांचे नवे चेहरे समोर येत आहेत.

 
महाराष्ट्रातील सर्वांत बुजूर्ग नेते शरद पवार यांनीही शिवचरित्राच्या पुनर्लेखनाची पाठराखण करीत शालेय शिक्षणात आतापर्यंत चुकीच्या माहितीवर आधारलेले  शिवचरित्र शिकविण्यात आले असे मत जाहीरपणे मांडले आहे. शिवचरित्राच्या नव्या मांडणीचा चलाखीने वापर आता राजकिय हेव्या-दाव्यांसाठी, जात-समाज यांच्यातील भांडणासाठी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, काही घटनांविषयीचे दावे-प्रतिदावे सोडले तर अख्खे शिवचरित्र हे स्फूर्ती व प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या-अडचणींचे उत्तर शिवचरित्रात आहे. आव्हानात्मक स्थितीत छत्रपती कसे वागले ? हे समजून घेतले तर समस्याग्रस्तांना सावरण्याचा मार्ग हमखासपणे शिवचरित्रात मिळतो.

शिवरायांचे चरित्र लेखन हे माँ जिजाऊंना समजून व जाणून घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. किंबहुना जिजाऊंच्या बालपणापासून शिवचरित्राचा प्रारंभ होतो. शिवरायांच्या जन्मापासून तर जिजाऊंच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवचरित्रातील प्रत्येक घटनेवर जिजाऊंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. शिवचरित्र हे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतरही संपत नाही. त्यापुढील रणसंग्राम हा संभाजी राजांचा आहे. सिंहाचा हा छावा कपट-कारस्थानातून मारला गेला. मात्र, तेथेही शिवचरित्राला पूर्णविराम देता येत नाही. कारण, त्यानंतर शिवचरित्राची पाने ही बंदीवान राणी येसूबाईच्या संघर्षाने लिहिली जातात. शिवचरित्राचा अभ्यास केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापुरता करणे म्हणजे जिजाऊ, संभाजी राजे आणि येसूबाईच्या चरित्रावर अन्याय करणारे ठरु शकते. ती शिवचरित्राशी प्रतारणा ठरु शकते.

शिवचरित्रातील काही प्रसंगाविषयी दावे-प्रतिदावे आहेत. पण, जिजाऊ आणि येसूबाईच्या संघर्षात्मक आणि धीरोदात्त चरित्र लेखनाविषयी कोणताही दावा-प्रतिदावा करता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्यावे. कारण, माँ जिजाऊ व शिवरायांच्या सानिध्यात व संभाजी राजांसोबत स्वराज्याचा प्रत्येक लढा व संघर्ष जवळून अनुभवणाऱ्या येसूबाईचे व्यक्तीमत्त्व हे भारतीय स्त्री व्यक्तिमत्त्वांच्या संग्रहात सर्वांत अव्वलचे चरित्र आहे. याविषयी कोणीही दुमत मांडू शकत नाही.

शिवचरित्राच्या पुनर्मांडणीला पाठींबा देताना जेष्ठ नेते शरद पवार यांनी अफझल खान वधाविषयी दावा केला आहे की, शिवाजी राजांनी खानाचा वध स्वराज्याचा शत्रू म्हणून केला. मुस्लिम सरदार म्हणून नाही. यासोबत पवार असेही म्हणाले की, खानाच्या छावणीत असलेला खानाचा निष्ठावंत कृष्णाजी कुळकर्णी यालाही शिवाजी राजांनी ठार मारले कारण, तो सुद्धा स्वराज्याचा शत्रू होता. पवार यांनी अत्यंत चलाखीने खानाचे मुस्लिमपण बाजुला सारले आहे. मात्र, कृष्णीजीचा उल्लेख करताना त्याच्या जात-समाजाच्या लोकांना शिवाजी राजांच्या विरोधकांचा मुखवटा चढवून टाकला आहे.

शिवचरित्राच्या नव्या मांडणीत कृष्णाजी कुळकर्णीच्या जात-समाजावर अनेक वादातीत प्रसंगांचे खापर फोडले जाते. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात निष्ठेने जबाबदारी सांभाळणाऱ्या कारभाऱ्यांपेक्षा कृष्णाजीचा समाज म्हणून विशिष्ट वर्गाला लक्ष्य करीत खलनायक म्हणून रंगवले जात आहे.

