Sunday, 4 June 2017

शेतकरी संघटना भाजपच्याच गळी !

शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा करुन संपात फूट पाडल्याचा आरोप करुन जयाजी सूर्यवंशीची संपूर्ण जातकुळी काढली जात आहे. गणोजी शिर्के किंवा सूर्याजी पिसाळ संबोधून त्याचा रावसाहेब दानवे केला जातोय. साला शब्द उच्चारुन दानवे अडचणीत आल्यानंतर त्यांच्यासाठी जी भाषा वापरली गेली तीच आता जयाजीसाठी आहे. दानवेंचीही जातकुळी काढली गेली होती. मराठा मूकमोर्चा संदर्भात संभ्रम निर्माण करणारी एक जाहिरात पुण्यातून प्रसारित झाली होती. हे सर्व संदर्भ पुन्हा ताजे झाले.

जयाजी असे का वागला ? याचा तटस्थपणे शोध घेतला तर शरद जोशींच्या मूळ शेतकरी संघटनेच्या नावावर फूटीची बांडगुळेच पोसली गेली हे लक्षात येते. स्वतः जोशी व इतर फुटकळ नेत्यांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली, हा ही इतिहास आहेच. जयाजी हा त्याच वंशकुळातला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला १९७९-८० च्या काळात शरद जोशींचे शेतकरी संघटन अस्तित्वात आले. तो काळ शरद पवार, कॉ. शरद पाटील व शरद जोशींचा होता. १९८५ मध्ये काँग्रेस विरोधात एकवटलेल्या विरोधकांना सोबत घेवून पवार पुलोद सरकारचा प्रयोग करायला निघाले होते. तेव्हा तिघे शरद एकत्र होते. पवारांनी संगत केल्यामुळे तेव्हाचा जनसंघ महाराष्ट्रात पोहचला. जनसंघ म्हणजे भाजपचा पहिला चेहरा. मात्र नंतर पवार काँग्रेसवासी झाले आणि सत्तेत बसल्यानंतर शेतकरी संघटना सरकार विरोधात उभी राहू लागली.

शेतकरी संघटना वाढू लागल्यावर पवार यांनी जोशींची जातकुळी काढून शेती न करणाऱ्या बामणाचे शेतकरी संघटन अशी जोशींची कुचेष्टाही केली होती. पवार-जोशी यांच्या शेतीविषयक दृष्टीकोनात खूप फरक होता. शरद जोशी भारताची विभागणी इंडिया आणि भारत अशी करीत. पवार सत्तेची विभागणी सरकार व सहकार अशी करत. जोशी पिकांच्या उत्पादनासाठी खर्चाधारित भाव मागत. पवार सरकारी हमी भावाची शिफारस करीत. नंतरच्या काळात काँग्रेस दुबळी झाली. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार आले. तेव्हा शरद जोशींना भाजपने राज्यसभेचे खासदार केले. शेतकरी संघटना भाजपच्या गळी पहिल्यांदा अशी लागली.

भारतातील शेतकरी संघटनांचा इतिहास तसा खूप जूना आहे. पण देशाच्या पातळीवर आपणच शेतकरी नेता आहोत हे बिंबवण्यासाठी महेंद्रसिंग टिकैत यांनी नवीदिल्लीत शेतकरी आंदोलनस्थळी शरद जोशींना व्यासपिठावरून खाली ढकलून दिल्याचा प्रकारही घडला होता. जोशींवर वाजपेयी सरकार मेहरबान असल्याचा टिकैत यांना रोष होता.

शरद जोशी भाजपशी जवळीक करताहेत हे पाहून राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत आदी काही दुय्यम फळीतील मंडळी शेतकरी संघटनेतून बाहेर पडली. त्यांनी शेतकरी संघटना स्वाभीमानी हा पर्याय सुरु केला. पश्चिम महाराष्ट्रात शेट्टींना जनाधार मिळाला. शेट्टी हे जिल्हा परिषद सदस्य नंतर आमदार पुढे खासदार झाले. दरम्यान स्वाभीमानी संघटनेत अजून फूट पडली. रघुनाथदादा पाटील गटातून प्रदीप पाटील गट वेगळा झाला.

शरद जोशी यांनी भाजप सोबत जायला विरोध करुन शेट्टींनी सवतासुभा उभारला होता. नंतर त्यांनी ही यू टर्न घेतला. तीन वर्षांपूर्वी 2014 मध्ये लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत शेट्टी-खोत हे भाजपसोबत राहीले. सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये शेट्टी यांना केंद्रीय मंत्रिपद हवे होते. ते काही जमले नाही. राज्यात विधानसभा जिंकल्यानंतर स्वाभीमानी संघटनेला बक्षिसी म्हणून फडणवीस सरकारमध्ये खोत यांना राज्यमंत्री पद बहाल करण्यात आले. तेव्हापासून शेट्टी-खोत यांच्यातील मतभेद सुरू आहेत. भाजपने खोत यांना मंत्रीपद देऊन शेतकरी संघटनेत फुटीची बीजे पेरली. अशा प्रकारे  दुसऱ्यांदा शेतकरी संघटना भाजप गळी लागली. शेट्टी-खोत यांच्यातील मतभेद शेतकरी संपानंतर झालेल्या चर्चेतही दिसले.

आता फडणवीस सरकारने शेतकरी संप मागे घेण्यासाठी जयाजी सूर्यवंशीचा वापर केला. तेव्हा शेतकरी संघटना तिसऱ्यांदा भाजपच्या गळी लागली. जयाजीची जातकुळी मांडताना तो शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप असा प्रवास करुन आला व भाजप नादी लागला असे सांगितले जात आहे. इतिहासातील संदर्भ पाहिले तर शेतकरी संघटनातील नेत्यांनी नेहामी भाजपशी जवळकी केलेली आहे. यात आज गैर वाटण्याचे कारण काय ?

No comments:

Post a Comment