अफझल खानाच्या भेटीप्रसंगी शिवरायांवर वार करणारा कृष्णाजी कुळकर्णी होता हे द्वेषबुद्धीने सांगितले जाते. परंतु संभाजी राजांचा क्रूरपद्धतीने खून झाल्यानंतर मोगलांच्या ताब्यात ३० वर्षे बंदीवान असलेल्या येसूबाईंची सुटका पहिला पेशवा तथा बाळाजी विश्वानाथ भट यांनी आपल्या मुत्सद्देगिरीतून केली हे सांगायला नवी मांडणी करणारे सोयीने विसरतात. हे संदर्भ अभ्यासल्याशिवाय शिवचरित्र पूर्ण होत नाही. अशा संदर्भाविषयी कोणाचे आक्षेपही नाहीत.


खरे तर हा लेखन प्रपंच जळगाव येथील लेखिका सुलभा राजीव यांच्या येसूबाई या कादंबरीचा परिचय करुन देण्यासाठी आहे. वर्षभरापूर्वी बाजारात आलेली ही कादंबरी सध्या दुसऱ्या आवृत्तीच्या छपाईसाठी गेली आहे. शिवरायांच्या सूनबाई आणि संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई यांच्याविषयी इतिहासात फारशी पाने लिहीलेली नाहीत. त्यामुळे त्यांचा जीवनसंघर्षाचा प्रचार-प्रसार फारसा नाही. संभाजी राजांना पत्नी येसूबाई यांच्यातील संसारिक व व्यवहारिक गुणांची जाणिव होती. म्हणूनच त्यांनी श्रीसखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई असा उल्लेख करीत येसूबाईंच्या सन्मानार्थ खास राजमुद्रा तयार करुन घेतली होती. येसूबाई सोज्वळ, सात्विक, सोशिक, शांत आणि खंबीर होत्या. जिजाऊ व शिवाजी राजांच्या पश्चात झंजावाताप्रमाणे आयुष्य जगललेले संभाजी राजे यांच्या प्रत्येक यश-संघर्षात येसूबाई निश्चल व अविचल होत्या. जिजाऊ आणि शिवरायांच्या संस्कारांची जपवणूक करीत त्यांनी आपल्या आयुष्याला स्वमर्यादांचे सुरक्षा कवच घातले. हे कवच होते म्हणूनच येसूबाई संभाजी राजांच्या पश्चात ३० वर्षे मोगल्यांच्या बंदीवान असूनही खंबीरपणे जगू शकल्या. पूत्र शाहू यांचा सांभाळही त्यांनी धीराने केला.

लेखिका सुलभा राजीव यांनी येसूबाईचे चरित्र लेखन करताना भाषा ही शिवकाळास साजेशी ठेवली आहे. लेखन ओघवत्या शैलीत असल्यामुळे ५४३ पानांची कादंबरी कुठेही रेंगाळत नाही.

अगदी लहान वयातच शृंगारपुराच्या शिर्केंची ही कन्या भोसलेंची सून होते. माँ जिजाऊ आणि शिवाजी राजे यांच्या तालिमीत शंभुराजे व येसूबाईला संसारि, सामाजिक व राजकिय शिक्षण मिळते. जिजाऊंच्या नंतर येसुबाईंच्या शब्दाला तेवढाच मान-सन्मान आपोआप मिळत राहिला. येसूबाईंच्या चरित्रावर ही कादंबरी असली तरी ती काल्पनिक व शब्द बंबाळ नाही. इतिहासातील अस्सल दस्तावेज व पुराव्यांच्या जवळ जाणारे व त्या प्रसंगातील जिवंतपणा प्रत्ययकारीपणे उभे करणारे येसूबाईचे हे वास्तव चरित्र आहे.

लेखिका सुलभा राजीव यांनी आनंदमयी (डॉ. आनंजीबाई जोशी यांच्या जीवनावरील नाटक), समर्पित (पंडिता रमाई यांच्या जीवनावरील नाटक), वादळातील दीपस्तंभ (संतती नियमनाचा प्रचार करणारे र. धो. कर्वे यांच्या जीवनावरील नाटक) यासह कॅन्सरवर आन्सर या पुस्तकाचेही लेखन केले आहे. येसूबाई ही कादंबरी प्रॉलिफिक पब्लिकेशन (जळगाव) यांनी प्रकाशित केली आहे. कांदबरीची दुसरी आवृत्ती अक्षरधारा बुक गॅलरी (पुणे), पुस्तकपेठ, बुकगंगा इंटरनॅशनल बुकडेपो, साकेत प्रकाशन (औरंगाबाद), अजब पुस्तकालय (कोल्हापूर), नवसाहित्य बुक डेपो (बेळगाव) तसेच इंटरनेटवर बुकगंगा डॉट कॉम तसेच ई बुक रुपांतरणही उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment